आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकटीतले धाडस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘घुंगरू बांधण्या’ला भारतीय सामाजिक परंपरेत एक विशिष्ट अर्थ आहे. तो वेळोवेळी हिंदी चित्रपटांतूनच अधोरेखित होत राहिला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर ‘पाकिज़ा’चे ठळक उदाहरण देता येईल. त्यात साहेबजानच्या पायाच्या बोटांत कुणी अनामिका चिट्ठी अडकवून जातो, ‘आपके पाँव देखे, बहुत खूबसूरत हैं। इन्हें ज़मीन पर न उतारिये, मैले हो जाएँगे।’ त्या चिट्ठीबाबत साहेबजान म्हणते, ‘ही माझ्यासाठीच आहे. माझ्याच पायात ती अडकवलेली होती.’ तेव्हा तिची सखी तिला वास्तवाचे भान देत म्हणते, ‘त्या वेळी तुझ्या पायात घुंगरू नव्हते. ती चिट्ठी तुझ्यासाठी नाही.’
‘गाइड’ची रोझी मात्र घुंगरांना लटकलेल्या या समजुतीलाच छेद देते...

नृत्य हे तिचे पहिले प्रेम आहे. पण मध्यंतरीच्या घटनांनी तिला आपल्या या आकांक्षेपासून दूर ठेवले होते. रोझी ही देवदासीची मुलगी आहे आणि आईचा प्रयत्न तिला या वातावरणातून दूर समाजाच्या मुख्य धारेत नेऊन सोडण्याचा आहे. त्यामुळे रोझीचे बालपण बहुतांशी होस्टेलमध्ये गेले आहे. शिक्षण संपवून ती घरी परतते तेव्हा तिची आई तिला लग्नाचा आग्रह करते. रोझीला इतक्यात लग्न करायचे नाही. तिला आधी स्टेजवर नृत्यांगना म्हणून नाव कमवायचे आहे. आई तिला समजावते, ‘आधी कुणा तरी प्रतिष्ठित माणसाशी लग्न करून मुख्य धारेत पोहोच, मग हवे ते केलेस तरी कुणी बोट दाखवणार नाही.’ जाहिरातीच्या माध्यमातून मार्को या मध्यमवयीन प्रतिष्ठित माणसाशी रोझीचे रजिस्टर लग्न होते आणि ती समाजाच्या मुख्य धारेत येते.

आर. के. नारायण यांच्या कादंबरीत रोझी ही देवदासीची मुलगी असल्याचा उल्लेख आहे. चित्रपटातील कथेचे स्थळ आहे मालगुडी हे दक्षिण भारतातील शहर. आर. के. नारायण यांनी आपल्या साहित्यात उभे केलेले हे काल्पनिक शहर आहे. दक्षिणेतल्या या त्यांच्या काल्पनिक शहरातून चित्रपटाची कथा उत्तरेतल्या- हिंदी भाषी प्रदेशाला जवळच्या अशा राजस्थानात- उदयपूरला-आणून ठेवतानाही देवदासीची मुलगी असल्याचा उल्लेख तसाच ठेवण्यात आला आहे. रोझी आणि तिच्या आईची चित्रपटातील पार्श्वभूमी दक्षिणेतील असू शकते, परंतु घरातील वातावरण, रोझीचा कथ्थकचा रियाझ हे उत्तरेतील तवायफच्या कोठ्याशी साम्य दर्शवतात. हे वातावरण हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांच्या अधिक परिचयाचे आहे. देवदासी प्रथा ही प्रामुख्याने दक्षिण भारतातली. परंतु उत्तर भारतातील तवायफचे आणि दक्षिणेतील देवदासीचे सामाजिक प्राक्तन वेगळे नव्हतेच. या कलावंत स्त्रिया परंपरेने संगीत-नृत्यादी कलांचे जतन करत आल्या, त्यायोगे तथाकथित कुलीन, प्रतिष्ठित समाजातील पुरुषवर्गाचे मनोरंजन करत आल्या आणि त्या समाजाकडून केला जाणारा तिरस्कार सहन करत आल्या. या कलावंतीण समाजातील स्त्रियांचे हे प्राक्तन, त्यांना समाजातील कुलीन स्त्रीचे, गृहिणीचे स्थान मिळवण्याची लागलेली आस यांचे चित्रण भारतीय, विशेषत: हिंदी चित्रपटांतून सातत्याने केले जात आले, तेही त्यातील नाट्य, नृत्य-संगीतादी मनोरंजनाच्या त्यातील संधी पाहूनच मुख्यत:; परंतु प्रकटपणे वेश्योद्धार हा उदात्त हेतू सांगत!

