आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्‍य-त्‍य-य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय प्रेक्षकाला एकाच वेळी असंख्य दूरचित्रवाहिन्या उपलब्ध होतील, असे मनातही आले नव्हते; तोवर खासगी दूरचित्रवाणीचे आगमन झाले आणि पाहता पाहता वाहिन्यांची संख्या चार आकडी होण्याची वेळ आली. काही आंतरराष्‍ट्रीय वाहिन्या, काही राष्‍ट्रीय स्वरूपाच्या हिंदी, इंग्रजी वाहिन्या आणि प्रत्येक भाषिक प्रदेशाच्या इतर अनेक वाहिन्या, असा हा पसारा पाहता पाहता कसा वाढत गेला, ते या प्रेक्षकाला कळलेही नाही.

वृत्तवाहिन्या हा वाहिन्यांच्या या पसा-यातील एक महत्त्वाचा घटक. करमणूकप्रधान वाहिन्या जेवढ्या चवीने आणि ज्या मोठ्या संख्येने पाहिल्या जातात, तेवढ्याच कुतूहलाने नि आग्रहाने वृत्तवाहिन्याही पाहिल्या जातात. जेव्हा एखादी महत्त्वाची (खरोखर महत्त्वाची किंवा वृत्तवाहिन्यांनी महत्त्वाची बनवलेली) घटना घडते, तेव्हा तर सर्वांचे डोळे या वृत्तवाहिन्यांवर खिळलेले असतात.

या वृत्तवाहिन्या चोवीस तास माहितीचा रतीब घालत असतात. चालू घडामोडींशी संबंधित त्यांचे विषय असल्याने फार थोडे कार्यक्रम त्यांना आधी, निवांतपणे तयार करून ठेवता येतात. त्यामुळे स्पर्धा सतत वेळेशी असते. त्यातही केवळ बातमी देणे महत्त्वाचे नसते, तर ती शक्य तितक्या लवकर आणि इतरांच्या आधी देणे महत्त्वाचे असते. बातमी उशिरा देणे काय आणि ती अजिबात न देणे काय; एकूण एकच, अशी मनोवृत्ती बहुसंख्य वृत्तवाहिन्यांत पाहायला मिळते. त्यामुळे बातमी गोळा करून ती प्रेक्षकांपर्यंत सादर करण्याच्या प्रक्रियेला फारसा वेळ मिळत नाही वा लागत नाही. या प्रक्रियेत बातमीशी संबंधित दृश्ये गोळा करणे, संबंधितांच्या प्रतिक्रिया मिळवणे, दृश्यांचे संपादन करणे, त्याला योग्य अशी संहिता लिहिणे, ती ध्वनिमुद्रित करणे अशी अनेक कामे मोजक्या वेळात करायची असतात. अनेकदा तर घटना घडत असताना थेट वार्तांकन करावे लागते. परंतु एवढी धांदल असली तरी कोट्यवधी रुपये खर्च करून, कोट्यवधी रुपये मिळवणा-या वाहिन्या त्यांचे सगळे काम अचूकपणे करत असणार, ही प्रेक्षक म्हणून आपली श्रद्धा असते किंवा त्यांनी तसे करावे, अशी आपल्याला एक प्रेक्षक म्हणून अपेक्षा असते.

पण अनेकदा आपला अपेक्षाभंग होतो. काही ठरावीक दृश्येच सतत दाखवली जातात, पडद्यावर लिहून येणा-या मजकुरात साध्या, गंभीर, हास्यास्पद अशा अनेक प्रकारच्या चुका दिसतात, वृत्तनिवेदक सांगत असलेल्या बातमीत भाषेच्या असंख्य चुका आढळतात, घटनास्थळावरून बोलणा-या अनेक वार्ताहरांना नेमके शब्द सापडत नसतात, ते खूप पसरट किंवा अडखळत बोलतात, त्यांचे उच्चार योग्य नसतात, अशी निरीक्षणे वरचेवर नोंदवली जातात. मराठी वृत्तवाहिन्या (आणि अन्य करमणूकप्रधान कार्यक्रमदेखील) वापरत असलेल्या मराठी भाषेविषयी काही मराठी-भाषाप्रेमी मंडळी वर्तमानपत्रे आणि अन्य माध्यमांतून त्याबद्दलची चीड, काळजी, संताप व्यक्त करतात.

