आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Science Education By Mohan Madwanna,Divya Marathi

विज्ञान शिक्षण: ऋतू कसे होतात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठे होतात व ऋतू बदल होतो. उन्हाळा येतो त्यानंतर पावसाळा व हिवाळा असे चक्र वर्षानुवर्षे चालू आहे, पण नियमित हिवाळा व उन्हाळ्याचे चक्र कसे होते हे नीटसे समजत नाही. आजचा प्रयोग ऋतुचक्र समजण्यासाठी करायचा आहे. त्याआधी थोडी उजळणी. आपण उत्तर गोलार्धात राहतो. मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात. रात्र लहान होत जाते. याचे कारण पृथ्वीच्या अक्षातून तिरपा जाणारा काल्पनिक अक्ष आहे. भोवरा आपल्या आरीवर लंबरूप फिरतो, पण पृथ्वी आपल्या अक्षाभोवती 23 अंश तिरपी फिरते. पृथ्वीचे यासोबत वार्षिक सूर्याभोवती फेरी मारण्याचे चक्र 365 दिवसांत पूर्ण होते. पृथ्वीवर होणारे सर्व ऋतू या तिरक्या अक्षामुळे होतात. या तिरक्या अक्षामुळे सूर्याचा प्रकाश उत्तर गोलार्धावर अधिक सरळ आणि त्याच वेळी दक्षिण गोलार्धावर तिरके पडतात. उत्तर गोलार्धात उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिकेचा उत्तर भाग तर दक्षिण गोलार्धात दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचा विषुववृत्ताच्या दक्षिणेचा भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका येतो. पृथ्वीच्या तिरप्या अक्षामुळे दक्षिण गोलार्धात सूर्यप्रकाश तिरपा पडतो.


आजच्या प्रयोगात हे नेमके कसे होते हे शोधून काढायचे आहे. प्रयोगाचे साहित्य तुमच्या घरीच उपलब्ध आहे. एखादा लाकडाचा चौकोनी ठोकळा, मोठी वीट किंवा बुटाचे आयताकृती खोके यापैकी काहीही एक. चांगला सरळ प्रकाशझोत देणारा टॉर्च, पांढरा चॉपिंग बोर्ड (किचनमधील भाजी चिरण्यासाठी वापरतात तो), स्वच्छ पांढरा कागद, पेन्सिल आणि चिकट पट्टी. कार्डबोर्ड बॉक्सचे झाकण लावा. त्यावर टॉर्च चिकटपट्टीने आडवा, असा चिकटवा की तो त्यावरून घरंगळणार नाही. हा झाला तुमचा सूर्य. चॉपिंग बोर्डवर पांढरा कागद चिकटपट्टीने चिकटवा. पांढरा कागद लावलेला चॉपिंग बोर्ड हा झाला पृथ्वीचा पृष्ठभाग. आता प्रयोग करण्यासाठी टॉर्चचा प्रकाशझोत चॉपिंग बोर्डवर सोडा. बोर्ड टॉर्चच्या सरळ रेषेत जवळ आणला म्हणजे एका अंतरावर प्रकाशाचा गोल कागदावर दिसला पाहिजे. पेन्सिलने गोल प्रकाशझोताच्या कडा आखून घ्या. त्याचा व्यास तुम्हाला सहज मोजता येईल.


या प्रकाशगोलाचे क्षेत्रफळ गणिताने काढून ठेवा. एवढे झाले म्हणजे ज्या अंतरावर प्रकाशाचा गोल दिसत होता त्याच अंतरावर बोर्ड प्रकाशझोताबरोबर 45 अंशाचा कोन करून उभा धरा. या वेळी प्रकाशझोताचा गोल होण्याऐवजी त्याचे लंबवर्तुळ झाल्याचे दिसेल. लंबवर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे शाळेत विचारा. वर्तुळाहून लंबवर्तुळाचे क्षेत्रफळ दुपटीहून अधिक येईल. या प्रयोगाचा अर्थ सोपा आहे. वर्तुळाकृती गोलाच्या पृष्ठभागावर पडलेला प्रकाश अधिक तीव्र तर लंबवर्तुळावर पडलेला प्रकाश विभागला गेल्याने कमी तीव्र झाला. म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा सूर्यकिरण लंब असतील तेव्हा अधिक उष्णता व पृष्ठभागावरील प्रकाशकिरण विभागले गेले म्हणजे कमी उष्णता म्हणजे हिवाळा.


madwanna@hotmail.com