प्रतिष्ठित समाजातील पुरुषाशी लग्न करून समाजाच्या मुख्य धारेत प्रवेश करण्याचे, आपल्या बदनाम परिसरातून मुक्त होण्याचे प्रयत्न या कलावंत समाजातील स्त्रिया प्रत्यक्षातही करत आल्या आहेत. काहींनी त्याद्वारे मुक्ती, प्रतिष्ठा मिळवलीही. उत्तर मुगल काळात तवायफ या नबाबांच्या बेगमा झाल्याची, त्याचप्रमाणे ब्रिटिश अधिका-यांनीही त्यांच्याशी लग्ने केल्याची उदाहरणे सापडतात. तसेच आधुनिक काळातही काही कलावंत समाजातील स्त्रियांनी प्रतिष्ठित, श्रीमंत व्यक्तींशी लग्ने करून आपल्या पारंपरिक प्राक्तनातून मुक्ती मिळवली. काहींनी अशाप्रकारे प्रतिष्ठा मिळवतानाच आपल्या कलेची साधनादेखील केली आणि कलेच्या क्षेत्रातही नाव कमावले. परंतु हे प्रयत्न समाजाने नेहमीच सहजसाध्य होऊ दिले नाहीत. जन्मजात चिकटलेल्या लेबलचा उल्लेख समाज वारंवार करतच राहिला, चारित्र्याची चर्चा करतच राहिला, अविश्वास दाखवतच राहिला. असे लग्न करणा-या पुरुषालाही समाजाची ही मानसिकता कमकुवत करत राहिली, उपकार भावनेच्या पायावर उभारलेली या संसाराची घरकुले अनेकदा डळमळत राहिली आणि परिणामी अशी लग्ने म्हणजे दीर्घकाळ नवी अग्निदिव्ये ठरत राहिली किंवा अल्पजीवी ठरली.

कलावंतीण समाजाला मुख्य धारेतील प्रतिष्ठा मिळवून देणारा दुसरा मार्ग होता त्यांच्या कलेला प्रतिष्ठा मिळणे हा. चित्रपटसृष्टीने या बाबतीत आघाडी घेतल्याचे दिसते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दादासाहेब फाळके यांनी पहिल्या भारतीय चित्रपटाच्या निर्मितीची तयारी चालवली होती, त्या काळात त्यांना चित्रपटात भूमिका करायला स्त्रिया मिळेनात, तेव्हा त्यांनी वेश्या व्यवसायातील स्त्रियांमध्ये स्त्री कलावंतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु या स्त्रियांनी चित्रपटात काम करायला नकार दिला तो ते काम हलक्या दर्जाचे असे म्हणतच. नाइलाजाने फाळके यांना ‘राजा हरिश्चंद्र’ या आपल्या पहिल्या चित्रपटातील स्त्री भूमिका पुरुष कलावंतांकडून करवून घ्याव्या लागल्या. पुढच्या काळात मात्र प्रामुख्याने कलावंतीण समाजातील स्त्रिया चित्रपटसृष्टीत येऊ लागल्या आणि त्यांच्यासाठी चित्रपटसृष्टी हे अर्थार्जनाचे अधिक प्रतिष्ठित साधन ठरू लागले. एवढेच नव्हे, तर या माध्यमाच्या लोकप्रियतेबरोबर त्यांचा आर्थिक-सामाजिक स्तरही उंचावू लागला. 1930च्या दशकात प्रतिष्ठित समाजातील दुर्गा खोटेंसारख्या घरंदाज स्त्रियांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून, कलाक्षेत्रातील स्त्रियांचे समाजाच्या नजरेतील स्थान उंचावले. समाजाची मानसिकता काही अंशी तरी बदलू लागली. स्वातंत्र्योत्तर काळात संगीत-नृत्य-नाट्यादी कलांना पं. नेहरूंच्या पुढाकाराने सरकारी धोरणाद्वारेच प्रोत्साहन, प्रतिष्ठा मिळू लागली. संगीत नाटक अकादमीसारख्या संस्थांनी आणि पुढे खासगी संस्थांनी या कलांना संस्कृतीतील त्यांचे हक्काचे स्थान मिळवून द्यायला सुरुवात केली. या कलांची परंपरागत जोपासना करणा-या या वर्गाला सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली.

