आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहजसुंदर नाते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाला फक्त व्यवहार कळतो. या जगात माणसं फक्त आपल्या स्वार्थासाठीच जवळ येतात आणि स्वार्थ संपला की अगदी सहज दुरावतात. अशा वेळी खूप त्रास होतो, आपला कुणी तरी वापर केला याचा मनोमनी संताप होतो. स्वत:च्या मनाला झालेली जखम खरं तर इवलीशी, मग त्याचा एवढा वर्षानुवर्षं बाऊ कशाला करायला हवा ?

नेहा-वय वर्षं बारा
रोज शाळेत गेल्यावर तो तिला भेटतो. तो म्हणजे तिचा वर्गमित्र रुचिर. बाई वर्गात शिकवायल्या लागल्या की याची मस्ती सुरू. जितका दंगेखोर तितकाच हुशारदेखील. त्यानं दंगामस्ती केली की बाई ओरडतात अन् नेहाला खुदकन् हसायला येतं. बरं झालं. अस्संच पाहिजे. नाही तरी सारखा सगळ्यांच्या खोड्या काढत असतो ना. बरं झालं बाई रागावल्या ते, असं चटकन तिच्या मनात येतं. मग कधीकधी नेहादेखील वर्गात लक्ष नाही म्हणून बोलणी खाते. सा-या वर्गासमोर बाई रागवल्या की तिला अगदी ओशाळल्यागत होतं; पण त्यातूनही रुचिर मनात हसत असणार या विचारानं मेल्याहून मेल्यासारखं होतं. खरं तर एवढं महत्त्व तिनं द्यावंच कशाला ना रुचिरला? पण तिला काही या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही.
....................
आमोद-वय वर्षं सोळा
बाबा मागे लागले होते की, स्कूटर घे; पण या पठ्ठ्यानं नाहीच ऐकलं. एकदाची ती स्टायलिश बाइक घेतली आणि याला भरून पावलं. दिवसभर तिचे कान पिरगाळत, कचाकचा ब्रेक दाबत वाट्टेल तशी बाइक हाकायची आणि सा-या जगाला जणू आपण आणि आपल्या बाइकशिवाय काही दिसतच नसणार, अशा थाटात हुंदडत राहायचं. बाबा अधेमधे विचारतात खरं बाइकबद्दल, पण बाइक कसली, बाइकचं नामकरण आमोदनं गर्लफ्रेंड असंच करून टाकलंय. जो येईल त्याला मोठ्या उत्साहात गर्लफ्रेंड दाखवायची आणि तोंडभरून या बाइकचं, नव्हे गर्लफ्रेंडचं कौतुक करत राहायचं. ज्या वयात खरीखुरी मुलगी आवडावी त्या वयात बाइकला गर्लफ्रेंड का करावंसं वाटलं रे, या प्रश्नाचं उत्तर नाही बुवा आपल्याकडे, असं म्हणून तो मोकळा होतो.
....................
ऋतिका-वय वर्षं बावीस
देवभोळ्या ऋतिकाला दिवसभरात कोणी भेटो न भेटो; पण देवाशी किमान दहा मिनिटं कॉन्व्हर्सेशन झालंच पाहिजे, असा तिचा नेम आहे. कॉन्व्हर्सेशन यासाठी की ऋतिका आहे देवबिव म्हणजे काही तरीच बुवा, असं मानणा-या मॉडर्न जमान्यातली. तिला स्वत:ची देवावरची श्रद्धा तर अबाधित ठेवायची आहे अन् तिच्या हायफाय मित्रमैत्रिणींमध्येही काकूबाई न राहता मॉडर्न गर्ल असायचं आहे. सो देवाशी कॉन्व्हर्सेशन. या कॉन्व्हर्सेशनमध्ये ती देवाशी काय वाट्टेल ते बोलते. घरातल्या अडचणी, मित्रमैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, कॉलेजातली कटकट, भविष्याची चिंता सारं सारं काही देवबाप्पाजवळ बोललं ना की हिला बरं वाटतं. सो रोजच्या दिवसातली दहा मिनिटं खास देवबाप्पासाठी.
....................

