आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधमुक्तीचा कालातीत उद‌्गार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झेन अँड द आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स’ हे रॉबर्ट पिरसीगचं पुस्तक म्हणजे ‘कल्ट’ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या ५० लाख प्रती खपल्या आहेत. याच्या प्रकाशनाला ४० वर्षं पूर्ण झाली. एका लेखकाचा १७ दिवसांचा अमेरिकेतील प्रवास या पुस्तकात चित्रित होतो. यात कधी मित्र भेटतात, कधी त्यांच्या आठवणी येतात, तर कधी मोटारसायकलपासून तत्त्वज्ञानापर्यंतच्या अनेक विषयांची ते चर्चा करतात. काहीही असो, या पुस्तकांची मोहिनी पडलेल्यांमध्ये, दोन पिढ्यांतील अनेक लेखक, चित्रकार, कलावंत आहेत.

६०च्या दशकामध्ये ‘निसर्गाकडे चला’ ही चळवळ सुरू झाली. हे दशक तरुणांच्या बंडखोर चळवळींमुळे (काउंटर कल्चर मुव्हमेंट) गाजले. फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांनी केलेला उठाव, व्हिएतनाम युद्धात कोवळ्या तरुणांचे जाणारे बळी याविरुद्ध अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये निघालेला शांती मोर्चा, वूडस्टॉकसारख्या गावात भरलेली जगभरच्या संगीतप्रेमींची जत्रा, स्वातंत्र्य आणि मुक्तीची घोषणा करणारी गीते, कम्युनिझमपासून ते भारतीय अध्यात्मापर्यंत अनेक वैचारिक प्रवाहांचा स्वीकार, महेश योगींचे ‘ट्रान्सेनडेंटल मेडिटेशन’ हे सारे या दशकामध्ये पसरत गेले. युरोप-अमेरिकेतल्या बंडखोरीचा वारसा आपल्याकडेही आला. ‘कोसला’सारख्या कादंबरीपासून लिटिल मॅगझिनपर्यंत अनेक गोष्टींत तो प्रतिबिंबित झाला. हे सारे पचवून स्थिरावणा-या पिढीच्या हाती ‘झेन अँड द आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स’ पडली आणि या पिढीने सा-याची उलटतपासणी सुरू केली.

असं या पुस्तकात काय आहे? खरं तर बाइक घेऊन फिरत जाणे, एवढेच लेखक यात करतो. पण हे करता करता कुठेतरी त्याचा अस्तित्वाचा शोध सुरू आहे. त्यासाठी त्याने भरपूर कसरती केल्या आहेत. भारतासारख्या देशात जाऊन मुक्काम केला आहे. सारे जग माया आहे, असे सांगणा-या प्राध्यापकाने अणुयुद्धही मायाच, असे सांगितल्यावर तिरीमिरीत त्याने विद्यापीठ सोडलेले आहे. पुस्तकामधल्या प्रवासाच्या शेवटी, त्याला काहीतरी गवसतं. प्रचंड शारीरिक कष्टांनंतर, अविरत भ्रमंतीनंतर एका विशिष्ट तत्त्वापर्यंत तो पोहोचतो. त्याला एकरूपतेचा विलक्षण अनुभव येतो.

पुस्तकाच्या सुरुवातीच्या वर्णनात लेखकाने सांगितले आहे की, हे पुस्तक तत्त्वज्ञानाविषयी नाही किंवा मोटारसायकलविषयीसुद्धा नाही. तरीही त्यात लेखकाचे म्हणून तत्त्वज्ञान आले आहे. प्रामुख्याने प्लेटोच्या संवादातील ‘विज्डम’चा उल्लेख लेखक करतो. प्रत्येक गोष्टीबाबत प्रश्न विचारणे आणि प्रत्येक गोष्ट तपासून घेणे, हे सूत्र या पुस्तकात दिसते.
‘झेन’ ही बुद्ध धर्मात विकसित झालेली आध्यात्मिक चळवळ. यामध्ये मन विशुद्ध करणे, एखाद्या गोष्टीवर पूर्ण चित्त एकाग्र करणे, हे अपेक्षित असते. असे झाल्यानंतर ज्या कलेत तुम्ही एकाग्रता साधता, ती कला तुमच्या हातून नैसर्गिकरीत्या घडत जाते किंवा तुम्ही केवळ साक्षी बनता. लेखक रॉबर्ट पिरसिग हा अर्थातच सुरुवातीला पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाने भारावलेला आहे. ६०च्या दशकातील अनेक युवकांप्रमाणे विश्वकल्याणाच्या आस्थेने आणि कुतूहलाने भारलेला आहे. पाश्चात्त्य मन हे कारण, परंपरा आणि ऐहिक सुखसोयी यांचा विचार अधिक करतं. लेखकाने मोटारसायकल हे त्याचे प्रतीक बनवलेले आहे. तर पृथ्वीविषयीच्या कुतूहलाचे शमन तो आपल्या प्रवासातून करू पाहतो. हा प्रवास जितका वैचारिक तितकाच भौतिकही आहे. तसं पाहिलं तर हे पुस्तक अनेक ठिकाणी क्लिष्टही वाटते. होलिस्टिक विचारसरणीच्या अनुयायांना हे पुस्तक निश्चितच आवडेल.

रोमँटिक नजरेला अभिजात नजर कंटाळवाणी, अडचणीची आणि विद्रूप भासत असते. अगदी मेकॅनिकल मेंटेनन्ससारखी. प्रत्येक गोष्टीचे भाग, तुकडे, सुटे अवयव आणि त्यांचे नाते याचाच त्यात विचार असतो. कॉम्प्युटरमधून डझनभर वेळा गेल्याशिवाय निष्कर्ष हातीच येत नाही. सारे काही बेतलेले आणि शुद्धतेवर आधारलेले. पिळवणूक करणारे, जड आणि रुक्ष. मृत्युदंडच म्हणा ना! या अभिजात रचनेमधले तर्क रोमँटिक माणसांना मात्र विक्षिप्त वाटतात. तर हे सारे केवळ सुख शोधण्यात दंग असलेले, पोकळ लोक आहेत, असे अभिजात दृष्टीला वाटते. या सा-यांचा विस्तृत पट हे पुस्तक मांडते. या पुस्तकाच्या यशानंतर पिरसिगने ‘लीला’सारखे पुस्तक लिहिले. पण लोक पिरसिगला ओळखतात, ते ‘झेन अँड द आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स’चा लेखक म्हणूनच.

shashibooks@gmail.com