आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडिएशन थेरपी: आशेचे क्ष-किरण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेडिएशन हे सावधतेने उपयोगात आणावे, असे वैद्यक तंत्र आहे. ट्यूमरपर्यंत रेडिएशन पोहोचवण्याचे तीन मार्ग आहेत- टेलिथेरपी, ब्रॅकीथेरपी आणि सिस्टिमिक थेरपी.
शरीरापासून दूर रेडिएशनचा झोत निर्माण करून तो शरीरातील ट्यूमरवर रोखून सोडायचा, या तंत्राला टेलिथेरपी म्हणतात. सर्वसाधारणपणे ही पद्धती ब-याच प्रकारातल्या कर्करोगांसाठी वापरली जाते. ‘लिनियर अ‍ॅक्सिलरेटर’मध्ये क्ष-किरण तयार करून, ते शरीरातील ट्यूमरवर सोडतात. हे क्ष-किरण शरीरातून ट्यूमरपर्यंत पोहोचताना शरीरातील इतर उतींमध्येसुद्धा शोषले जातात. त्यामुळे क्ष-किरणांचा झोत कसा ठेवायचा, त्याचा किती डोस द्यायचा, याची तयारी रेडिएशन तज्ज्ञ प्रत्येक ‘केसचा’ स्वतंत्र अभ्यास करून ठरवतात. रेडिएशन थेरपी प्रत्येक रुग्णासाठी निराळी असते. ही थेरपी सुरक्षित कक्षात दिली जाते.
रुग्णाच्या शरीरातील अवयवांना इजा होऊ नये, म्हणून ‘लेड’ (शिसे) या धातूपासून बनवलेले संरक्षक कवच रुग्णासाठी वापरतात. दोन किंवा तीन कोनामधून क्ष-किरणांचा झोत ट्यूमरवर सोडला जातो. दिवसातून एकदा व आठवड्यातून पाच दिवस याप्रमाणे ही थेरपी दिली जाते. अशी थेरपी किती आठवडे द्यायची, याचे गणित प्रत्येक कर्करोगासाठी निराळे असते. स्तनाचा कर्करोग, हॉजगिन्स ट्यूमर, मान व डोके येथील कर्करोग, प्रॉस्टेटचा कर्करोग, गर्भाशय, स्त्री बीजांड याचे कर्करोग, हे रोग बरे करण्यासाठी या थेरपीचा उपयोग होतो. जर कर्करोग हाडापर्यंत फैलावला असेल, तर वेदना निवारणासाठी ‘पॅलिएटिव्ह’ म्हणूनसुद्धा या थेरपीचा उपयोग केला जातो.

वैद्यकीय विज्ञानातील आधुनिक थेरपीला इतिहास असतो. तो समजला म्हणजे वैद्यकीय विज्ञान कसे विकसित झाले, ते लक्षात येते. त्यापासून अवास्तव रास्त अपेक्षा ठेवता येतात. ब्रॅकीथेरपीला शतकापेक्षा जास्त वर्षे होऊन गेली. पिअरे क्युरी यांनी १९०१मध्ये फ्रेंच डॉक्टरांना रेडियम प्रत्यक्ष ट्यूमरमध्ये ठेवून कर्करोगावर उपचार करता येतील, असे सुचवले होते. टेलिफोनचा जनक बेल यानेसुद्धा रेडियमचा कर्करोगासाठी असा उपचार करता येईल, असे अमेरिकन डॉक्टरांना सूचित केले होते. त्याप्रमाणे रेडियमचा उपयोग होऊ लागला. पण ब्रॅकीथेरपी करणा-या डॉक्टरांना रेडिएशनचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ही थेरपी मागे पडली. आज ट्यूमरची शरीरातील जागा अचूकपणे नक्की करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. सुरक्षिततेने रेडियम शरीरात ठेवण्याची यंत्रे निघाली आहेत. ब्रॅकीथेरपी पुन्हा वापरात येऊ लागली आहे. ‘ब्रॅकी’ या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘जवळ’ असा आहे.

