आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट मिळाला होता, पण...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी सिव्हिल इंजिनिअर, परंतु वडिलांनंतर घरचे दुकानच सांभाळतो. उच्च रक्तदाब सोडता इतर काही आजार नव्हते. परंतु 1 ऑगस्ट 2006 च्या रात्री मला पक्षाघाताचा तीव्र त्रास झाला व डावी बाजू पूर्ण पांगळी झाली. घरच्यांनी त्वरित नाशिक रोडच्या दवाखान्यात नेले. उपचार सुरू झाले. परंतु 10-12 दिवस झाले तरी विशेष फरक पडला नाही. उलट दिवसेंदिवस प्रकृती अतिशय खालावत चालली होती. मरणाशी माझा संघर्ष सुरू होता. व्हेंटिलेटरवर ठेवण्याची तयारी केली होती, परंतु घरच्यांनी विशेषत: माझ्या पत्नीने त्यास पूर्ण विरोध केला. सर्व घाबरले होते, परंतु संबंधित डॉक्टर मला सोडायला तयार नव्हते. घरच्यांना मला पुण्याला रुबी हॉस्पिटलला न्यायाचे होते. माझे मित्र महेंद्र शहा यांनी आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य सागर पाटील यांना आणले. त्यांनी नाडी बघून सांगितले की त्यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे. तुम्ही त्यांना ताबडतोब दुसरीकडे हलवा. त्याप्रमाणे सर्वांनी त्या डॉक्टरांशी अक्षरश: भांडण करून डिस्चार्ज मिळवला. आयसीओ रुग्ण वाहिनीने मला पुणे येथे आणण्यात आले.

मला सुरुवातीला पूर्णपणे निर्जंतुक करून रात्री 2 वाजता न्यूरो ट्रीटमेंट युनिटमध्ये दाखल केले. डॉ. उमेश फाळकेंनी ट्रीटमेंट सुरू केली. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. मध्येच पोटात रक्तस्राव झाला. त्यासाठी तत्काळ छोटेसे ऑपरेशन करूनच मग घरच्यांना त्यांनी कल्पना दिली. दीड महिन्याच्या औषधोपचारानंतर डिस्चार्ज मिळाला. या सर्व 2-3 महिन्यांच्या काळात माझी पत्नी सुनंदा हिची परमेश्वराने कठोर परीक्षाच घेतली. तिनेही सर्व प्रसंगाला धिराने तोंड देऊन मला अक्षरश: मरणाच्या दाढेतून ओढून आणले. इकडे भगूरला माझ्या मुलीची 10 वीची बोर्डाची परीक्षा होती. आई-वडील दोघेही दवाखान्यात, पण मुलीनेच स्वत:कडे लक्ष दिले. त्यानंतर ती नाशिक बोर्डात पहिली आली. तिन्ही मेहुणे, नातेवाईक व मित्रांनी फारच परिश्रम घेतले. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून 75-80 टक्के बरा झाल्यावर मी माझा व्यवसाय सुरू केला व सध्या करीत आहे. त्यामुळे मी नेहमीच गमतीने म्हणतो, पासपोर्ट तयार होता, परंतु देवाच्या कृपेने व्हिसा न मिळाल्यामुळे मुक्काम वाढला.