आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे'मॅजेस्टिक'अनुभवविश्‍व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या वडिलांनी, म्हणजेच केशवराव कोठावळेंनी मुंबईत फुटपाथवर पुस्तक विक्रीपासून व्यवसाय सुरू केला. आपल्या लेखनाने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणा-या जयवंत दळवींचा बाबांशी असलेला स्नेह तेव्हापासूनचा. बाबांची पुस्तकांची जाण दळवींना ठाऊक होती. एखाद्याला पुस्तक कसे दाखवावे, त्याला कुठल्या पुस्तकात रस असू शकतो, याची जाणीव
बाबांना असल्याचे दळवींच्या लक्षात आले होते. दळवी म्हणत, ‘मला कुठले पुस्तक केव्हा हवे असते, हे केशवरावांना बरोब्बर ठाऊक असायचे.’

त्या वेळी माझे वडील केवळ १७-१८ वर्षांचे होते. हळूहळू दळवी बाबांचे मित्र बनले. लेखक हा चोखंदळ वाचक असताेच, असे नाही. दळवींसारख्या मान्यवरांच्या प्रोत्साहनाने पुढे बाबांनी गिरगावात पुस्तकांचे दुकानच थाटले. म्हणता म्हणता दादर, ठाणे असा या पुस्तक चळवळीचा विस्तार झाला, ज्याचा वारसा आज मी चालवतो आहे. गो. नी. दांडेकरांसारखे कित्येक मान्यवर मॅजेस्टिकच्या पुस्तकविश्वात येऊन गेलेत. या लेखकांच्याही काही खास सवयी, त्यामुळे आमच्या विशेष लक्षात राहिल्या. उदाहरणार्थ; विश्वास पाटील नेहमी पुस्तके खरेदी करतात, पुस्तके भेट म्हणून मिळण्याची ते वाट पाहात नाहीत. प्रत्येक फेरीत ते सात-आठ पुस्तके विकत घेतात. त्यांना नवीन पुस्तकांची आधीच माहिती असते. त्यामुळे ते कुठली नवीन पुस्तके आलीत? हा सरधोपट प्रश्न कधीच विचारत नाहीत. ते स्वत: एेतिहासिक लिहीत असले तरी त्यांना सामाजिक, सांस्कृतिक, विविध आशयांची पुस्तके वाचायला आवडतात, हे त्यांच्या
ग्रंथखरेदीवरून मला नेहमी कळत गेले.

या उलट काही गमतीशीर प्रसंगही मी अनुभवले आहेत. एक लेखक, त्यांचे नाव मी घेत नाही; पण आपल्या पुस्तकांना उत्तम रॉयल्टी मिळणारे ते लेखक होते. एकदा ते आपल्या डॉक्टर असलेल्या मुलाबरोबर आमच्या ठाण्यातल्या दुकानात आले. मुलाने एक पुस्तक आवडल्याने हातात घेतले, त्याची किंमतही माफक होती. त्याने आपल्या लेखक असलेल्या वडिलांना पुस्तके दाखवले, कसे वाटते विचारले. लेखकांनी किंमत बघत म्हटले, ‘महाग वाटत नाहीय का हे पुस्तक?’
आपले पुस्तक खरेदी करून अनेकांनी वाचावे, असे वाटणारा हा लेखक स्वत:च दुस-याच्या पुस्तकाचे असे मूल्य ठरवतो, हे बघून मला गंमत वाटली. वाचकांच्याही काही गमतीजमती विचार करायला लावणा-या ठरल्या आहेत. एखादा माणूस वाचकच नसतो, तो एकदेखील
पुस्तक वाचत नाही, याचा धक्कादायक अनुभव देणारा एक प्रसंग आमच्या ठाण्यातील दुकानात घडला. शिक्षण घेताना फक्त अभ्यासक्रमातील पुस्तके वाचणारा एक माणूस बहुधा पहिल्यांदाच पुस्तकांच्या दुकानात आला. अचंबित झाला की, इतकी सगळी माणसे चक्क पुस्तके विकत घेताहेत म्हणून... त्याने तोपर्यंत कधीच पुस्तके विकत घेतली नव्हती. पुस्तके
वाचणे तर सोडाच, पुस्तक विकत घेणा-यांचाही वर्ग शिल्लक आहे, हे पाहून त्याला आश्चर्य वाटले होते. असा न वाचणा-यांचा वर्ग आपल्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात आहे, याची जाणीव त्या माणसाकडे बघून मला झाली.

काही वेळेला पुस्तकचोरीचे अनुभव वाचनाच्या हव्यासापोटी येतात. जी. ए. कुलकर्णी यांनी आपल्या एका पत्रात लिहून ठेवले आहे, ‘तुम्हाला पुस्तक वाचायचे असेल तर तीन पर्याय आहेत- buy, beg or steal...’ यातल्या ‘चोरी’चा प्रत्यय आम्हालाही अनेकदा आला.
एकदा आमच्या ठाण्याच्या दुकानात वपुंचे एक पुस्तक चोरताना एक पोरसवदा मुलगा पकडला गेला. ते चोरण्यामागचे कारण त्याने सांगितले, ‘मला पुस्तक वाचायची खूप इच्छा होती, पण खिशात पैसे नव्हते म्हणून चोरले.’ आता या पैसे नसणा-या मुलाचे मी समजू शकतो; पण अनेकदा उत्तम कमावती माणसेही पुस्तकांचा मोह तर आवरत नाही; पण खर्च
करण्याची मानसिकता नाही, अशा दुविधेत पुस्तक चोरू शकतात, याचीही मला प्रचिती आली आहे. एक बड्या कंपनीत काम करणारे वाचक, आमच्या बुक क्लबचे जुने सदस्य होते. ठरावीक दिवसांनंतर ते आमच्या दुकानात न चुकता एक फेरी घालत. त्यांच्याजवळ एक बॅग कायम असायची. एकदा आमच्या कर्मचा-यांपैकी एकाला त्यांचा संशय आला. त्यांनी बॅग तपासण्यासाठी मागितली. महाशयांच्या बॅगेत सात-आठ तरी पुस्तके होती, जी त्यांनी
चक्क चोरली होती. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी त्यांनी तशाच तीन-चार बॅगा भरून चोरलेली पुस्तके परत केली, तेव्हा आम्हाला धक्काच बसला. अशा विविध अनुभवांची पोतडीच खरे तर इतक्या वर्षांपासून साठली आहे, ज्यातून खरे तर पुस्तकाबाहेरचे नि पुस्तकातले
जग ख-या अर्थाने मला कळत गेले आहे.
ashokkothavale@hotmail.com