वास्तवातील हे नवे परिवर्तन ठळकपणे समोर आले ते प्रथम चित्रपटसृष्टीद्वारे. परंतु या समाजाचे हे नवे वास्तव चित्रपटाने मात्र कधी नोंदले नव्हते. तोवर चित्रपटांचे विषय कोठ्याच्या आणि मुजरानृत्याच्या पारंपरिक घाण्याभोवतीच फिरत असताना 1965सालच्या ‘गाइड’ने कलावंतीण समाजाचे बदलते वास्तव रोझीच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रथमच चित्रपटात नोंदले. ही भारतीय चित्रपटातील महत्त्वाची घटना होती. मनोरंजनप्रधान मुख्य धारेतील शैलीचाच अवलंब करत हे नवे वास्तव पटकथाकार आणि दिग्दर्शक विजय आनंद आणि निर्माता देव आनंद यांनी नोंदले होते. ही गोष्टही वैशिष्ट्यपूर्ण होय. व्ही. शांताराम यांनी 1930च्या दशकातच ‘कुंकू’सारखे सामाजिक आशयाचे धाडसी प्रयोग प्रेक्षकांपुढे यशस्वीपणे ठेवले होते. पुढच्या काळात चित्रपट निर्मिती करत असलेल्या मेहबूब खान, बिमल रॉय, राज कपूर, गुरु दत्त अशा निर्मात्यांनीही मनोरंजनाच्या पठडीचा स्वीकार करतच वेगळा आशय दिला होता, परंतु या सर्वांमध्ये देव आनंदची जनमानसातील प्रतिमा अगदी वेगळी होती. स्वत:वर खुश असलेल्या, सतत स्वत:चाच चेहरा कॅमे-यासमोर ठेवणा-या, चिकन्या-चुपड्या नायकाची. नायिकेवरचे त्याचे प्रेम हेदेखील जणू स्वत:वरच्या प्रेमाचीच अभिव्यक्ती असावी, असे वाटायला लावणारी प्रतिमा होती त्याची. लोकांनाही त्याच्याकडून तीच अपेक्षा असे. लोकप्रिय चित्रपटातील मनोरंजनाच्या सुरक्षित, गुळगुळीत साच्यातून हिंदी चित्रपटांचे वेगवान उत्पादन होत असताना देव आनंद या चॉकलेट हीरोला आर. के. नारायण यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या कादंबरीने भूल पाडावी, हे काहीतरी वेगळे घडत होते. देव आनंदची प्रेक्षकांमधील प्रतिमा छैलछबिल्या चॉकलेट हीरोची असली तरी प्रत्यक्षातल्या देवचे वाचन चौफेर असे आणि निर्माता म्हणून आपल्या चित्रपटांसाठी त्याने नेहमी एखादा समकालीन विषय निवडला, मात्र दिग्दर्शक म्हणून जेव्हा तो हाताळला तेव्हा त्याच्या त्या विषयाचे वेगळेपण मनोरंजनाच्या आणि प्रतिमाप्रेमाच्या जल्लोशात पार हरवून गेले. दिग्दर्शक विजय आनंद याच्याकडे मात्र विषयाचे आणि मनोरंजन पठडीचे संतुलन राखण्याची विलक्षण क्षमता होती. तिचा उत्कृष्ट आविष्कार म्हणजे ‘गाइड’. ‘गाइड’मध्ये वर उल्लेखलेले फार मोठे सामाजिक संक्रमण त्याने त्यातल्या सामाजिक-मानसिक गुंतागुंतीसहित नोंदले आहे.

आर. के. नारायण यांची ‘गाइड’ ही कादंबरी म्हणजे पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची सैर करवून आणणारा राजू गाइड ते समाजाचा आध्यात्मिक गाइड या प्रवासाची कथा आहे. राजू (देव आनंद) या नायकाची ही कथा आहे. परंतु त्याच्या या प्रवासाला कारणीभूत झाली आहे ती रोझी. रोझी त्याच्या आयुष्यात आली आणि तिच्या उपस्थितीने त्याच्या आयुष्याला वादळी वळणे दिली. जगण्याकडे, जगाकडे आणि स्वत:कडे पाहण्याची त्याची नजर बदलत गेली, ती विलक्षण उलटी सुलटी वळणे घेत.

मार्को (किशोर साहू) वयस्कर आणि रोझी (वहीदा रहमान) तरुण. इथेच या जोडप्याचे विजोडपण संपत नव्हते. पुरातत्त्ववेत्ता असलेला मार्को सतत आपल्या करिअरमध्ये बुडालेला. त्याने लग्न केले आहे, ते केवळ वासना शमवण्याची सोय म्हणून. ते करतानाच त्याने एका देवदासीच्या मुलीवर उपकारही केले आहेत! रोझीने आईच्या सल्ल्यानुसार लग्न स्वीकारले, तरी ती काही या विवाहाने प्रफुल्लित वगैरे झालेली नाही. रजिस्टर लग्नाच्या दृश्यात हे स्पष्टच दिसते. तसेच, आपल्या या संसाराला काही अर्थ नाही, मार्को आपल्याला मूल देऊ शकणार नाही की पती म्हणून सहवास, साथ देणार नाही, पैशाच्या जोरावर तो आपल्याला ऐषआरामात ठेवणार, पण भोगदासी म्हणूनच; हे लग्न झाल्याझाल्याच - पहिल्याच रात्री- तिला कळले आहे. ते प्रत्यक्षात दोघांतल्या कोणत्याही प्रकारची माहिती देणा-या संवादांतून नव्हे. संवाद त्या दृश्यात नाहीतच. आहे ती शय्येवर मार्कोच्या शेजारी पण विरुद्ध दिशेला तोंड करून असहायपणे, निराशपणे अश्रू गाळणारी रोझी. विवाहातले सारे फोलपण या संवादरहित दृश्यात व्यक्त झाले आहे. आता तिला जर कुणाची साथ मिळू शकेल तर ती तिच्या नृत्याचीच. आईने दिलेल्या सल्ल्यानुसार ती आता प्रतिष्ठित माणसाची विवाहिता झाल्यानंतर नृत्याची साधना करू पाहते, तर मार्को त्या साधनेला हरकत घेतो. त्याची पारंपरिक मानसिकताही ‘हे माझे घर आहे, कोठा नव्हे’ असे तिला सुनावतो. मनोमन विझलेली रोझी तरीही मार्कोची पत्नी म्हणून आपले प्रारब्ध, निरर्थक आयुष्य स्वीकारते.

