आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Sahitya Samelan And Their Controversies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिनवादी साहित्य संमेलनाचा चंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखाचे शीर्षक वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल, याची आम्हाला खात्री आहे. त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही जाहीर माफी मागतो. वाटल्यास वर्तमानपत्रांत, ‘आम्ही असे काहीच बोललो नाही, पत्रकारांनी आमच्या विधानाचा विपर्यास केला’, (नेहमीप्रमाणे) असेही आम्ही हवं तर छापून आणतो. असो. आजवरच्या संमेलनात झालेली वादावादी पाहून, ऐकून, आम्हाला एक तरी संमेलन बिनवादी व्हायलाच पाहिजे, असं वाटू लागलं. सासवडला साहित्य संमेलन होण्याची घोषणा झाल्यापासून आम्हाला असं बरंच काही काही वाटायला लागलं आहे. अर्थात, वादविरहित संमेलन झालं, तर त्यामुळे अनेकांचे हितसंबंध धोक्यात येतील आणि अनेकांच्या हितांना बाधा पोहोचेल, याचीही आम्हाला जाणीव आहे. तरीही मायमराठीच्या भल्यासाठी आणि वाचकांच्या हितासाठी आम्ही ही जोखीम उचलण्याचे ठरवले आहे. अनेकांचा आम्हाला यासाठी पाठिंबाही मिळत आहे. फक्त त्यांची नावे आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करू शकत नाही. पण ते काहीही असलं, तरी हे संमेलन बिनवादी व्हायलाच पाहिजे, असा चंग आम्ही (इथे आमच्यासोबत बाकीच्यांचाही समावेश होतो) बांधलेला आहे. त्यासाठी आम्हाला ज्या सूचना मिळाल्या आहेत, त्या इथे जनहितार्थ आम्ही मांडत आहोत. त्याला सर्वांनी भरभरून पाठिंबा द्यावा, हीच आमची कळकळीची सूचना आहे.

- संमेलनात फोटोंवरून होणारे वाद टाळण्यासाठी ज्या गावात संमेलन होणार आहे, तिथे आधीच सूचना देऊन गावातील सर्व देवीदेवता, साधुसंत, बाबाबुवा, मंत्रीसंत्री, अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी, मृत-हयात सर्वांचे फोटो जमा करावे. मुख्य मंडपातच एक वेगळा मंडप मांडून, तिथे यांची प्रतिष्ठापना करावी. ज्यांचे फोटो राहिले असतील त्यांनीही ते न विसरता आवर्जून मंडपात आणून ठेवण्याची दवंडी गावात द्यावी.
- पत्रिकेवरून होणारे वाद टाळण्यासाठी सर्व मान्यवरांना कोरी निमंत्रण पत्रिका आणि एक पेन पाठवून द्यावा. त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यावर हवा तो मजकूर आणि हवी ती चित्रे काढावीत. त्यावर आयोजक कोणताही आक्षेप
घेणार नाही.
- अध्यक्षीय निवडणुकीचा वाद टाळण्यासाठी सर्वच इच्छुकांना अध्यक्ष बनवून टाकावे किंवा त्यांची भिशी काढावी किंवा अध्यक्षपदच रद्द करावे किंवा जुन्याच अध्यक्षांना पुन्हा अध्यक्ष बनवावे. ते हयात नसल्यास त्यांचा फोटो ठेवावा.
- संमेलनातील थाटमाट बघून ज्यांचे डोळे दिपतात त्यांच्यासाठी खास ‘भिकार-डी’ चश्म्यांची संमेलनाठिकाणी व्यवस्था करावी. ज्यातून सारं वातावरण दळभद्री आणि भिकारडंच दिसेल.
- निमंत्रण न मिळाल्यानं रुसून बसलेल्या थोर साहित्यिकांसाठी मुख्य मंडपाशेजारी ‘विहीणबाईचा मंडप’ घालण्यात यावा. तिथे जमून त्यांनी साहित्य परिषद आणि संमेलन आयोजकांच्या नावानं हव्या त्या बोंबा माराव्यात. त्या सर्वांना ऐकू याव्यात म्हणून खास लाऊडस्पीकर्सही बसवण्यात यावेत.
- संमेलनासाठी निधीची नेहमीच कमतरता भासत असते. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनात थेट परकीय गुंतवणूक सुरू करण्यात यावी, असा ठराव पारित करून तो पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना पाठवून द्यावा.
- संमेलनात जेवणाचा मेन्यू चांगला नसतो, असं पोट फुटेपर्यंत खाल्ल्यावर बोलण्याची अनेकांना सवय असते. त्यांनी त्यांच्या जेवणाचे डबे घरूनच आणावे, अशी जाहीर सूचना पेपरातून द्यावी.
- इतरांना मानपान मिळाल्यानं ज्यांच्या पोटात दुखतं, अशा प्रतिभावंत साहित्यिकांना आयोजकांनी हाजमोला आणि जुलाबाच्या गोळ्या मोफत पुरवाव्या.
- परिसंवादांमधील गर्दी (ऐकणा-यांची, बोलणा-यांची नाही. ती कमी करण्याची गरज आहे.) वाढवण्यासाठी जो हा परिसंवाद पूर्णवेळ ऐकणार नाही, त्याला माजी संमेलन अध्यक्षांच्या भाषणांचे खंड मोफत देण्यात येतील, अशी सूचना जाहीर करावी.
- राजकीय नेत्यांची व्यासपीठावरील गर्दी कमी करण्यासाठी एक व्यासपीठ पात्रता स्पर्धा घेण्यात यावी. ज्यात खालील प्रश्न विचारण्यात यावे.
1. मागील तीन साहित्य संमेलन अध्यक्षांची नावे सांगा.
2. तुम्ही स्वत: वाचलेल्या किमान पाच मराठी पुस्तकांची आणि त्यांच्या लेखकांची नावे आणि त्या पुस्तकाचा सारांश सांगा.
3. ‘मसाप’चा अर्थ सांगा.
4. कोणत्याही एका साहित्यिक राजकारण्याचे किंवा राजकीय साहित्यिकाचे नाव सांगा.
5. तुमची मुले मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतात का?
6. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकाचे नाव सांगा.
7. नेमाडेंच्या देशीवादाबद्दल तुमचं मत (कोणतीही देशी, विदेशी न घेता!) सांगा.
8. कोणत्याही एका समीक्षेच्या पुस्तकाचं नाव सांगा.
यातील एका जरी प्रश्नाचे उत्तर नाही आले, तर त्याला अपात्र ठरवण्यात यावे. (विशेष सूचना : ज्यांना आपली व्यासपीठ पात्रता सिद्ध करून आपले राजकीय व साहित्यिक वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी आम्ही खास ‘कोचिंग क्लासेस’ सुरू करणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.)

-संमेलन झाल्यानंतर उणेदुणे काढण्याची अनेकांना हौस असते, त्यांच्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात यावी. त्यात यशस्वी झालेल्या लोकांना पुढच्या संमेलनाचे आमंत्रण देऊ नये.


आमच्या या सूचनांची मराठी साहित्य परिषदेने आणि सासवड साहित्य संमेलन आयोजकांनी ताबडतोब दखल घ्यावी, अशी शेवटची सूचना. अन्यथा यंदाच्या संमेलनात वाद झाल्यास त्याला आम्ही जबाबदार असणार नाही!