आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Science Education By Mohan Madwanna, Divya Marathi

विज्ञान शिक्षण: बाटलीमध्ये धुके बनवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरच्या घरी ढग कसे बनतात हे आजच्या प्रयोगातून आपण शिकायचे आहे. आकाशात ढग आपोआप बनतात हे आपण पाहिले आहे, पण ढग बनण्यासाठी तीन बाबी आवश्यक आहेत. उबदार हवा, ढग बनण्यासाठी केंद्र, आणि थंडी. ढग बनण्यासाठी केंद्र काहीही असू शकते. उदा. धुळीचे कण, धूर, हवेतील प्रदूषके वगैरे. सकाळी सकाळी थंडीमध्ये तयार झालेले धुके अशा प्रकारचे असते. काही आठवड्यांपूर्वी दिल्ली विमानतळावर धुक्यामुळे एकही विमान उतरू शकले नाही. तसेच रेल्वे वाहतूक थांबली.


आजच्या प्रयोगासाठी आवश्यक सर्व साहित्य घरीच उपलब्ध आहे. सेंट स्प्रे, हेअर स्प्रे यापैकी कोणताही स्प्रे. तो वापरण्याची आवश्यक परवानगी मोठ्या व्यक्तीकडून घ्या. एक काचेची एक लिटर पाणी मावेल अशी मोठ्या तोंडाची बरणी, लोणच्याची पारदर्शक बरणी उत्तम, फ्रिजमधील बर्फाचे खडे, एका किटलीमध्ये जवळजवळ उकळते पाणी. पाणी उकळण्यासाठी किटलीच पाहिजे असे नव्हे. चहाच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी उकळता येते.


पाणी उकळा. उकळते पाणी बाटलीमध्ये ओता. हे पाणी तळापासून दोन सेमी उंचीपर्यंत आले म्हणजे पुरे. एक लिटर बरणीमध्ये दोन सेमी. उंचीपर्यंत पाणी यायचे म्हणजे ते सुमारे पन्नास-साठ मिलि गरम पाणी पुरेसे आहे. बरणीचे झाकण लावून घ्या. झाकण लावून गरम पाण्यासह बरणी खळबळून घ्या. याचा उद्देश काच सर्व बाजूने तापली पाहिजे. झाकण फिरवून काढा त्यात चार पाच बर्फाचे खडे ठेवा. बरणीमध्ये थोडा स्प्रे फवारा. आता त्वरेने बरणीचे झाकण बर्फासहीत बरणीच्या तोंडावर ठेवा. बर्फ बरणीमध्ये घालायचे नाही. ते झाकणावर तसेच ठेवायचे आहे.
बरणीचे बारकाईने निरीक्षण करा. बरणीमध्ये धुके जमलेले दिसेल. ते हळूहळू बरणीच्या तोंडाकडून तळापर्यंत जमेल. थोड्या वेळाने बरणी भरली म्हणजे बरणीचे झाकण काढा धुके हवेत विरून जाईल. आजच्या प्रयोगात नेमके काय झाले हे पाहूया. बरणीमध्ये गरम पाणी ओतून ते बरणीच्या कडेने फिरवल्याने बरणीतील हवा गरम झाली. गरम पाण्याची वाफ आतच शिल्लक राहिली. बरणीच्या झाकणावरील बर्फामुळे आतील पाण्याची वाफ थंड झाली. स्प्रेमधील एरोसोल (कलिली सूक्ष्म कण) कणानी बाष्प एकत्र येण्यास मदत केली. या कणावर एकत्र आलेले बाष्प आपल्याला धुक्याच्या किंवा ढगासारखे दिसले.


निसर्गात ढग किंवा धुके तयार होताना धूलिकण किंवा धुरासोबत बाष्प जमा होते व एरवी अदृश्य बाष्प दिसायला लागते. थोडे वातावरणाचे तापमान वाढले म्हणजे बाष्प परत हवेत विरून जाते व धुके नाहीसे होते. ढग ठरावीक उंचीवरच का जमा होतात याचे उत्तर तुम्हाला सापडले असेल. या उंचीवर असलेल्या थंडीमुळे बाष्प एकत्र येऊन त्याचे ढग बनतात. याचे वजन वाढले म्हणजे त्यामधील पाणी पावसाच्या स्वरूपात खाली येते.