आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब होण्‍याच्या स्पर्धेची लाजिरवाणी कहाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागाहून येणा-याने
जावे कुठे बोल?
ओलांडून गेले मला
प्रारब्धाचे बोल...
सर्पाने घातलेल्या वेटोळ्यांत फसलेल्या आयुष्याची सुटका करून घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानासमोरील रांगा संपता संपत नाहीत. भविष्यात संपण्याची काही चिन्हे नाहीत. कारण जिथे जगण्याचीच सुरक्षा नाही, तिथे आता अन्न-सुरक्षा योजना लागू झाली आहे. आजच्या घटकेला ग्रामीण भागातला शेतकरी, कामगार, शेतमजूर कधी सावकाराच्या, तर कधी बँकांच्या दाराशी कटोरा घेऊन उभा आहे. त्याच्या हातातील कटोरा जाण्याची शक्यता कमीच आहे. कारण आता मायबाप सरकारने विविध लोककल्याणकारी योजना सुरू करून त्यांना कायमस्वरूपी रांगेत उभे राहण्यास भाग पाडले आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत भ्रष्ट मानसिकता असलेल्यांमध्ये गरीब होण्याची लाजिरवाणी स्पर्धा सुरू झाली आहे. ‘गरिबी हटाव’ या एका घोषणेने सत्तरच्या दशकात इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्या. कारण गरिबी हा शाप आहे, अशी समाजाची धारणा होती. गरिबीतून वर येण्याची प्रत्येकाची धडपड होती. त्यासाठी प्रसंगी काबाडकष्ट करण्याची वा कष्टाचे डोंगर उपसण्याची गरीब माणसाची तयारी होती. गरिबीवर मात करत आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडून देदीप्यमान यश मिळवलेल्या आणि नंतर श्रीमंत झालेल्या उद्योजक आणि जीवन व्यवहाराच्या विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या कहाण्या इतरांनाही लढण्याचे बळ देत होत्या. माणसाचे जीवन समृद्ध करत होत्या. गरिबी प्रयत्नांती दूर करता येते, हे सिद्ध झाले होते. गरिबीत वा दारिद्र्यात खितपत पडलेल्या अनेकांनी नंतर श्रमाच्या श्रीमंतीतून समृद्धीचे मळे फुलवले. कारण समाजात श्रमाला खरोखर प्रतिष्ठा होती. आता सारे बदलले आहे. आता गरिबी कुणाला दूर करावीशी वाटत नाही. कारण गरीब राहण्याचे फायदे आता लोकांना कळायला लागले आहेत आणि मायबाप सरकार व सारे काही फुकट देण्याची आश्वासने देणा-या राजकारण्यांकडून गरिबीचे फायदे व्याजासह वसूल करण्याची कला समाजातील भ्रष्ट मनोवृत्तीच्या लोकांना अवगत झाली आहे. आज ग्रामीण भागातील वास्तव भीषण आहे. मायबाप सरकारने उघडलेल्या पॅकेज इंडस्ट्रीमुळे लोकांची श्रम करण्याची सवयच तुटत चालली आहे. ग्रामीण भागात तग धरून असलेली श्रम संस्कृतीही आता शेवटच्या घटका मोजत आहे. पण त्याचे सोयरसुतक कुणालाच नाही. सारे काही फुकटात मिळते आहे, म्हटल्यावर कुणी कशाला काम करील? साध्या अन्न सुरक्षा योजनेचे घ्या. दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ, एक रुपया किलो ज्वारी, बाजरी आणि मका, प्रति माणशी प्रति महिना पाच किलो धान्य आणि अंत्योदय योजनेत प्रति कुटुंब दरमहा 35 किलो धान्य! अन्न सुरक्षा योजनेचे राज्यात 8 कोटी 77 लाख लाभार्थी असून त्यापैकी 7 कोटींना योजनेचा लाभ मिळणार आहे. उर्वरित 1 कोटी 77 लाख