आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल सेल सेल सेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या महिनाभरात तुम्ही पाहिलं असेल, जिकडेतिकडे सेल, 50 टक्के सूट, मोठे डिस्काउंट वगैरे पाट्या लागलेल्या होत्या. विशेषत: ब्रँडेड कपडे आणि चपलांच्या दुकानांमध्ये. दिवाळीच्या वेळी सेल असला तर आपण समजू शकतो की लोक खरेदी करणारच आहेत म्हणून सेल लागलाय. ‘आत्ता, जानेवारी/फेब्रुवारीत काय सेल लावतात, इकडे इयरएंडमुळे टॅक्स कापताहेत कचकचीत...’ तसे ऑगस्टमध्येही लागतात सेल मॉलमध्ये, काय तर म्हणे ‘एंड ऑफ सीझन.’ म्हणजे नवरात्र/दिवाळीसाठी माल भरण्याआधी जुना माल काढून टाकायची युक्ती. आधीच वाढवून लावलेल्या किमतीवर सूट द्यायचे धंदे हे. आपण आहोतच फसायला या युक्तीला. सेल लागलाय, मग खरेदी केलीच पाहिजे, कपडे काय खराब होत नाहीत कपाटात ठेवून, लागतातच की रोज घालायला, असं आपल्याच मनाला आपण समजावतो आणि दुकानात शिरतो. बाहेर पडताना हजारभर रुपये तरी उडालेलेच असतात खिशातले.
काय आहे हे वेड खरेदीचे? आपण विचार केलाय का कधी याचा? ‘डिस्काउंट,’ ‘एकावर एक मोफत’, ‘सेल’ हे शब्द वाचले, कानावर पडले की अंगात वारं भरल्यासारखं का होतं आपल्याला? फक्त बायकांवरच हा असा परिणाम होतो असं नाही हं. पुरुषही कमी नसतात खरेदी करण्यात, हो ना? की तुमचा अनुभव काही वेगळा आहे?
मानसशास्त्र सांगतं की, नैराश्यावर खरेदी हा एक उपाय आहे. त्याला म्हणतात ‘रिटेल थेरपी.’ नवीन वस्तू घेतली की त्याबद्दल आपण उत्साही असतो, तिच्याबद्दल आणखी कोणाशी बोलतो. ती वापरतानाही आपल्याला छान वाटत असतं. यामुळे कदाचित नैराश्य दूर पळत असेल; पण त्याचा अतिरेकही उपयोगाचा नाही, यावर लक्ष ठेवलं पाहिजे. क्रेडिट कार्ड आहे, होऊ दे खर्च असा विचार करून खरेदी केली तर कार्डचं बिल आल्यावर पुन्हा नैराश्य येण्याची जास्त शक्यता.
अर्थात कधी कधी सेलमध्ये एखादी छानशी वस्तू खूप कमी किमतीत मिळून जाते, हेही खरं. पण त्यासाठी फार म्हणजे फार चांगलं नशीब लागतं. आहे का तुमचं एवढं चांगलं नशीब? सांगणार आम्हाला?
mrinmayee.r@dainikbhaskargroup.com