आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धैर्यदृढ पंजाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाब राज्य स्वतंत्र भारताइतकंच अखंड हिंदुस्थान असतानाही महत्त्वाचं मानलं जात होतं. आपल्या संस्कृतीची मुळं जर कुठल्या मातीत उगवली असतील, तर ती पंजाबच्या मातीतच. सिंधू संस्कृती, मोहोंजोदडो, हडप्पा सा-या प्राचीन खुणा, अवशेष सापडले ते याच भूमीत. पंजाब नावाची फोडच मुळी दोन शब्दांत केली जाते. पंज+आब. पंज म्हणजे पाच. आब म्हणजे पाणी. पाच नद्यांच्या पाण्यावर पोसलेला पंजाब. पंच नद्यांच्या दुआबाचा... दोन्ही किना-यांचा सुपीक जमिनीचा प्रदेश पंजाब. या पंच नद्या खरं तर सिंधूच्याच उपनद्या. झेलम, चिनाब, रावी, बिआस आणि सतलज. या नद्यांमुळे पंजाब प्रारंभापासूनच समृद्ध, सुजलाम, सुफलाम! पंजाबची भौगोलिक रचनाच अशी आहे की, वायव्य दिशेचं हे प्रवेशद्वार. इितहास काळात युरोप, आशियातून जे जे आक्रमक आले, ते पंजाबमधूनच. आर्य, कुशाण, सिथियन, ग्रीक, पर्शियन, अरब, तुर्क, पठाण, मुघल, ब्रिटिश आले ते पंजाबमधूनच. सा-यांना इथल्या हिरव्या गालिच्याची भुरळ!
पंजाबचं विभाजन १९४७ला झालं असलं, तरी इितहासकाळात वारंवार होणा-या आक्रमण, लढायांमुळे या प्रांताने अनेक शासक सहन केले. विभाजन आणि एकीकरण हा दर लढाईचा खेळ. भाषा, साहित्य आणि संस्कृतीवरही वारंवार होणा-या लढाया, आक्रमणांचा परिणाम झाला. मझी, दोआबी, माळवी, पत्यावली, डोगरी, चंबा, पहाडी, ल्यालपुरी, मुलतानी, हिंडको, पोथोहारी अशा कितीतरी बोलींच्या संयोगातून आजची पंजाबी उदयाला आली. इंडो-युरोपीय भाषा कुलातील ही इंडो आर्यन भाषा. जगात सुमारे १० कोटी लोक पंजाबी बोलणारे आहेत. सर्वाधिक आहेत, ते पाकिस्तानात- पावणेआठ कोटी. भारतात आहेत पावणेतीन कोटी. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशात ते अधिक असले तरी भारतभर अन् जगभर पंजाबी भाषी विखुरलेले आहेत. शीख, मुसलमान, हिंदू धर्मात पंजाबी भाषिक आढळतात. कोण गुरुमुखीत लिहितो तर कोण अरेबिकमध्ये. पण मुख्य लिपी गुरुमुखीच.
अन्य भारतीय भाषांप्रमाणे पंजाबी लिखित साहित्य नवव्या, दहाव्या शतकापासून आढळतं. तत्पूर्वी ते लोकसाहित्याच्या रूपात होतं. ‘गिहरे’, ‘थाल’, ‘किकली’ ही पूर्वीची बालकांची बडबड गीतं. आपल्याकडील ‘चांदोबा, चांदोबा भागलास का?’सारखी. तेथील तरुण-तरुणी ‘गिद्धा’ गातात, नि नाचतात. नाद, ताल, शब्द सारं टाळ्या नि टाचांवर ठुमकत राहतं. तसेच ‘टप्पे’ आणि बोलियाँ. लग्नात आजही ‘घोडिया’, ‘सुहाग’ ही पारंपरिक गीतं ढोलकीच्या तालावर गायली जातात. ‘वार’ ही तिथली पारंपरिक शौर्य गीतं. आपल्या पोवाड्यांसारखी. रोमांचक ‘ढोले’, धार्मिक ‘दोहे’ पंजाबीत आहेतच. ‘सिठनिया’, ‘बैंत’, ‘लुडी’, ‘जली’, ‘धमाल’, ‘मंदा’, ‘सीहरफियाँ’ची पंजाबी लोकगीतांची नजाकत काही औरच. बल्लेऽबल्लेऽऽ करत गायली जाणारी, नाचली जाणारी भांगडा गीत, नृत्ये कुणाला नाही माहीत? जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला मदतीला येतं, ते पंजाबी लोक गीत िन संगीत!
