आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Politician Dress Code By Deepak Patve, Divya Marathi

देहबोलीचा राजकीय प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ अशी एक म्हण आहे. त्यानुसार राजकारणात कपड्यांना किती महत्त्व आहे, हे आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलं. कपडे आपला पहिला प्रभाव पाडतात आणि आपली देहबोली (बॉडी लँग्वेज) दुसरा प्रभाव पाडते. त्यामुळे शरीरभाषेकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा कपड्यांमुळे पडलेला प्रभाव देहबोली काही क्षणांत धुळीला मिळवू शकते.


देहबोली म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं, तर आपल्या शारीरिक हालचालींतून समोरच्या व्यक्तीला मिळणारे संदेश किंवा संकेत म्हणजे, आपली शरीरभाषा. उदाहरणांतून ते अधिक स्पष्ट होऊ शकेल. काही व्यक्तींना पाहिल्याबरोबर काही क्षणांत आपण प्रभावित होतो. असं का होतं? कारण त्या व्यक्तीची देहबोली आपल्याला त्या व्यक्तिमत्त्वाविषयी काही बाबी सांगून टाकते. म्हणजे, ती व्यक्ती खंबीर आहे, तिच्यात आत्मविश्वास पुरेपूर भरला आहे, ती जिद्दी आहे, शूर आहे, इत्यादी इत्यादी. आपण का प्रभावित झालो, हे विचारलं तर कदाचित इतक्या सा-या बाबी आपल्याला सांगता यायच्या नाहीत; पण आपल्या मनाने त्यांची नोंद केलेली असते. हे सारं त्या व्यक्तीच्या हालचालींवरून दिसतं. हालचालच कशाला, केवळ बसणं, केवळ उभं राहणं, चालणं यातूनही समोरच्या व्यक्तींवर प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही बसता कुठे आणि कसे? तुम्ही उभे कसे राहता? चालता कसे? पाहता कसे? प्रतिक्रिया(रिअ‍ॅक्शन) कशी असते? या बाबी तुमची प्रतिमा बनवत जातात. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विचार करायचा, तर यात आणखी काही बाबी जोडाव्या लागतील. कारण राजकारणासाठी विशिष्ट व्यक्तिमत्त्वाची गरज असते. राजकारणासाठी म्हणण्यापेक्षा राजकारणात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी त्यांची अधिक आवश्यकता असते, असे म्हणता येईल. आता तर हे क्षेत्र इतकं पुढे गेलं आहे की, तुमचा लूक कसा असावा, हे सांगणारे सल्लागार बाळगले जाऊ लागले आहेत. अर्थात, तेवढ्या टोकाला जाण्याइतकी संवेदनशीलताही या बाबतीत अपेक्षित नाही!


आपली देहबोली कशी असावी, हे आपण नक्कीच ठरवू शकतो. त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळेच कमी असलेली शारीरिक उंची, काळा रंग, डोक्यावर असलेले टक्कल राजकारणातील यशाला अडसर ठरलेले नाहीत, हे अनेक राजकारण्यांनी दाखवून दिले आहे. त्यांची उदाहरणे देण्याची आवश्यकता नाही. असल्या गोष्टींचा न्यूनगंड वाटता कामा नये, हीच अशा व्यक्तींसाठी यशाची पहिली पायरी असते. या पहिल्या पायरीच्या वरची पायरी गाठायची, म्हणजे आपल्या देहबोलीने प्रभावित करण्याची क्षमता मिळवणे. आपल्या अंगकाठीला शोभेल, असा समकालीन स्वच्छ पोशाख आणि निर्दोष देहबोली असली की व्यक्तिमत्त्व प्रभावी बनतं, यात शंका बाळगण्याचं कारण नाही. त्यावर मोहोर चढते, ती उत्तम भाषेने. तुमची भाषा लाघवी, ओघवती, शुद्ध आणि प्रभावी असेल, तर समोरच्यांच्या मनात तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छबी उमटल्याशिवाय राहत नाही. काही जणांना राजबिंडे म्हणता येईल, असे व्यक्तिमत्त्व लाभलेले असते. उंचापुरा देह, भव्य कपाळ, गोरा रंग, दाट आणि काळे केस इत्यादी. असे असतानाही देहबोलीतील दोषांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावहीन होते किंवा हास्यास्पदही ठरते. कारण असे नैसर्गिक व्यक्तिमत्त्व लाभले असतानाही आत्मविश्वासाचा अभाव असेल, न्यूनगंड असेल, तर त्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत नाही. हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू पडते. आपण बसतो कसे आणि कुठे, उभे राहतो कसे आणि कुठे, या बाबी आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकतात, हे ब-याच जणांच्या लक्षातच येत नाही. याचा अर्थ असा नाही, की प्रभाव पाडण्यासाठी नेहमी इतरांपेक्षा उच्चासनावरच बसायचे किंवा एक पायरी वर उभे राहायचे. उलट, असे केल्याने इतरांपासून तुटण्याची, दुरावण्याची शक्यता अधिक असते. मग बसणे आणि उभे राहण्याचा प्रभाव कसा पडतो? तर त्याला अनेक पैलू असलेले संदर्भ आहेत. समजा, वर वर्णन केल्याप्रमाणे राजबिंडे व्यक्तिमत्त्व लाभलेली एक व्यक्ती अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावायला आली आहे. विधी सुरू असेपर्यंत ती व्यक्ती मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली किंवा ते शक्य नसेल तर तिथे असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींजवळ जाऊन उभी राहिली आणि त्यांच्याकडे त्या मृत व्यक्तीविषयी चर्चा करत राहिली, तर ते स्वाभाविक म्हटले जाईल; पण ती व्यक्ती तिथे येऊन एका कोप-यात एकटीच उभी राहिली, कोणाशी बोलली नाही, कोणाकडे पाहून नमस्कारासारखे अभिवादन केले नाही, तर तिची तिथली उपस्थिती इतरांना खटकायला लागेल. इतरांमध्ये जाऊन उभी राहिली; पण उभे राहताना स्थिर नसणे, शरीर वाकडे करून उभे राहणे, एक पाय दुमडून उभे राहणे, समपातळीत नसलेल्या जागेवर त्याच पद्धतीने उभे राहणे, असे करायला लागली तर त्या व्यक्तीच्या राजबिंडेपणाचा प्रभाव कमी झाल्याशिवाय राहणार नाही.


deepakpatwe@gmail.com