आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्‍ट एका जगण्‍याची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँडिट क्वीन’ चित्रपटासाठी मी अभिनेत्री सीमा विश्वासची निवड केली होती. फुलनदेवीची व्यक्तिरेखा व तिची कथा समजून घेण्यासाठी सीमा खूप मेहनत करत होती. एक दिवस मी तिला फुलनदेवीबद्दल कागदावर लिहायला सांगितले. सीमाने साधारणपणे दीड पान लिहून आणले. त्यानंतर मी सीमाला स्वत:बद्दल लिहायला सांगितले, तेवढ्याच दीड पानामध्ये. सीमाने प्रयत्न केला खरा; पण तिला लिहिता आले नाही. दीड पानाची मर्यादा तर तिला आलीच; शिवाय स्वत:ला नेमके कसे ‘डिफाइन’ करायचे, हा प्रश्न तिला गोंधळात टाकणारा ठरला. स्वत:बद्दल फार न बोलण्याची आपली आतापर्यंतची परंपरा चांगली असली, तरी ती अनेकदा स्वत:ला गोंधळात टाकणारी, गुंतवणारी ठरते. अभिव्यक्तीला जागा देणारी थेट माध्यमे आज कलाक्षेत्राव्यतिरिक्त उपलब्ध आहेत. त्यामुळे आताचा तरुणवर्ग कलेच्या माध्यमातून नाही जमले तर थेट या संवाद माध्यमांमधून स्वत:चे जगणे मांडू बघत असतो.

आपल्या जगण्याची हीच तर गंमत आहे. कळत्या वयापासून पुढे जाताना स्वत:ची मागच्या क्षणांची गोष्ट आठवत आपण सावधपणे, तर कधी बेसावधपणे पुढचे पाऊल टाकत राहतो. पण स्वत:च्या जगण्याबद्दल जर सांगायला लावले तर अगणित शब्द तरी लागतात किंवा शब्दच सापडत नाहीत. तीन तासांच्या चित्रपटामध्ये आपण व्यक्तिरेखा साकारतो, त्यांच्या आयुष्याची कथा मांडतो, त्यांचा कैकदा पूर्ण आयुष्याचा पटच रेखाटतो, पण प्रत्यक्षात आपल्या स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगायला मात्र आपल्याला मर्यादा येतात. सीमाचा त्यामुळे स्वत:ला कागदावर मांडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

पडद्यामागची कथा नि पडद्यावरची कथा यामध्ये सूक्ष्म अंतर असते, ते यामुळेच. सुदैवाने अभिव्यक्त होण्याची आज अनेक माध्यमे आपल्यासमोर उपलब्ध आहेत. एका क्लिकसरशी आपण अनेक माध्यमे आपल्यासाठी खुली करू शकतो. माध्यमजगताशी सतत कनेक्ट राहण्याचा, अपडेट राहण्याचा आता लेखकाने, दिग्दर्शकाने खरे तर फायदा करून घ्यायला हवा. तुमच्या जगण्याची जेव्हा तुम्ही वास्तववादी चित्रपटातून गोष्ट सांगायला जाता, तेव्हा सुरुवातीला तुमच्याकडे फक्त स्वत:चा चष्मा असतो, एखादी व्यक्तिरेखा व तिचे जगणे मांडतानाही तुम्ही तुमच्याच दृष्टिकोनातून त्या व्यक्तिरेखेकडे बघता.
मात्र, तिच्या जगण्यातले एखादे पान, एखादी ओळ तुम्ही माध्यमजगतामार्फत शेअर केली, तर ती अनेकांसाठी विविध दृष्टिकोन मांडण्याचे पर्याय खुले करते. इतकेच नाही, तर त्यातून एखादी नवी कल्पना आकारास येते. मी जेव्हा ट्विटरवर माझा एखादा विचार मांडतो, तेव्हा त्या विचाराला फक्त माझा स्पर्श असतो, नंतर तो विचार समूहाचा होतो. हा समूह सामूहिकतेने व व्यक्तिश: त्या विचाराला कसा सामोरा जातो, याचे निरीक्षण करणे फार मजेशीर असते, शिवाय ते विचाराच्या पुढच्या टप्प्याकडे वळण्यासाठी मला चालना देणारेही ठरते.

