आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Rajkumar By Dharmendra Pratap Singh, Divya Marathi

राजकुमार: एक भावुक व्यक्तिमत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहरी, सनक सम्राट यांसारखी अनेक नावे प्रसिद्ध अभिनेता राजकुमार यांना दिली गेली. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘जानी’ या नावामुळे. बॉलीवूडमधील ऑफिसबॉयपासून निर्माते-दिग्दर्शकांपर्यंत सगळेच त्यांना जानी म्हणूनच ओळखायचे. राजकुमार यांच्यातील भावूक व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले आहे. संवेदनशील आणि हळुवार मन असलेल्या राजकुमार यांनी फाळणीचे चटके स्वत:देखील सोसले होते. त्यामुळेच बाबरी मशीद-रामजन्मभूमी हा वाद उफाळल्याने मुंबईत दंगल झाली असताना सगळी थिएटर्स बंद केली असताना निर्माते मेहुल कुमार यांना सांगून राजकुमार यांनी आपला ‘तिरंगा’ हा चित्रपट अशाही परिस्थितीत प्रदर्शित करायला लावला होता. भर रस्त्यावर हिंसाचार उसळला असताना कोण थिएटरमध्ये चित्रपट पाहायला येईल, असे वातावरण असताना वितरकांच्या या शंकेचे निरसन करीत राजकुमार यांनी देशभक्तीवर आधारित ‘तिरंगा’ चित्रपट तरुणांना आकर्षित करेल; जे या हिंसाचाराचे अजाणतेपणी वाटेकरी होत आहेत, असा भावूक आशावाद मांडला.

त्या वेळी मी जिथे राहत होतो तिथून दीड किलोमीटर अंतरावर राजकुमार यांचा बंगला होता-57 वरळी सी फेस. रोज फिरायला जात असताना त्यांना बंगल्याच्या बाल्कनीत मी पाहायचो. मात्र, त्यांच्या वाढदिवशी मी हिंमत केली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. त्यांनी आस्थेने विचारपूस करत प्रथम चॉकलेट्स दिली व खीरही आग्र्रहाने खायला लावली होती. राजकुमार यांची तिन्ही मुले त्या वेळी परदेशात शिकत होती. इतके भावनाशील व्यक्तित्व असूनही राजकुमार यांचे बॉलीवूडमध्ये मित्र म्हणवण्यासारखे कुणी नाही. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे यासाठी कारण देता येत नाही. पण त्यांनाच यामागचे कारण विचारले असता, ‘आपण जीवनात प्रगती करो अथवा न करो, जो सतत सोबत राहतो तो खरा मित्र. उद्ध्वस्त होण्यासाठीही सोबत राहण्यास धाडस लागते. मला नाही वाटत ते कुणाजवळ असेल.’ असे उत्तर राजकुमार यांनी दिले. पडद्यावरील त्यांच्या कठोर प्रतिमेबाबत त्यांना बोलतं केलं असता तो केवळ या मायानगरीत स्थिरावण्यासाठी केलेला बदल आहे, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. मात्र या मायानगरीने त्यांना या प्रतिमेत कायमचे अडकवले, अगदी त्यांना ती वास्तव वाटेस्तोवर. याच भ्रामक वास्तवात अडकलेल्या राजकुमार यांनी मुलाकरता जुहूला बंगला बांधला, पण तो बघायलादेखील ते गेले नाहीत.
3 जुलै 1996ला त्यांचे निधन झाले तेव्हा मी मुंबईतच होतो. त्यांचे अंतिम संस्कार त्यांच्या इच्छेनुसार कुटुंब व निकटवर्तीयांच्या उपस्थितीत शांततेत पार पडले. फारशी गर्दीही नव्हती. मेहुलकुमारांच्या म्हणण्यानुसार त्यांना आपल्या मृत्यूचा तमाशा बनवायचा नव्हता. मला त्यांनी माझ्यापाशी एकदा काढलेले उद्गार आठवले, ‘जानी, मुझे मारने में इतना विलंब क्यों... जिस दिन मैं मरुंगा, दुनिया वालों को खबर भी नहीं लगेगी !’

dpsingh@dainikbhaskargroup.com