मार्को आणि रोझी हे दांपत्य उदयपूरला येते ते या पार्श्वभूमीवर. मार्को इथे आला आहे तो पुरातत्त्व संशोधक म्हणून. तो तिथे येताच आपल्या कामाला लागतो. तरुण, नवपरिणीत पत्नी अर्थातच दुर्लक्षित राहते. पतीने निदान आपल्याला प्रेक्षणीय स्थळे दाखवीत फिरावे, एवढी माफक अपेक्षाही पुरी होत नाही, तेव्हा रोझी गप्प बसत नाही. तिच्या आतली चडफड या निमित्ताने व्यक्त होऊ पाहते. सतत भांडणे होऊ लागतात. मार्कोच्या या प्रवासाचे सारे आयोजन, नियोजन करणारा राजू गाइड पती-पत्नीतला हा विसंवाद पाहात असतो. सुरुवातीला तटस्थपणे, नंतर आपल्या परीने विसंवाद दूर करायचा आपला मर्यादित प्रयत्न करत. परंतु शेवटी तो केवळ नोकर. पती प्राचीन गुफांमध्ये रमलेला, तेव्हा भडकलेल्या मेमसाब एकट्याच प्रेक्षणीय स्थळे पाहायला निघतात. राजू गाइड इमानेइतबारे त्यांना प्रेक्षणीय स्थळांची सैर करवतो. या दरम्यान त्यांचे नृत्यकौशल्य पाहून थक्कही होतो.

यावेळच्या गीतविरहित नागनृत्यातून चित्रपटाने वेगवेगळी उद्दिष्टे साध्य केली आहेत. रोझीच्या नृत्यकौशल्याचा राजूला, प्रेक्षकांना होणारा साक्षात्कार हे एक. रोझीचे आणि नृत्यकलेचे अद्वैत नाते अधोरेखित करणे हे दुसरे उद्दिष्ट. या नागनृत्यात जसा जोश आहे, तशीच खवळलेल्या, धुमसणा-या, डिवचल्या गेलेल्या नागिणीची तडफड आहे. हे तिचे नृत्य म्हणजे कोणता आनंद व्यक्त करणारा आविष्कार नाही, तर तिच्या मनातल्या तडफडीचे ते दृश्य रूप आहे. गीताचा, शब्दांचा आधार न घेता केवळ संगीत आणि दृश्य यांच्या वापरातून रोझीच्या मनाची अवस्था इथे व्यक्त केली आहे. लेखक हा कादंबरीत पात्राचे मनोव्यापार शब्दांच्या साहाय्याने वाचकाला वर्णन करून सहज सांगू शकतो. इथेच चित्रपट-दिग्दर्शकापुढे आव्हान उभे ठाकते. सिनेमाच्या भाषेतून, म्हणजेच प्रतिमांच्या भाषेतून त्याला पात्रांचे मनोव्यापार प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचे असतात. ‘माझं मन फार तडफडतंय’ असे पात्राने संवादातून सांगणे म्हणजेही चित्रपट माध्यमाचा अपमानच की! शब्दांशिवाय रोझीची तडफड व्यक्त व्हायला हवी. आणि त्यासाठी दिग्दर्शक इथे नेमका तिच्या व्यक्तिरेखेचा उपयोग करतो. नृत्य ही तिची आत्माभिव्यक्ती आहे, हे तिच्या व्यक्तिरेखेचे नेमके आरेखन आणि तिची मनोवस्था या दोन्ही गोष्टी नागनृत्याच्या योजनेतून साध्य केल्या आहेत. किंबहुना ‘गाइड’च्या दिग्दर्शकाने रोझीच्या विविध मनोवस्था तिच्या नृत्याविष्कारातून वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. मग ‘काँटों से खींच के यह आँचल’ या गाण्यातून व्यक्त झालेला तिचा मुक्तीचा निर्भर आनंद असो; की उत्तरार्धात ‘सैंया बेईमान’ म्हणत तिने व्यक्त केलेला पराकोटीचा क्षोभ- नुसता क्षोभ नव्हे, तो तर मधल्या काळात साचत गेलेल्या चडफडीचा स्फोटच आहे तो! नागनृत्याचा ज्वर ओसरल्यावर तिथून निघताना, म्हणजेच पुन्हा वास्तवात येताना रोझी राजूला म्हणते, की ‘यातलं काही साहेबांना कळलं नाही पाहिजे.’ राजूला हळूहळू उलगडा होऊ लागला आहे. ‘नाही कळणार’- तो आश्वासन देतो.

रोझीला सोबत करता करता राजूपुढे आपसूकच रोझीची व्यथा उलगडत जाते. मार्को तिची करत असलेली अमानुष उपेक्षादेखील तो चकित होऊन पाहात असतो. देशोदेशीच्या पर्यटकांसोबत फिरणारा असला तरी एका पारंपरिक मानसिकतेच्या शहरातल्या राजूला मार्कोकडून पत्नीची होणारी ही उपेक्षा कोड्यात टाकणारी आहे. आपली जागा ओळखून असला तरी तो फार काळ या प्रकरणात तटस्थ राहू शकत नाही. वैफल्याच्या काठावर पोहोचलेली रोझी आत्महत्येचा प्रयत्न करते, तेव्हा राजू अनिवार्यपणे या प्रकरणात ओढला जातो. पतीने केलेल्या उपेक्षेने धुमसणा-या रोझीच्या मनात राजूने केलेल्या शुश्रूषेने, त्याने दाखवलेल्या आपलेपणाने ओलाव्याचे पाझर फुटले तर नवल नाही. राजू देखणा, उमदा तरुण आहे. वडलांच्या पश्चात रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉलचे त्यांचे कंत्राट त्याच्याकडे आले आहे, पण तो स्टॉल चालवायचे काम एका लहान पोरावर सोपवून आणि स्टॉलचे उत्पन्न आयते मिळवतो आणि पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळे दाखवणे, त्यांच्या सहलीचे नियोजन करून देणे वगैरे कामात रमतो. यासाठी जो आत्मविश्वास, दादागिरी करणाची खुमखुमी लागते तीही या स्ट्रीट स्मार्ट, चलाख तरुणात आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडते हे त्याला ठाऊक आहे आणि देशोदेशीच्या, विविध धर्मांच्या, विविध वंशांच्या, विविध विचारांच्या पर्यटकांबरोबर फिरताना त्याने विविध बोली आत्मसात केल्या आहेत. धर्माच्या, जातींच्या उच्च-नीचतेच्या कल्पनांचे फोलपण या अनुभवांतूनच त्याला जाणवले आहे. ‘जो पर्यटक येतो तो राजू गाइड कुठे आहे, राजू गाइड कुठे आहे म्हणूनच विचारणा करतो’ असे राजू मोठ्या अभिमानाने म्हणतो. आजूबाजूच्या समाजात आपले महत्त्व आहे, असे राजूला वाटायला लावण्यासाठी हे गरजेचे आहे. पर्यटक नसतील तर राजूला गावात मिळणारे महत्त्व शून्य.

