आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन म्हणजे अडगळीचा माळा नव्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावरचा पहिला उपाय म्हणजे जिथे गरज नसेल अशा अनावश्यक कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमात स्वत:कडे महत्त्व घेण्याची मानसिकता कमी करायला हवी. कुटुंबात रोजच्या रोज जे घडत असतं, ते आपल्याला सांगून सवरूनच व्हायला हवं हा आग्रह सोडणं शहाणपणाचं आहे. कालपर्यंत घरातला मुलगा-सून किंवा अगदी तुमचा जोडीदारसुद्धा घराबाहेर पडताना कुठे, केव्हा जातोय हे तुम्हाला माहीत असणं हा तुम्ही तुमचा अधिकार समजत होतात, आता तो अधिकार नव्हे तर अनावश्यक माहिती समजायला लागा. एखाद्या विशाल सरोबरात पडणारा पाण्याचा एक थेंबदेखील आवर्तन निर्माण करतो आणि अशा मनात उमटणा-या प्रत्येक आवर्तनाचा प्रभाव बराच वेळ टिकतो. हा आपला स्वानुभव आहे. तेव्हा अशी आवर्तनं निर्माणच होणार नाहीत असा मार्ग स्वीकारावा. कौटुंबिक किंवा व्यवहार म्हणून चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारच्या प्रसंगांना होता होईल तो जाणं टाळा. कारण असं की अशा प्रसंगी एकत्र येणा-यांच्या मनात अंत:स्तरावर कितीतरी हिशोब चाललेले असतात. एकत्र आल्यावर त्यांच्या हिशोबी वागण्या-बोलण्याने तुमच्या मनावर तरंग उमटणारच. ज्या घटनेशी तुमचं काहीही देणंघेणं नाही, किंवा जी घटना तुम्ही कधी ऐकलीसुद्धा नसती ती घटना तुमच्या कानावर पडते. मग तुम्हाला त्यावर स्वत:चं होकारार्थी वा नकारार्थी मत प्रकट करावं लागतं, अकारणच तुम्ही एका अनोळखी प्रवाहात ओढले जाता.
आजवर असं अकारण ओढलं जाणं तुम्हाला आवडलंही असेल. पण आता हे असं अकारण ओढलं जाणं तसंच चालू ठेवलंत तर ज्या शांती आणि प्रसन्नतेची अपेक्षा आहे, त्यापासून दूरच राहाल. या दोन्ही गोष्टी एका वेळी होणार नाहीत. आपल्याला अप्रिय वाटली तरी एक गोष्ट मान्य करायला हवी की सत्तरीनंतर माणसाची
ग्रहणशक्ती कमी होत जाते. बँकेतली बचत कमी झाली की आपण त्या पैशाचा वापर अधिक महत्त्वाच्या गोष्टींसाठीच करतो.
त्याप्रमाणे क्षीण होत चाललेली आंतरशक्ती-मन:शक्ती महत्त्वाच्या गोष्टींसाठी खर्च करायला हवी. मनाची क्षुब्धता कमी करण्याचा हा पहिला उपाय आहे.कित्येक माणसं सामाजिक सेवेच्या नावाने अशी अशांती स्वत:वर ओढवून घेत असतात. सामाजिक संस्थांमधील प्रतिष्ठेसाठीची चढाओढ इतकी घृणास्पद असते. तिचा स्पर्श तुमच्या मनात अशांती निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी अध्यक्षपद मिळाल्याने तुमचा अहंकार सुखावेल, तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढली आहे, असा भ्रमही निर्माण होईल पण हे अळवावरचं पाणी आहे. थोड्याच काळात हे लक्षात येईल पण तोवर मनाच्या सरोवरात अपार प्रकंप निर्माण झालेले असतील.
माणसाने वृद्धत्व आल्यावर स्वत:ला सगळ्यातून वजा करावं असा याचा अर्थ मुळीच नाही. एका नित्य घडणा-या घटनेतून ही गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करूया.समजा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये किंवा अन्य एखाद्या खोलीत आराम करत आहात किंवा वर्तमानपत्र वाचत आहात. दरम्यान ड्रॉइंग रूममधल्या फोनची बेल वाजते. ती तुमच्या कानावर पडते. कोणी तरी बोलतं. एक गोष्ट नक्की, की तो फोन तुमच्यासाठी नव्हता. काही वेळानं ड्रॉइंगरूममध्ये जाऊन तुम्ही जर कुणाला विचारलं की कुणाचा फोन होता, तर ही अकारण पृच्छा आहे. घरातल्या ज्या कुणाला फोन आला होता त्याचं बोलून झालं आहे. त्यात तुमच्यासाठी काही असेल तर तेच कुणी तरी सांगेल. अशा वेळी ही ज्यादा माहिती तुम्हाला शांती आणि प्रसन्नतेच्या विरुद्ध दिशेला नेईल.