लाभार्थींना सरकार 1100 कोटी खर्च करून बीपीएल दरात धान्य देणार आहे. एवढे सर्व इतक्या स्वस्तात मिळाल्यावर काम करण्याची मानसिकता कशी राहणार नाही, प्रश्नच आहे. यापूर्वीही स्वस्त धान्य मिळत होतेच; आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्याचे व्हायचे ते दुष्परिणाम होत आहेत. ग्रामीण भागात सालगडी वा सालदार मिळणे उंबराच्या फुलाइतके दुुर्मिळ झाले आहे. शेतीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे -
सवाल ये नहीं की शिशा टूटा या नहीं
सवाल ये है की पत्थर कहाँ से आया
पण याचा फेर तर दूरच राहिला; साधा विचार करायलाही कुणी तयार नाही. कारण समोर निवडणुका आहेत. आता तर शौचालयसुद्धा सरकार ‘नरेगा’ योजनेमधून फुकटात बांधून देणार आहे. अगदी आतापर्यंत त्यात लाभार्थीचाही हिस्सा राहत असे; पण आता विहिरींपासून शौचालयांपर्यंत सारे काही मायबाप सरकारच बांधून देणार आहे. शिवाय, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत उपचारही मोफत मिळताहेत. या योजनेत विविध प्रकारच्या 971 शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. पिवळे, अंत्योदय, केशरी व अन्नपूर्णा रेशनकार्डधारक कुटुंबातील लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येत आहे. एकूणच तुम्हाला सारे काही घरपोच आणि नाममात्र दरात भरपूर मिळेल, अशी सोय झाली आहे. अट एकच आहे - तुम्ही गरीब असले पाहिजे... म्हणूनच आताच्या घडीला सर्वाधिक गर्दी बीपीएल यादी ठरवण्याच्या ग्रामसभेला असते. कारण बीपीएल यादीत नाव आले की, पोरीच्या बापासारखे सरकारच तुमच्या दाराशी ‘हात’ जोडून उभे राहते. फारसे कष्ट न घेता सा-या सरकारी योजनांचे लाभार्थी होता येते. ग्रामीण भागातील शाळकरी मुलींना सायकल वाटप करण्याच्या तीन योजना आहेत. या शिवाय जिल्हा परिषदेमार्फत शेती उपयोगी अवजारे, गाई, बैल, शेळी वाटप करण्यात येते. इरसाल प्रवृत्तीच्या लोकांनी या योजनांचा फायदा कसा लाटला, याचे किस्से ‘अरेबियन नाइट्स’मधील कथांपेक्षाही सुरस आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची नागपूरमधील वाडी भागातील लाभार्थी शकुंतला भगत नंतर प्रत्यक्षात किती ‘गरीब’ आहे, हे मीडियाने उजेडात आणले. त्या वेळी सारवासारव करताना सरकारी अधिका-यांच्या नाकीनऊ आले. खरे म्हणजे, संत गाडगेबाबा, राष्टÑसंत तुकडोजी महाराज आदींनी श्रमाची संस्कृती रुजवली. संत-महात्म्यांनी श्रमाचे महत्त्व सांगितले; पण मायबाप सरकारने सारे काही फुकटात देण्याच्या सवयी लावून श्रम संस्कृती मातीमोल केली आहे.
गावांतील लोक शहाणे
कौलांवर जीव पसरती
पाऊस परतण्याआधी
क्षितिजेच धुळीने मळती...
अशी श्रमाची श्रीमंती जपणारी गावे आता हरवली आहेत. परिणामी, खेडी बकाल झाली आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील, अशी काही खेडी वगळली; तर खेड्यांत आजकाल मंदिरात कमी आणि दारूच्या दुकानात गर्दी उसळलेली दिसते. गोधन नाही, दुधाने भरलेले कलशही नाहीत आणि आता त्याची गरजही राहिलेली नाही. कारण आता गरीब असण्याचे फायदे गावागावात सहज मिळत आहेत.
pethkaratul09@gmail.com