मार्कोची पत्नी म्हणून स्थान मिळाले नसते तर रोझीलाही समाजात ‘मेमसाब’ म्हणून मान मिळाला नसता. नृत्याला बंदी आणि वैवाहिक जीवनातही संपूर्ण निराशा - रोझीच्या सर्वच नैसर्गिक ऊर्मींचा कोंडमारा होऊन ती वैफल्याच्या गर्तेत कोसळत असताना, आत्महत्येच्या प्रयत्नांपर्यंत पोहोचली असताना तिला हा राजू भेटला आहे. वयाने आणि रूपाने तिला अनुरूप. आयुष्यात समाधानी असती तर या अनुरूपतेची जाणीवही तिला झाली नसती. ती तत्काळ त्याच्याकडे ओढली जाते, असेही नाही. ती खरे तर तिच्या दु:खांतच मग्न आहे. पण तिला वाचवू पाहणारा राजू तिला त्यातून बाहेर काढतो. तिची शुश्रूषा करणारा, तिच्याविषयी आस्था दाखवणारा हा बहुधा पहिलाच माणूस. तेव्हा ती स्वत:च्या दु:खाच्या कोषातून जरा बाहेर येऊन कुतूहलाने त्याची चौकशी करते. लग्न झालंय का? असा साधा-सा प्रश्न विचारते. तेव्हा त्या संभाषणादरम्यानच बोलता बोलता तो तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची निर्भर्त्सना करतो. ‘रोटियाँ पकवाएँगे, पैर दबवाएँगे और ऐसी कोई हरकत की जैसी कल आपने की तो झापड़ भी लगाएँगे’- तो पत्नीविषयीच्या आपल्या अपेक्षेविषयी बोलतो. त्यावर ती विचारते, ‘साथ में प्यार भी करोगे न?’ तो म्हणतो, ‘प्यार तो करना ही पड़ेगा.’ त्यावर रोझी म्हणते, ‘तो फिर रोटी पकाने, पैर दबाने, झापड़ खाने में कोई हर्ज़ नहीं.’ रोझी म्हणजे काही कुणी स्त्री मुक्तीचा झेंडा घेऊन निघालेली विचारवंत महिला नव्हे. तिच्या सुखाच्या कल्पना या सामान्य स्त्रीसारख्याच पारंपरिक आहेत. मार्कोने तिला प्रेम दिले असते तर तिनेही खरोखरीच त्याच्या हातचा मारही मुकाटपणे खाल्ला असता आणि आपल्याशी लग्न केल्याबद्दल त्याचे उपकार जन्मभर मानले असते.

तू कलावंत आहेस आणि कलावंताची जात ही उच्चच असते, असे राजू तिला म्हणतो, तेही तिला उभारी देणारे असते. राजूच्या बोलण्यातून, त्याच्या आसपास असण्यातून त्याच्यातली जगण्याची ऊर्जाच जणू तिच्यात संक्रमित होऊ लागते. ही उभारी घेऊनच ती गुफांमध्ये मुक्काम ठोकून असलेल्या मार्कोकडे पायात घुंगरू बांधून जाते, नृत्य-मुद्रांनी त्याचे लक्ष वेधून घेते. त्याचा अनुनय करू पाहते. परंतु आपल्या पत्नीने नृत्य-विभ्रमांनी आपल्याला रिझवू पाहावे, हे मार्कोला आवडत नाही. एखाद्या वेश्येने रिझवणे त्याला चालते; किंबहुना आदल्या रात्री त्याने गुफेतच एका वेश्येसोबत रात्र घालवलेली असतेच. परंतु त्याच्या पत्नीने पायात घुंगरू बांधलेले त्याला सहन होत नाही. रोझी त्याच्या दांभिकपणाचे वाभाडे काढते. गुफेतली त्यांची खडाजेगी त्यांना एकमेकांपासून आणखीनच दूर करते.
या उलट राजू वैफल्यग्रस्त रोझीला तिच्या नृत्यकौशल्याची आठवण देऊन तिच्या आयुष्याला अर्थ देण्याचे काम करतो. राजूचे बोल हे केवळ निमित्त. खरे तर नृत्यच रोझीला नवी उभारी देते. राजू आणि रोझी ही दोघे संधी साधल्यासारखी कधीच एकत्र येत नाहीत. परिस्थिती त्यांना एकत्र आणते.

