आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Present Condition Of Marathi Literature By Rajan Khan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्मकोषात गुरफटलेली साहित्याची दुनिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीत आज हजारभर प्रकाशक कार्यरत असावेत. त्यात कमीजास्त नावाजले गेलेले आणि धंद्यावर पूर्ण पकड बसलेले प्रकाशक मोजून नऊ-दहा आहेत. कमी नावाजलेले पण प्रकाशनात सातत्य ठेवणारे प्रकाशक हे चाळीस-पन्नास आहेत. बाकी प्रकाशक मग तिय्यम यादीत येतात. ते मधून मधून पुस्तकं काढत आपल्या अस्तित्वाची जाणीव देत असतात. त्यातले कित्येक बंद पडतात, कित्येक नव्यानं सुरू होतात. पण या सर्वच प्रकाशन संस्थांचं वैशिष्ट्य म्हणजे, या संस्था साधनांनी आधुनिक झाल्या असल्या तरी मानसिकतेनं पारंपरिकच आहेत. यातली एकही प्रकाशन संस्था स्वत:हून नवे लेखक शोधायला किंवा जुन्या लेखकांचं नवं काय चाललंय, हे शोधायला जात नाहीत. स्वत:च्या उंब-यावर येणारे लेखक आणि त्यांची पुस्तकं यांच्यातलं बरंवाईट निवडून छापण्याचा पारंपरिक धंदा हे सगळे करतात.

मराठी प्रकाशकांचं-अपवाद सोडून-एक थोरलं वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वत: काहीच वाचत नाहीत. पाश्चात्त्यांचं आकर्षण म्हणून, पाश्चात्त्य प्रकाशक जसे पुस्तक निवडीसाठी संपादक नेमतात तसे मराठी प्रकाशकांनीही ठेवावेत, अशी मागणी सतत होत असते. पण मराठी प्रकाशक त्याकडं लक्ष देत नाहीत. काही प्रकाशकांनीही संपादकांचे प्रयोग मराठीतही केले आहेत; पण त्या अंतिम निर्णयस्वातंत्र्य नसलेल्या वा आपल्या बगलबच्च्यांची पुस्तकं छापून घेणा-या अनेक संपादकांची स्थिती दयनीय म्हणावी अशीच होती. जुन्या लेखकांचं काहीच न वाचता डोळे मिटून छापत राहायचं, हा एक प्रकाशकांचा मुख्य रिवाज आहे आणि आलाच कुणी लेखक नवा, तर आपल्या पदरीच असलेल्या किंवा आपल्या मदिरेसाठी लालायित असलेल्या एखाद्या लेखकाला त्या नव्या लेखकाचं वाचायला देऊन कसं वाटतंय ते सांगा, असं बिनपैशात होणारं काम निपटायचं, असा एक रिवाज आहे. काही प्रकाशकांनी सलग एक किंवा अनेक संपादक बाळगण्याचाही प्रयोग मराठीत केला आहे. पण हे संपादक समाजाच्या किंवा पुस्तकांच्या खुल्या विश्वाचा वेध घेणारे नव्हते. ते कुठल्या तरी एका संकुचित धारणेशी स्वत:ला बांधून घेतलेले लोक होते. प्रकाशनसंस्था, समाज आणि साहित्यसृष्टी यांच्या भल्यापेक्षा त्यांची स्वत:च्या धारणेवर श्रद्धा होती न् ती धारणाच प्रभावी ठरल्यामुळं त्यांच्या संपादनातली पुस्तकं कायम एका छापाचीच निघत राहिली. स्वत:ची वैचारिक, जातीय, धार्मिक धारणा म्हणजे सगळं जग नव्हे; आणि तेवढंच फक्त साहित्य नव्हे, हे या संपादकांना कधीच कळलं नाही. ते आपल्या धारणांशी घट्ट राहिले आणि त्यांच्या धारणेत बसणारीच पुस्तकं काढत राहिले. त्यामुळं या प्रकाशकांच्या पुस्तकांची काही काळ चलती जरी आलेली दिसली तरी त्यांच्या एकसाचीपणाला वाचक उबगलेसुद्धा.

