Home »Magazine »Rasik» Article On Sarangkheda Ghodebazar

सारंगखेड्याचा बहुढंगी घोडेबाजार

रणजित राजपूत | Jan 05, 2013, 20:51 PM IST

  • सारंगखेड्याचा बहुढंगी घोडेबाजार

सरत्या डिसेंबरच्या गारठ्याची धुंद पहाट... दूर लखलखत्या दिव्यांत गाव जागे होताना मी गोधडीला कवळून धुक्यात हरवलेली वाट नदीच्या काठाने तुडवत निघालो. अंजनी, गिरणा, वाघूर गोमाई नद्यांच्या ‘सारंगी’ प्रवाहांनी एकमुखी दत्ताच्या चरणी तीर्थक्षेत्र झालेले तापी नदीचे प्रवाह. तिच्या प्रतिबिंबात अखंड बुडालेले सातपुडा डोंगर, सुंदर पपई-केळीचे, हुरड्याच्या कणसांचे मळे आणि सोबतीला जत्रेने बहरून गेलेला सारंगखेड्याचा (ता. शहादा, जि. नंदुरबार) परिसर. इथेच नजरेस पडते, धुक्याच्या दाटीतून जाणारी पायवाट तुडवत दूर मुख्य रस्त्यापर्यंतच्या सेतूला पोहोचलेले, मारवाडच्या राजघराण्याशी रुबाबदार नाते सांगणारे चौखूर उधळलेले ऐटबाज घोडदळ... पुढा-यांनी बदनाम केलेल्या ‘घोडेबाजार’ या शब्दाला अहिराणीच्या मुलखाने दिलेली विधायक ओळख देणारे...
ग्रामीण जीवनात उपयोगी येणा-या लहान-सहान वस्तूंपासून ते थेट बैलगाडी आणि शेतीची विविध अवजारे आणि बैल, घोडे यासारखे पशुधन सारंगखेड्याच्या यात्रेत विक्रीसाठी ठेवलेले असतात. गरमगरम गुळाची जिलेबी, गोडीशेव, शेवखमणी आणि आळूपात्रा यांच्या खमंगाने गंधाळलेली खाऊची दुकाने जिभेचे लाड पुरवणा-या खवय्यांनी खच्चून भरलेली असतात, एकीकडे सातपुड्यातील आदिवासी महिला बचत गटांची कारागिरी आणि पहाडातील चुलींवर भाजलेल्या ज्वारी, बाजरी, नागली व मक्याच्या भाकरीचा दरवळ रंध्रे उल्हसित करत असतो. अर्थात, बापाच्या खांद्यावर चढून जत्रा लुटणारी मुले, जत्रेत सजलेले तमाशाचे तंबू आणि नमकीन चाटचे ठेले, पेढ्यांची गोडी, चुर्णाची जडी-बुटी या सर्वांना आपल्या उदरात घेतलेल्या सारंगखेडा यात्रेचे पंचप्राण एकवटलेले असतात, ते बहुढंगी अश्वप्रदर्शनात. हे अश्वप्रदर्शन म्हणजे, अहिराणीच्या लोकसंस्कृतीचे हृदय. आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो, नांदेडच्या माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्‍ट्रातल्यामधल्याच शिरपूरला. असे देश आणि राज्यात भरणारे घोडेबाजार कमी नाहीत. तरीही सारंगखेड्याच्या बाजाराची एक आगळी ओळख निर्माण झाली आहे. येथील घोडेबाजाराने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील घोड्याच्या व्यापा-यांना आकर्षित केले आहे. याचे कारण, या बाजारात पंजाब, मारवाड, काठीयावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे घोडे विक्रीसाठी येतात, एकेका अस्सल जातिवंत घोड्याला 50 हजारांपासून ते 21 लाखांपर्यंत दाम मिळतो. 