आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Russian Film Leviathan By Narendra Bandabe

आम आदमीचा रशियन चेहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिकसिनेमात प्रतिष्ठित समजल्या जाणा-या गोल्डन ग्लोब पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली. बेस्ट फॉरेन फिल्मचा पुरस्कार रशियाच्या ‘लिवायथन’ला मिळाला. जेव्हा एखाद्या देशातल्या सिनेमाला पुरस्कार मिळतो, तेव्हा तिथल्या लोकांना साहजिकच आनंद होतो. देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयानं सिनेमाची निर्मिती केली असेल, तर हे यश सरकारी होतं. सिनेमाच्या सर्व कलाकारांना डोक्यावर घेतलं जातं. पण ‘लिवायथन’च्या बाबतीत भलतंच घडलं. गोल्डन ग्लोब पुरस्कार ज्या दिवशी जाहीर झाला, त्याच दिवशी रशियातल्या एका गटानं सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी केली. तर दुसरा एक गट सिनेमाच्या बाजूनं उभा राहिला. ज्या गटाचा सिनेमाला विरोध आहे त्याच्या मते, ‘लिवायथन’ हा हॉलीवूड रूढीवाद्यांचा सिनेमा आहे. मग असा सिनेमा रशियन सरकारनं बनवलाच कसा, असा सवाल सिनेमाच्या बाजूनं असलेल्या लोकांनी केला. हा वाद टोकाला पोहोचला असतानाच, ऑस्कर पुरस्कारांच्या यादीतही ‘लिवायथन’ची नोंद झाली. अॅण्ड्य्रूच्या या सिनेमाला ऑस्करची तब्बल पाच नामांकनं आहेत. या सिनेमाला विरोध आणि त्याच वेळी तेवढाच पाठिंबा का मिळतोय?

म्हटलं तर, ‘लिवायथन’चं कथानक अगदीच साधं आहे. उत्तर रशियातल्या बॅरेंट्स सी भागातल्या एका छोट्याशा खेडेगावात राहणारा कोलया. त्याचं छोटं गॅरेज आहे. गॅरेजच्या बाजूला त्याचं छोटंसं घर आहे. ज्यात तो त्याची बायको आणि मुलासोबत राहतोय. सौंदर्यानं नटलेल्या परिसरावर शहराच्या मेयर वादीम शेलेवॅतची नजर आहे. वादीमला कोलयाचा व्यवसाय, त्याचं घर आणि त्याची जागाही बळकावायची आहे. सुरुवातीला मेयर कोलयाला आमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला वडिलोपार्जित घर सोडायचं नसतं. त्यामुळं शेलेवॅथच्या सरकारी जाचाला सुरुवात होते. इथंच आम आदमी विरुद्ध सत्ता, असा संघर्ष पेटतो.

सिनेमा सुरू होतो, तेव्हा पडद्यावर दिसतो तो अथांग समुद्र. या समुद्राच्या लाटा फोफावत, रोरावत किना-यावर येतात आणि तिथल्या दगडांवर आपटून नष्ट होतात. जणू काही किना-यावरचं सर्व काही आपल्या मिठीत घ्यायची त्यांना घाई झाली आहे. दिवसागणिक अशा असंख्य लाटांचा मारा सहन करूनही दगड अगदी ढिम्मसारखा समुद्राला आव्हान देत उभा असतो.
आता अशी कल्पना करा, की हा समुद्र म्हणजे एखादा देश, कुठलाही असो आणि किना-यावरचे दगड म्हणजे हा देश चालवणारी यंत्रणा म्हणजे तिथलं सरकार. समुद्रातल्या लाटा म्हणजे तिथली जनता, तिथं राहणारे लोक. आता हा लाटारूपी जनसागर आपल्या मागण्या, समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी दगडांकडे जातोय. पण या दगडाच्या पलीकडे तयार झालेल्या सिस्टिमनं या नैसर्गिक प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. कितीही मोठ्या लाटा आल्या आणि या दगडांवर आपटल्या, तरी त्याचा काहीही फरक पडत नाही. हा संघर्ष देशातला एक नागरिक विरुद्ध सिस्टिम असा आहे. जगभरातली राजकीय स्थिती बघितली, तर हे आपल्याला लक्षात येईल की, माणूस विरुद्ध सिस्टिमचा हा संघर्ष सगळीकडेच विकोपाला गेलाय. म्हणूनच मग रशियातल्या भ्रष्ट राजकारणाची पिसं काढणारा ‘लिवायथन’ हा सिनेमा ख-या अर्थानं जागतिक होतो. धर्मसंस्था, समाजसंस्था आणि न्यायसंस्था अशा तिन्ही खांबांच्या बरोबर मधोमध अडकलेला ‘लिवायथन’चा हीरो कोलया आजच्या जगातल्या आम आदमीचं प्रतिनिधित्व करतो.

