आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेचा उपेक्षित 'आदिनायक'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच स्वच्छ भारताचा मूलमंत्र देशाला दिला आणि त्याची सुरुवातही स्वतःपासून केली. त्याच्या कितीतरी आधी सातपुड्याच्या पायथ्याशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी जसे राष्ट्रव्यापी काम केले, तेवढेच तोलामोलाचे कार्य आदिवासी संत गुलाम महाराज यांनी केले आहे. केवळ इतिहासाने त्यांची दखल न घेतल्यामुळे ते आजही उपेक्षेच्या अंधारात आहेत.

तत्कालीन पश्चिम खान्देश जिल्ह्यात व आताच्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदे तालुक्यात, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मोरवड गाव. गावात गुर्जर शेतकरी समाजाबरोबर कष्टकरी आदिवासी समाजाची वस्ती. गाव अत्यंत लहान, एक अतिशय गरीब, दरिद्री, सालदारकी करणारे भायल्या भिलचे कुटुंब गावात राहत होते. अतिशय सामान्य आदिवासी परिवार. भायल्या पत्नी मैनाबाई हिच्याबरोबर संसार करत होते. भायल्या व मैनाला एकूण सहा अपत्ये. गुल्या, रामदास, दामू, वेडू ही चार मुले, तर नर्मदा व नवादी या दोन मुली. घरची शेती नाही. सालदारकी व मोलमजुरीवर गुजराण करणा-या या कुटुंबाचे गुल्या हे सर्वात मोठे चिरंजीव. हेच गुल्या नंतर गुलाम झाले. लहानपणापासून बक-या, गायक्या, बैलक्या, ढोरक्या ही कामे करत वाढत्या वयानुरूप पदोन्नती होत-होत सालदारकीपर्यंत पोहोचले.

आपल्या वडलांची हलाखीची स्थिती पाहून कुटुंब चालवण्यासाठी ‘सालदारकी’ हा एकच पर्याय गुलाम यांच्याकडे होता. गुलाम सालदार असताना विशिष्ट साचेबद्ध पद्धतीने वागू लागले. रोज नित्यनेमाने जगण्याचा त्यांचा परिपाठ अनेकांच्या कौतुकाचा तर काहींसाठी चेष्टेचा विषय होऊ लागला. त्या काळी समाजात आवश्यक वाटत नसे तरी रोज सकाळी शौचास जाताना पाणी घेऊन जाणे, हा त्यांचा पहिला नियम. गुला रोज अंघोळ केल्याशिवाय व सूर्याचे दर्शन घेतल्याशिवाय काहीही खात नसत. त्या काळी ‘पावसाळा’ आतासारखा नव्हता. पावसाची झडी लागली तर तीन-चार दिवस सूर्याचे दर्शन होत नसे. गुला सूर्यदर्शन होत नाही तोवर अन्नग्रहण करत नसत. कडकडीत, निरंकट उपवास करत. मात्र त्यांच्या कामात कोणताही खंड पडू देत नसत. ते जसे सूर्याचे उपासक होते, तसे रोज सकाळी स्नान झाल्यानंतर तांब्याभर पाणी घेऊन मंदिराचा पार(ओटा) स्वच्छ करणे हासुद्धा त्यांचा छंद होता. गुला सालदार, रखवालदार असतानाही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेकदा पायी जाऊन आले होते. विठ्ठलभक्त व वारकरी गुला म्हणूनसुद्धा त्यांची ओळख घट्ट झाली. या सर्व आचरणातून, सततच्या त्यांच्या ‘भक्ती’ पंथाच्या वर्तनातून गुला लोकांसाठी ‘गुलाम महाराज’ झाले. अर्थात, गुलाम महाराज झाल्यानंतरही ते ‘ऐतखाऊ’ झाले नाहीत. आपल्या खाण्यापिण्याचा भार कोणावरही पडणार नाही, यासाठी ते दक्ष होते. त्यांच्या कार्याकडे भिल्ल समाज व त्यानंतर भिल्लेतर समाजही मोठ्या संख्येने आकर्षित होऊ लागला. तत्कालीन भिल्ल समाजामध्ये साक्षरता नावाचा प्रकार समाजात शोधूनही सापडणे अशक्य व अवघड होते. चोर-दरोडेखोर म्हणून संभावना केला जाणारा भिल्ल समाज प्रत्यक्षात ‘फुकटखाऊ’, ‘ऐतखाऊ’, ‘भीक मागून खाणारा’ कधीच नव्हता. मात्र भिल्लेतर ‘शाहू’ समाजाकडून उच्चनीचतेची वागणूक पावलोपावली मिळत होती. याची झळ स्वत: गुलाम भिल्लसुद्धा अनुभवत होते.

