आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एज्यु कॉर्नर: दुस-यांना मदत करा..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यावर चाललेला डोंबा-याचा खेळ फार कुतूहलतेने मी पाहत होते. त्यांची ती कला, लवचिकता पाहून डोळ्यांचं पारणं फिटत होतं. तेवढ्यातच माझी नजर जवळच बसलेल्या त्याच्या छोट्याशा मुलावर गेली. एवढ्या भरउन्हात घालायला कपडेही नसल्यामुळे लागत असलेल्या चटक्यांनी त्या मुलाला किती वेदना होत असतील, या विचाराने गहिवरून आले. क्षणाचाही विलंब न करता मी कपाटातील लहान मुलांचे कपडे काढले, त्या डोंबा-याला इशारा करून वरून पिशवीतून फेकले. त्यांनी त्या पिशवीतील कपडे नीट न्याहाळले आणि चक्क एक चांगला कपड्याचा जोड तिथेच फेकला आणि तो तिथून निघून गेला. माझाच माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एवढी मिजास… मला एवढा राग आला की त्या क्षणीच मी मनाशी ठरवून टाकलं की, यापुढे मी कधीच कोणाला मदत करणार नाही. गरजू व्यक्तींना तुम्ही कितीही व कोणत्याही प्रकारे मदत केली तरी त्यांना त्याची कदर नसते हा सतत मिळालेला मला अनुभव होता. बस! आता पुढे नाही.

बरोबर ना? तुम्हीही अशा प्रसंगी असाच विचार कराल ना? परंतु काही वेळानी माझ्या डोक्यातील राग जेव्हा शांत झाला त्या वेळी घडलेल्या प्रसंगाचा, अनुभवाचा मी बारकाईने विचार केला आणि त्या वेळी माझ्या डोक्यात जे विचार आले त्यांनी माझी विचार करण्याची वृत्ती व प्रवृत्तीही बदलून टाकली आणि हेच विचार आज मला तुमच्यासमोर सादर करायचे आहेत.

दुस-यांना मदत करण्याची वृत्ती बाळगावी ते दोन गोष्टींकरिता. पहिली गोष्ट म्हणजे दुस-यांना मदत करण्याची तुमची वृत्ती आहे, परंतु मला मिळालेल्या अनुभवाप्रमाणे जर तुम्हालाही अनुभव आला तर तुम्ही विचार कराल, मी का बरं मदत करावी? परंतु असा विचारही मनात आणू नका. कारण दुस-यांना मदत करण्याची वृत्ती तुमची आहे, परंतु आवश्यक नाही ना की समोरच्याकडेही मदत स्वीकारण्याची वृत्ती असेलच. मग आपण आपली वृत्ती का बरं सोडावी? एकदा एक गुरुजी आपल्या शिष्याबरोबर नदीच्या किना-यावरून प्रवास करत असतात. त्या वेळी एक छोटासा विंचू पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे गुरुजींच्या निदर्शनास येते. ते पटकन जाऊन त्याला हातात पकडून किना-यावर ठेवतात. त्या वेळी तो विंचू त्यांना दंश करतो आणि पुन्हा पाण्याच्या दिशेने जातो. पुन्हा गुरुजी त्याला हातात पकडून ठेवत असताना तो विंचू त्यांना दंश करतो. असे दोन-तीन वेळा होते. या प्रसंगाने चक्रावलेला शिष्य त्यांना विचारतो, हा विंचू प्रत्येक वेळी तुम्हाला दंश करतोय तरी तुम्ही त्याला का वाचवत आहात! त्यावर हसून गुरुजी त्याला उत्तर देतात, ‘बाळा, विंचवाची प्रवृत्ती आहे दंश करण्याची आणि माझी प्रवृत्ती आहे वाचवण्याची, मदत करण्याची. जर विंचू आपली मूळ प्रवृत्ती सोडत नाही तर मी का बरं सोडावी?
काय, मिळाले ना तुम्हालाही उत्तर! दुस-यांना मदत करण्याची वृत्ती बाळगणे हा आपला चांगलेपणा असतो. तेव्हा आपण ही वृत्ती बदलू नये. समोरच्या व्यक्तीकडे मदत स्वीकारण्याची वृत्ती आहे की नाही, त्याला मिळालेल्या मदतीची कदर आहे की नाही हे विचारच कटाक्षाने टाळावे. कारण आपली वृत्ती ही प्रसंगाप्रमाणे बदलता कामा नये. वाईट अनुभव आले तरी निराश होण्याचे काहीच कारण नाही. कारण आपल्या चांगुलपणापुढे सर्व वाईट गोष्टींना हार मानावीच लागणार आहे. तेव्हा आपण जिंकत आहोत, हा विचार मनाशी बाळगा. कारण ज्या वेळी तुम्ही हा सकारात्मक विचार बाळगाल, तेव्हा समोरच्या माणसांचा, त्यांच्या वाईट विचारांचा, प्रवृत्तीचा, अगदी तुम्हाला मिळालेल्या वाईट अनुभवाचाही तुमच्यावर काहीही एक परिणाम होणार नाही. उलट अशा प्रसंगाला हसत हसत सामोरे जा. कारण लक्षात ठेवा, चूक तुमची नाहीच. तुमची वृत्ती जर चांगली आहे, मग अनावश्यक राग का बरं बाळगावा?