आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Shantanoo Moitra By Priyanka Dahale, Divya Marathi

बॉलीवूड एक बहुरूपिया की तरह है...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. त्यात ‘ना बंगेरु तल्ली’ या तेलुगू चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध संगीतकार शंतनु मोइत्रा यांना सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा राष्‍ट्रीय पुरस्कार घोषित झाला.परिणीता, थ्री इडियट्स, मद्रास कॅफे आदी चित्रपटांस भावस्पर्शी संगीत देणा-या मोइत्रा यांनी पुरस्कारानिमित्त उलगडलेला हा संगीतप्रवास... त्यांच्याच शब्दांत!
‘ना। बंगेरु तल्ली या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करशील का?’ असं चित्रपटाच्या दिग्दर्शक सुनीता कृष्णन यांनी विचारलं, त्या वेळी मी खरं तर दुस-या चित्रपटाच्या कामात व्यग्र होतो. पण कृष्णन यांच्या चित्रपटाचा विषय संवेदनशील होता. सामाजिक आशयावर आधारित चित्रपटासाठी संगीत करणं खरं तर एक प्रकारे आव्हान असतं. मेन स्ट्रीमच्या ‘हीट म्युझिक’चा फॉर्म्युला अशा चित्रपटांना लावता येत नाही. संगीत हा आशय-विषयाचा आत्मा असतो. आशय-विषय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात संगीताचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे या चित्रपटासाठी संगीत करताना मी माझ्या इतर काही चित्रपटांप्रमाणे माझा आतला आवाज ऐकत गेलो. सरधोपट, रुळलेलं व त्याहीपेक्षा चव घालवणारं संगीत मला आजवर कधीच रुचलं नाही. त्यामुळे ‘ना
बंगेरु...’चा विषय शरीरविक्रयासाठी महिलांच्या होणा-या तस्करीशी संबंधित होता. त्या विषयाची गहिरी, काळी बाजू अधिक गडद करणारं, वास्तवाला स्पर्श करणारं संगीत देण्याचा प्रयत्न केला, आणि त्यास राष्‍ट्रीय पुरस्काराने पसंतीची पावती दिली. माझ्या आजवरच्या संगीतप्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा असा क्षण आहे. संगीतातला आत्मा जपण्याचे फळ मला या क्षणाने दिले आहे.
गोडवा, हृद्यता आणि मूळ जपणा-या संगीताला एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग असतो, तसाच तो प्रवाहाबाहेरच्या चित्रपटांनाही असतो. ‘ना
बंगेरु..’आधी मी सुजित सरकार यांच्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करीत होतो. चित्रपटाचा विषय राजकीय असला तरी त्यास हतबलतेच्या स्पर्शाबरोबरच काही अपरिहार्य अगतिकतेचेही संदर्भ होते. ते हेरून प्रसंगानुसार संगीताची व्याप्ती व त्याची पातळी बदलण्याचा मी प्रयत्न केला. ‘मद्रास कॅफे’चे संगीत करणे म्हणजे, डिस्कोथेकची गाणी तयार करणे नक्कीच नव्हते. चित्रपटातला अत्यंत महत्त्वाचा राजकीय संदर्भ दुर्लक्षित होणार नाही, चित्रपटातल्या घटनांशी एकरूप होऊन जाईल असे संगीत निर्माण करणे, हा माझ्यासाठी नवा प्रयोगच होता. हा प्रयोगदेखील कौतुकास पात्र ठरला, याचे मला समाधान आहे.
पण असे प्रयोग सहसा सातत्याने होत नाहीत आणि त्यांना सातत्याने यश मिळत नाही, याची मला कधीकधी खंत वाटते. आजपर्यंत बॉलीवूडने संगीतातले विविध चढउतार पाहिले आहेत. बॉलीवूड एक बहुरुपिया की तरह हैं... त्याला जे चांगलं दिसतंं, ते ते तो उचलत आला आहे. संगीतात एकेकाळी गझलचा जमाना होता, आता रॅप संगीताचा आहे. पण या सगळ्या संक्रमणावस्था आहेत. अशा वेळीच प्रयोगशीलतेचा कस लागतो. ‘परिणीता’ चित्रपटाच्या वेळी नेमके असेच झाले. ‘परिणीता’ची गाणी मी जेव्हा संगीतबद्ध करत होतो, तेव्हा ‘कजरा रे कजरा रे’सारख्या गतिमान संगीत असलेल्या गाण्यांचा प्रभाव होता. अशा वेळी ‘पीहू बोले पिया बोले, क्या ये बोले जानू ना’सारख्या संथ संगीत असलेल्या, विलक्षण गोडवा असलेल्या गाण्यांना लोकप्रियता मिळेल का, अशी शंका होती. पण अशाच वेळी ‘चलन और चाल’ याहीपलीकडे संगीतात काहीतरी जादू असते, यावरचा विश्वास कामी येतो. त्यामुळे सगळ्या शंका बाजूला सारत आम्ही ‘परिणीता’चं संगीत केलं.