‘तुला जायचं तर परत जा’ म्हणून मार्कोची चिट्ठी मिळताच रोझीला काचणा-या बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटते. ती राजूला सोबतीला, होय सोबतीलाच घेऊन बाजारात जाते आणि घुंगरू विकत घेऊन भर बाजारात ते पायात बांधते. बाजार बघतच राहतो, राजूला गावात तोंड कसे दाखवावे, ते कळत नाही. पण रोझीला समाजाचे हे दंडक जाणवतच नाहीत. ते मुळात ती त्या समाजाचा भाग नव्हती म्हणून, विलक्षण घुसमटीतून सुटका झाल्याचा अमर्याद आनंद झाल्यामुळे आणि तिच्यातल्या जगावेगळ्या जातिवंत कलावंत वृत्तीमुळे. तिच्या बहरून आलेल्या चित्तवृत्ती आजूबाजूच्या परिसरातल्या कणा-कणातून आनंद शोषू लागतात, खोडकरपणे त्यांच्याशी संवाद साधतात, जिवाची पर्वा न करता उंच हवेल्यांच्या अवशेषांवरून आकाशात झेपावू पाहतात. आणि नायक हे सारेच चकित, भांबावलेल्या नजरेने पाहात राहतो... एखाद्या भाबड्या तरुणाला एखादी यक्षिणी भेटावी तसे काहीसे होते त्याचे. मार्कोने सांगितल्यानुसार रोझी गाडीत बसून निघून जाती तर, कधी तरी एक स्वप्न पडले होते, एवढीच आठवण राजू गाइडच्या उर्वरित आयुष्यात रोझीची उरली असती. पण तसे होत नाही. पतीचे लेबल लागलेल्या मार्कोला रोझीची राजूशी जवळीक म्हणजे आपली बदनामी वाटते आणि रोझीला तो टाकून देतो.
असहाय, एकाकी रोझीपुढे एकच पर्याय उरतो. गेल्या काही दिवसांतल्या वैफल्यातून ज्याने सावरले तो राजू. ती राजूच्या घरी आश्रय मागायला जाते. राजूचा तिला विश्वास वाटतो. कलावंतीणीचे आयुष्य जगणा-या आईकडे ती जात नाही. त्या बदनाम जगातून बाहेर पडून समाजाच्या मुख्य धारेची सदस्य बनल्यानंतर पुन्हा त्याच जगात जाण्याचा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवत नाही. राजूने तिच्यातल्या कला-साधिकेला सन्मानाचे स्वप्नही दाखवले आहे. ती येते आणि राजू तिला आश्रय देतो. आईच्या रागाची, मामाने केलेल्या निर्भर्त्सनेची आणि समाजाचीही पर्वा न करता तिला आश्रय देतो. समाजाकडून होणा-या विरोधामुळे तर रोझीला आधार देणे हे आव्हान बनूनच त्याच्यापुढे येते आणि आपल्या स्वभावानुसार तो ते स्वीकारतो. रोझी आल्याआल्या आईच्या चौकशीला थातुरमातुर उत्तरे देणारा राजू नंतर सरळ सरळ रोझीची जबाबदारी घेतो आणि घरीच तिच्या रियाझाचीही व्यवस्था करतो. तिच्या सामर्थ्याची आणि यापूर्वी तिने पाहिलेल्या स्वप्नाची जाणीव तिला करून देत त्याच्या पूर्तीचे सारे प्रयत्न तो करतो. या सर्व घटनाक्रमात दोघे अनिवार्यपणे एकमेकांच्या जवळ येतात. राजूच्या आधाराने, मदतीने रोझी पुन्हा उभी राहते. आपल्यासाठी राजूने आई, कुटुंब, मित्रपरिवार, समाज सा-यांचा त्याग केला आहे, याची जाणीव तिला त्याच्याविषयी अधिकच भावुक करते. तिचे स्वप्न साकारण्यासाठी राजू आपले सारे संपर्ककौशल्य पणाला लावतो. या एकत्रित प्रयत्नांचे आणि त्यातून दोघांत निर्माण होत गेलेल्या प्रेमभावाचे प्रकटीकरण दिग्दर्शक करतो ते ‘पिया तोसे नैना लागे’ या गीत-नृत्यातून.

त्याचा कुशल जनसंपर्क, मार्केटिंग आणि तिची नृत्यप्रतिभा यातून पाहता पाहता ‘मिस नलिनी’ या प्रसिद्ध नृत्यांगनेचा जन्म होतो, तिची प्रसिद्धी, तिचे यश, तिचे वैभव वाढवण्याची जबाबदारी राजू गाइड घेतो.