२०१४ मध्ये फ्रान्समधल्या कान फिल्म फेस्टिव्हलबरोबर अनेक फेस्टिव्हलमध्ये ‘लिवायथन’नं बाजी मारलीय. गोव्याला झालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो सरस ठरला. सुवर्णमयूर घेऊन गेला. खरं तर पुरस्कार हे सिनेमा चांगला आहे की वाईट, हे समजून घेण्याचं मानक नाही. पण कॉम्पिटिशनच्या या जगात, तेच मानक असेल तर ‘लिवायथन’ यात अव्वल ठरलाय, हे इथं सांगणं गरजेचं आहे.

‘लिवायथन’ या शब्दाचा संदर्भ बायबलमध्ये सापडतो. समुद्रातल्या शार्क माशाला हे संबोधन वापरलं जातं. त्याच्याकडे वाईट गोष्ट म्हणून पाहिलं जातं. ‘लिवायथन’ सिनेमातली वाईट गोष्ट कुठली, तर तिथली रूढिवादी पारंपरिक चौकट आणि फोफावलेला भ्रष्टाचार, याच वेळी विस्कटत जाणारी सामाजाची घडी. याचा बळी ठरलाय, तो तिथला सर्वसामान्य माणूस म्हणजेच आम आदमी.

‘लिवायथन’ समजून घेण्यापूर्वी रशियातल्या धार्मिक, सामाजिक आणि न्यायप्रक्रियेची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पुस्सी राइट बँड आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात निवडणूक लढवणा-या अलेक्स नेवल्नीच्या बातम्या वाचल्या तर रशियात नक्की काय चाललंय, याचा अंदाज येईल. पुतीनला ज्या व्यक्तीची सर्वात जास्त भीती वाटते, तो म्हणजे अलेक्स नेवल्नी. त्यानं पुतीन राजवटीतल्या भ्रष्टाचाराविरोधात दिलेला लढा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जगभर पोहोचला. पुस्सी राइट या महिलांच्या बँडनंही असंच केलं. ऐन निवडणुकीच्या अगोदर पुतीनची या दोघांनी गोची केली.

या दोन्ही घटनांमधून आजचा रशिया समजून घेता येतो. तिथला आम आदमी आणि भ्रष्ट सिस्टिम विरोधातला त्याचा लढा समजून घेता येतो. ही लढाई आपल्याला पडद्यावर दिसते, अनुभवता येते, ती अँड्य्रू झ्व्यागिन्सेव दिग्दर्शित लिवायथन(२०१४)मुळं. ही लढाई प्रातिनिधिक स्वरूपात फक्त रशियात घडतेय. तशी ती जगभर सुरू आहे.

रशियातल्या कुठल्याशा गावात ही गोष्ट घडतेय. तिथं कुटुंबासह शिकारीला जाण्याची प्रथा आहे. या शिकारीत नेम शिकण्यासाठी कोलया आणि त्याचे मित्र रशियातल्या सर्व जुन्या राष्ट्राध्यक्षांचे फोटो घेऊन येतात. सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो का नाही आणला, या साहजिक पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळते, त्यांनी अजून इतिहास घडवला नाही. हे थेट पुतीन यांच्या कार्यशैलीवर करण्यात आलेलं भाष्य आहे.

सिनेमात कोर्टानं फैसला सुनावण्याचे लांबच्या लांब दोन ते तीन सीन आहेत. कायद्याच्या चौकटीत सर्वसामान्यांचा लढा हा पुरावे आणि त्याविरोधातले तयार करण्यात आलेले प्रतिपुरावे एवढंच आहे. याचा अर्थ असा की, न्यायदेवतेला फक्त आणि फक्त वस्तुनिष्ठ पुरावेच लागतात. परिस्थिती कशामुळं तयार झाली, याचा लॉजिकल विचार करण्याचे काम न्यायदेवतेचे नाही. यामुळे फैसला सुनावताना त्यात गुन्हा का झाला, याचं विश्लेषण नाही; तर गुन्हा झाला त्याची शिक्षा काय, हेच वाचून दाखवलं जातं. यात मुळातच कुठलाही माणुसकीचा भाव नसतो. असतात फक्त कलमं आणि त्याच्या आधारावर दिली जाणारी शिक्षा.

सिनेमा संपण्यापूर्वी चर्चमधले पाद्री चर्चचं महत्त्व समजावून सांगतात. देवाला फक्त आणि फक्त सत्य कसं आवडतं, हे सांगितलं जात असतं. त्याअगोदरच भ्रष्ट मेयर आणि त्याच्या साथीदारांनी कोलयाचं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं असतं. शेवटी, पडद्यावर पुन्हा समुद्र दिसतो. लाटा फोफावत, रोरावत पुन्हा या खडकांवर आदळत असतात. या लाटांमध्ये एक लाल रंगाचा लोखंडी ड्रमही किना-यावर जोरात आदळतोय आणि परत मागे जातोय, पुन्हा त्याच वेगानं खडकांवर आदळतोय, असा हा सीन आहे. खरं तर रशियातल्या साम्यवादाची स्थिती ही अशीच झालीय. तोही असाच भरकटलाय. हेच कदाचित अँड्य्रूला ठळकपणे सांगायचं असावं बहुतेक!

narendrabandabe@gmail.com