आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटची व्याघ्रभूमी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातल्या अन्य कुठल्याही व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ दिसल्यावर होत नसेल तेवढा आनंद मेळघाटात वाघ दिसल्यावर होतो. याचे मुख्य कारण म्हणजे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची भौगोलिक रचनाच अशी आहे की, उंचसखल पर्वतरांगांमुळे येथे व्याघ्रदर्शन क्वचितच होते. अत्यंत दुर्गम आणि अनाघ्रात क्षेत्रात वावरणारा इथला वाघ भारतात आढळणाऱ्या अन्य जंगलांतील वाघांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असल्याचेही वन्यजीव संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आकर्षित होतात. परंतु मेळघाटात केवळ वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी न जाता तेथील निसर्गाचा व जैवविविधतेचा निखळ आनंद घेण्यासाठी गेल्यास भ्रमनिरास होत नाही.

विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प भारतातील तमाम पर्यटकांना आपल्या अमर्याद क्षमतांसह साद घालतोय. भारतातील समृद्ध वनक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात नुकतीच अत्याधुनिक कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने वन्यप्राणी गणना करण्यात आली. देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून अस्तित्वात आलेल्या या जंगलात व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात येण्याअगोदर फक्त केवळ २७ वाघांची नोंद करण्यात आली होती. परंतु या क्षेत्रात ६५ वाघ असल्याचे नुकत्याच केलेल्या व्याघ्र गणनेतून निष्पन्न झाले आहे. व्याघ्र संरक्षणार्थ राबविण्यात आलेले विशेष उपक्रम, वनकर्मचारी व अधिकारी यांच्या विशेष प्रयत्नामुळे व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या वाढत असल्याने, समृद्ध वनवैभवाचे संकेतच मिळाले आहेत. व्याघ्र सनियंत्रणाच्या नव्या पद्धतीनुसार धोक्यात असलेल्यांच्या प्रगणनेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात ग्रासभक्षी व तृणभक्षी व वन्यजिवांच्या अस्तित्वाचेही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुरावे गोळा केले गेलेत. या नियतक्षेत्रामध्ये आढळून आलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुराव्यांची संख्या, घनता बघता मेळघाट व्याघ्रक्षेत्रात वाघांची संख्या वाढत असल्याचा, निर्धारित घोषित वाघांच्या संख्येपेक्षा अधिक वाघ असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालनालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या गुगामल, सिपना आणि अकोट वन्यजीव विभागांत पहिल्यांदाच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कॅमेरा ट्रॅपचा उपयोग केला गेला. याकरिता स्वयंचलित २५ डिजिटल कॅमेरे गुगामलकडे, २५ कॅमेरे सिपनाकडे, तर ५ कॅमेरे अकोट वन्यजीव विभागाकडे आहेत. आकोट वन्यजीव विभागातील नरनाळा अभयारण्य क्षेत्रातील कृत्रिम पाणवठ्यावर एकाच वेळी चार पट्टेरी वाघ पाणी पितानाचे छायाचित्र घेण्यात आले आहे. तर ज्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये एकही वाघ नसल्याचे गृहीत धरण्यात आले होते, त्या अंबाबरवामध्ये चार वाघांच्या पावलांचे ठसे बघायला मिळाले आहेत. तसेच सिपना वन्यजीव विभागातील चौराकुंड, जारिदा रायपूर व सेमाडोह वनपरिक्षेत्रात वाघांचे अस्तित्व आहे. या ठिकाणी वाघाच्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पुरावे मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत.

गुगामल वन्यजीव विभागात निवडक क्षेत्रात कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने, डेहराडून येथील वन्यजीव संस्थेने केलेल्या अभ्यासात ३९ वाघ असल्याचे म्हटले आहे, तर याच विभागांतर्गत चिखलदरा वन्यपरिक्षेत्रात वाघ आणि बिबट्याचे प्रत्यक्ष छायाचित्र मोठ्या संख्येत कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने मिळवण्यात क्षेत्रीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना यश आले आहे. डूडा या अतिदुर्गम रानपिंगळ्यांचे अस्तित्व चौराकुंड परिसरात आढळून आले आहे. चौराकुंड परिसरात रानपिंगळ्यांचे हमखास दर्शन होत असल्यामुळे आणि जागतिक पातळीवरील आकर्षणामुळे परदेशी पक्षीतज्ज्ञ पर्यटकांची त्या भागात वर्दळ वाढली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे महत्त्व व त्यांचे संरक्षण याबाबत केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व मेळघाट व्याघ्र प्रकल्प या तिघांमध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या करारामुळे आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षेत्र संचालनालयावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तर महत्त्वाच्या सुधारणा म्हणून मेळघाट व्याघ्र फाउंडेशनची नोंदवही करण्यात आली आहे.