लेखक ज्या वेळी सोशल मीडियावर सतत कार्यरत असतो, व्यक्त होत असतो, तेव्हा त्याच्या अंतर्मनात बाह्य जगाचे भान आणि स्वत:चे भान यांचा झगडा सुरू असतो. मला व्यक्तिश: बाह्य जगाशी कनेक्ट राहणे पटते, कारण त्यातून मी चित्रपटाची कथा व्यापक आणि समाजाला जवळ असणारी निर्माण करू शकतो, वा त्या कथेला तसे परिमाण देऊ शकतो. काही लेखक-दिग्दर्शक बाह्य जगाशी अपडेट न राहणे पसंत करतात, हा भाग अलाहिदा. पण मला जर माझी कलाकृती लोकांसाठी निर्माण करायची असेल, तर मी अपडेट राहण्याचा पर्याय अधिक रास्त समजतो.

आज सर्वाधिक तरुण वर्ग सोशल मीडियावर अभिव्यक्त होत असतो. त्यांना त्यांचे जगणे या माध्यमातून मांडायचे असते. त्यांचे विचार, त्यांचे भावनाशील जग, त्यांचे एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देणे, हे मला सोशल मीडियावर वाचता येते, बघता येते. तुकड्या-तुकड्यांमधून का होईना, या माध्यमांमधून प्रत्येक जण स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत असतो. पडद्यावर वास्तव चित्र निर्माण करण्यासाठी यापेक्षा दुसरे सशक्त असे, संचित सध्या कुठे मिळत नाही.
सोशल मीडियाचे व्यासपीठ आपण कसे वापरतो नि त्याकडे कसे बघतो, यावर सगळे अवलंबून आहे. मला जीवन हा सर्वात मोठा व श्रेष्ठ शिक्षक वाटतो. जीवनात काळानुसार होणारे बदल आयुष्य प्रवाही ठेवा, हे सांगत असतात. सोशल मीडिया हा या बदलाचाच एक भाग आहे. ज्यावर आपण आपले आयुष्यच संक्षिप्तपणे मांडू पाहत असतो. जगण्याची गोष्ट सांगता येणे, हे आपल्या सगळ्यांसाठीच एक आव्हान असते. ती तुम्ही कुठल्या माध्यमातून सांगता यापेक्षा कशी सांगता, हे महत्त्वाचे. ट्विटरवर १४० शब्दांमध्ये तुम्ही जगण्याचा सारांश मांडू शकलात तर तिथेच तुम्हाला तीन तासांच्या चित्रपटाच्या कथेचे गमक सापडते. लहान मुलाच्या हाती क्रेयॉन्स दिलेत, तर तो त्यातून चित्र रेखाटतो, पेन्सिल दिली तर अबकडच्या भाषेत लिहू पाहतो, फेसबुकची वॉल दिली तर मोठा झालेला हा मुलगा ‘फिलिंग ब्लेस्ड’, ‘अपसेट’ आदी भाषेत आपले स्टेटस अपडेट करतो. तंत्र बदलत गेले तशी भाषा बदलत गेली; पण जगण्यातल्या भावना, संवेदना बदलल्या नाहीत. कारण, त्याला बाह्य जगात त्याच्याशिवाय भिन्नविभिन्न आयुष्य जगणारी माणसे सापडत असतात. सोशल मीडिया बाह्य जगाशी अ‍ॅटॅच राहण्याचे जसे माध्यम आहे, तसेच डिटॅच राहण्याचेही. ते आपले आपण जमवले, की आपल्याला जी गोष्ट सांगायची आहे, तिचा परीघ वाढत जातो नि त्या परिघात सामावणारे श्रोते-प्रेक्षकही!