आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Pro Kabbadi League By V.M.Karmarkar, Rasik

प्रो-कब्बडी उमदीही, पण मराठी! वाहवत जाऊ नकोस !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कडक उन्हाळ्यात थंडगार वारे वाहू लागले आहेत... दुष्काळी प्रदेशावर पाऊस मेहरबान होतोय... जमाना बदलतोय! कबड्डीची हेटाळणी करण्यात ज्या समाजाच्या पिढ्यान्पिढ्या धन्यता मानत, त्याच समाजातील काही व्यवहारी शक्ती आता अचानक कबड्डीची महती, दिंडी पिटून, ढोल-ताशे बडवत समजवत आहेत. कुणाला? आम आदमीला! कबड्डीसह सा-या देशी खेळांची जोपासना उतरत्या क्रमाने का होईना, पण आज एकविसाव्या शतकातही करत आलेल्या मराठी माणसाला. तसेच कबड्डीला आपला खेळ मानणा-या हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या हिंदी मुलुखाला!
केवळ कबड्डीच नव्हे, तर खो-खो, मातीतील कुस्ती, मल्लखांब व आता जवळपास इतिहासजमा झालेला आट्यापाट्या, या देशी खेळांना गेली शंभर वर्षे महाराष्ट्र जोपासत आला आहे. या सा-या खेळांची मराठी मनावरील पकड निश्चित ढिली झाली आहे व त्याचे सोयरसुतक या खेळातील संघटकांना (म्हणजे कै. बुवा साळवींपासून दत्ता पाथ्रीकर, किशोर पाटील व शांताराम जाधव; माधव पाटील, चंद्रजीत जाधव व जेपी शेळके; बाळ लांडगे व प्रभृतींना) नसले तरीही या खेळांची पाळेमुळे मराठी मनात खोलवर रुजलेली आहेत. त्यांना आता कबड्डीची महती ऐकवत आहेत हे व्यवहारी, व्यापारी-व्यावसायिक! कशाच्या जोरावर? दुनियेतील क्रीडा विश्वावर राज्य करणा-या टेलिव्हीजनसारख्या प्रचंड प्रभावशाली माध्यमाच्या बळावर!
देशी खेळांना आपलं मानणारा मराठी माणूस, एका चक्रावणा-या अनुभवातून जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, या देशी खेळांचे सामने बालपणापासून बघत आलेले मराठी क्रीडा-पत्रकार या व्यापारी-व्यावसायिकांचे अति-अतिरंजित दावे जस्सेच्या तस्से मान्य करून आपल्या नावाने सादर करत आहेत. व्यावसायिकांचे दावे सर्वच क्षेत्रांत अतिरंजित असतात; तो त्यांच्या धंद्यातील सफाईचा एक अविभाज्य भाग असतो, ही मूलभूत बाब नजरेआड करत आहेत. आपल्या प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता या व्यापारी-व्यावसायिकांना विनामूल्य वा जाहिरातीच्या दराने बहाल करत आहेत!
उपक्रम स्तुत्य, पण...
मी सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छितो, ‘प्रो-कबड्डी’ आणि पंजाब ढंगाची आणि कुस्ती व रस्सीखेचकडे वळलेली ‘वर्ल्ड (विश्व) कबड्डी’ या उपक्रमांनी एका खेड्यापाड्यातल्या खेळाची चक्क टेलिव्हिजनच्या आधुनिक पडद्यावर प्रस्थापना केली! उपक्रमातला भाग खचीतच स्तुत्य आहे. सामने वेळच्या वेळी सुरू करणे व संपवणे, पुढारी मंडळींना दूर ठेवणे, हीदेखील या उपक्रमांची जमेची मोठीच बाजू. या उपक्रमांचा आणखी एक उमदा भाग म्हणजे, या व्यापारी-व्यावसायिक शक्तींनी कबड्डीपटूंना आपल्या आर्थिक उलाढालींचा छोटा-छोटासा किंवा छोटा का होईना, भागीदार बनवले. सुमारे शंभर निवडक कबड्डीपटूंना सहा आठवड्यांसाठी दोन ते बारा लाख रुपयांचे मानधन आणि त्यातील निम्मा खेळाडूंना प्रत्येकी पाच-सात लाख रुपयांचे रोख इनाम देऊ केले. या उपक्रमाची आर्थिक उलाढाल नेमकी किती, याविषयी स्टार स्पोर्ट््स वा आनंद महिंद्र व चारू शर्मा वा अभिषेक बच्चन इ. इ. काहीही सांगत नाहीत. केवळ आपापली पाठ थोपटून घेत आहेत. प्रो-कबड्डी आणि वर्ल्ड कबड्डी, या उपक्रमांची आर्थिक उलाढाल नेमकी किती? यात स्पर्धक संघांच्या ठेकेदारांची गुंतवणूक, सर्व त-हेच्या प्रसिद्धीचा तपशील, तिकीट विक्री आदी संपूर्ण तपशीलवार जमा-खर्च लोकांपुढे ठेवला पाहिजे. यातील काही व्यवहार वादग्रस्त आहेत. संयोजनात वापरलेले छोटे छोटे स्टेडियम दोन-तीन हजार लोकांनी खचाखच भरल्याचे संघटक सांगतात; पण यापैकी किती प्रेक्षकांनी किती रकमेची तिकिटे काढली, हेही स्पष्ट व्हावे.
