आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Ready To Cock Food Items By Sujay Shastri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक विशेष: 'इन्स्टंट' खाद्ययात्रा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ फारसा जुना नाही, अगदी २५-३० वर्षांपूर्वीचा. म्हणजे ८०चे दशक संपून ९०च्या दशकाची चाहूल लागली होती. कॉम्प्युटर नुकताच घरा-दारांत दिसू लागला होता. टीव्ही घराघरांत पोहोचत होता. दुर्मीळ असलेला फोनही मध्यमवर्गापर्यंत पोहोचू लागला होता. त्याचे जाळे आजच्यासारखे विस्तारले नव्हते, पण पायाभरणी भक्कम होत होती. त्यातच ७०च्या दशकात झालेली ‘हरित क्रांती’ आणि त्याच्या पाठोपाठ पुढच्याच दशकात झालेली ‘धवल क्रांती’मुळे एकूण समाजावर त्याचे परिणाम दिसून येत होते. दुष्काळ संपला नव्हता, मान्सूनचा लहरीपणा होताच, लोकसंख्याही वाढत होती; पण अन्नधान्याच्या कमतरतेमुळे पूर्वीसारखी खाण्यापिण्याची आबाळ नव्हती. रेशनवर स्वस्त धान्य मिळत नसले, तरी बाजारात मात्र धान्य उपलब्ध होते. भूकबळी कमी होत होते. मध्यमवर्ग झपाट्याने वाढत होता. शहरे वाढत होती. अर्थव्यवस्थेत नव्या आर्थिक संधी निर्माण होत असल्याने आधुनिकीकरणानेही वेग घेतला होता.

अशा काळात देशातील किराणा मालाचे स्वरूप बदलत होते. वाण्याची पारंपरिक दुकाने कात टाकत होती, तर ‘अपना बझार’सारखी दुकानांची साखळी नुकतीच उदयास येत होती. पारंपरिकरीत्या कांडप करून मसाले तयार करण्याची पद्धत कालबाह्य होत, रेडिमेड मसाले सहज उपलब्ध होऊ लागले होते. महाराष्ट्रातल्या पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये असे बदल होताना तळागाळातल्या ग्राहकांना सहज परवडतील अशा १ ते ५ रुपयांपर्यंतच्या सॅशे उर्फ आधुनिक पुडक्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे छोट्याशा पॅकेटमध्ये शॅम्पू व तेलापासून ‘रेडी टू इट’पर्यंतचे असंख्य पदार्थ विक्रीस येण्यास सुरुवात झाली होती. खासगी चॅनेल्सच्या आगमनामुळे देशी-विदेशी वस्तूंचे माहात्म्य चमकदार नि आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून घराघरांत पोहोचू लागले होते. उत्पादकांनी आपला जाहिरातदार हेरला होता आणि जाहिरातदारांनी आपला ग्राहक. या सगळ्यांसाठी टीव्ही हे सगळ्यांत प्रभावी माध्यम बनले होते. जागतिकीकरण आणि उदारीकरणाची ती पहाट होती.

वस्तुतः ही पहाटच आपले खाद्यजीवन आंतर्बाह्य बदलणारा एक महत्त्वाचा टप्पाही होता. या टप्प्यात-मन्वंतरात एक खाद्यपरंपरा लोप पावत दुस-या खाद्यपरंपरेचा म्हणजे, एका नवतेचा जन्म होत होता. आज पन्नाशी ते सत्तरीत असलेल्यांना आठवत असेल, की त्यांच्या लहानपणी, तरुणपणी त्यांच्या दैनंदिन खाण्यापिण्यात कोणते पदार्थ होते, व आज ते त्यांच्या मुलांना काय देत आहेत. खरे तर हॉटेलात कधीतरीच जाण्याचा तो काळ होता. हॉटेलात नेहमी जाणे म्हणजे, चंगळवादी असणे किंवा ही ‘श्रीमंतांची थेरं’ असा मध्यमवर्गात पक्का समज होता. पण चायनीज, काँटिनेंटल डिश हॉटेलात असणे व ती मागवणे, हे तर हॉटेल व ग्राहकासाठी ‘स्टेटस सिम्बॉल’ होते. जे पदार्थ घरात केले जात नाहीत तेच पदार्थ हॉटेलात जाऊन खाणे, हा हॉटेलिंग करण्याचा सर्वसाधारण निकष होता. उदाहरणार्थ पावभाजी, इडली, डोसा, मेदूवडा, कचोरी, पॅटिस, कटलेट, वडा-सांबार, समोसे, गुजराती, राजस्थानी, पंजाबी आदी पदार्थ मध्यमवर्गीय, त्यातही मराठी घरात सहसा तयार केले जात नसत. पण ते हॉटेलात जाऊन खाण्याची मात्र पुरेपूर मजा घेतली जात असे. भेळपुरी, पाणीपुरीसारखे चाट वर्गातले पदार्थही विकेंडला जाऊनच खाल्ले जात. गुलाबजाम, चॉकलेट, सूप, पुडिंग, केक, आइसक्रीम यांसारखे पदार्थ घरी करणा-या गृहिणींना तर एक वेगळेच मानाचे, आदराचे स्थान असे. मिसळ, भजी, बटाटेवडे यासारखे तत्सम महाराष्ट्रीय पदार्थही स्वयंपाकघरात क्वचित केले जात. साधारणपणे सर्वांच्याच जेवणात भाज्या, पालेभाज्या, पिठले, भात, आमटी, कढी, उसळी, भाकरी-चपाती, विविध चटण्या असाच बेत असे. लग्नातही आजच्यासारखी पंजाबी, गुजराती-मारवाडी पदार्थांची रेलचेल नसे. कोशिंबिरी, भरीत, बटाटा, अळू, सार, कळणं, मसाले भात, मठ्ठा, श्रीखंड, जिलेबी असेच पदार्थ त्या काळी पंगतीत वाढले जात. एकंदरीत आपल्या समाजाचे हे खाद्यजीवन ‘ठेविले अनंते, तैसेचि राहावे’ अशाच स्वरूपाचे होते.