व्याघ्र संरक्षित क्षेत्र
महाराष्ट्र राज्यातील समृद्ध वनश्रीने नटलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी तालुका अंतर्गत सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीमध्ये मेळघाट व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहे. त्याचा विस्तार १६७६.९३ चौ.कि.मी. एवढ्या विस्तीर्ण पहाडी, घाटी व वन्यजिवाच्या परिसरात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालनालयाच्या अंतर्गत सिपना, गुगामल आणि आकोट वन्यजीव विभाग मिळून सुमारे दोन हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र आहे. दीड हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र (Critical Tiger Habitat) म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात मेळघाट अभयारण्याचे ११.५० चौरस किलोमीटर, नरनाळा अभयारण्याचे १२.३५ चौरस किलोमीटर, अंबाबखा अभयारण्याचे १२७.११ चौरस किलोमीटर व वान अभयारण्याचे २११ चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट आहे.

अमरावती हे जिल्ह्याचे ठिकाण असून व्याघ्र प्रकल्पाचे मुख्यालय आहे. मुख्यालयाच्या परिसरात भव्य निर्वचन केंद्र असून या केंद्रामध्ये मेळघाट क्षेत्रातील जैविक विविधता व त्यांचे निसर्गातील महत्त्व विशद करणारी माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन, निसर्ग पर्यटन, आदिवासी संस्कृती, औषधोपयोगी वनस्पती, नैसर्गिक स्रोतांचा काटकसरीने वापर या बाबींवर विशेष भर देण्यात आलेला आहे. थोडक्यात, संपूर्ण जीवनसृष्टीची कल्पना या केंद्राच्या माध्यमातून आपल्याला सहज येते. त्यामुळे हे केंद्र पर्यटकांच्या दृष्टीने तसेच निसर्ग अभ्यासाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात वनक्षेत्रामधून पायी भ्रमण करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी पाऊलवाटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पायी भ्रमणामुळे विविध पशुपक्ष्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा, पशुपक्ष्यांचे आवाज व त्यांचे निरीक्षण, विविध प्रजातीच्या वृक्षवल्ली व त्यांचे उपयोग यांची बारीकसारीक माहिती संकलित करणे, उत्साहवर्धक ठरते. यासाठी स्थानिक वनकर्मचाऱ्यांशी संपर्क करून पाऊलवाटांनी भ्रमण करण्याचा आनंद लुटता येतो.

नरनाळा अभयारण्य हे अकोट या तालुक्याच्या ठिकाणावरून सुमारे ३० किमी अंतरावर अकोट, हरिसाल महामार्गावरील पोपटखेडा या गावापासून पश्चिमेस आहे. या अभयारण्यामध्ये पाण्याने भरलेले नैसर्गिक तलाव आहेत. या क्षेत्रामध्ये विविध पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्यामुळे व संपन्न जैवविविधतेमुळे या क्षेत्रांस भेट देणे आनंददायी ठरते.
वान अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेसंलग्न असून अकोट या तालुक्याच्या ठिकाणापासून खटकाली मार्गे पश्चिमेस सुमारे २० किमी अंतरापासून सुरू होतो. खळखळून वाहणारी वान नदी आणि लगतचा परिसर हिरव्याकंच झाडांनी व्यापलेला असल्यामुळे या क्षेत्रास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. उंचसखल भूभाग आणि जैविक विविधता हे या क्षेत्रासाठी वरदान असून तिथे भ्रमण करणे आल्हाददायक ठरते. वान अभयारण्याच्या सीमेस सलग्न असलेले निसर्गाचे देखणे रूप म्हणजे, अंबाबरवा अभयारण्य. विविध पशूपक्षी आणि वृक्षवल्ली यांचा संगम हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे.

ranjitrajput5555@gmail.com