कुणी असे म्हणेल की, काही तासांच्या प्रक्षेपणात काही चुका झाल्या, तर त्यावर एवढी चर्चा करण्याचे, त्याचा गाजावाजा करण्याचे काय कारण? कामाच्या रगाड्यात तेवढे होणारच. मात्र असे म्हणणारे सहसा संबंधित माध्यमात काम करणारेच असतात आणि ते - भाषेचे आपण फार स्तोम माजवतो, मला शक्य असेल तर मी शुद्धलेखन हा प्रकारच रद्दबातल ठरवीन, प्रत्येकाने त्याला हवे तसे बोलावे- अशी विधाने जाहीररीत्यादेखील करतात. अन्यथा सर्वसामान्यांना असे वाटते की, भाषेच्या मार्गानेच जर बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर ती भाषा अचूक, शुद्ध असायला काय हरकत आहे? वाहिन्यांवर काम करणारे काही सामान्य नागरिक नसतात, तर ते पारखून, चाचणी घेऊन निवडलेले, आधी प्रशिक्षित असलेले किंवा निवडीनंतर ज्यांना प्रशिक्षण दिले आहे असे पत्रकार असतात, तर मग त्यांच्याकडून अचूकतेची अपेक्षा करण्यात काय गैर आहे?

या दृष्टीने जर मराठी वृत्तवाहिन्यांमधील भाषेच्या अचूकतेचा अभ्यास केला तर असे लक्षात येते, की तेथे काम करणा-या व्यक्तींचा मर्यादित शब्दसंग्रह, व्याकरणाची, विशेषत: लिंग व वचन यांची फारशी जाण आणि जाणीव नसणे, संहिता लिहिल्यानंतर ती पुन्हा स्वत: किंवा दुसरे कुणी वाचत नसल्याने सहज टाळता येण्यासारख्या चुकाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. उदा. ते म्हणाले, ‘केवळ ---’ असं ते पुढं म्हणाले. या वाक्याच्या सुरुवातीला ‘ते म्हणाले’ असा उल्लेख आहे आणि शेवटीदेखील आहे. एकाच वाक्यात दोनदा उल्लेख करण्याची गरज नाही, हे शाळकरी मुलगादेखील सांगेल. पण केवळ संहिता तपासण्याची संपादकीय यंत्रणा नाही म्हणून अशा चुका निदर्शनाला येतात.

आजारांशी आळा घालण्यासाठी--- यांसारख्या रचना पाहिल्या की असे वाटते, की मराठी भाषेतील प्रचलित प्रत्यय, अव्यय इत्यादींमध्ये असे बदल करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? आळा कशाला तरी घातला जातो, कशाशी तरी नाही. विविध वाहिन्यांवरच्या बातम्या काळजीपूर्वक ऐकल्या तर अशी कितीतरी उदाहरणे सहज सापडतात. ‘--तातडीनं मदत पोचणं ही महाराष्‍ट्राची परंपरा आहे’ हे वाक्य महाराष्‍ट्राला मदत मिळणे या संदर्भात असेल तर ठीक आहे, परंतु संबंधित बातमीत महाराष्‍ट्र मदत पोहोचवतो, या अर्थानं ते होतं. आपल्या लेखनातून जे विचार, भाव व्यक्त करायचे आहेत ते आपण नेमकेपणाने पोहोचवत आहोत की नाही, याची खातरजमा कुणी करायची?

शब्दसंग्रह मर्यादित असल्याने अजिबात, सुतराम, बिलकूल असे शब्द तर वाहिन्यांमधली मंडळी चुकूनही वापरत नाहीत. त्यामुळे कोणत्याही, कसल्याही, कुठल्याही अशा सरधोपट, सपाट शब्दरचना सापडतात. (उदा. ‘कसलंही अनुदान’, ‘कुठल्याही प्रकारचा अनुभव’, ‘कोणतीही शक्यता नाही इ.). योग्य मराठी शब्द सापडला नाही तर फार विचार न करता सुचतील ते हिंदी किंवा इंग्रजी शब्द वापरून मोकळे व्हायचे, हा सोपा उपाय ही मंडळी वापरतात. आजकाल दैनंदिन संभाषणात आपण खूप इंग्रजी शब्द वापरतो म्हणून आम्ही वृत्तलेखनासाठीदेखील जाणीवपूर्वक तशीच शैली वापरतो, असे वाहिन्यांमधील (आणि वर्तमानपत्रांमधीलदेखील) ज्येष्ठ मंडळी सांगतात. परंतु जर चांगले, नेहमीच्या वापरातले मराठी शब्द उपलब्ध असतील तर इंग्रजी शब्द का वापरायचे, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. इंग्रजी शब्द अचूक वापरले जातात असेही नाही. हिंदी शब्दांचा वापर ही एक वेगळीच समस्या आहे. काही हिंदी शब्द मराठीतही वापरले जातात, पण अगदी भिन्न अर्थाने. उदा. त्सुनामीनं प्रभावित झालेल्यांना मदत---. मराठीत प्रभावित होणे या संज्ञेला अगदी वेगळा अर्थ आहे.