तत्कालीन भिल्ल समाजाची अवहेलना होण्यास, अवनती होण्यास गुलाम महाराजांनी दोन प्रमुख कारणे त्यांच्या अनुभवातून, निरीक्षणातून शोधली. पहिले म्हणजे, कौटुंबिक संबंध व दुसरे दारूची गुलामगिरी. कुटुंबातील विशेषत: पती-पत्नीत घट्ट नसलेले संबंध हे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडवणारे, कुटुंबव्यवस्था मोडकळीस आणणारे असून यातून निर्माण होणारा ‘आक्रोश’ दारूच्या गुलामगिरीकडे लोटणारा ठरत असल्याचे त्यांचे ठाम मत झाले. त्यांच्या निदानातून कौटुंबिक स्वास्थ्यासाठी, पती-पत्नीच्या मनात परस्परांविषयी प्रेम राहावे, कौटुंबिक जिव्हाळा कायम राहावा, म्हणून गुलाम महाराजांनी सती-पती आरतीची रचना केली. तसा प्रारंभही केला. अशातच त्यांनी ‘आप’ या शब्दाची नव्याने योजना केली. आपल्या सांगण्याप्रमाणे ज्यांनी आपल्या वर्तनात बदल केला, भक्तिमार्ग अवलंबला, त्या मंडळींना संत गुलाम महाराज ‘आप मंडळ’ म्हणून लागले. ते जरी निरक्षर होते तरी त्यांना सुचलेला मार्ग हा शिक्षित, तत्त्ववेत्त्यालासुद्धा न जमणारा होता, हे काळाने दाखवून दिले आहे. त्यांच्या उपदेशाने केवळ भिल्ल समाजच त्यांच्याकडे ओढला गेला नाही, तर भिल्लेतर समाजही मोठ्या संख्येने आकर्षिला गेला.

गुलाम महाराजांनी आपल्या ‘आप मंडळाच्या वाटचाली’ नंतर त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता आप समाजाची केलेली स्थापना ही पक्क्या पायावर उभी केलेली इमारत होय. २२ ऑगस्ट १९३८च्या आरतीला सव्वा लाख लोकांच्या उपस्थितीची नोंद आहे. सोमवारच्या आरतीसाठी गुजरात भागातून नंदुरबार मार्गे ‘स्पेशल गुलाम महाराज ट्रेन’ने हजारोंच्या संख्येने समाज एकत्रित येत होता. गुलाम महाराजांनी स्वत:ची आरती समाजाकडून कधीही करून घेतली नाही. हाच महत्त्वपूर्ण भेद इतर संत व संत गुलाम महाराजांतील असल्याची नोंद घेणे आवश्यक वाटते. गुलाम महाराजांची दशसूत्री याप्रमाणे होती - शौचास जातेवेळी पाणी नेत जा, रोज स्नान करा, गंध व कुंकू लावा, दारू पिऊ नका, भांग वगैरे घेऊ नका, मांस खाऊ नका, खरे बोला, लबाडी करू नका, फसवू नका, ‘आप’ची आरती करा, परस्परांची आरती करा, ही त्यांची दहा सूत्रे होती. या उपदेशाची विशेषता अशी की, त्याचे पालन स्त्री व पुरुष दोघांनीही करावे. परस्परांवर विश्वास ठेवून, परस्परांच्या सहकार्याने त्यावर अंमल करावा. हे ‘प्रयत्नपूर्वक’ व्यवस्थापन संत गुलाम महाराजांनी केले होते. गुलाम महाराजांच्या सहवासाने, उपदेशाने, सामूहिक आरती उपक्रमाने भिल्ल आदिवासींमध्ये होणारे परिवर्तन कोणत्याही मापदंडाने मोजण्यासारखे नव्हते. गावच्या गाव त्यांच्या प्रभावाने, त्यांनी आचरणात सांगितल्याप्रमाणे समाजवर्तन करू लागला. समाजातील हे परिवर्तन, हा होत असणारा प्रभाव, ‘अचंबा’ करण्यासारखा व अद्भुत होता. संत गुलाम महाराज यांना अल्पशा आजाराने १९ जुलै १९३८ रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता देवाज्ञा झाली. ही घटना संपूर्ण समाजाला धक्कादायक होती. काळ इतक्या निष्ठूरपणे संत गुलाम महाराजांना समाजातून हिरावून नेईल, असे कोणालाही वाटले नव्हते. आपल्या संताला शेवटचा निरोप देण्यासाठी मोरवडला उपस्थित असलेली अलोट गर्दी, भावपूर्ण व साश्रुनयनांनी दिलेला निरोप, अजूनही मोरवड व पंचक्रोशीतले वृद्ध विसरलेले नाहीत.
ranjitrajput5555@gmail.com