आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे कोण?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी कधी कोजागिरीच्या रागाचे कारण शांताला समजायचे नाही. असेच एकदा नवीन कल्पना लढवीत शांता म्हणाली, ‘काही गोष्टी केवळ तुझ्याच म्हणून गुपित असतात की नाही? आईलाही त्या माहीत होऊ नये असे वाटते. तुझ्याशिवाय कोणालाही माहीत नसतात. कधी कधी त्या काही मैत्रिणींना ठाऊक असतात. अशा गोष्टी तू या डायरीत लिहीत जा. सर्व जम्माडीजमत, सिक्रेट्स या डायरीला सांगायचे.’ आणि कोजागिरीला डायरी दिली. ‘तू अ‍ॅन फ्रँकची डायरी वाचली आहेस ना? तिने कशा सर्व गोष्टी आपली मैत्रीण समजून डायरीत लिहिल्या, तसेच तुला करायला मजा येईल का?’ कोजागिरीचा भाव बदलत असल्याचे शांताला जाणवले.
डायरी लिहिण्याच्या कल्पनेने कोजागिरीची कळी खुलली होती. तिचा बदलणारा भाव पाहून शांता म्हणाली, ‘म्हणजे बघ, कितीतरी वेळा तुला माझा राग येतो. मी अगदी वाईट, वेडी आहे असे वाटते. तेसुद्धा तू लिहू शकशील. वर्गातील मित्रमैत्रिणींच्या गमती, भांडण, दंगे सर्व सर्व काही.’ ‘पण माझी डायरी कोणीही वाचायची नाही. हो ना? ती फक्त माझीच असेल.’ कोजागिरी आता विचार करायला लागली होती. ‘हो, नक्कीच. दुसर्‍याची डायरी, पत्रं परवानगीशिवाय कुणीही वाचायची नसतात,’ शांता समजावून देत म्हणाली. काही महिन्यांसाठी कोजागिरी बर्‍याच वेळा डायरी लिहीत होती. ऑफिसमधून परत आल्यावर शांताचा ‘ऑफिसमधल्या गमती’ सांगण्याचा एक कार्यक्रम असायचा. त्याच धर्तीवर कोजागिरी ‘शाळेतल्या गमती’ सांगायची. एकदा कोजागिरी म्हणाली, ‘आई, माझी गंमत आहे शाळेतली. मी माझ्या डायरीतही लिहिलीय. तू कुणाला सांगणार नसशील तर मी तुला सांगणार आहे. आमच्या वर्गातील ... मुलगा मला खूप आवडतो. तो माझ्याशी खूप चांगला वागतो. इतर मैत्रिणींसारखा भांडत नाही.’ त्यानंतरही कोजागिरीची बडबड सुरूच होती. वर्गातील मुलं-मुली एकमेकींना कसे चिडवतात ते सांगताना म्हणाली, ‘मला कधी कधी या गोष्टीचा खूप राग येतो.’
शांताने कोजागिरीकडे पाहिले. ती जरा अस्वस्थ वाटत होती. वेण्या घालताना शांताने कोजागिरीच्या अंगावरून हात फिरवला. तशी कोजागिरी म्हणाली, ‘आई, इतरांना आहे तसा मला भाऊ किंवा बहीण का नाही?’ हा प्रश्न कोजागिरीने प्रथमच विचारला होता असे नव्हते. वेगवेगळ्या वयात या प्रश्नाभोवती शांता आणि ती बोलल्या होत्या. पूर्ण नसले तरी तात्पुरते समाधान ती करू शकली होती. परिस्थिती अनुकूल असती तर शांताला एकापेक्षा जास्त बाळं झालेली आवडली असती. पण हा विचार कोजागिरीला सांगण्याइतपत ती अजून मोठी नव्हती. आहे त्या परिस्थितीत काय करायचे, ते चांगले कसे करायचे, ही गोष्ट शांता जाणीवपूर्वक करत राहिली. ‘कोजा, आता तू मोठी होत आहेस. कोणीतरी जवळचे भावंड असावे असे तुला वाटणे मी समजू शकते. पण आपण चुलत-मामे-मावसभावंडं आपलीच सख्खी भावंडं मानायची. शिवाय शेजारचे, शाळेतले मित्रमैत्रिणी असतातच की नाही.’ शांताच्या बोलण्याकडे कोजागिरीचे लक्ष नव्हते. ती वेगळ्याच विश्वात गुंतल्यासारखी दिसत होती. आपल्या मित्राबद्दलचे स्वाभाविक आकर्षण कोजागिरी नीट व्यक्त करू शकत नव्हती, हे शांताला उमजले. अशा वेळी कोजागिरीला एकटे वाटते आहे, हे शांताने ओळखले. विचार करून शांता म्हणाली, ‘आपण या सुटीत तुझ्या वर्गातील आवडत्या मित्रमैत्रिणींना घेऊन दिवसभरच्या सहलीला जाऊ या. तू आतापासूनच सगळ्यांना सांगून ठेव. मी त्यांच्या आईबाबांशी बोलेन. मजा येईल की नाही?’ कोजागिरीचे एकटेपण कमी होते आहे का, याचा अंदाज शांता घेत होती. ‘खरंच की, मस्त आयडिया आहे.’ वेणी घालून झाल्याने कोजागिरी टण्णकन् उडी मारून उठली. शांताच्या गळ्यात हात घालून म्हणाली, ‘तुझ्यावर मी रागावले तरी तू मला आवडतेस.’ दुसर्‍या क्षणी खेळण्यासाठी ती बाहेर निघूनही गेली!
ती निघून गेल्यावर शांता मनातल्या मनात कोजागिरीशी बोलत राहिली, ‘आपले कोण याचा शोध प्रत्येकाला घ्यावा लागतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर. प्रत्येक वेळी समाधानकारक उत्तर मिळते असे नाही. तू माझ्यावर जरूर रागाव, कारण मी तुला जवळची आहे. प्रत्येक वेळी मला तुझा राग समजून घेणे जमेल असे नाही. त्या वेळी तू मला क्षमा करशील का?’

aruna burte@gmail.com