अर्जुन-वय वर्षं पस्तीस
चौकोनी संसार. चौकोनी आयुष्य. सारं काही सुरळीत सुरू. कश्शाचीही चिंता नाही, इतकं सरळसोट आयुष्य. नहुष आणि अर्जुनची कित्ती तरी वर्षांपासूनची मैत्री. अगदी घट्ट. नहुषनं लग्न नाही केलं, एकटंच राहायचं ठरवलं. अर्जुनचा संसार छान फुलला. जवळजवळ दहा-बारा वर्षांत दोघांचीही आयुष्यं बदलली खरी, पण मैत्री? मैत्री मात्र अबाधित राहिली. अर्जुनची बायको कधीकधी कटकट करते, यांच्या अबाधित मैत्रीविषयी मनात चरफडते. सगळ्या गोष्टी कशाला त्याला सांगायला हव्यात, जरा म्हणून प्रायव्हसी नाही, असं वैतागून म्हणते; पण तरीही या दोघांचं नातं आजही तसंच छान. मनमोकळं.
....................
पाटील वहिनी-वय वर्षं साठ
नवरा अर्ध्यावरच म्हणजे साधारण चाळिशीच्याच उंबरठ्यावर जग सोडून गेला आणि यांच्या वाट्याला एकटेपणा आला. सारं काही क्षणात अपुरं, अधुरं राहून गेलं. पदरी मूलबाळ नाही त्यामुळे आणखीनच एकाकी वाटू लागलं. शेजारच्या चौकोनी कुटुंबातल्या आजी-आजोबांशी समवयीन असल्याने मैत्री झाली; पण आजींना सततची गुडघेदुखी असल्याने कायम बिचा-या घरातच. मग काय आपोआपच शेजारच्या आजोबांशी (वय वर्षं 65 असावं) मैत्री झाली. भाजी आणणे, मंदिरात जाणे, बागेत फिरायला किंवा मॉर्निंग वॉकला एकत्र जाताना सुरुवातीला अवघडल्यागत व्हायचं खरं.


लोकदेखील काहीबाही बोलायला लागले. म्हातारा-म्हातारीचं सूत जमलंय, असलं काहीतरी बकायला लागले. हे सारं कानावर येई; पण पाटील वहिनींच्या एकटेपणावर दुसरा इलाज काय हे उत्तर मात्र कोणाकडे नसे. शेजारच्या आजी पाटील वहिनींच्याच वयाच्या. त्यामुळेच त्यांना पाटील वहिनींचा एकटेपणा समजे आणि आपली गुडघेदुखी सोबत असल्याने आपण काही ह्यांच्यासोबत जाऊ शकत नाही हे त्यांनी मान्यच करून टाकल्याने पाटील वहिनी आणि शेजारचे आजोबा एकत्र बाहेर गेले तरी आपल्याला काही वावगं वाटत नाही हेच त्यांनी ठणकावून सांगितलं. लोकांची तोंडं सुरूच; पण या तिघांचे प्रश्न या तिघांनी अत्यंत विचारपूर्वक, जाणीवपूर्वक सोडवले.
....................
स्थळ - आधार वृद्धाश्रम
आयुष्यातली सारी सुखदु:खं झेलत असतानाच हळूहळू वृद्धापकाळानं गाठलं आणि वृद्धाश्रमात रवानगी झाली. कुणा तरी आजोबांनी लीड घेत सगळ्यांना ठणकावून सांगितलं की, यापुढे आपण आपलं मस्त मजेत राहूयात. सारी जण मिळून आजकालची तरुण पोरटी साजरे करतात तसले डेज वगैरे साजरे करूयात. आयुष्याची संध्याकाळ नीरस आणि उदास घालवली पाहिजे असा काही नियम आहे का? नाही नं. मग आपण आपल्याला जे झेपेल ते आणि जे रुचेल ते करूयात. व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डे आपणही साजरे करायला काय हरकत आहे? आजोबांची ही कल्पना सा-या ज्येष्ठांना पटली आणि आधार वृद्धाश्रमात आनंदीआनंद झाला. स्वत:च्या सौंदर्याचा विचार करू लागलेल्या सा-या आजीबाई आणि स्मार्ट दिसण्यासाठी नेटकी शेव्हिंग वगैरे करून वावरणारे तमाम आजोबा.
....................
खरंच आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी किती नाती असतात जी रक्ताच्या पलीकडे; पण थेट मनाचा ठाव घेत जोडली जातात. कधी जाणीवपूर्वक, तर कधी अजाणतेपणे तयार झालेले हे नात्यांचे सुंदर बंध जन्मभर तसेच राहतात. या सुंदर नात्यांचं कधी बंधन होत नाही. हे बंध आपण स्वत:हून स्वीकारलेले असतात. स्वार्थानं बरबटलेल्या जगात प्रत्येक माणसाकडे असं एखादं तरी नातं असलंच पाहिजे, नाही?


