रोबोट ल्युनार रोव्हर / रोबोट ल्युनार रोव्हर व्हेईकल

मोहिनी घारपुर

Apr 28,2012 05:53:41 AM IST

नाशिकच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये कर्मवीर एक्स्पो ही राष्ट्रीय स्तरावरील चलितयंत्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटने लक्ष वेधले. हा रोबोट चंद्रावर किंवा अवकाशात, जिथे गुरुत्वाकर्षणाची कमतरता असते तेथे अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावू शकतो हे विशेष. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विद्यार्थी लव राठी, चैतन्य मुंडे, मलय साहू, परिमल कुंडलवाडीकर, पवन लांडे यांच्या चमूने तयार केलेल्या या रोबोटचे नामकरण ‘ल्युनार रोव्हर व्हेईकल’ असे केले आहे. नासाच्या अपोलो 11 मिशनने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा रोबोट तयार केला असून या रोबोटचा उपयोग नकाशे बनवण्यासाठी किंवा विविध मूलद्रव्यांचा शोध घेण्यासाठी करता येऊ शकतो, असे टीम लीडर लव राठी सांगतो.
असे आहे ल्युनार रोव्हर व्हेईकल - वायरलेस कॅमेरा, नवीन प्रकारची सस्पेन्शन्स आणि ऑबस्ट्रॅकल अँनेलायझर या तीन साधनांचा वापर या रोबोटमध्ये करण्यात आला आहे. टॉर्क मोटर आणि क्रँकचा वापर करून सस्पेन्शन तयार केले. ऑबस्ट्रॅकल अँनेलायझर असल्यामुळे हे व्हेईकल कोठेही विनाअडथळा चालू शकते. स्पेशली डिझाइंड सिलिकॉन टायर्समुळे हे वावरणे सहज शक्य होऊ शकते. फरक काय ?- अशा प्रकारचे ल्युनार व्हेईकल यापूर्वीदेखील सॅटेलाइटच्या माध्यमातून चंद्रावर पाठवण्यात आले आहे, परंतु आजवर पाठवण्यात आलेल्या ल्युनार व्हेईकलच्या तुलनेत हे व्हेईकल अगदी साधे व हलक्या वजनाचेदेखील आहे. या व्हेईकलमध्ये कोणत्याही प्रकारची क्लिष्टता नाही.

X
COMMENT