दुस-या महायुद्धानंतर मात्र पंजाबी साहित्य परंपरेतून पूर्णत: बाहेर आलं. अब्दुल रेहमानलिखित ‘स्नेहरसक’ पंजाबीचा आदि ग्रंथ मानला जातो. पण पुरावा हाती आहे, तो मात्र बाराव्या शतकातला. बाबा फरीद शकरगंज आदिकवी म्हणून ओळखले जातात. मध्य युगात नानक देव, आदि गुरू, मग अंगद, अमरदास, अर्जुनदेव, तेगबहादूर, गोविंद सिंह असा गुरू परंपरेचा विकास म्हणजे, शीख धर्माचा नि साहित्याचा विस्तार. शाह हुसेन, बुल्लेशाह, सुलतान बाहू, शाह शरफ इत्यादी सुफी काव्य परंपरा ही सतराव्या शतकातीलच. अठराव्या शतकात भाई संतोखसिंह यांनी संस्कृत काव्य परंपरेचा पुरस्कार करत काव्य रचना केली. एकोणिसाव्या शतकात मोहंमद बक्षांनी रीतीकाव्य लिहिलं. वीरसिंह, पूरनसिंहांनी पंजाबी आधुिनक काव्याचा पाया रचला. स्वातंत्र्यानंतर मोहनसिंग, अमृता प्रीतमची पंजाबी काव्याला भारतीय काव्यात प्रतिष्ठा मिळवून दिली, ती गुरू दयाल सिंह यांनी वर्धिष्णू करत सहस्त्रक श्रेष्ठ बनवली.

आज पंजाबी साहित्य म्हटलं की, भारतीयांपुढे नाव येतं ते अमृता प्रीतम यांचं. सहस्रक श्रेष्ठ कवयित्री म्हणून बहुमान लाभलेल्या अमृता प्रीतम यांनी स्त्रीवादी विचार आपल्या साहित्यातून भारतीय साहित्यामध्ये रुजवला. त्यांच्या ‘कागज ते कैनवास’ या १९६५ ते १९७४ कालखंडात लिहिलेल्या कवितांच्या संग्रहास १९८१चा भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार लाभला. तो पंजाबीस लाभलेला पहिला भारतीय पुरस्कार. या कवितांतून त्यांनी आजच्या अमानवी जीवन व्यवहारावर बोट ठेवलं आहे. त्या आपल्या साहित्यातून ‘अवसर’ची कल्पना मांडतात. माणसाच्या जीवनात कडेलोटाचे प्रसंग येतात. आस्तित्व उपटून हाकू पाहणारे. माणूस आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्या मरणप्राय क्षणांवर विजय मि‌ळवतो. तो ‘अवसर’, ती ‘संधी’ माणसाचं जीवन व्यवच्छेदक करते. त्यांनी आत्मकथनात्मक अनेक रचना लिहिल्या. त्यातील ‘रसीदी टिकट’ गाजली, ती त्यांच्या स्पष्टवादी शैलीमुळे. पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीस ‘रेव्हिन्यू स्टँप’ बनवून टाकल्याचं शल्य प्रीतमनी त्यात व्यक्त केलंय. प्रीतम यांनी आपल्या काव्यातून, साहित्यातून स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्व व विकासाची कल्पना मांडली ती, ‘चौथा कमरा’ संकल्पनेने. प्रत्येक घरात माजघर, शयनघर, स्वयंपाकघर असतं. सगळी त्या स्त्रीसाठी... तिला राबायला, सजवायला, मिरवायला लावणारी. तिला तिचा श्वास घेता यावा अशी जागा, अवसर घरात असते का? विचारणा-या अमृता प्रीतमनी ‘सफरनामा’मधून ‘आत्म साक्षात्कार’ हा नवा साहित्य प्रकार आणला. स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत स्वत:ला व्यक्त करत, उसवत जायचं. यातून ‘प्रोफाइल’, ‘सेल्फी’ जन्मली. त्यांनी ‘अक्षरों के साये’ हे साहित्यिक आत्मकथन लिहिलं. पण भारतीय भाषांतलं पहिलं साहित्यिक आत्मकथन वि. स. खांडेकरांनी ‘पहिली पावलं’ रूपात पन्नास ते सत्तरच्या दशकात लिहिलं. ते पुस्तकरूपात यायला एकविसावं शतक उजाडावं लागलं.