15 दिवसांत तब्बल पाच कोटींपर्यंत उलाढाल होते. या एवढ्या मोठ्या उलाढालीचे कारण एकच आहे; येथे मिळणारे उत्तम घोडे आणि खरेदी-विक्रीची उत्तम होणारी नोंद. या बाजारात प्रामुख्याने घोड्यांच्या तीन जातींची हुकमत चालते. त्यात आघाडीवर असतात पंजाबी, मारवाडी आणि काठेवाडी. अर्थात, सामान्य जनांना या घोड्यांची जात किंवा त्यांचे वैशिष्ट्य लक्षात येत नाही. पण घोडाशौकीन मात्र रंग, उंची आणि शरीराच्या ठेवणीवरून पाहताक्षणी त्यांची अचूक पारख करतात. मारवाडी जातीचे घोडे पाच ते साडेपाच फूट उंच असतात. ते दिसायलाही आकर्षक असतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. चेहरा पसरट असतो. त्यामुळे ते भारदस्त दिसतात. तर पंजाबी अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात. त्यांच्या पांढ-या वर्णावर किंचित डाग आढळतो. ते शुभ्र वर्णी पंजाबी घोडे ‘नुकरा’ नावाने प्रसिद्ध आहेत. अश्वशौकिनांची या घोड्यांना विशेष मागणी असते. प्रत्येक खरेदीदार घोड्यांची पारख करताना आपली गरज पाहतो. काठेवाडी घोडे शिकण्यासाठी उत्तम असल्याने लग्नात नाचण्यासाठी याच घोड्यांना मागणी असते. पंजाबी शुभ्र घोडे लग्नात मिरवणुकीसाठी वापरले जातात. शौकीन मंडळीही शुभ्र घोडे पसंत करतात. व्यवसायासाठी घोडा खरेदी करणारा त्याला आवडलेल्या घोड्यात फार खोड्या काढत नाही. परंतु तोच जर एखाद्या शौकिनास खरेदी करायचा असेल तर तो त्या घोड्यांची सविस्तर अंगपरीक्षा घेतो. घोड्याच्या अंगावरील सर्व खुणा तपासतो. गेल्या तीन पिढ्यांपासून या अश्व प्रदर्शनाचे आयोजन करणा-या रावळ कुटुंबाचे वारस जयपालसिंह रावळ यांच्या म्हणण्यानुसार, घोड्यात 72 खोड्या म्हणजे दोष काढता येतात. अंगावरील खोड्या कुठे आणि कशा आहेत, ते महत्त्वाचे असते. या खुणा मुख्यत्वे भोव-याच्या स्वरूपात असतात. गळ्यावर भोवरा असलेला घोडा उत्तम समजला जातो. त्या घोड्यास ‘देवमन’ म्हटले जाते. घोड्याच्या छातीवर दोन्हीकडे आणि डोक्यावर दोन भोवरे असलेला घोडा शुभलक्षणी मानला जातो. पोटावर भोवरा असेल तर तेही शुभ मानून त्यास ‘गंगापाट’ म्हटले जाते. मात्र, त्याच वेळी डोक्यावर, गळ्यावर तीन आणि चार भोवरे असतील, तर ते अशुभ मानले जाते. मागच्या पायात ढोपराच्या सांध्याजवळ खालच्या दिशेने खोल खड्डा असेल, तर तो घोडा चांगला समजला जातो. असा घोडा मालकाच्या ताब्यात राहतो. वरच्या दिशेने खड्डा असलेला घोडा खुटी उपटून पळणारा मानला जातो. निव्वळ छंद म्हणून दारातील शुभलक्षण म्हणून घोडा पाळणारे घोड्यातील अशी सारी लक्षणे तपासून खरेदी करतात. अशा शुभलक्षणी घोड्याचा दाम लाखावर असतो. ‘पंचकल्याणी’ घोडा खास करून देवाचे वाहन म्हणून वापरला जातो. त्याचे चारही पाय ढोपराखाली शुभ्र असतात आणि त्याच्या चेह-यावर पांढरा पट्टा असतो, डोळे घारे असतात. या दोन डोळ्यांना ‘जयमंगल’ असे म्हटले जाते. ‘पंचकल्याणी घोडा अबलख गं, जीनावरी कलाबूत लखलख गं...’ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकरांची ही प्रसिद्ध लावणी. सारंगखेड्याचा घोडेबाजार बघताना यमुनाबार्इंची लावणी सोबतीला नसली तरीही या लावणीतला माहोल ठासून भरलेला असतो...

Next Article

Recommended