कुणी म्हणेल, छे, असतात का अशी काही नाती या जगात? जगाला फक्त व्यवहार कळतो. या जगात माणसं फक्त आपल्या स्वार्थासाठीच जवळ येतात आणि स्वार्थ संपला की अगदी सहज दुरावतात. अशा वेळी खूप त्रास होतो, आपला कुणी तरी वापर केला याचा मनोमनी संताप होतो. जगण्यात केवळ आणि केवळ निराशाच भरून राहते. वर्षं उलटतात, पण ही निराशा, औदासीन्य पाठ सोडत नाही. किंबहुना, आपल्याला त्याची सवयच होऊन जाते. खरं तर चांगल्या गोष्टींची सवय व्हायला पाहिजे, असं अगदी लहानपणापासून शिकवलं जातं; पण तेदेखील आचरणात आणता आणता माणसाच्या नाकी नऊ येतात. स्वत:च्या मनाला झालेली जखम खरंतर इवलीशी, मग त्याचा एवढा वर्षानुवर्षं बाऊ कशाला करायला हवा? असा विचार केला तर जाणवतं की, या जखमेपेक्षाही या दु:खाच्या मन:स्थितीत राहताना आणि जगासमोर तसं सतत वावरत राहण्यातला आनंद आपल्याला आवडू लागलेला असतो.

आपल्या अवतीभवती नजर फिरवली तरी अशी दु:खाची आळवणी करणारी कित्ती तरी माणसं सापडतात. त्यातूनही सतत दु:ख कुरवाळण्याचा छंद जडलेल्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अंमळ जास्तच दिसतं. मी लग्न होऊन आले तेव्हा मला यांच्या अमुक एका बहिणीने तमुक बोलून टोमणा हाणला होता तेव्हा इतकं वाईट वाटलं होतं ना. अशी वाक्यं, वर्षानुवर्षं कुजलेले तेच ते विचार यांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेत असल्याचे यांना कळतं; पण वळत मात्र नाही. तेव्हा प्रश्न पडतो, खरंच नाती जोडण्यातली कला या तमाम मंडळींना साध्य झाली का? वरवरची नाती, पोकळ उसासे, क्षणिक राग या सा-याची जोखडं वर्षानुवर्षं बाळगणा-या या मंडळींकरिताच नेहा, आमोद, ऋतिकासारख्यांची उदाहरणं. माणसाच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की, माणूस हा कळपात राहणारा प्राणी. एकट्यादुकट्याने वावरण्यापेक्षा टोळी करून राहणे अधिक हितावह हे त्याला सुरुवातीपासूनच माहीत होते. त्यामुळेच नात्यांचा जन्म झाला. मानवी वृत्ती-प्रवृत्ती लक्षात घेत बनलेली ही नाती खरं तर सुख मिळवण्यासाठी तसंच काही नाती मानवी भावनांच्या सहज आविष्कारातून तयार झालेली; पण आजच्या घडीला मात्र आपण सुख मिळवण्यासाठी आणि स्वार्थापोटी नाती जोपासण्याच्या नादात मानवी भावनांच्या आविष्कारातून निर्माण होणारी सहजसोपी सुंदर नाती विसरत आणि पर्यायाने गमावत चाललो आहोत. सुंदर मैत्री ही खरं तर कोणाशीही, कोणत्याही वयात आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकते; पण आपल्या धकाधकीच्या आणि मुख्य म्हणजे स्पर्धेच्या युगात हा सारा निखळ आनंद आपण विसरत चाललो आहोत असे दिसते. त्यामुळेच तुम्हा सर्व मैत्रिणींना या निखळ आनंदाची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न. बघा तुम्हालाही असा निखळ आनंद, सहजसुंदर नातं तयार करून मिळवता येतो का ते ?