विसावं शतक अस्ताला जात असताना १९९९ला पंजाबीला दुसरा ज्ञानपीठ सन्मान लाभला, तो गुरुदयाल सिंह यांना. त्यांनी वंचितांच्या वेदनांना आपल्या साहित्याद्वारे जनाधार मिळवून दिला म्हणून. गुरुदयाल सिंहांनी कथा, कादंबरी, नाटक, प्रवास, संस्कृती, बालसाहित्य असं चतुरस्र लेखन केलं.
आज पंजाबी भाषा आणि साहित्य अन्य भारतीय भाषांप्रमाणे सर्व साहित्य प्रकार स्पर्शत विकसित होताना दिसतं. पद्यापेक्षा आज ते गद्य शैलीत अधिक लिहिलं जातं. आधुनिक पंजाबी गद्याचा प्रारंभ पूरन सिंह यांच्या निबंधांमुळे विशेष गाजला. ते बहुभाषी होते. पंजाबीप्रमाणे ते हिंदी, इंग्रजीत आत्मविश्वासाने लिहीत. ‘द स्पिरिट ऑफ ऑरिएंटल पोएट्री’, ‘द स्पिनिंग व्हिल’, ‘टेन मास्टर्स’, ‘द स्पिरिट ऑफ सिख्स’सारखे निबंध वाचताना ते लक्षात येतं. त्यांनी हिंदीत लिहिलेले निबंध वाचून हिंदी समीक्षक आचार्य रामचंद्र शुक्ल एकदा म्हणाले होते की, ‘पूरन सिंहांनी हिंदीत एखादा निबंध संग्रह प्रकाशित केला असता तर त्यांनी सर्व हिंदी निबंधकारांना मागे टाकले असते.’ पंजाबातील ‘खुले लेख’ निबंध संग्रह गाजला होता. तेजा सिंह, मोहन सिंह वैद, स. स. चरनसिंह शहीद पंजाबीतील अन्य बहुचर्चित निबंधकार म्हणून सांगता येतील.

निबंधांप्रमाणेच पंजाबीत आत्मकथा लेखनाची परंपरा मोठी आहे. अमृता प्रीतम यांच्या लेखनाचा विकास अजीत कौर यांच्या ‘खानाबदोश’ आत्मकथेत दिसून येतो. त्यांना त्यांनी स्त्रीसुलभ लाजेच्या सर्व मर्यादा पार केल्या, असं मानलं जातं. पुढे अजीत कौरनी ‘कूड-कबाड़’ लिहून क्षतिपूर्ती केली. स्त्री आत्मकथेत आणखी एक उल्लेखनीय नाव म्हणजे दलीप कौर टिवाणा. त्यांची ‘नंगे पैरा दा सफर’ आत्मकथा स्त्रीवेदन म्हणून महत्त्वाची. ‘इतिहास, इतिहास के पन्नों पर लिखे जाने से कुछ देर पहले लोगों के जिस्म (शरीर) पर लिखा जाता है।’ सांगणारं हे आत्मकथन गंभीर लेखन मानलं गेलं. त्यांच्या ‘इह हमारा जीवना’ या कादंबरीला १९७१चा साहित्य पुरस्कार लाभला. स्त्रियांबरोबर पंजाबीत अनेक पुरुष लेखकांनीही आत्मकथा लिहिल्या. तेजा सिंह, गुरूबक्श सिंह, नानक सिंह, बलराज साहनी, मास्टर तारासिंह यांच्या आत्मकथा वाचनीय ठरल्या. कर्तारसिंह दुग्गलांची ‘किस पहि खोलऊ गंठडी’, हरभजन सिंह ‘आरसी’ लिखित ‘टािकयावाला चोला’, बलवंत गार्गींची ‘नंगी धूप’ आत्मकथाही उल्लेखनीय ठरल्या.