पण उदारीकरणानंतर सर्व चित्रच झपाट्याने बदलून गेले. उदारीकरणाची पहिली काही वर्षे व विसाव्या शतकाच्या अखेरीस तेलबियांमधील क्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या एकूणच आहारात शेकडो नव्या पदार्थांची आयात झाली. ज्या ‘मॅगी’वरून सध्या देशभर वाद उठला आहे, ती ‘मॅगी’ याच काळात आपल्या स्वयंपाकघरात, फडताळात आस्ते आस्ते, दबकत आली व पुढे आपल्या एकूणच खाद्यजीवनात स्वतःचे असे काही अढळ स्थान पैदा केले की, आज या ‘मॅगी’वर संक्रांत आलेली पाहून कुणाचेही मन अस्वस्थ होऊन जावे.

आज नाव घ्याल तो पदार्थ ‘रेडी टू कूक’ असा विक्रीस आहे. पोळ्या बनवण्याची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. घनदाट जंगलात जा किंवा ट्रेकिंगचा आनंद लुटत डोंगरमाथा गाठा, कुठेही गेलात तरीही कपभर गरम पाणी घालून उपम्यापासून डाळ खिचडीपर्यंत असंख्य पदार्थ पाच मिनिटांत तयार करणे आता शक्य आहे. पण ‘मॅगी’सारखे ‘रेडी टू इट’ पदार्थ आपण आपलेसे केले त्याला अनेक सामाजिक, आर्थिक कारणे देता येतील. एक म्हणजे, असे पदार्थ लहान मुलांपासून थोरांपर्यंत सहजपणे कोणालाही बनवता येतात. त्यामुळे चायनीज पदार्थांविषयीचे जे पूर्वी अप्रूप वाटत होते, ते विविध चायनीज ‘रेडी टू इट’ प्रकाराने कायमचे नाहीसे झाले. त्यातच पावभाजीपासून सांबार, बिर्याणी, पुलाव, सार, पाणीपुरी अशा विविध रेडिमेड मसाल्यांमुळे पदार्थ करणे अगदीच सोपे झाले. कोणत्या पदार्थात किती चमचे मसाला घालावा, इतके बेसिक खाद्यज्ञान पॅकेटवर ठळकपणे छापल्यामुळे तर क्लिष्ट वाटणारे पदार्थ तयार करण्यास अधिकच सोपे झाले. नोकरदार महिला व त्रिकोणी-चौकोनी कुटुंबाच्या नव्या रचनेमुळे धकाधकीच्या जीवनात वेळ सांभाळत सगळ्या पातळीवर काम करणे, ही मोठी कसरत होती.
त्यात भाज्या कापण्यापासून दररोज नवे मसाले तयार करण्यापर्यंतचा वेळ काढणे मुश्कील जात होते. या परिस्थितीच्या अपरिहार्यतेतूनच इन्स्टंट फूड, फास्टफूडची बाजारपेठ उत्तरोत्तर बहरत गेली.

आज परिस्थिती अशी आहे की, मॅगी असो वा इतर प्रकारचे रेडिमेड कन्फेशनरी पदार्थ असोत; या सर्वांची मागणी इतकी वेगाने वाढली आहे की, नेहमी सकाळी न्याहारीला लागणारे पोहे, सांजा, उपमा, भजी, वडे यांसारखे पदार्थ विकेंडला किंवा पंधरा दिवसातून केले जाऊ लागले आहेत किंवा ते अमुक-अमुक हॉटेलमध्ये उत्तम मिळतात, म्हणून तिकडे जाऊन खाण्याला पसंती मिळू लागली आहे.

जागतिकीकरण आणि माध्यम क्रांतीमुळे ज्ञान व वस्तूंचे आदान-प्रदान इतके झपाट्याने वाढले आहे की, पाश्चात्त्य खाद्यपदार्थांच्या भोवतीचे वलय, त्यामागे असलेले श्रीमंत-गरीब, चैन वगैरे असे समज वेगाने ढासळू लागले आहेत. या पाश्चात्त्य म्हणा वा पौर्वात्य पदार्थांचे भारतीयीकरण या २० वर्षांत केव्हाच पूर्ण झालेले आहे. गंमत अशी की, जी परदेशी आउटलेट्स हा पदार्थ या देशात विकतात, त्यांनाही भारतीयांच्या जिभेची चव बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागत आहे. त्यात आपल्या हॉटेल व्यावसायिकांनीही धंदा करण्याचे कौशल्य दाखवत दाक्षिणात्य, पंजाबी ते चायनीज-काँटिनेंटल अशी भली मोठी खाद्यरेंज खवय्यांपुढे ठेवल्यामुळे, खाद्यसंस्कृतीत एक प्रकारची समानताही आली आहे.
‘मॅगी’वरील बंदीचा काही निर्णय लागो; पण आपले एकूणच खाद्यजीवन इतके इन्स्टंट झाले आहे की, त्याला कोणताही असा उतारा नाही. यू टर्न तर नाहीच नाही! कारण कुणाला पटो वा न पटो, ‘ग्लोबलाइज्ड’ चवी आता पुरत्या ‘लोकलाइज्ड’ झाल्याचा हा काळ आहे...

sujayshastri@gmail.com