ज्यापासून रेडिएशनचा उगम होतो, अशी वस्तू ट्यूमरमध्ये किंवा ट्यूमरच्या आजूबाजूला रोपण करणे याला ब्रॅकीथेरपी म्हणतात. रेडियम वा कोबाल्ट ६० या धातूपासून हे सूक्ष्म उपकरण तयार केलेले असते. त्याच्यातून रेडिएशनचा किती डोस मिळेल, हे तज्ज्ञ ठरवतात व त्याप्रमाणे हे उपकरण तयार करतात. रेडिएशनचा हा डोस किती दिवसांत पूर्ण होईल, हे आधीच ठरलेले असते. त्या काळानंतर हे उपकरण शरीरातून काढले जाते. मेंदूचे काही ट्यूमर व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, प्रॉस्टेटचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग यासाठी ही थेरपी वापरली जाते. काही विशेष प्रकारच्या ‘केस’मध्येच या थेरपीचा उपयोग करण्याचा निर्णय तज्ज्ञ घेतात. या रेडिएशनचा आजूबाजूच्या अवयवांवर प्रभाव पडण्याचा धोका या थेरपीमध्ये असतो. २०१३च्या आकडेवारीनुसार या थेरपीवर जगात ६८ कोटी डॉलर खर्च केले जातात.
भौतिकी तज्ज्ञांनी न्युक्लिअर फिजन रिअ‍ॅक्टर तयार केले. तेथे विविध धातूंचे व अधातूंचे रेडिओ आयसोटोप्स तयार करता येऊ लागले. यांना ‘रिअ‍ॅक्टर बाय प्रॉडक्ट मटेरियल’ म्हणतात. यातून ‘रेडिओ फार्मास्युटिकल्सचा’-किरणोत्सारी औषधांचा उदय झाला. ही किरणोत्सारी औषधे विविध मार्गाने शरीरात सोडणे, याला कर्करोगाची सिस्टमिक थेरपी म्हणतात. विविध मार्गाने म्हणजे, तोंडावाटे, शिरेतून, रोहिणीतून वगैरे. केसियम १३७, आयोडिन १३१, मॉलिब्डेनम ९९ ही त्याची काही उदाहरणे.

आयोडिन १३१चे उदाहरण घेऊ. थायरॉइड ग्रंथी आयोडिन शोषून घेते. त्यापासून थायरॉइड हार्मोन तयार करते. या तत्त्वाचा येथे उपयोग केला जातो. आयोडिन १३१ थायरॉइडच्या कर्करोगासाठी वापरतात. आयोडिन १३१चा डोस ठरवून ते थायरॉइडचा कर्करोग असलेल्या रुग्णाला दिले जाते. थायरॉइड ग्रंथी हे आयोडिन १३१ शोषून घेतात. यापासून निर्माण होणारे रेडिएशन थायरॉइडच्या कर्करोगातील कर्कपेशी नष्ट करतात. त्याबरोबरच थायरॉइडच्या नॉर्मल पेशीही नष्ट होतात. कर्करोग बरा होतो, पण शरीरात थायरॉइड हार्मोन तयार होणे बंद होते. रुग्णाला थायरॉइड हॉर्मोन आयुष्यभर घ्यावे लागते. कर्कपेशींच्या आवरणावर काही प्रथिने असतात. या प्रथिनांच्या विरोधी प्रतिपिंडे-अँटिबॉडी तयार करतात. रेडिओआयसोटोप्सना या अँटिबॉडी जोडतात व रुग्णाला देतात. या अँटिबॉडी रेडिओआयसोटोप्सना कर्कपेशींपर्यंत पोहोचवतात. अशा त-हेने कर्कपेशी नष्ट होतात. बी सेल लिम्फोमा या रक्ताच्या कर्करोगासाठी या थेरपीचा उपयोग होतो. संशोधनाचे चक्र कधी थांबत नाही. त्यामुळे नवनवीन थेरपीचा शोध चालूच आहे. रुग्णांसाठी हे आशादायी आहे.

dranand5@yahoo.co.in