आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेड्याचा ऐटदार घोडेबाजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसंस्कृतीत लपलेल्या परंपरांना अनुभवण्यासाठी बोलावं लागत नाही. आपल्या डोळ्याचं पारणं फेडत त्या आपल्याला साद घालत असतात. एरवी, इतिहासातले प्रसंग जिवंत अनुभवायचे असतील, चित्रपटात उत्कंठा वाढविणारे अश्व खरोखरच पाहायचे असतील आणि अलीकडच्या काळात विकाऊ पुढा-यांनी बदनाम केलेल्या ‘घोडेबाजार’ या शब्दाला अहिराणीच्या मुलखाने दिलेली विधायक ओळख करून घ्यायची असेल, तर या दिवसांत सारंगखेड्याला (ता. शहादा, जि. नंदुरबार) यायलाच हवे.
डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत, दैनंदिन ग्रामीण जीवनात लागणा-या वस्तूंपासून तर थेट बैलगाडी आणि शेतीची विविध अवजारे आणि बैल, घोडे यासारखे पशुधन देशभरातून या यात्रेतील प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलेली असतात. सोबतीला अनुभवता येतो सातपुड्यातील आदिवासी महिला बचत गटांची कारागिरी आणि पहाडातील चुलींवर भाजलेल्या ज्वारी, बाजरी, नागली व मक्याच्या भाकरीचा मनाला सुगंधित करणारा दरवळ. बापाच्या खांद्यावर चढून जत्रा लुटणारी मुले, जत्रेत सजलेले तमाशाचे तंबू आणि नमकीन चाटचे ठेले, पेढ्यांची गोडी, चूर्णाची जडी-बुटी या सर्वांना आपल्या उदरात घेतलेल्या सारंगखेडा यात्रेचे पंचप्राण एकवटलेले असतात ते अश्वप्रदर्शनात! हे अश्वप्रदर्शन म्हणजे अहिराणीच्या लोकसंस्कृतीचे हृदय. असं ठिकाण जिथून या बहुसांस्कृतिक संस्कृतीच्या चैतन्याची स्पंदने उगम पावतात आणि या यात्रेच्या आर्थिक उलाढालींना गती देतात. मानव आणि पशू यांचं एक अतूट नातं असतं. पशू असेल तर माणूस टिकेल आणि माणूस टिकला तर पशूच्या जगण्याची निर्मळ उपयुक्तता सिद्ध होईल. आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो, नांदेडच्या माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपुरात हा बाजार येतो. असे देश आणि राज्यात भरणारे घोडेबाजार कमी नाहीत. तरीही सारंगखेड्याच्या बाजाराची एक आगळी ओळख निर्माण झाली आहे. येथील घोडेबाजाराने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील घोड्याच्या व्यापा-यांना आकर्षित केले आहे. याचे कारण या बाजारात पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, गावठी अशा जातींचे घोडे विक्रीसाठी येतात. एकेक अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून ५० हजार रु.पासून ते २१ लाख रु.पर्यंत घोड्यांच्या किमती ठरतात. १५ दिवसांत तब्बल पाच कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते.
या बाजारात प्रामुख्याने घोड्यांच्या तीन जातींची हुकूमत चालते. त्यात पंजाबी, मारवाडी आणि काठेवाडीचा समावेश आहे. तशा स्थानिक जाती ब-याच आहेत; पण अस्सल घोड्यांसाठी दर्दी मंडळीची पसंती या तीन जातींनाच असते. तब्बल १५०० घोडे पंजाबी, मारवाडी आणि काठेवाडी जातींचे येथे विक्रीसाठी येतात. एकेक घोडा एवढा अस्सल, की पाहताक्षणी नजरेत भरतो.
अर्थात सामान्य जनांना पाहताक्षणी या घोड्यांची जात किंवा त्यांचे वैशिट्य लक्षात येत नाही. पण जाणकार मात्र रंग, उंची आणि शरीराच्या ठेवणीवरून पाहताक्षणी त्यांची अचूक पारख करतात. मारवाडी जातीचे घोडे उंच असतात, त्यांची उंची पाच ते साडेपाच फूट उंच असते. ते दिसायलाही आकर्षक असतात. त्यांचे कान उंच असून, त्यांची टोके एकमेकांशी जुळतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. त्यांचे कान कमी असतात, पण चेहरा पसरट असतो. त्यामुळे ते भारदस्त दिसतात. तर पंजाबी अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात. त्यांच्या पांढ-या वर्णावर किंचित डाग आढळतो. ते शुभ्रवर्णी पंजाबी घोडे ‘नुकरा’ नावाने प्रसिद्ध आहेत. अश्वशौकिनांची या घोड्यांना विशेष मागणी असते.
घोडेबाजारात घोड्यांची अचूक पारख करणारे अनेक जण असले तरी प्रत्येकाची निवड सारखी असेल, असेही नाही. कारण घोडे खरेदीसाठी येणा-या प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. गेल्या तीन पिढ्यांपासून या अश्वप्रदर्शनाचे आयोजन करणा-या रावळ कुटुंबाचे वारस जयपालसिंह रावळ यांच्या म्हणण्यानुसार, घोड्यात ७२ खोड्या म्हणजे दोष काढता येतात. अंगावरील खोड्या कुठे आणि कशा आहेत ते महत्त्वाचे असते. या खुणा मुख्यत्वे भोव-याच्या स्वरूपात असतात. गळ्यावर भोवरा असलेला घोडा उत्तम समजला जातो. त्या घोड्यास ‘देवमन’ म्हटले जाते. घोड्याच्या छातीवर दोन्हीकडे आणि डोक्यावर दोन भोवरे असलेला घोडा शुभलक्षणी मानला जातो. पोटावर भोवरा असेल तर तेही शुभ मानून त्यास ‘गंगापाट’ म्हटले जाते. मात्र त्याच वेळी डोक्यावर, गळ्यावर तीन आणि चार भोवरे असतील, तर ते अशुभ मानले जाते.
घोडेबाजार... हा शब्द ‘विकाऊ' पुढा-यांनी अलीकडच्या काळात बदनाम करून टाकला आहे. पण उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याला मात्र घोडेबाजारानेच देशभर ख्याती मिळवून दिली आहे. शहादा तालुक्यात तापी नदीच्या काठी वसलेल्या सारंगखेड्याला दत्तजयंतीनिमित्त जी यात्रा भरते, तिच्यात हा घोडेबाजार लागतो. यंदा हा घोडेबाजार नवा उच्चांक गाठण्याची चिन्हं असून यात्रा सुरू होण्यास काही दिवस उरले असले तरी ऑनलाइन अश्वप्रदर्शनातून एक कोटी रुपयांहून अधिक उलाढाल एव्हाना झाली आहे...
लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांची ही प्रसिद्ध लावणी. ती गाताना अबलख घोडा आणि घोड्यावर बसणा-या सारंगखेड्याचा घोडेबाजार बघताना लावणीसम्राज्ञी यमुनाबाईं वाईकरांच्या ‘पंचकल्याणी घोडा अबलख गं, जिनावरी कलाबूत लखलख गं...’ या लावणीतला माहोल ठासून भरलेला असतो. बाजारात आलेले घोडे अस्सल जातिवंत आहेत. त्यांना पाहणा-या प्रत्येकाच्या मनात येते, की ठोकावी घोड्यावर मांड अन् द्यावा उधळून चौखूर... आणि हीच खासियत आहे या घोडेबाजाराची.
ranjitrajput55555@gmail.com