मुंबईपुरते बोलायचे तर बहुसंख्य प्रेक्षक हे तथाककथित ‘निमंत्रित’ वा फुकटेच होते. ही हालत कबड्डीच्या बालेकिल्ल्यात; तर इतरत्र चित्र वेगळे कितपत असेल?
आयपीएल नको!
जगभर फुटबॉलच्या व्यावसायिक लीग रंगतात.त्यातही सामने-सौदेबाजी होतेच. पण तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे, स्पर्धक संघांचे आर्थिक व्यवहार पारदर्शक असतात. मँचेस्टर युनायटेड, चेलसी, अरसेनाल, रीयाल मॅड्रीड, बारसलोन, बायर्न म्युनिक, युवेंट्स, पॅरिस सेंट जरमेन आदी सर्व व्यावसायिक क्लब हे कंपनी म्हणून नोंदवलेले आहेत. त्यांचे व्यवहार पारदर्शक आहेत. आज कबड्डी त्या दिशेने व्यावसायिक होऊ पाहत असेल तर महिंद्र, अभिषेक बच्चन आदी ठेकेदारांनीही व्यावसायिकतेची पथ्ये पाळली पाहिजेत. आपले सारे व्यवहार खुले ठेवले पाहिजेत. नाही तर प्रो-कबड्डी आणि वर्ल्ड कबड्डी यांच्यात आयपीएलमधील गैरव्यवहारांची लागण होऊ शकेल.
नवीन उपक्रमाला हात घालताना, अशा स्वरूपाच्या जुन्या उपक्रमांपासून प्रो-कबड्डी आणि वर्ल्ड कबड्डी काय शिकणार आहे?
‘प्रो-कबड्डी’च्या एरवी व प्रथमदर्शनी उमद्या वाटणा-या उपक्रमाविषयी स्टार स्पोर्ट‌्स अफाट दावे छापून आणत आहेत. म्हणे ४३-४४ कोटी प्रेक्षकांनी हे सामने टीव्हीवर पाहिले!!! म्हणे अंतिम सामन्याला साडे आठ कोटींपेक्षा जास्त टीव्ही प्रेक्षक लाभले!!! ही थापेबाजी ते करत असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही. तो तर त्यांच्या व्यापारी-व्यावसायिकतेचाच अटळ भाग आहे. फार दूरच्या गोष्टी कशाला, सत्ताधारी भाजपचे युवा नेते वरुण गांधी हे भावी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या कलकत्त्यातील सभेस पन्नास हजार प्रेक्षक जमले होते, असे सांगत असताना भाजपची प्रचार-यंत्रणा गर्दीचा आकडा चार-पाच लाख सांगत नव्हते का? सयोजकांनी भरमसाठ दावे सातत्याने केले. इंग्रजी दैनिकात पुरस्कृत स्तंभलेखनातून जाहिरातीच्या दराने केले, पण मराठी दैनिकात त्या बातम्या म्हणून छापल्या तर माझा त्याला तीव्र आक्षेप असेल. टीव्हीचा झगमगाट कबड्डीला नवा. त्याचे मोठे अप्रूप. पण प्रसारमाध्यमांनी त्यावर भाळून जाऊ नये, वाहावत जाऊ नये आणि पारदर्शकतेचा आग्रह सदैव धरावा. या उपक्रमातील काही ब-यापैकी रक्कम सब-ज्युनियर, ज्युनियर व युवा कबड्डीच्या विकासावर खर्च होण्याची मागणी रेटत राहावी. जगभरच्या फुटबॉल लीगमध्ये तसे काही घडत आलेले आहे. प्रो-कबड्डी आणि वर्ल्ड कबड्डी यांना त्याच मार्गावर न्यावे!