आपला विद्यार्थी मित्र शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये फार रमतो. सीआयडी किंवा एक शून्य शून्य सारख्या मालिका देखील अगदी हौसेने बघतो, पण करिअर म्हणून यातील प्रमुख पात्रांचा अर्थात डिटेक्टिव्ह किंवा गुप्तहेराचा विचारच करत नाही. कारण इथे गुळगुळीत, साचेबद्ध, एक विशिष्ट चौकटीतला, पारंपरिक धो-धो मार्क पडतील, मेरिट लिस्ट लागेल असा काही भक्कम अभ्यासक्रम नाहीये. अतिशय तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, एखाद्या गोष्टीचं, घटनेचं मुळासकट खोलवर जावून विश्लेषण करण्याची कुवत (अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी), समयसूचकता, धाडस, जिद्द, चिकाटी, सेवाभाव, तल्लख बुद्धिमत्ता, नैतिक मूल्यांची जोपासना, प्रामाणिक प्रयत्न यांचा एकत्रित मिलाफ असणारी व्यक्ती खासगी गुप्तहेर म्हणून काम करू शकते. गुप्तहेर होण्यासाठी मुळात डिप्लोमा इन डिटेक्टिव्ह, बॅचलर ऑफ डिटेक्टिव्ह किंवा मास्टर्स अशा प्रकारचा कुठलाही कोर्स किंवा अभ्यासक्रम किंवा कॉलेज किंवा विद्यापीठ नाही. पण तरीही वरील गुणांच्या जोरावर आपला विद्यार्थी मित्र या अतिशय वेगळ्या वाटेवरच्या क्षेत्रात सहज मुशाफिरी करू शकतो.
खासगी गुप्तहेराचे कामाचे स्वरुप कसे असते बरं? एखाद्या गुन्हेगाराला पकडणं, मग तो चोरी करणारा चोर असो, दरोडे टाकणारा, लुबाडणारा दरोडेखोर असो, सोनसाखळी चोरणारा किंवा शांत वसाहतींमध्ये घुसून नगदी रक्कम, सोने चोरणार असो किंवा कुठल्याही, संशयास्पद वाटणा-या घडामोंडीमध्ये सहभागी असणारी व्यक्ती असो, त्याला पकडण्याचे काम हे खासगी गुप्तहेर करू शकतात. हल्ली बहुतेक ठिकाणी कॉर्पोरेट जगतामध्ये सुद्धा एखाद्या गलेलठ्ठ पगाराच्या, उच्च पदावरील नेमणुकीसाठी किंवा तिजोरी सांभाळणे किंवा रोकड हिशेब तपासणा-या व्यक्तीचे, संशयास्पद चारित्र्य किंवा वर्तनाचा शोध घेण्यासाठी खास गुप्तहेर नियुक्त केले जातात आणि त्या गुप्तहेरांकडून आणलेल्या माहितीनुसार त्याचे विश्लेषण केले जाते. बरेचदा श्रीमंत किंवा उद्योगपती किंवा चित्रपट तारकांच्या घरी वेगवेगळ्या कामासांठी येणा-यांवर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर नेमलेले असतात.
कित्येक वधू-पिता आपली मुलगी ज्या घरामध्ये सून म्हणून वावरणार आहे, त्या घराची पार्श्वभूमी, नवरा मुलगा, त्याच्या सवयी, व्यसने, त्याची नोकरी/व्यवसाय, मित्र कंपनी या गोष्टींची खात्रीलायक चौकशी करण्यासाठी सुद्घा खासगी गुप्तहेरांचा वापर करताना दिसतात. म्हणजेच या क्षेत्रामध्ये संधी अतिशय मुबलक प्रमाणात आहेत. फक्त इथे काही दहा ते सहाच काम नसतं त्यामुळे एखादी ‘केस’ सोडवण्यासाठी कदाचित पंधरा दिवस लागतात तर कधी-कधी सहा-सहा महिन्यांचा अवधी सुद्धा लागू शकतो. गुप्तहेराची फी ही त्या कामाच्या वेळखाऊपणावर किंवा गुंतागुंतीवर अवलंबून असते. जितकी आव्हानात्मक, गुंतागुंतीची केस तितकीच फी ज्यादा म्हणजे या क्षेत्रामध्ये पैसाही ब-यापैकी मिळू शकतो. ना कोर्स ना सिलॅबस अशा या क्षेत्रामध्ये जर कुणाला यायचं असेल तर त्याने किंवा तिने किमान पदवीपर्यंतचं तरी शिक्षण घ्यायलाच हवं. अगदीच शिक्षणाची अट नाही म्हणजे दहावीनंतरच या क्षेत्रात येण्याचा वेडेपणा करु नये. पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन, मानसशास्त्राचा अभ्यास करीत, स्वतःमधील क्षमतांचा वापर करुन मग निर्णय घेणं योग्य करु शकते, कारण हे क्षेत्र सर्वस्वी तुमच्या धाडसावर, बुद्धिचातुर्य, समयसूचकतेवर, निरीक्षणावर आधारलेले आहे. शिवाय चेह-यावरुन माणसं ओळखू शकणं किंवा हस्तरेषा, शारीरिक ठेवण, डोळ्यांच्या हालचालींवरुन स्वभाव अशा गोष्टींचा अभ्यास असणे इथे उपयोगाचं ठरु शकतं. बरेचदा पोलिस यंत्रणेची वेगवेगळी मदत घ्यावी लागते. एकदा जम बसल्यावर स्वसंरक्षणाचा परवानादेखील मिळू शकतो. समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, गुन्हेगारी प्रवृत्ती, गुंडगिरी, अत्याचार, बलात्कारांसारख्या गोष्टी ज्यांना मनापासून संपवायच्यात, त्यांच्यासाठी हे क्षेत्र उपयुक्त आहे. खासगी गुप्तहेरांबरोबर किंवा त्यांच्या यंत्रणेत काम करण्याच्या अनुभवाचा खूप फायदा होतो.