आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑपरेशन थिएटरबाहेर सोनू माझी वाट बघत बसला होता. ‘काय झालं?’ मी विचारलं. उत्तरादाखल तो हमसाहमशी रडू लागला. ‘मॅडम, माझ्या हातून फार मोठी चूक झालीय.’ मला काहीच कळेना. विचारल्यावर त्याने हलकेच एक कागद काढून माझ्या हातात दिला. त्यावरचे एचआयव्हीचे चिन्ह नजरेस पडताच मी दचकले. रिपोर्ट उघडला, तो पॉझिटिव्ह होता. ‘हा तुझा रिपोर्ट आहे?’ अंदाज आला असूनही मी विचारलं! उत्तरादाखल मान हलवत तो नुसता रडत राहिला. अवघा 20 वर्षांचा मुलगा! मन कळवळलं! त्याचा रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला बोलत केलं. त्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या मी जाणते ह्या भ्रमात असलेल्या मला सोनूच्या समस्येचा एक सर्वस्वी अनोळखी पैलू जाणवला!

झोपडपट्टीतील लहानसं घर, वडील नाहीत, आई सदैव तीन मुलांच्या पोटाच्या विवंचनेत कामं करत राहिलेली, तिचं उरलेलं लक्ष मुलींवर! त्यामुळे शेंडेफळ आणि त्यातूनही मुलगा असल्यामुळे ह्याला बरीच मोकळीक मिळालेली! या दरम्यान 8-9 वर्षांचा असताना तो त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांच्या संपर्कात आला आणि त्यांच्याकडून पहिल्यांदाच त्याला लैंगिक संबंधांचा अनुभव मिळाला. एक प्रकारचे लैंगिक शोषणच ते! त्याने कुणाला काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. कारण एक तर त्याच्याबरोबर नक्की काय होतंय हे त्याला नीटसं उमगत नव्हतं आणि त्यातच त्या मुलांनी ह्याला चांगलंच धमकावलं होतं! त्यामुळे हा प्रकार चालूच राहिला. ह्या मुलांशी गोडीगुलाबीने राहिल्याचे फायदेही त्याला अर्थातच मिळतच होते. त्याची छोटीमोठी हौसमौज पूर्ण होत होती, वस्तीतील इतरांपासून संरक्षण मिळत होते. सोनू नकळतच स्वत:ला त्या मुलांबरोबर आयडेंटिफाय करू लागला. नाहीतरी त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तो वेगळा आहे असे त्याला नेहमीच वाटायचे! सुरुवातीला जबरदस्तीने सुरू झालेल्या संबंधांची नंतर त्याला सवयच झाली. तो समलिंगी गटाचा एक हिस्सा कधी बनला त्याला कळलेसुद्धा नाही!

गेल्या 2-4 वर्षांपासून मात्र तो एका सामाजिक संस्थेच्या संपर्कात आला होता. त्या संस्थेद्वारे युवा वर्ग घेण्यात येत असत. ह्याच ठिकाणी त्याला पहिल्यांदा शरीररचना, लैंगिक आरोग्य आदींची माहिती मिळाली. तेव्हापासूनच त्याच्या मनात पाल चुकचुकत होती. मात्र ही बेचैनी त्याने मनातच दडपून ठेवली. त्या संस्थेच्या पाठिंब्यामुळे त्याने बारावीनंतर एका चांगल्या कोर्सला प्रवेश घेतला. सामाजिक कार्यातही तो उत्तम सहभाग घेत असे. काही न काही कारणामुळे तो जेव्हा माझ्याकडे येत असे तेव्हा त्याच्यात जाणवणारा हा बदल मला नेहमी सुखावून जात असे. आता कोणत्याही कारणासाठी का होईना त्याने ही चाचणी करून घेतली हेच फार महत्त्वाचे होते. त्याला धीर देऊन मी एआरटी केंद्रात घेऊन गेले.