ज्यादा माहितीची साठवण करून तुमच्या मनाचा अडगळीचा माळा करू नका. काही मंडळींनी वयाची सत्तरी गाठेपर्यंत आपल्या मनाचा असा माळा करून टाकलेला असतो. इतर कोणत्याही गोष्टीत रस न घेतल्यामुळे या माळ्यावर साठलेली अडगळ हीच त्यांची समृद्धी असते आणि त्यातच त्यांना स्वारस्य असतं. माळ्यावर साठवलेल्या काही वस्तूंचा कधी तरी उपयोग होतो. तरीही दरवर्षी आपण दिवाळीच्या आधी हा माळा न विसरता साफसूफ करत असतो. त्या वेळी अशा कित्येक गोष्टी आढळतात ज्या आपण वर्षानुवर्षं जपून ठेवलेल्या असतात पण वापरण्याची वेळ कधी आलेली नसते. काही वेळा लक्षात येतं की या वस्तू निरुपयोगी झाल्या आहेत. त्यानंतरही तुम्ही त्या गोष्टी फेकून दिल्या नाहीत तर तुमच्या माळ्यावर काही दिवसांनी वाळवी, कोळिष्टकं, आणि झुरळं याशिवाय काहीही दिसणार नाही. विशेषत: साठी ओलांडल्यावर आजवर जे केलं, ज्या मार्गानं चाललो, जे काही घडलं, घडवलं, त्या सर्व बाबतीत परिवर्तन करण्याची वेळ आली आहे आणि असं करण्यात गमावण्यासारखंकाही नाही, असलंच तर मिळवण्यासारखं आहे.
आता चित्ताची प्रसन्नता म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. याबद्दल आपल्या मनात नेमकेपणा, स्पष्टता नसते. टीव्हीवर आपण एखादी क्रिकेट मॅच पाहत असतो, सामना अटीतटीचा असेल, उत्कंठेचं वातावरण असेल, विजय आपल्या आवडत्या टीमच्या आवाक्यात येत असेल, अशा वेळी आपल्याला खूप मजा येते, गंमत वाटते. जिथे अक्कल वापरण्याची मुळीच गरज नसते किंवा जे पाहताना अक्कल खुंटीला टांगूनच ठेवायची असते अशी एखादी मालिका असते. आपण बघत असतो, तेव्हाही आपल्याला मजा वाटते. ही मजा म्हणजे प्रसन्नता नव्हे. कधी तरी आपण चांगलं संगीत ऐकतो किंवा एखादे छानसे पुस्तक वाटतो तेव्हा मनाला आनंद वाटला असे आपण म्हणतो. मजा ही नैसर्गिक स्तरावर असते तर आनंद सांस्कृतिक स्तरावरचा असतो. हा फरक अशासाठी की मॅच किंवा मालिका संपली की मजाही संपते. पण संगीत किंवा साहित्यासारख्या कलेच्या संस्पर्शाने जो आनंद मिळतो त्याची अनेक दिवसानंतर आठवण जागी झाली तरी मन आनंदानं भरून जातं. पण या आनंदाची आठवण झाल्यावरच तो मनाला सुखावतो. त्या मनावर कायमचा परिणाम असत नाही. प्रसन्नता ही मनाची अशी अवस्था आहे जिच्यासाठी मॅच, मालिका, संगीत, साहित्य किंवा इतर कोणत्याही बाह्य उपकरणांची गरज नसते. याचा अर्थ असाही नव्हे की प्रसन्न चित्तामध्ये विषाद प्रवेशच करत नाही. विषाद, दु:ख हाही मनुष्यसहज भाव आहे. त्यामुळे एखादी मोठी घटना किंवा विचार आपल्याला खिन्नतेकडे नेतो. म्हणजेच विषाद वाटतच नाही असं नाही पण विषादातसुद्धा मानसिक संतुलन कायम राहील इतकी स्वस्थता मनाला शिकवता आली तर प्रसन्नता टिकते. ज्येष्ठांनी मनाला या प्रसन्नतेच्या मार्गावर नेण्यासाठी आपापले धोरण आखायला हवे. त्यासाठी एखादं गणिती समीकरण नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीत मजा येते, काही गोष्टींचा आनंद आपण लुटतो, पण प्रसन्नता प्राप्त करावी लागते. मिळवावी लागते.
अनुवाद - प्रतिभा काटीकर, सोलापूर
dinkarmjoshi@rediffmail.com