‘परिणीता’चं ‘रात हमारी तो चांद की सहेली हैं’ हे गाणं मी आधीच संगीतबद्ध केलं होतं. मी सलील चौधरी यांचा निस्सीम भक्त होतो. ते जशी संगीतरचना लिहायचे तसं मला लिहिता येईल का किंवा संगीतात तशी धून निर्माण करता येईल का, या प्रयत्नात मी होतो. आणि त्यातून रात हमारी... गाण्याचं संगीत मी तयार केलं. प्रदीप सरकारना ते भावलं, आणि ‘परिणीता’मधील ‘मी व माझ्या एकटेपणाशी असलेली माझी मैत्री म्हणजे, मी आणि माझी रात्र’ अशी ‘जक्स्टा पोझिशन’ (विरोधाभासी मेळ) असलेली भावनिक उत्कटतेची परिस्थिती या गाण्याशी तंतोतंत जुळतही होती. त्या गाण्याने चित्रपटातलं एक विशिष्ट वळण अत्यंत नेमकेपणाने अधोरेखित केलं. ‘अंधेरा रुठा हैं...गुमसुमसा कोने में बैठा हैं’ यासारख्या ओळींमधली अर्थवाही जागा संगीताने भरून काढणे माझ्यासाठी एक निखळ आनंद देणारा अनुभव होता...
याच प्रदीप सरकार यांच्याबरोबर मी ‘बोले मेरे लिप्स, अंकल चिप्स’ ही जाहिरातीसाठीची जिंगल संगीतबद्ध केली होती. तिथून मी आजवर जो काही संगीत प्रवास केला आहे, त्या प्रवासात अनेक बदल वेगाने झालेले मी पाहिले आहेत. या वेगवान बदलांना मी परिवर्तन म्हणू शकत नाही. कारण या बदलांना काही क्षणांचंदेखील स्थिरत्व नाही. स्थिरत्वातून काही कलाटणी देणारे घडवणे; नवा सिद्धांत, नवा विचार रुजवणे, याला मी परिवर्तन म्हणतो. शिवाय हे बदल वरपांगी आहेत, आतून ते आपला पाया हरवून बसताहेत, याची जाणीव त्यांना आहे; पण हिट फॉर्म्युल्याच्या नादात या जाणिवेकडे दुर्लक्ष होत आहे.
‘हजारो ख्वाइशे ऐसीं’मधील ‘बावरा मन’ वा अगदी ‘थ्री इडियट्स’मधील ‘गिव्ह मी सनशाइन’, वा ‘बंदेमें था दम’, ‘वंदे मातरम्’ ही गाणी चित्रपटाव्यतिरिक्त कुणीही ऐकतं, तेव्हा ते त्यांचं जगणं त्या गाण्यांशी रिलेट करू शकतात. पण अशी फार कमी गाणी आज बॉलीवूडमध्ये आहेत. ज्या गाण्यांचा गोडवा हृदयाला स्पर्श करून जातो, त्यातली गतिमानताही मग लोकप्रिय ठरते, व ती दीर्घकाळ टिकतेही. ही समज असणारे माझ्यासारखे अनेक संगीतकार या क्षेत्रात आहेत; पण सगळ्यांनाच चित्रपटात अशा संगीताचा कलात्मक रित्या वापर करणे जमत नाही, हे खरे दुखणे आहे. गाण्याला चित्रपटामध्ये डोळसपणे स्थान देता येते, ते चित्रपटाचा भाग असण्याबरोबरच केवळ अमुक एका प्रसंगापुरते अडकून न राहता स्वतंत्र कलाकृतीही ठरू शकते, ही बाबच हल्लीच्या चित्रपटांमधून हरवू लागली आहे.
मला हे ‘हरवलेपण’ नेहमीच अस्वस्थ करत आले आहे. तरीदेखील मी माझा संगीतविषयक दृष्टिकोन बॉलीवूडच्या नव्हे तर माझ्या विचारांनुरुप बदलत आलो आहे. आगामी ‘बॉबी जासूस’ या विद्या बालन अभिनित चित्रपटातील एका गाण्यात मी इतर वाद्यांच्या सोबतीने केवळ एक मृदुंग वापरला आहे. अशा प्रयोगांतूनच मी माझ्यातलं संगीत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मी लखनौ व दिल्लीत वाढलेलो असलो, तरी माझ्या वडलांपासून माझ्यात उतरलेला बंगाली गोडवा नकळत त्यात येतो, हे तर खरेच आहे; पण कर्कश्श संगीताचा जमाना असतानाही, स्वत:ला भावणारं संगीत निर्माण करणं आणि ते रुजवणं, लोकप्रिय करणं हे माझ्यासाठी खरं कलात्मक आव्हान आहे...
- शब्दांकन - प्रियांका डहाळे