दोघांतील नात्याचा प्रवास पटकथेतून इतका सहजपणे घडत जातो, की चित्रपटाचा नायक आणि विवाहित नायिका एकमेकांच्या प्रेमात पडली आहेत हा आजवर हिंदी चित्रपटांतला निषिद्ध मानला गेलेला नातेसंबंध आहे, हे प्रेक्षकाच्या लक्षातही येऊ नये. परंपराप्रिय भारतीय प्रेक्षकाने काही नैतिक धारणा उराशी मूल्य म्हणून कवटाळल्या होत्या. आपल्या सदैव सत्शील नायक-नायिकेला विवाहबाह्य प्रेमसंबंध स्थापित करण्यापासून रोखले होते. असे निषिद्ध वर्तन करणा-या नायक किंवा नायिकेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळणार नाही ही खूणगाठ निर्माता-दिग्दर्शकाने मारलेली असे. नसता धोका तो कधी पत्करत नसे. ‘गाइड’च्या दिगदर्शकाने अगदी सहजपणे आणि यशस्वीरीत्या ती व्यावसायिक लक्ष्मणरेषा ओलांडली. व्यावसायिक चित्रपटाचा अनैसर्गिक संयमाचा आग्रह त्याने धुडकावला आणि मानवी मनाच्या नैसर्गिक गुंतागुंतीचे चित्रण करताना दिग्दर्शकीय धाडसाचा, कौशल्याचा आणि संयमाचा पुरावाच सादर केला. हिंदी सिनेमाच्या पारंपरिक चौकटीला प्रेक्षकाच्या नकळतच ‘गाइड’च्या नायक आणि नायिकेने छेद दिला.

राजू मिस नलिनीसाठी उभारलेला बंगला दाखवतो तेव्हा त्याच्या मिठीत शिरत रोझी म्हणते की, ‘तुझ्यासाठी मी सगळं सोडून द्यायला तयार आहे.’ एकेवेळी लग्नासाठी नाइलाजाने नृत्य सोडून द्यावे लागलेली हीच रोझी मनासारखा आणि सर्वार्थाने साथ देणारा साथीदार मिळाल्यावर त्याच्यासाठी नृत्यातली यशस्वी करिअर सोडायलाही तयार होते, ती तिची क्षणिक भावनाही असू शकते. परंतु त्या भावनेचा कस लागण्यापूर्वी राजूच तिला, ‘काही सोडण्याची गरज नाही’ म्हणून म्हणतो. रोझीच्या यशाचा झंझावात आणि तो निर्माण करण्यातले आपले देदीप्यमान यश यांचीही एक नशा राजूच्या अंगात भिनत चालली आहे, त्याचा हा परिणाम. कारण पुढच्याच क्षणी रोझी जेव्हा विचारते, की ‘आणि मुलं झाल्यावर?’ त्यावर तो म्हणतो, ‘ज़रूरी नहीं है कि शादी होते ही बच्चे हों.’ आणि मग रोझी आणखी एक पीस खोवते, ‘और यह ज़रूरी है कि शादी हो?’ बस्स! दोघांचेही नशीब इथे सील होते आणि नात्याच्या प्रवासातले पुढचे वळण लागते. लग्न या गोष्टीचा निराशाजनक अनुभव रोझीने घेतलेला आहे. आता या क्षणी जी सुखाची अवस्था ती उपभोगते आहे तिच्यात बदल करणे नको, असेच तिला त्या क्षणी वाटले. परंतु काळाप्रमाणेच नातीही प्रवाही असतात, हे तिच्या लक्षात आले नाही.
पूर्वार्धात घटना अशा काही वेगाने घडतात, की रोझी आणि राजू एकत्र येतात. पण, डिड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हरआफ्टर? नो! नात्याचा गुंतागुंतीचा प्रवास उत्तरार्धात सुरू होतो. जगण्याची उसंतही घेऊ न देणा-या स्टेज शोजच्या धबडग्यात रोझी कधी कधी थकून जाते, तर रोझीची करिअर घडवल्याच्या यशाची, पुढच्या कार्यक्रमातून तिच्याकडे चालत येणा-या आणखी आणखी वैभवाची नशा चढलेल्या राजूला तिचा थकवा दिसत नाही. राजू रोझीच्या यशाचा शिल्पकार खराच, परंतु नृत्याच्या मंचावरून जगाला दिसणा-या रोझीच्या प्रतिभेपुढे त्याचे व्यवस्थापन कर्तृत्व स्वाभाविकपणे दुर्लक्षिले जाऊ लागते. खरे तर दोघांच्या मेहनतीतून जमा झालेला पैसादेखील राजूने रोझीच्या नावेच ठेवलेला आहे. प्रेमात माझे-तुझे नसते, या गोंडस समजुतीचा पगडा नव्या वास्तवातही त्याच्या नकळत त्याच्या मनावर कायम आहे. तो लागेल तेव्हा चेकवर तिची सही घेत असतोच. जुगारी मित्रपरिवार, दारू अशी चैन तो करू लागतो. समाजाच्या ज्या स्तरातून राजू आलेला आहे, तो लक्षात घेता अमाप पैसा हाती खेळू लागल्यानंतर तो वापरण्याच्या संस्कृतीचा अभावच राजूच्या ठायी दिसतो. गरिबीत वाढलेला, केवळ पैसा मिळवणे हीच सार्थकता मानणारा राजू वाहवत गेला तर नवल नसते. (रेल्वे फलाटावरचा स्टॉल चालवण्यासाठी कमी पगारात लहान मुलाला वापरणारा, तिथल्या आयत्या उत्पन्नावर हक्क सांगत दादागिरी करणारा राजू आठवला की राजूच्या संस्कारांची पार्श्वभूमी सहज लक्षात येते.) रोझी जेव्हा समानधर्मी कलावंतांमध्ये रमते तेव्हा तर एकट्या पडलेल्या राजूला जुगारी मित्र आणि दारू यांचीच सोबत वाटते. अशी ही परिस्थिती आणि लौकिक समजुती रोझीवरही नकळत आपला प्रभाव टाकू लागतात. यश आणि पैसा मिळवला तो आपणच आणि राजू आपल्या पैशावर आरामात जगतो आहे. मित्रांवर आपला पैसा उडवतो आहे, असे तिला वाटू लागते. राजूला व्यवहार चांगला कळतो तरी तो काही कलावंत नव्हे. रोझीला मानणा-या कलावंतांच्या गोतावळ्यात राजू आउटसायडरच ठरत जातो. राजूला हे रोझीचे दूर जाणे, आपले एकटे पडणे असह्य होऊ लागते. रोझी आपल्याला वेळ देत नाही असे त्याला वाटू लागते. अशात, ‘बाईच्या जिवावर पुरुषाने जगू नये असे मार्को म्हणायचा ते बरोबरच होते’, असे रोझी बोलून दाखवते. दोघे एकमेकांवर दोषारोप करू लागतात.