शब्दचित्रे, चरित्रे, प्रवासवर्णन, आठवणी, वृत्तांत अशा प्रकारांत पंजाबीमध्ये मोठ्या प्रमाणात लेखन झालं आहे. गुरुदयाल सिंह पंजाबीचे आघाडीचे कादंबरीकार होत. ‘मढी दादीवा’, ‘अनहोये’, ‘अधचानणी रात’, ‘आथण उग्गन’, ‘अन्हे घोडे दा दान’ या त्यांच्या कादंब-यांनी पंजाबी कादंबरी विकासात स्वत:चं युग निर्माण केलं. दिलीप कौर टिवाणांच्या ‘इह हमारा जीवना’ कादंबरीने स्त्री जीवनाचं प्रभावकारी चित्रण करत सन १९७१चा साहित्य अकादमी पुरस्कार पटकावला होता. लघुकथेत कुलवंत सिंह विर्क, गुलजार सिंह संधू, मोहन भंडारी यांनी विशेष पसंती मिळवली आहे. गुल चौहान, प्रीतम, जोगिंदर कैराँ, प्रीतम ब्रार यांच्या कथाही पंजाबीत उल्लेखनीय समजल्या जातात. ‘इक छित चनाँ दी’ कथासंग्रहास सन १९६५चा अकादमी पुरस्कार लाभल्याने पंजाबी प्रतिनिधी कथा म्हणून विर्क यांच्या या कथांचे अनेक भारतीय भाषांत अनुवाद झालेत.

आय. सी. नंदांनी पंजाबी नाटकांची परंपरा सुरू केली. पण तिला रंगमंचीय मान्यता मिळवून दिली, ती मात्र संतसिंग सेखाँ यांच्या नाटकांनी. ‘छे घर’, ‘बारिस’, ‘मोइयाँ सार ना काई’, ‘दमयंती’, ‘कलाकार’ या नाटक, एकांकिकांनी पंजाबी रंगमंच रोमांचित केला. त्यांच्या ‘मित्र प्यारा’ नाटकास १९७२चा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला, तो त्याच्या वैचारिक सामर्थ्यामुळे. सेखाँनी आपली सारी नाटकं विचार प्रसाराचं माध्यम मानून रचली व अभिनित केली. हरचरण सिंह, अमरीक सिंह, गुरुचरण सिंह, कपूर सिंह, हरसरन सिंह यांच्या एकांकिका मंचित झाल्या व त्यांची अनेक भाषांत रूपांतरेही झालेली दिसतात. या एकांकी नाटकांवर पाश्चात्त्य प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

१९४७ वर्ष भारतीय इितहासात स्वातंत्र्याचं वर्ष म्हणून नोंदलं गेलं असलं, तरी पंजाबी बांधवांसाठी मात्र विभाजन वर्ष म्हणून कायमस्वरूपी लक्षात राहील. जात, धर्माच्या नावावर खून, दंगे, बलात्कार, अत्याचाराचे भीषण आघात पंजाबी बांधवांनी सहन केले. ते अनुभवायचे असतील, तर अमृता प्रीतम यांची ‘वारिस शहा’ कविता, खुशवंत सिंहांची कादंबरिका ‘ट्रेन टू पाकिस्तान’, गुरुदेव सिंह रूपना यांची कथा ‘शीशा’, फैज़ अहमद फैज यांची उर्दू नज्म ‘सुबे आजादी’ (स्वातंत्र्याची पहाट), भीष्म सहानींची कादंबरी ‘तमस’ (हिंदी), सदाअत अली मंटोंच्या कथा, या सर्वांतून विभाजनाची शोकांतिक... त्या जखमेचं रक्त अजून वाहात आहे. आजचा हरित पंजाब त्या रक्ताच्या सड्यानंतरही हिरवागार पाहतो, तेव्हा लक्षात येतं, की पंजाबी माणूस मागं टाकण्यात व पुढं होण्यात जाँबाज खरा! दु:खांवर मात करत सुखावर स्वार होणं, पंजाबी वृत्ती म्हणून जगात कोणत्याही देशात जा, तुम्हाला पंजाबी दिसणारच. सीमोल्लंघन करत अटकेपार झेंडा रोवण्याचं पंजाबी कसब साहित्य, भाषा, संस्कृतीनं जपलं, ते नित्य नव्याचं स्वागत, अनुकरण करत. म्हणून पंजाबी साहित्य नित्य नूतन विचार, शैली, वृत्ती, चित्र घेऊन अवतरतं. ऋत्विक घटक यांना विभाजनाला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर १९९७मध्ये मागे राहिलेला आत्मासिंहचा भाऊ बंगालीमध्ये चित्रित करावासा वाटतो, ते केवळ विभाजनाचं शल्य न विसरता येणारं असतं म्हणूनच!
drsklawate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...