आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'प्राइड अँड प्रेज्‍युडिस': द्विशतकमहोत्‍सवी शब्‍दकळा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘प्राइड अँड प्रेज्युडिस’ प्रकाशित झाली त्या वेळी जेन ऑस्टिन 38 वर्षांची होती. चार्ल्स डार्विन चार वर्षांचा, चार्ल्स डिकन्स एक वर्षाचा, तर अफ्रेड टेनिसन चार वर्षांचा होता. क्वीन व्हिक्टोरियाचा जन्म व्हायचा होता. व्हिक्टोरियन कालखंड सुरू व्हायला खूपच अवकाश होता. तो काळ होता जॉर्जियन इंग्लंडचा. जेन ऑस्टिनचा जन्म 1775, मृत्यू 1817. तिला उणेपुरे 41 वर्षांचे आयुष्य लाभले. तरी मृत्यूनंतरचे जीवन मात्र तिला उदंड मिळाले.

‘प्राइड अँड प्रेज्युडिस’ 28 जानेवारी 1813 रोजी प्रथम प्रकाशित झाली, तर ‘वर्ल्ड क्लासिक’ म्हणून ‘प्राइड’ प्रथम प्रकाशित झाली 1929 मध्ये. जगाच्या अभिजात साहित्यात या कादंबरीने जी जागा मिळवली ती अजूनपर्यंत टिकून आहे. या कादंबरीच्या किती आवृत्त्या निघाल्या त्याच्या गणतीला ‘अगणित’ म्हणावे लागेल. अविवाहित जेन ‘प्राइडला’ ‘ओन डार्लिंग चाइल्ड’ म्हणत असे. तिच्या या आवडत्या ललितकृतीचे आणि जेनचे इंग्लिश संस्कृतीतले स्थान बदलत आले आहे आणि आकलनही.

व्हिक्टोरियन काळाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या आधुनिकतावादाबद्दल लोकांचा भ्रमनिरास होत होता. त्यांना जेनच्या कादंबरीत जादुई भावना दिसल्या. त्यांनी परिकथांच्या पंगतीत तिच्या कादंब-या नेऊन बसवल्या. आदर्श इंग्लंडचे प्रतिबिंब त्यांना या कादंब-यांत दिसले. पहिल्या महायुद्धात इंग्लिश शिपाईगडी जेनच्या कादंब-या लढाईच्या सीमेवर घेऊन जात. तिच्या शब्दातील कणखरपणा त्यांना धीर देई. दुस-या महायुद्धात जेन म्हणजे, मूर्तिमंत ‘इंग्लिशनेस’ मानली जात असे. तिच्या कादंब-यांतील कायावाचामनाला विश्रांती देणारे इंग्लिश घर याचे संरक्षण आपण केले पाहिजे, असे ब्रिटिश माणसाला वाटे. आजही एकविसाव्या शतकात ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’वर आधारित चित्रपट, टीव्ही सीरियल, संगीतिका, नाटक याचे प्रचंड आकर्षण पाश्चात्त्य जगतात आहे. एवढेच काय, तिच्या ललितकृतींवर आधारित ‘व्हिडिओ गेम्स’ प्रकाशित करण्याचेही घाटत आहे.

जेनच्या वडलांनी तिच्यातील लेखनगुण ओळखून तिला प्रोत्साहन दिले. ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’ तीन खंडात जेनने लिहिली. ती लगेचच प्रकाशित झाली नाही. तिने यावर बरीच वर्षे काम केले. नंतर ती प्रकाशित झाली. तब्बल दोन शतके ही कादंबरी जगभर वाचली, अभ्यासली गेली.

एक ब्रिटिश प्राध्यापिका आज चीनमध्ये इंग्लिश साहित्य शिकवते. तिला वाटले, ही जुनीपुराणी कादंबरी चिनी विद्यार्थ्यांना शिकवणे व समजणे कठीण जाईल. पण घडले उलटेच. ती विद्यार्थ्यांना सहज समजली. कारण ती मानवी स्वभावावर उभी आहे, जो दोनशे वर्षांत जराही बदललेला नाही.

‘प्राइड’ या शब्दाला गर्व, अभिमान, भूषण असे मराठी प्रतिशब्द. पण यातील एकच शब्द घेऊन ‘प्राइड’चे आकलन होत नाही. ‘प्राइड’मध्ये स्वत:च्या प्रेमात पडणे, ठळक व गडद आत्मभान, इतरांपेक्षा आपण वेगळे व चांगले आहोत ही भावना, अशा अनेक छटा आहेत. प्रत्येक व्यक्तीत या ‘प्राइड’ची प्रत आगळीवेगळी असते. कुटुंब, नातेवाईक, मित्र अशा व्यक्तिसमूहांत प्रत्येक जण जगत असतो. गंमत म्हणजे ‘प्राइड’चा एक अर्थ ‘कळप’ तोसुद्धा सिंहांचा; असा आहे!

‘प्रेज्युडिस’ या शब्दाला पूर्वग्रह हा मराठी प्रतिशब्द. दुस-याबद्दलचा पूर्वग्रह बरेच वेळा दूषित तर काही वेळा चांगलाही असतो. दुस-याकडे बघताना माणूस तटस्थपणे वगैरे बघू शकत नाही. ‘प्राइड’ला धक्का लागून कितीतरी ‘प्रेज्युडिस’ तयार होतात. त्यातून प्रत्येक व्यक्तीचे व त्यानुसार समूहाचे जीवन खळबळते. शब्दकौशल्याने जेनने हे सर्व समर्थपणे उभे केले आहे.