खरे तर दोघे विवाहबद्ध झाली असती, तरी हा श्रेयापश्रेयाचा गुंता व्हायचे टळले नसतेच. रोझीच्या आयुष्यातले दुसरे लग्नही दु:खदायक ठरले असते. इथे ते लग्न टाळले आहे, ते पुढच्या नाट्यनिर्मितीसाठी. ही नाट्यनिर्मिती म्हणजे मार्कोच्या पुनरागमनापायी राजूचे अस्वस्थ होणे आणि घाईघाईने फोर्जरीसारखा गुन्हा करायला उद्युक्त होणे. राजूने मार्कोचे येणे आपल्यापासून लपवून ठेवावे, अर्थव्यवहारात अफरातफर करावी, याने साहजिकच रोझी दुखावते. करिअरच्या वादळी वेगात मनाच्या तळाशी गाडली गेलेली राजूविषयीची कृतज्ञता, त्याच्याविषयीचे प्रेम आणि त्याच्या वागण्याचा येऊ लागलेला राग, यातून नकोसा होऊ लागलेला विवाहबाह्य शरीरसंबंध, अपराधीपण, त्यापायी स्वत:ची होणारी चडफड - या सा-या मन:स्थितीतच भर पडते ती राजूने केलेल्या अफरातफरीची. परंतु तिच्या आयुष्यात पुन्हा डोकावू पाहणा-या मार्कोपायी राजूचे अस्वस्थ होणे हेदेखील तितकेच स्वाभाविक होय. राजू हा काही कोणी सत्यवचनी महापुरुष नव्हे. लोकांवर छाप पाडणारा दुनियादारच आहे तो. रोझीला गमावण्याबरोबरच नवी लाभलेली वैभवी जीवनशैली गमावण्याच्या कल्पनेने तो अस्वस्थ झाला तर नवल नाही. प्रेम, पझेसिव्हनेस, भौतिक सुखसुविधा आणि प्रतिष्ठेची झालेली सवय या सर्वच घटकांनी त्याचा ताबा घेतला आहे. शेवटी या दोन व्यक्तींचा संघर्ष अटळ ठरतो.

रोझी प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशी सेलेब्रिटी झाल्यानंतर मार्को तिचे अभिनंदन करायला, तिला पुस्तक प्रेझेंट करायला येतो, हे घटित म्हणजे समाजाच्या सोयीस्करपणे बदलणा-या दृष्टिकोनाचेच प्रतीक.
राजूला शिक्षा होते, आणि खरे तर त्याच्या आयुष्यातील रोझीचा रोल संपतो. आयुष्याला परतीचा प्रवास नसतो. राजूच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू होते. परंतु चित्रपटाच्या व्यावसायिक चौकटीला नायिकेचा रोल संपवून चालत नाही! एवढ्या संघर्षानंतर राजूला शिक्षा झाल्या झाल्याच रोझीला पश्चात्ताप कसा काय होतो? राजू-रोझीच्या नात्याचा एवढा धाडसी प्रवास पाहिल्यानंतर हा प्रश्न उद्भवल्याशिवाय राहात नाही. पण व्यावसायिक चौकटीच्या मर्यादा पाळण्याच्या मजबूरीपायी चित्रपट या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करतो. एवढेच नव्हे तर तो अखेरीला रोझीला राजस्थानचे वाळवंट तुडवत, देवळात उपोषण करणा-या राजूकडे यायला लावतो. रोझीचा स्वाभाविक तिरस्कार करणा-या राजूच्या आईला, रोझीला मायेने जवळ घ्यायला लावतो. रोझीची हाडा-मासाची, स्खलनशील आणि म्हणून अधिकच लोभस, नाट्यपूर्ण व्यक्तिरेखा अखेर प्लास्टिकचे बाजारशरण वळण घेते. त्यावर कडी म्हणजे, अशा पश्चात्तापदग्ध, दु:खी वगैरे नायिकेला दिग्दर्शक न चुकता साध्या पांढ-या साड्या नेसायला लावतो आणि स्वत: क्लिशे परंपरेला शरण जातो...!
आणि तरीही 1965मध्ये व्यावसायिक चित्रपटाच्या चौकटीत राहून रोझीने केलेले धाडस दुर्लक्षिता येत नाही.