आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सही रे सही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सही रे सही’सारखी नाटके ही 1) शाब्दिक विनोद, 2) ख-या विनोदांचा वापर, 3) आंगिक अनुभव, 4) वेगवान हालचाली, 5) नकला यावर यशस्वी होतात. वाशीत झालेल्या प्रयोगात तर भरत जाधवने पृथ्वीराज चव्हाण यांची नक्कल करून दाखवली. वकिलांचे नाव ‘पिसाळलेले कोल्हे’ म्हणजे पिसाळ, लेले आणि कोल्हे यांची कंपनी. हा यातला शाब्दिक विनोद. शिडशिडीत बारीक अंगाचा काळ्या कोट-पँटमधला वकील आणि पांढ-या कपड्यातला भरत जाधव मिळून जे विनोदी आकार आणि आकृतिबंध तयार करतात ते अफलातून. खरे तर हे नाटक म्हणजे सबकुछ भरत जाधव. ज्या इतर तीन सुखात्मेंसारख्या दिसणा-या व्यक्ती शोधण्यात येतात, त्यातील एक कुरियरवाला असतो. साधासरळ माणूस ज्याला स्वत:चा टेम्पो, ट्रकचा व्यवसाय करण्याची इच्छा असते; तर दुसरा मतिमंद हरी, विचित्र असलेला. आणि तिसरा गलगले नावाचा इन्शुरन्स व्यावसायिक. हे गलगलेचे पात्र अगदी पोराबाळांनीही नकला कराव्यात इतके लोकप्रिय झालेले आहे.

नाटकाचे मुख्य बलस्थान होते ते डुप्लिकेट नावाची गोष्ट; जी पडद्यावरच दाखवता येते, ती नाटकात दाखवायच्या विचित्र कल्पनेने. अर्थात, हे केवळ अशक्य होते आणि आहे. त्यामुळे नाटकात अनेकदा एक भरत जाधव आणि त्याचे कपडे घातलेले पाठमोरे डमी दिसतात. पण या सर्व सादरीकरणातील अचूकता आणि भरत जाधवची चारही रोलमध्ये चटकन शिरण्याची क्षमता यामुळे हे नाटक यशस्वी होते. नाहीतर हे नाटक फसूही शकले असते.

मतिमंद हरीच्या चेह-याला हात लावला की तो ‘तुमच्यासारखा देवमाणूस मी पाहिला नाही’ असं म्हणतो. पायाला हात लावल्यावर ‘तुझ्या बापाचे खातोय काय?’ असे विचारतो. गाणी लावल्यावर नाचायला लागतो. हे सारे भरत जाधव अत्यंत कन्व्हिसिंगली सादर करतो. त्याच्या नाचाला टाळ्या पडतात. वाक्यावाक्याला हशा येतो. ‘मला स्टेशनवर नाचायला लावून हा पैसे जमवत होता’, हे करुण वाक्य त्या हशात बुडून जाते. इथे कुणाला कारुण्याची झालर वगैरे हवी आहे?

‘ऑल द बेस्ट’च्या यशातून भरत जाधव यशस्वी नट म्हणून पुढे आला. संजय नार्वेकर आणि अंकुश चौधरीही. चाळीच्या, कामगारवर्गाच्या पार्श्वभूमीतून आलेले हे तिघेही अभिनयक्षेत्रात यशस्वी झाले. आणि त्यातला भरत जाधव आता रंगभूमी-चित्रपटावरचा सर्वाधिक यशस्वी नट आहे. यशासारखे यश नसते आणि मनोरंजनासारखे मनोरंजन नसते.

शेवटी एकच. पी. जी. वुडहाऊस जेव्हा संगीतिका लिहायचा, तेव्हा नाटक कंपनीचा जो मालक असे त्याच्या नऊ वर्षांच्या मुलाला या संगीतिका दाखवण्यात यायच्या. याबाबत वुडहाऊस सांगतो, ‘संगीतिका (म्युझिकल्स) पाहायला येण्याचे सरासरी वय नऊ असते.’ ‘सही रे सही’च्या प्रेक्षकाचे सरासरी वय किती? प्रेक्षकांतील मुले पाहून ते सांगता येईल काय?