मराठी लेखक जसे आपापले जातीय, धार्मिक, वैचारिक दायरे सोडून लिहायला तयार होत नाहीत, आपल्या मतांचा प्रचार करण्यासाठी ते एकांगी लिहीत राहतात; तशीच अवस्था मराठीतल्या बहुसंख्य प्रकाशकांचीही आहे. (याला अपवाद आहेत. पण-) तेही आपल्या जाती, धर्म, विचारांचे दायरे सोडत नाहीत. मग त्यांची पुस्तकं आपोआपच एका छापाची होतात आणि त्यांचा ग्राहक काही काळासाठी तयार होतो, पण पुढं तोही कंटाळतो. दूर जातो. ज्यांची पुस्तकं कुठलाही प्रकाशक काढायला तयार होत नाही, अशा लोकांपैकी काही लोक प्रकाशकांचा नाद सोडून स्वत:च प्रकाशक होतात. अशांची संख्या मराठीत जास्त आहे. साहित्यातली एखादी कलाकृती चांगली आहे किंवा वाईट, हे कधीही लगेचच ठरवता येत नाही. एखादी कलाकृती हळूहळू लोकांच्या मनाची पकड घेत जाऊ शकते. एखादी चांगली कलाकृती लोकांच्या नजरेतून निसटूही शकते. अनेक वर्षांनंतर पुन्हा लोकांच्या लक्षात येऊ शकते. लोकांना काय आवडावं आणि काय नाही, याचं पक्कं गणित किंवा पक्कं मोजमाप कधीच ठरवता येत नाही. दमा-धीरानं एखादी कलाकृती लोकांच्या मनाची पकड घेत जाते आणि मग लोक तिचे निरनिराळे अर्थ-अन्वयार्थ लावत तिला महत्त्व देत जातात.

हा सगळाच अतिशय नाजूक आणि कायम अनिश्चित मामला असतो. पण लिहिणा-या लेखकाला किंवा कलावंताला या नाजूक आणि अनिश्चित मामल्याचं घेणंदेणं नसतं. त्याला वाटतं, आपण काहीतरी श्रेष्ठ काम केलंय. आपलं पुस्तक थोर आहे. लेखक (आणि प्रकाशकसुद्धा) आपल्या लिखाणाचं समाजातून मोठ्या प्रमाणात स्वागत होणार, अशाच स्वप्नात असतात. पण एकदा पुस्तकाच्या विक्रीची किंवा वितरणाची वेळ आली, की खरी परीक्षा सुरू होते. काही मुरलेले प्रकाशक जागा मिळेल आणि पैशानं परवडेल अशा ठिकाणी जाहिरात करून वाचकांना संमोहितही करू पाहतात. पण मराठीत पुस्तकं खपतात ती मौखिक प्रचारावर आणि लेखकाचं नाव विश्वासार्ह ठरलं तरच. पुस्तक नवं असो, लेखक नवा असो, जुना असो; लोक आपापसात त्याच्या चांगल्या-वाईटाबद्दल बोलत प्रचार करत राहतात. त्या प्रचारावर पुस्तक कोंडून पडायचं की चालू पडायचं, ते ठरतं. अर्थात, मराठीत पुस्तक वाईट असो की चांगलं, ते घाऊक पद्धतीनं घेऊन वितरित करणा-या यंत्रणा आहेत. खूप सारे प्रकाशक आणि विक्रेते पुस्तक आत उघडून न पाहता त्याचे गठ्ठेच्या गठ्ठे सरकारी खरेदी म्हणून ओळखल्या जाणा-या व्यवस्थेत किंवा वाचनालयांना वगैरे विकत असतात. या यंत्रणांशी संधान जुळवता आलं, तर नव्या लेखक-प्रकाशकांच्या पुस्तकाचे गठ्ठेही उचलले जाऊ शकतात. पण हा सगळा तस्करीसारखा नंबर दोनचा धंदा असतो. त्यात शिरणं नव्या लोकांना ब-यापैकी अवघड जातं. त्यात पुस्तक छापून झाल्यावर लेखक-प्रकाशकाच्या लक्षात येतं की, आपल्या समाजात हजार-पाचशेसुद्धा ओळखी नाहीत. वाटून वाटून पुस्तकं वाटणार कुणाला? त्यामुळे पुस्तके खपली नाहीत की एक भव्य विधान बाहेर पडतं अशा लोकांच्या तोंडून, मराठी समाजाला चांगल्या साहित्याची जाणच नाही. मी बराच काळ प्रकाशन व्यवहाराशी संबंधित आहे. त्यातून आमच्यात एक विनोद तयार झाला. खूप लेखकांना असं वाटतं की, आपलं पुस्तक महान आहे. संध्याकाळी सहाला पुस्तक छापून झालं की पहाटे सहाला ते प्रकाशकाला तावातावानं फोन करून विचारतात, ‘आँ? पुस्तक निघून दीर्घ असे बारा तास उलटून गेलेत, मी रात्रभर जागा आहे आणि तरीही अजून माझ्याकडं ते नोबेल पुरस्कारवाले का येऊन पोहोचले नाहीत?’
क्रमश:

aksharmanav@yahoo.com