या माहितीमुळे त्याच्या लहानपणापासूनच्या काही समस्यांचा मला आत्ता उलगडत होता! 8-9 वर्षांचा असताना सोनू अचानक बिछान्यात लघवी करण्याची तक्रार घेऊन आला होता. नंतर एकदा शाळेतून पळून येतो या कारणासाठी आई त्याला घेऊन आली होती. काही दिवस नैराश्यासाठी त्याला औषध चालू होते. एकदा तर त्याने चक्क या औषधांचा ओव्हरडोस घेतला होता! प्रत्येक वेळी त्याच्या त्या वेळच्या लक्षणानुसार त्याच्यावर उपचार झाले होते. घरची परिस्थिती मुळातच इतकी वाईट होती की असुरक्षितता, प्रेमाचा अभाव, दारिद्र्य या गोष्टी सततच सोबतीला होत्या. त्यामुळे त्याच्या वागण्याची कारणं या परिस्थितीतच शोधली गेली. त्यामुळे लहानपणापासून चालत आलेल्या लैंगिक शोषणाचा हा पैलू अंधारातच राहिला. आज मला स्वत:ला या गोष्टीचं विलक्षण वाईट वाटत होतं.

जी मुले लैंगिक शोषणाला बळी पडतात त्यांच्या वागण्यात नेहमीच बदल घडून येतो. अभ्यासातील लक्ष कमी होणे, अचानक बिछान्यात लघवी करायला लागणे, गप्प राहणे अशी अनेक लक्षणे दिसून येतात. मात्र ब-याचदा पालकांकडून या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. दुर्दैवाने सरकारी रुग्णालयातील गर्दी आणि एकांताचा अभाव यामुळे या ठिकाणी ब-याचदा डॉक्टरांकडून खूप खोलात जाऊन याविषयी माहिती घेतली जात नाही आणि एक अत्यंत गंभीर समस्या अस्पर्शितच राहते. आज लहान मुलांमधील लैंगिक शोषणाचं प्रमाण बरंच जास्त आहे. परंतु फार कमी वेळा या समस्येला हात घातला जातो. याविषयी मुलींच्या बाबतीत थोडीफार जागरुकता आढळते, पण मुलेही अशा शोषणाला बळी पडतात व त्यांच्या पुढील आयुष्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात या वास्तवाकडे अजूनही आपण फारसे लक्ष दिलेले नाही. विशेषत: पौगंडावस्थेत जेव्हा मुलांच्या लैंगिक जाणिवा विकसित होत असतात, शारीरिक बदल होत असतात व ती स्वत:ची ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत असतात, अशा संवेदनशील वयात जर असे शोषणाचे अनुभव आले तर काही वेळा एक प्रकारचा identity crisis त्यांच्या मनात उभा राहू शकतो. त्यामुळे क्षमता असूनही असा मुलगा पुढील आयुष्यात गोंधळलेला, न्यूनगंडाने पीडित किंवा लैंगिक गुन्हे करणार होऊ शकतो.

सोनूच्या सुदैवाने त्याचा एका चांगल्या संस्थेशी संबंध आल्यामुळे त्याला सूर सापडला. पण लहानपणापासून प्रत्येक पायरीवर त्याला भावनिक संघर्षाचा सामना करावाच लागला. सगळ्यात भयंकर म्हणजे यातून त्याच्या वाट्याला असा आजार आला होता ज्याचं सावट त्याच्या वर्तमान व भविष्यावर राहणारच होतं! रिपोर्ट हातात पडल्यापासून पुढची प्रोसिजर होईपर्यंत 2-3 दिवस तो माझ्या संपर्कात सतत होता. त्याला बसलेल्या पहिल्या धक्क्यातून सावरायला मदत करण्यासाठी हा काळ फार महत्त्वाचा होता. या संपूर्ण काळात मी जर काय केलं असेल तर त्याची एक मैत्रीण बनून त्याच्या वागण्याची कोणतीही चिकित्सा न करता त्याच्याबरोबर राहिले. त्याच्या मनात येणा-या सगळ्या भावनांचा निचरा होऊ दिला.

आता गरज आहे ती त्याला या वास्तवाचा स्वीकार करायला वेळ देणं आणि एक योग्य उद्दिष्ट त्याच्यापुढे ठेवणं! सोनूबरोबर अजून सतत काम करावं लागणार आहे. जीवनातील प्रत्यक टप्प्यावर त्याला समुपदेशनाची गरज लागेल. पण आयुष्याला एकदा सकारात्मक वळण लागलं की हे कठीण नाही. त्याच्या वयातील इतर मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी सोनू एक महत्त्वाचा दुवा होणार होता आणि हे काम म्हणजे त्याच्या आणि त्याच्या उत्तम आरोग्यामधील एक दुवा ठरू शकत होता!