त्यामुळे लिहिणा-याने अथवा बोलणा-याने आपण वापरत असलेल्या हिंदी शब्दाचा मराठी भाषकांच्या दृष्टीने काय अर्थ होतो, याचा विचार करायला नको का?
मराठी भाषेत नामाचे सामान्यरूप नावाची एक संकल्पना असते आणि सहसा नामाचे सामान्यरूप केल्याखेरीज त्याला विभक्तिप्रत्यय लावू नयेत, असा संकेत आहे. नियम म्हणण्याचे धाडस मी इथे करत नाही, कारण भाषेचे नियम कुणी बनवले, ते सर्वांनी का पाळायचे, प्रमाणभाषा वापरण्याचा आग्रह का, असे अनेक मुद्दे त्या अनुषंगाने उपस्थित केले जाऊ शकतात. परंतु ‘चांगला मुलगी’ ही रचना मराठी भाषेच्या रूढ संकेतांच्या दृष्टीने निर्दोष आहे का सदोष, असे विचारल्यावर बहुसंख्य लोकांचे उत्तर ‘सदोष’ असे येईल. म्हणजे भाषेचे सर्वच संकेत आपण धुडकावून लावतो असे नाही. संवादाची समान व्यवस्था म्हणून प्रगत समाजांनी भाषा ही एक व्यवस्था स्वीकारलेली असते. ती समान पद्धतीने बोलली गेली तर संवाद, संज्ञापन होऊ शकते. शब्दांचे प्रचलित अर्थ आपण स्वीकारलेले आहेत, मग व्याकरणिक व्यवस्था स्वीकारायला हरकत आहे? योजनेच्या अशी रचना मराठीत होऊ शकत नाही, एवढे किमान ज्ञान वाहिन्यांमध्ये काम करणा-यांना असेल, अशी अपेक्षा करणे गैर आहे का? एक योजना असेल तर योजनेच्या आणि अनेक असतील तर योजनांच्या अशी रूपे हवीत, हे लक्षात घेणे इतके अवघड आहे का?

जे वार्ताहर घटना घडत असताना थेट घटनास्थळावरून बोलतात त्यांची भाषा म्हणजे एक वेगळा अभ्यासविषय आहे. अशा वेळी त्यांच्याकडे लिहिलेली संहिता नसते, त्यांना खूप विचार करायला वेळ मिळालेला नसतो, हे खरे असले तरी साधी-सोपी मराठी वाक्ये बोलणे इतके अवघड का जावे? इथं जमलेले शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आपला शोक जो आहे तो व्यक्त करत आहेत. कुठेतरी ते आतून हेलावून गेले आहेत, कुठेतरी त्यांना आपला आधार जो आहे तो हरवला आहे, अशी भावना कुठेतरी त्यांच्या मनात आहे. वगैरे वगैरे. अशी वाक्ये अगदी अलीकडे सरसकट सर्व वाहिन्यांवर बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच्या वार्तांकनात ऐकायला मिळाली. त्यावर हिंदीचा प्रभाव असू शकतो का? सांगणं कठीण आहे, पण मराठी म्हणून जी भाषा आहे तिचं वळण म्हणून जे आहे तिच्याशी सुसंगती म्हणून जी आहे ती कुठेतरी यात दिसत नाही हे खरं.

भाषेकडे संवादाचे एक दुय्यम साधन म्हणून बघण्याची वृत्ती बदलत नाही, एखादी बातमी प्रसारित होण्यापूर्वी ती विविध चाळण्यांमधून जात नाही, तोवर अशा सहज टाळता येण्याजोग्या चुकांचे प्रमाण कमी होणार नाही, हे नक्की. त्यासाठी खरे तर माध्यमांना फार अधिक खर्च येईल. त्यांचा बातम्या देण्याचा वेग मंदावेल असेही नाही. राजकीय नेत्यांच्या बाबतीत वृत्तवाहिन्या म्हणतात त्याप्रमाणे इच्छाशक्ती पाहिजे. या सूचनांचा विचार करून माध्यमे त्याप्रमाणे कृती करतात की नाही, ते येणारा काळच ठरवेल.