आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Reproduction By Dr.Amol Annadate, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंद झाल्या तारका...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या वैद्यकीय क्षेत्रातले एक संशोधन सतत चर्चेत येत आहे. सर्वसामान्यांमध्ये याची चर्चा दबक्या आवाजात व गैरसमजांच्या फे-यात अडकलेली असते किंवा ब-याचदा ती निषिद्ध मानली जाते; पण याविषयी खुलेपणाने चर्चा व्हायला हवी. एका वैद्यकीय अभ्यासानुसार, गेल्या २०-२५ वर्षांमध्ये जगातील पुरुषांची शुक्राणूंची सरासरी संख्या व गुणात्मक दर्जा घसरत चालला आहे.
एकेकाळी १०० दशलक्ष प्रति एम. एल. असणारी शुक्राणूंची सरासरी आज २० ते ३० दशलक्षांवर घसरली आहे. वंध्यत्व ही वैयक्तिक समस्या असली तरी काळाबरोबर शुक्राणूंची कमी झालेली संख्या, ही समस्या वैश्विक असल्याने अनेक गोष्टींचा विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. याकडे केवळ वैद्यकीय समस्या व त्याचे उपचार एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून न पाहता हा निसर्गाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे, की मानवी अस्तित्वासाठी धोका, या प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. कमी शुक्राणूंच्या संख्येची कारणे शोधताना एक मोठा अडसर असतो. साधारणत: एकूण केसेसपैकी ४० टक्के वंध्यत्वाचे कारण पुरुषांमधील शुक्राणूंची कमी संख्या हे असते. पण अजूनही वंध्यत्वाच्या उपचार व तपासण्यांसाठी पुरुष आणि स्त्रीने एकत्र येण्याचे प्रमाण कमी आहे. म्हणून शुक्राणूंच्या कमी संख्येचे निदान व त्याच्या कारणांची मीमांसा नीट होत नाही.
भारतात १८ ते २५ वयोगटातील ५ पैकी एकाची शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे सत्य अजूनही आम्ही स्वीकारू व पचवू शकलेलो नाही. म्हणूनच याविषयीची कारणे, उपचार व संशोधनही अपूर्णच राहते. सर्वप्रथम दोन मोठे गैरसमज आपण दूर केले पाहिजेत. पहिला म्हणजे, शुक्राणूंच्या संख्येचा व लैंगिकतेचा किंवा लैंगिक क्षमतेचा काडीमात्र संबंध नाही. दुसरा म्हणजे, २० दशलक्ष प्रति एम. एल. ही शुक्राणूंची नॉर्मल लिमिट असली तरी त्यापेक्षा थोडी कमी शुक्राणूंची संख्या असल्यास तुम्ही प्रजननास १०० टक्के असमर्थ आहात, असा शिक्का मारता येत नाही. प्रजनन क्षमता वाढविण्यास काही प्रयत्न व गरज भासल्यास औषधोपचार घ्यावे लागू शकतात, एवढेच. म्हणून कमी असलेल्या शुक्राणूंच्या संख्येमुळे उगीचच न्यूनगंड निर्माण झालेल्यांनी या गोष्टी नीट समजून घेत हा न्यूनगंड मनातून काढून टाकावा.
शुक्राणूंची संख्या कमी झाल्यावर ब-याचदा वृषणांच्या रक्तवाहिन्या ताणल्या जातात. त्या फुगीर झाल्यामुळे ‘वेरीकोसील’ ही स्थिती निर्माण होते. फुगीर रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह होत नाही व ते साठून राहिल्याने वृषणाचे तापमान वाढते. शरीराच्या तापमानामध्ये वृषण शुक्राणूंची निर्मिती करू शकत नसल्याने त्यांना शरीराच्या बाहेर वृषणकोशात ठेवण्याची व्यवस्था निसर्गाने केली आहे. वृषणकोशाचे तापमान शरीरापेक्षा ०.८ सेल्सिअसने कमी असते, पण वेरीकोसीलमुळे हे तापमान वाढून शुक्राणूंची निर्मिती मंदावते. एका साध्या ऑपरेशनने वेरीकोसील बरे होते; पण अशा वेळी जुन्या काळी वापरला जाणारा लंगोट किंवा वैद्यकीय भाषेत ‘स्क्रोटल सपोर्ट’ चांगला परिणाम साधतात. सध्या लोकप्रिय असलेल्या नायलॉनच्या अंडरविअरमुळे वृषणकोशाचे तापमान बिघडते व शुक्राणूंची संख्या कमी होते.
टाइट जीन्स, कपडे, गरम पाण्याचे टब बाथ, सोना बाथ याच्या परिणामांमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. याव्यतिरिक्त कामातील व दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा व मानसिकतेचाही शुक्राणूंच्या संख्येवर विपरीत परिणाम होताना दिसतो. सध्या लग्नव्यवस्थेमध्ये झालेला एक मोठा बदल म्हणजे, पुरुष व स्त्रिया दोहोंचीही आता उशिरा लग्ने होतात. म्हणून प्रजननक्षमतेचा सर्वोच्च काळही निघून गेलेला असतो. त्यातच आताशा पुरुष-स्त्री दोघांचेही करिअरकडे जास्त लक्ष आहे. या सगळ्या गोष्टींतून निर्माण होणारे तणाव, जास्त वेळ बैठ्या स्वरूपाचे काम, वाढलेले वजन एकत्रितरीत्या शुक्राणूंची संख्या कमी करतात. त्यातच आहाराच्या अनियमित वेळा, निकृष्ट आहारही या गोष्टींमध्ये भर घालतात.
मोबाइल फोनचा अतिवापर, पँटच्या खिशात मोबाइल ठेवल्यामुळे त्यातून निर्माण होणारे रेडिएशन शुक्राणूंची संख्या कमी करते. तसेच मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करण्याच्या सवयीमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. या सर्व तंत्रज्ञानाचे आम्हाला कोडकौतुक असले तरी त्याच्या परिणामी शुक्राणूंची संख्या कमी होत आहे. या सर्व तंत्रज्ञानाचा वापर गरजेपुरताच व्हावा. धूम्रपान व मद्यपानामुळेसुद्धा शुक्राणूंची संख्या घटते. आता स्त्रियांमध्येही याचे प्रमाण वाढत असल्याने, त्यामुळे जन्माला येणा-या बाळामध्ये ही समस्या निर्माण होऊ शकते. शुक्राणूंच्या कमी होत चाललेल्या संख्येसाठी ही कारणे दिसत असली, तरी अजून बरीच कारणे अज्ञात आहेत. तसे शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी अनेक औषधांचा उपयोग होत असला तरी यावरचे ‘मॅजिक बुलेट’ म्हणजे, ‘जादुई औषध’ अजून तरी अस्तित्वात नाही. म्हणूनच हे वैद्यकीय क्षेत्रासाठी फसवणुकीचेही मोठे दालन ठरले आहे.

amolaannadate@yahoo.co.in