आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Political Marketing By Deepak Patve, Divya Marathi

राजकारणातील मार्केटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉलिटिकल मार्केटिंग आणि पॉलिटिकल ब्रँडिंग या दोन संकल्पना या वेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतून प्रकर्षाने समोर आल्या आहेत. आधी त्या नव्हत्या असे नाही; पण या वेळी त्या सर्वसामान्यांपर्यंत ठळकपणे पोहोचल्या आहेत. तसं प्रत्येकच निवडणुकीत पॉलिटिकल मार्केटिंग होत आलं आहे. त्यामुळे त्यात नवीन काय, असा प्रश्न काहींना पडू शकतो. किंबहुना, कोणत्याही निवडणुकीचा पायाच मुळी मार्केटिंग आहे, असंही कोणी ठामपणे सांगेल. निवडणुकीसाठी उमेदवारी करणारे सारेच आपल्या चांगुलपणाचा, कार्यक्षमतेचा आणि ध्येयधोरणांचा प्रचार करतात, तेच त्यांचं मार्केटिंगच असतं. अगदीच खोलात जाऊन चर्चा करायची म्हटली तरी, एखाद्या गटाचा, समूहाचा नेता म्हणून आपल्याला मान्यता मिळावी, यासाठी आपल्या क्षमता आणि ताकद दाखवून देण्याचं आणि पटवून देण्याचं तंत्र आदिम काळापासून वापरलं जात आहे, हे तर आम्ही लहानपणापासून शिकत आलो आहोत. त्यालाच आज आपण ‘मार्केटिंग’ असा शब्द वापरतो. असं जर असेल, तर सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील मार्केटिंगची इतकी चर्चा कशासाठी?
मार्केटिंग अर्थात, विपणन म्हणजे काय? आपली वस्तू किंवा सेवा घ्यायला आणि त्या बदल्यात आपल्याला अपेक्षित असलेला मोबदला द्यायला एखाद्याला किंवा अनेकांना तयार करणे म्हणजे विपणन, अशी ढोबळ व्याख्या करता येईल.
हिमालयात जाऊन (जिथे प्रचंड थंडी असते) फ्रिजर विकून येणं हे खरं मार्केटिंग, असं मानलं जातं. म्हणजे काय, तर एखाद्याला वस्तूची गरज नसतानाही ती वस्तू त्याच्या किती उपयोगाची आहे, हे जो पटवून देतो आणि विकत घ्यायला लावतो, त्याला ख-या अर्थाने विपणन जमले, असे म्हटले जाते. अर्थात, यात खोटे बोलून वस्तू अथवा सेवा विकणे अभिप्रेत नाही. जे काही सांगायचे आहे ते इतक्या प्रभावीपणे सांगायला हवे की, समोरच्याला ते पटलेच पाहिजे, यात विपणनाचे कौशल्य आहे. आधुनिक मार्केटिंगची व्याख्या समजली की, सध्या सुरू असलेल्या पॉलिटिकल मार्केटिंगची इतकी चर्चा का होते आहे, हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.

सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नरेंद्र मोदींच्या पॉलिटिकल मार्केटिंगकडे आधी पाहू. त्या तुलनेत राहुल गांधी यांच्या पॉलिटिकल मार्केटिंगची स्थिती कशी राहिली, याचीही चर्चा करू. भारतीय घटनेने संसदीय लोकशाहीची देणगी देशवासीयांना दिली आहे. या प्रकारच्या राज्यपद्धतीत दोन किंवा दोनापेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांमधून जनतेने आपले प्रतिनिधी निवडून संसदेत पाठवायचे असतात. ज्या राजकीय पक्षाचे सर्वाधिक उमेदवार संसदेत निवडून दिले जातात, त्या पक्षाला सरकार स्थापनेची संधी दिली जाते. प्रत्येक राजकीय पक्षाची आपली अशी विचारधारा असते, धोरण असते, विकासाचा कार्यक्रम असतो. त्यामुळे त्या त्या परिस्थितीत कोणता पक्ष देश व्यवस्थित चालवू शकेल, याचा विचार करून मतदार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मत द्यायचे, ते ठरवत असतो. असे असतानाही नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरण, त्याचे चिन्ह आणि केलेली कामे यांचा प्रचार न करता आपण मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये काय केले, ते सांगण्यावरच अधिक भर दिला होता. त्यामुळेच नरेंद्र मोदी हे पक्षातील हुकूमशहा आहेत, एककल्ली आहेत आणि पक्षापेक्षा स्वत:ला मोठे समजणारे आहेत, असा प्रचार त्यांच्या बाबतीत सुरू झाला आहे. विरोधकच नव्हे, तर त्यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेतेही आता खासगीत असेच म्हणू लागले आहेत. दुसरीकडे मात्र मोदींचा हा प्रचारच भारतीय जनता पक्षाला तारक ठरेल, असे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळेच मोदींच्या मार्केटिंगची चर्चा सुरू आहे, आणि राहुल गांधी यांच्या मार्केटिंगची तुलनाही सुरू आहे. काय नेमकं सांगितलं, दाखवलं, म्हणजे वस्तू स्वीकारली जाईल, हे ज्याला कळतं त्याला मार्केटिंग कळतं. नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांचा कमी आणि गुजरातमध्ये त्यांनी केलेल्या कामांचाच प्रचार जास्त केला, हे आपण पाहिलं. अनेकांना ते खटकत होतं; पण त्यांनी आपल्याऐवजी पक्षाचा प्रचार अधिक करायचं ठरवलं असतं, तर त्यांना आता जे यश मिळणार आहे तेवढं मिळालं असतं का, हा प्रश्नच आहे. कारण पक्षाला प्राधान्य देताना त्यांनी जे काही सांगितलं असतं त्यावर जनतेने किती विश्वास ठेवला असता? एनडीए सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने जी जी आश्वासने दिली होती, त्यातली प्रमुख आश्वासने पूर्ण झालीच नाहीत. उदाहरणार्थ, मंदिर वही बनायेंगे, असं सांगून त्यांनी एक वातावरण निर्मिती केली होती. साडेचार वर्षांत मंदिर काय, मंदिराची एक वीटही तिथे आली नाही. अन्य आश्वासनांची गोष्टच वेगळी. त्या तुलनेत मोदींना गुजरातविषयी सांगण्यासारखं खूप होतं, ज्याचा त्यांनी प्रचारात सकारात्मक वापर केला आणि भाजपाच्या पूर्वीच्या आश्वासनांचा मतदारांना विसर पडायला लावला. नेमकं काय सांगायचं आणि काय नाही, हे मोदींना माहीत होतं म्हणून त्यांच्या पॉलिटिकल मार्केटिंगची इतकी चर्चा आहे.

deepakpatwe@gmail.com