आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Ruskin Bond's Book By Abhilash Khandekar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुस्तकप्रेमाची रसाळ गोष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात जे नामवंत इंग्रजी लेखक वाचकप्रिय झाले, त्यात रस्किन बाँड हे प्रामुख्याने येतात. त्यांचे वैविध्यपूर्ण लिखाण गेली 60 वर्षे वाचकांना भुरळ घालत आहे. बाँड यांनी कथा, ललित लेखन, कादंब-या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लिखाण मुबलक स्वरूपात केले. त्यांची आजवर छोटी-मोठी 500हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यावरून या लेखकाचा आवाका लक्षात येऊ शकेल.

‘बुकशेल्फ’मधील पुस्तकांच्या सान्निध्यात राहून व पुस्तकांवर प्रेम करत कसे जगता येते, या विषयावर रस्किन बाँड यांनी ‘लव्ह अमंग द बुकशेल्फ्स’ हे प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे. ते उत्तराखंडच्या डेहराडून या नयनरम्य शहरात (राजधानीत) राहतात. अलीकडेच ते ऐंशी वर्षांचे झाले... माझा कयास असा आहे की, त्यांचे हे कदाचित शेवटचे पुस्तक असावे... किंबहुना त्याच सुरात त्यांनी हे लिहिले आहे...

खरे तर त्यांना आवडलेली पुस्तके, बालपणापासून त्यांच्या मनावर ज्या पुस्तकांनी किंवा लेखकांनी छाप टाकली ती पुस्तके व त्यांनी अनेक वर्षे निगुतीने सांभाळलेली पुस्तके यांची रंगतदार गोष्ट सांगणारे हे पुस्तक आहे. एका अर्थाने ते पुस्तकांवरचे पुस्तक आहे!
लेखक लिहितात की, त्यांनी एकूण दहा हजारांवर पुस्तके आजवर वाचली आहेत. ‘लहानपणी तर माझ्या हातात येईल त्या पुस्तकाचा फन्ना मी पाडत असे- तो लेखक आवडो किंवा तो विषय नावडो- मी वाचूनच ते पुस्तक खाली ठेवत असे.’ असे त्यांनी आपल्या वाचनप्रेमाबद्दल म्हटले आहे.

प्रस्तुत पुस्तकात बाँड लिहितात की, अनेक वेळा त्यांच्या प्रिय पुस्तकांनी त्यांचा एकाकीपणा, नैराश्य घालवले; तसेच त्यांना एक लेखक म्हणून घडवण्यासही मोलाची मदत केली. या संदर्भात खूप जुनी आठवण ते सांगतात, हरिद्वार व डेहराडून यामध्ये वसलेल्या राजाजी निसर्ग उद्यानात त्यांनी प्रथम वाचनास सुरुवात केली किंवा ती परिस्थितीच अशी होती की, पुस्तक वाचण्याशिवाय तेव्हा पर्याय नव्हता. त्यांचे सावत्र वडील शिकारी होते. त्या वेळी रस्किन बाँड यांना वडलांसोबत जंगलात जाणे भाग पडले व तिथल्या डाकबंगल्यातल्या वास्तव्यात पुस्तकांच्या प्रेमात बाँड पहिल्यांदा पडले ते आजतागायत! तेव्हा (1944-45) ते आठ वर्षांचे होते व आज ऐंशी वर्षांचे झालेत. बंदूक, शिकार हे सगळे बाजूला सारून ते पुस्तकविश्वात आकंठ बुडाले ते आजपर्यंत!

त्यांनी वाचलेले पहिले पुस्तक होते, जगविख्यात विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांचे ‘लव्ह अमंग द चिकन्स.’ वन खात्याच्या राजाजी पार्क येथील विश्रामगृहात चक्क पुस्तकांचे एक भलेमोठे शेल्फच लहानग्या रस्किनच्या हाती लागले. दुस-या दिवशी परत त्यांना शिकारीसाठी जाण्याचा आग्रह वडलांनी केला; पण तो रस्किननी धुडकावून लावत एम. आर. जेम्स यांचे ‘घोस्ट स्टोरीज ऑफ अ‍ॅन अँटिक्वॅरी’ हे पुस्तक पूर्ण वाचून काढले. मग त्यांनी अगाथा ख्रिस्ती, जॅक लंडन व अशाच अन्य लेखकांची पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. या वाचनाचा पुढे जाऊन त्यांना खूप उपयोग झाला. अर्थात, ते एक जगन्मान्य लेखक म्हणून नावारूपास आले.
रस्किन बाँड हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात राहत आहेत. अर्थात, इंग्लंडमध्ये जाऊन राहण्याचे अनेकदा प्रसंग आले; परंतु प्रत्येक वेळेस त्यांना भारताची ओढ परत खेचून आणत राहिली. शेवटी ते इथलेच होऊन गेले. भारताचे मुख्यत: हे एक सुदैव आपण म्हणू शकतो.
बाँड यांना अभिजात इंग्रजी साहित्याची प्रचंड आवड; परंतु त्याचबरोबर अनेक वेगळ्या विषयांचीही गोडी असल्याने त्यात कथा, कादंब-या, नाटके, आत्मकथा असे सगळे साहित्यप्रकार आहेत.

प्रस्तुत पुस्तकात अनेकानेक पुस्तकांची ओझरती ओळख आपल्या वाचकांना ते करून देतात व स्वत:चे फक्त पुस्तकांविषयीचे सुंदर अनुभव अत्यंत रसाळ नि सहज भाषेत आपल्यासमोर ठेवतात. पुस्तकांच्या भोवती गुंफलेले त्यांचे आनंददायी जग आपण एका पुस्तकाद्वारे सहज अनुभवू शकतो. ते पुस्तकांवर अतोनात प्रेम करतात, हे आपणास पानोपानी लक्षात येत राहते.
चार्ल्स डिकन्स, एमिली ब्रांट, आंद्रे, गिडे, सॉमरसेट मॉम, विल्यम सरोयान, इव्हलिन वॉ, आर. एल. स्टीव्हन्सन, जोसेफ कोनार्ड, एच. ई. बेट्स व एम. आर. जेम्स असे एक ना अनेक जगविख्यात लेखक व त्यांची गाजलेली पुस्तके याबद्दल थोडक्यात, पण ओघवत्या भाषेत रस्किन बाँड यांनी या पुस्तकात लिहिले आहे. मी स्वत: ‘बुकशेल्फ’ हे सदर गेली तीन वर्षे ‘दिव्य मराठी’त सातत्याने लिहितो आहे. त्यात जी पुस्तके मला खरेच खूप आनंद देऊन गेली, त्यातले हे एक ताजेतवाने पुस्तक आहे, हे आवर्जून नमूद करणे मला गरजेचे वाटत आहे.

* पुस्तक : लव्ह अमंग द बुकशेल्फ्स
* लेखक : रस्किन बाँड
* प्रकाशन : पेंग्विन इंडिया
* किंमत : रु. 299 /- पाने 185
abhilash@dainikbhaskargroup.com