प्रदीर्घ कालावधीनंतर एका खेड्यात जाणे झाले. खेडे म्हटल्यानंतर त्यात दुर्गमता, मागासलेपणा, विकासाचा अभाव हे सगळेच आले. पण मी जिथे गेलो, तिथे यातले काहीच शिल्लक नव्हते. त्या खेड्यातली जवळजवळ सर्व घरे उंच जोत्यावर पक्की बांधली आहेत. काही तुरळक घरांना शहरातल्या बंगल्यांना असते तशी गॅलरी आणि त्यावर सॅटेलाईटच्या डिश अँटेना दिमाखात मान काढून उभ्या. या गावाची प्रगती पाहताना सहजच मनात आले, ‘कधीकाळी नावारूपाला आलेली त्या गावची शाळा आता कशी असेल?’ मग याच कुतूहलापोटी मी त्या शाळेला भेट द्यायचे ठरवले. मे महिना असल्याने स्वाभाविकपणे शाळेला सुटी होती. साधारण पंचेचाळीस वर्षांपूर्वी ही शाळा बांधली गेली, तेव्हा तिला गावच्या मंदिरापेक्षाही जास्त पवित्र दर्जा असणार. ‘आमच्या गावात प्राथमिक शाळा आहे’ ही समस्त गावक-यांसाठी अभिमानास्पद बाब असणार.
एरवी जन्मजात कष्ट वाट्याला आलेल्या कित्येक लहान मुलांना ‘काही तासांसाठी कामापासून सुटका मिळते’ या एकमेव सबबीसाठी शाळेत जायला आवडत असणार. अर्थात, प्रत्येकाच्याच वाट्याला ही सुविधा आली नसणार. घराजवळ शाळा असूनही काही मुलांना मात्र वडील नसल्याने, किंवा घरात कमावते हात कमी असल्याने शिक्षण घेण्याची चैन शक्य नसणार. अर्थात, ‘
आपल्याला शिकायला मिळाले नाही’ ही टोचणी या देशातल्या कोट्यवधी लोकांना आजही दु:खी करते. या देशातली दहामधली पाच मुले आपले प्राथमिक शिक्षणही पूर्ण करू शकत नाहीत. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत दहामधला फक्त एक विद्यार्थी टिकाव धरून राहतो. यात खेड्यातल्या मुलांचा जसा समावेश आहे, तसा शहरातल्या मुलांचाही आहे.
शिक्षणाची अशीच एक अटीतटीची लढाई अलीगढच्या राजेश कुमार शर्मा यांनी काही वर्षांपूर्वी लढली. अनेक खस्ता खात ते बीएसस्सीच्या तिस-या वर्षापर्यंत पोहोचले. डिग्री हातात येण्यास फक्त एक वर्ष उरलेले असताना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडून पोटापाण्यासाठी दिल्लीकडे स्थलांतर करावे लागले. नोकरी करताना शिक्षण पूर्ण झाले नसल्याने त्यांच्या वाट्याला आलेले शोषण मन खिन्न करणारे होते.
सरतेशेवटी नोकरी सोडून ते व्यवसायात उतरले आणि काही सहका-यांच्या मदतीने आपल्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. या झगड्यात अर्थातच शिक्षण पूर्ण न केल्याची खंत कायम होती. स्थिरस्थावर झाल्यानंतर दिल्लीपासून जवळच्या वनक्षेत्रात फिरत असताना त्यांना काही झोपडपट्ट्या दिसल्या, ज्यात कितीतरी लहान मुले खेळत होती. ‘या मुलांना शाळेत का पाठविले जात नाही?’ याबद्दल त्यांनी विचारणा केल्यानंतर शाळा ही महामार्गापासून दूर असून रस्ते ओलांडताना अपघात होऊन मुलांचे मृत्यू होत असल्याने ही मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, अशी माहिती समोर आली. शर्मा यांनी इथल्या मजुरांना आपले म्हणणे पटवून देऊन मुलांना शाळेत पाठविण्याचे कबूल करवून घेतले. आणि दुस-याच दिवशी त्यापैकी पाच मुलांना घेऊन जवळच जगातली अद्भुत शाळा सुरू केली.
राजेश कुमार शर्मा यांनी चालविलेल्या या शाळेत पंखे वा लाईट्स नाहीत, बसायला बेंचेस नाहीत, किंवा दर तासाला बदलणारे शिक्षकही नाहीत. महामार्गावर असलेल्या एका उड्डाणपुलाखाली ही शाळा भरते. पुलाच्या खाली बनविलेल्या भिंतीवर काळा ऑईलपेंट लावून फळा बनविण्यात आलेला असून शिक्षकाला बसायला एक मोडकी खुर्ची, खडू, मुलांना बसण्यासाठी सतरंजी आणि एक हंडाभर पिण्याचे पाणी इतक्याच सामुग्रीसह ही शाळा गेली चार वर्षे सुरू आहे. वेगवेगळ्या वयातल्या सर्व मुलांना एकत्रितरीत्या शिकवून त्यांच्या वयानुसार शैक्षणिक तयारी करवून घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना जवळच्या सरकारी शाळेत शिकवण्यासाठी पाठविण्यात येते. आजपर्यंत अशी शेकडो मुले या शाळेत शिकली असून काहींनी दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेण्यापर्यंत मजल मारली आहे. अर्थात, यातला एखाद-दुसरा डॉक्टर बनूही शकेल; पण आर्थिक विषमतेचा विचार करता वास्तवात कदाचित सगळ्यांना हे शक्य होणार नाही. ही मुले जितकी मजल मारू शकतील तितपत ती जातील. या शिक्षणाचा भविष्यात त्यांना काही ना काही उपयोग नक्की होईल, असे शर्मा यांना वाटते. ज्ञान मिळविण्यासाठी एक मोठा वर्ग असा संघर्ष करीत असताना सद्य:स्थितीतले शिक्षणाचे राष्ट्रीय स्वरूप लक्षात घेतल्यास त्यात अनेक परस्परविरोधी गोष्टींना आपण सामोरे जात आहोत. सधन घरातले मूल दोन वर्षांचे झाल्यानंतर शिक्षणाचे पहिले धडे त्याचे पालक द्यायला सुरुवात करतात, जे अर्थातच इंग्रजी माध्यमात असतात.
