आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Public Provident Fund By Sunil Chitale

गुंतवणुकीचा राजा-पीपीएफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या लेखमालेमध्ये आजचा विषय आहे पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी. जे आयकरदाते आहेत त्यांना पीपीएफ निश्चितच माहीत आहे. नुसते माहीतच नाही, तर आयकरदात्यांमध्ये पीपीएफ अत्यंत पॉप्युलर आहे. आयकर वाचवण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांची पहिली पसंती पीपीएफच आहे, तेव्हा आज आपण जाणून घेऊ पीपीएफबद्दल.
कोणतीही सज्ञान व्यक्ती पीपीएफचे खाते सुरू करू शकते. संयुक्त (Joint) खाते उघडता येत नाही; परंतु नामांकनाची (Nomination) सोय यामध्ये आहे. खातेदार एक किंवा अधिक व्यक्तींच्या नावाने नॉमिनेशन करू शकतो. पीपीएफ खाते आपण स्टेट बँक, इतर राष्‍ट्रीयीकृत बँक, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करू शकतो. या खात्यात दरवर्षी कमीत कमी 500 रु. व जास्तीत जास्त एक लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. 5 तारखेच्या आत जमा केलेल्या रकमेवरच त्या महिन्याचे व्याज मिळेल. सध्या व्याजाचा दर 8.7% असा आकर्षक दर आहे. व्याज प्राप्तिकरापासून संपूर्णपणे करमुक्त आहे, हा या योजनेतील सर्वात मोठा फायदा आहे. शिवाय जी रक्कम आपण दरवर्षी भरू त्यावर आयकराच्या 80 सीच्या अंतर्गत सूटसुद्धा मिळेल. आयकरामध्ये सूट व 8.7% दराने संपूर्ण करमुक्त व्याज यामुळेच गुंतवणूक क्षेत्रात अनेक जण पीपीएफला गुंतवणुकीचा राजा असेही संबोधतात. आजच्या व्याजदराने दरवर्षी पीपीएफमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 15 वर्षांनी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळेल व ही रक्कम संपूर्णपणे करमुक्त असेल.
अनेक गुंतवणूकदारांची 80सीची एक लाख रुपयांची मर्यादा, पीएफ, विमा हप्ता, गृहकर्जाची परतफेड किंवा मुलांची फी यामध्ये पूर्ण होऊन जाते. मग अशा गुंतवणूकदारांनी पीपीएफचे खाते उघडावे का? तर असे गुंतवणूकदार जे प्राप्तिकराच्या 20% किंवा 30% मर्यादेत आहेत अशांनी 80 सीची सूट नको असली तरी गुंतवणूक म्हणून दरवर्षी एक लाख रु. पीपीएफमध्ये अवश्य गुंतवावेत. 30% प्राप्तिकर भरणा-यांसाठी 8.7% दराने करमुक्त व्याज हे 12% व्याज मिळवण्यासारखे आहे आणि आज 12% व्याजदर कोणीच देत नाही. त्यामुळे गुंतवणूक म्हणूनही पीपीएफ अत्यंत आकर्षक आहे. याच्यापेक्षाही आकर्षक असा म्युच्युअल फंडाचा पर्याय माझ्याजवळ आहे. त्याविषयी पुढे आपण बघणारच आहोत.
आता एक लाख रुपये केव्हा भरावेत? तर ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे अशांनी नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याबरोबर म्हणजेच शक्यतो 5 एप्रिलच्या आधीच भरून मोकळे व्हावे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच 8.7% दराचे करमुक्त व्याज सुरू होईल. अडचण फक्त एकच आहे की सरकारने मागील 2-3 वर्षांपासून एजंटचा रोल पीपीएफमधून काढून टाकला आहे. त्यामुळे पीपीएफचे काम गुंतवणूकदाराला स्वत: बँकेत किंवा पोस्टात जाऊन करावे लागेल. त्याला एजंटची मदत मिळणार नाही.
पीपीएफ खाते 15 आर्थिक वर्षांसाठी असते, परंतु सहा वर्षांनंतर पैसे काढण्याची सोयसुद्धा असते. परंतु, आवश्यक असेल तरच यामधून पैसे काढावेत, अन्यथा याला पेन्शन फंडाचा भाग म्हणूनसुद्धा बघता येईल. दरवर्षी कमीत कमी 500 रु. भरणे बंधनकारक आहे. काही कारणाने खाते बंद झाल्यास, न भरलेल्या वर्षासाठी दर वर्षाला 50 रु. दंड भरून खंडित खाते पुन्हा सुरू करता येते. 15 वर्षे मुदतीनंतर खाते 5 वर्षांसाठी वाढवता येते आणि अशी 5-5 वर्षांची वाढ कितीही वेळा करता येते.
जे गुंतवणूकदार 20% व 30% प्राप्तिकराच्या क्षेत्रात आहेत अशांनी पीपीएफचे खाते उघडून दरवर्षी त्यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक अवश्य करावी व जे प्राप्तिकरदाते नाहीत किंवा 10% प्राप्तिकराच्या मर्यादेत आहेत त्यांनी पीपीएफ खाते न उघडता इतर आकर्षक पर्यायाकडे लक्ष द्यावे.गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सुपरिचित असा गुंतवणूक सल्लागार शोधा आणि सर्व गुंतवणूक त्याच्या सल्ल्यानेच करा. तुमची फसवणूक होणार नाही.
sunilchitale16@yahoo.com
(वाचकांनी कोणतीही गुंतवणूक करताना
स्वत:च्या जबाबदारीवर करावी. कोणत्याही परिणामाला दै. दिव्य मराठी वा मधुरिमा जबाबदार नाही हे कृपया लक्षात ठेवावे.) -संपादक