तेव्हा फेसबुक, ट्विटर नव्हते; पण उच्च व मध्यमवर्गीयांच्या घरात पत्ते खेळण्यासाठी ‘कार्ड टेबल्स’ होती. या कार्ड टेबल्सचा उपयोग कादंबरीतील प्राइड आणि प्रेज्युडिस बाळगणा-या काहींना एकत्र आणण्यासाठी, तर काहींना दूर ठेवण्यासाठी जेनने मोठ्या चतुराईने केला आहे. असे तिच्या शैलीचे, सूक्ष्म निरीक्षणाचे अनेक विशेष सांगता येतील.

आजच्याप्रमाणे त्या काळीही व्यक्तीचे, कुटुंबाचे समाजातील स्थान संपत्तीवर अवलंबून असे. वारसाहक्काने चालत येणारी धनदौलत माणसाचे जीवन बदलून टाकत असे. विवाहामध्येसुद्धा रेशमाच्या बंधापेक्षा पैशाचे बंध महत्त्वाचे होते. जेनची कादंबरी अशा पैशावर आधारित उच्च व मध्यमवर्गीयांचे चित्रण करते, ‘लोअर क्लासेसचे’- खालच्या वर्गाचे नाही. तिच्या कादंबरीतील कुटुंबात नोकरचाकर येतात, पण अदृश्य स्वरूपात. कादंबरीतील एलिझाबेथला तिची आई नोकराचाकरांसमोर काही टीका-टिप्पणी करते हे रुचत नाही. ‘रिमेन्स ऑफ द डे’ या काझुओ इशीगुरोच्या इंग्लिश बटलरच्या जीवनावरील कादंबरीत बटलर म्हणतो, ‘नोकरांनी असून नसल्यासारखे वावरले पाहिजे, अदृश्य रूपात.’

‘खालचा वर्ग’ हा जेनच्या चिंतन-मननाचा विषय नव्हता. ‘जेन ऑस्टिन अँड सर्व्हंट्स’ असे एक पुस्तकही लिहिले गेले आहे. जॉर्ज ऑर्वेलने डिकन्स, टॉलस्टॉयवर निबंध लिहिले, तशी दखल त्याने जेन ऑस्टिनची घेतल्याचे दिसत नाही.

मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे दाखवणारी प्रेमकहाणी गेल्या दोनशे वर्षांत इतर कोणी लिहिली नाही, असे मुळीच नाही. मग जेनच का अजरामर झाली? जेनची शैली वगैरेबद्दल दुमत नाही. जेनला प्रसिद्धी नको होती. तिने तिच्या भावाला पत्रात हे स्पष्ट लिहिले होते. तिचा प्रकाशक जॉन मरे याला तिने पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तिचे नाव घालण्यास परवानगी दिली नव्हती. सुरुवातीला बरीच वर्षे तिच्या कादंब-या निनावी प्रकाशित झाल्या. तिच्या मृत्यूनंतर 1833मध्ये तिच्या कादंबरीवर जेन ऑस्टिन हे नाव छापले गेले. पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या ललितकृतींचे उत्तम मार्केटिंग झाले. मार्केटिंग करणा-यांचा उद्देश ‘अर्थात’ होता.

काळाबरोबर जेनइझम तयार होत गेला. जेनच्या वस्तू व वास्तू यांच्याभोवती वलय निर्माण झाले. तिची वास्तू तर ‘रिस्टोरेशन’- पूर्ववत करण्याच्या नावाखाली पुन्हा बांधली गेली. जेन ऑस्टिन फेस्टिवल पैशाच्या उलाढालीचा उद्योग झाला. ‘जेन ऑस्टिन कल्ट अँड कल्चर’ हे क्लॉडिया जॉन्सन या प्रिन्स्टन विद्यापीठातील प्राध्यापिकेचे पुस्तक वाचण्यासारखे आहे.

जेन ऑस्टिनचा विविध अंगांनी अभ्यास झाला. तिचा पत्रव्यवहार, चिठ्ठ्याचपाट्या, तिच्या संपर्कात आलेल्यांनी तिच्याबद्दल लिहिलेले किस्से या सर्वांचे उत्तम जतन केल्यामुळे संशोधकांना उपयोग झाला. तिच्या पुस्तकांच्या थक्क व्हायला होईल अशा सूक्ष्म, सखोल व व्यापक ‘अनोटेटेड’- सटीप आवृत्त्या अजूनही प्रकाशित होत आहेत. पाश्चात्त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे व व्यासंगाचे दर्शन यातून घडते. याचाच अप्रत्यक्षपणे मार्केटिंगला उपयोग झाला. फक्त मार्केटिंगमुळे ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’ गाजली, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.

पाश्चात्त्यांची नोंदी ठेवण्याची सवय, इतिहासकालीन साधने जपण्याची शिस्त, इतिहास संशोधनातून व्यक्तीबद्दल जे काही बरेवाईट निघेल ते ऐकून घेण्याची तयारी, यामुळे जेन ऑस्टिनची दोनशे वर्षांची कहाणी सफल झाली. हे सगळे वाचताना, पाहताना मराठी कादंबरीच्या बाबतीत हे होऊ शकेल का, हे प्रश्नचिन्ह मनात उभे राहते.