लहान मुलांसाठी मॉल्स आणि किराणा दुकानात उपलब्ध असलेली शैक्षणिक पुस्तके पाहिल्यास त्यात बी फॉर बॉल, बी फॉर बलून, की बी फॉर बॉय या साध्या गोष्टीत एकमत होताना दिसत नाही. ही त्रुटी पुढे वाढत जाऊन निरनिराळ्या बोर्डांचा अभ्यासक्रम असलेल्या शाळा, विद्यार्थ्यांची जात, धर्म, लिंग आणि आर्थिक परिस्थितीनुसार केलेली विभागणी, शिक्षणशास्त्राचे शिक्षण न घेतलेल्या स्वस्त पदवीधारकांकडून दिले जाणारे शिक्षण आणि एकूणच बाजाराभिमुख शिक्षण घेण्याकडचा कल हे सद्य:स्थितीत भारतीय शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. त्यात विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षक आपल्या विषयांच्या क्षेत्रात नव्याने काय शिकत आहेत, हा संशोधनाचा विषय ठरावा. विविध राजकीय पक्षांच्या पुढा-यांनी उघडलेली शैक्षणिक संस्थाने, त्यांच्या फाइव्ह स्टार हॉटेलशी स्पर्धा करणा-या इमारती आणि वातानुकूलित वर्गांतून बोलक्या पोपटांची एक अनुभवशून्य पिढी तयार करीत आहेत. साक्षरतेच्या महत्त्वानंतर पदव्युत्तर शिक्षणाचे महत्त्व स्पष्टपणे बिंबविण्यास आपण अपयशी ठरत आहोत...
गावातल्या शाळेच्या इमारतीत पत्ते खेळणारे लोक पाहिल्यानंतर, शिक्षणाची किंमत कमी होते आहे का? हा प्रश्न मला व्यथित करणारा होता. पंचेचाळीस वर्षांपूर्वी उघडलेल्या याच शाळेतले कितीतरी सुरुवातीचे विद्यार्थी आज स्थिर नोक-या अथवा व्यवसायात यशस्वी झाले आहेत, याचे श्रेय गावातल्या त्या शाळेला देण्यास ते विसरत नाहीत. सुरुवातीच्या काळात शिक्षणाने उपलब्ध करून दिलेल्या संधी मात्र हळूहळू कमी झाल्या असून सद्य:स्थितीत शिकलेल्या लोकांसाठी उपलब्ध असणा-या रोजगाराच्या संधींचे प्रमाण हे एकूण बेरोजगारांच्या संख्येपेक्षा कैक पटींनी कमी आहे. शिक्षण घेऊनही नोकरी न मिळणे आणि ते वाया जाऊ नये म्हणून अंगमेहनतीची कामे करण्यास नकार देणे, अशा एका विचित्र परिस्थितीत सध्या आपल्या देशातील सुशिक्षित तरुण सापडला आहे. शिक्षणातून तयार होणा-या या आधुनिक बेरोजगारीचे स्वरूप कळल्यानंतर गावातल्या त्या शाळेत कुणाला पत्ते कुटावेसे वाटले तर त्याला कितपत दोषी धरता येईल? या पार्श्वभूमीवर कुठल्याही मदतीशिवाय राजेश कुमार शर्मा यांनी चालविलेली शाळा हे याच प्रश्नाचे एक व्यापक स्वरूप आहे. गेली तीन वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळूनदेखील शर्मा यांनी कुठल्याही संस्थेकडून वा व्यक्तींकडून कसलीही आर्थिक मदत या शाळेसाठी घेतलेली नाही. अनेक राजकीय पुढा-यांचे अंतस्थ हेतू लक्षात घेऊन त्यांच्यापासूनही ते पूर्णपणे दूर राहिले आहेत. सद्य:स्थितीत उड्डाणपुलाखालची ही शाळा चालविण्यासाठी होणारा खर्च शर्मा हे आपल्या तुटपुंज्या कमाईतून भागवत असून हळूहळू पैसे साठल्यानंतर स्वकमाईच्या पैशाने शाळेची इमारत बांधण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ही इमारत बांधली जाईपर्यंत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणसंधी, नव्या जगातल्या शिक्षणाचे संदर्भ आणि शिक्षणाची गुणवत्ता या समस्यांना ही शाळा शेकडो प्रश्न विचारत राहील. जगातील कुठली व्यवस्था हा प्रश्न सोडवू शकेल, हा येणा-या काळातला सर्वात मोठा प्रश्न असणार आहे.
rahulbaba@gmail.com