आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sharad Patil By Dinesh Patil, W.C.Bendre Award, Marxism

'योध्‍दा' संशोधक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहास मरत नसतो; चुकीच्या आकलनातून तो प्रेरक न बनता बाधक बनतो, ही भूमिका घेऊन भारताच्या इतिहासाची युगप्रवर्तक पुनर्मांडणी करणा-या कॉम्रेड शरद पाटील यांना अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदेचा पहिला वा. सी. बेंद्रे (बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखनाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखनात विकसित केला.) पुरस्कार जाहीर झाला. ही महत्त्वाची घटना आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला अ‍ॅकॅडेमिक मान्यता मिळत आहे. गेली 40 वर्षे एक ‘जीवनदायी कार्यकर्ता’ म्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रांत अखंडपणे कार्यरत असणा-या शरद पाटलांना अवहेलना, द्वेष आणि मानहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक ‘जैविक विचारवंत’ ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.


बडोद्याचे ‘जागृति’कार भगवंतराव पाळेकर नात्याने आजोबा, तर वडील धुळे जिल्ह्यातील पहिल्या पिढीतील सत्यशोधक होते. यामुळे घरातच सत्यशोधकी विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. 1964-65च्या चीन युद्धादरम्यान तीन वर्षे स्थानबद्धतेत तुरुंगात असताना त्यांनी मार्क्सचा ‘कॅपिटल’ हा महाग्रंथ समजून घेतला. या ग्रंथाच्या दुस-या खंडातील मार्क्सने सोडविलेले एक गणित चुकीचे असल्याचे त्यांनी कॉ. बी. टी. रणदिवेंना पत्राने कळवले. ‘मार्क्स चुकला आहे, इतक्या खोलवर विचार कुणी केला नाही’, असे उत्तर आले. मार्क्सही चुकू शकतो, हे सांगत त्यांनी मार्क्सभक्तीचे झापड बाजूला सारले. भारतीय समाज आणि इतिहास हा फक्त मार्क्सच्या मदतीने समजून घेता येणार नाही, याची खात्री पटल्याने त्यांनी स्वतंत्र लेखन करण्याचे ठरवले. यासाठी वैदिक वाङ्मय मुळातून वाचायचे आणि त्यासाठी वैदिक संस्कृत शिकायचे, या हेतूने 1966मध्ये ते बडोद्याला गेले. इतिहास हा नेहमीच सांस्कृतिक राजकारणातील महत्त्वाचे शस्त्र म्हणून पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन्ही गटांकडून वापरला जाणार; परंतु अँतोनिओ ग्रामसी ज्यांना ‘वंचित’ म्हणतो, त्या सर्वहारांचा सशक्त इतिहास भक्कम पुराव्यांच्या आधारे पुढे आणून सांस्कृतिक राजकारणाची लढाई लढण्यासाठी आवश्यक ‘सांस्कृतिक भांडवल’ शरद पाटलांच्या इतिहास संशोधनातून सर्वहारांकडे उपलब्ध आहे. म्हणून शरद पाटील नेहमी म्हणतात, ‘मी समतावादी समाजाच्या उभारणीचे शस्त्रागार तयार केले आहे, त्याचा वापर नव्या पिढीने करावा.’ शरद पाटलांनी इतिहासाला काय योगदान दिले, याचे उत्तर असे की, त्यांनी इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी आवश्यक नव्या संकल्पना, अन्वेषणशास्त्र आणि माफुआ ते सौतांत्रिक भौतिकवाद असे सैद्धांतिक योगदान दिले. राम आणि कृष्ण यांची भारताच्या इतिहासातील भूमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्यांचे ऐतिहासिक महत्त्व, असे अनेक मूलभूत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फुले-आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुधा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षांचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. 1957 ते 1971 अशी 14 वर्षे संशोधन करून ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ हा बुद्धकाळापर्यंतचा इतिहास ग्रंथ त्यांनी लिहिला. ‘जातिव्यवस्था व सामंती सेवकत्व’ हा तुर्काच्या काळापर्यंतचा इतिहास लिहिला. दिग्नाग स्कूलचे सौतांत्रिक विज्ञानवाद व अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र ही जाती व्यवस्थान्तक संघर्षाची अन्वेषण पद्धती वापरून ‘जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती’ हा ग्रंथ प्रकाशित केला. तर, या महाप्रकल्पातील शेवटचा खंड ‘निऋती व हरिती यांची स्त्री राज्य ते भारताचा समाजवाद’ प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. शिवाजी-संभाजीची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु, या चिकित्सेतून शिवाजी-संभाजीच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. पाटलांनी त्यांच्या ‘शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण-महंमदी की ब्राह्मणी?’ या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषण पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले.


या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्‍ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर कडवे आव्हान उभे केले. महाराष्‍ट्राची अस्मिता असणा-या शिवाजीच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. त्याचप्रमाणे महाराष्‍ट्राच्या परिवर्तनवादी चळवळींची चिकित्सा करताना ते म्हणतात, ‘महाराष्‍ट्रात ब्राह्मणेत्तर चळवळीत पुढाकार घेणा-या कुणबी जातींनी, जातिव्यवस्था विरोधाला तिलांजली देऊन राष्‍ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आणि प्रमुख अस्पृश्य जात, आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जातिव्यवस्था विरोधार्थ स्वतंत्रपणे संघटित झाल्यामुळे कुणबी जात व ही अस्पृश्य जात यांची विरोधी एकजूट पुन्हा वैमन्यसभावी बनली.’ त्यांचा हा निष्कर्ष आज परिवर्तनवादी चळवळी क्षीण का होत आहेत, याचे उत्तर देतो. याबरोबरच ‘अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथाने संस्कृतीतील सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संदर्भांत अधोरेखित केले. मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत ग्रामीण दलित आदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यांनी वर्गजातिस्त्रीदास्यांताच्या लढ्यांना अग्रक्रमाने समजावून घेत माफुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकूणच भारतीय इतिहास याकडे पारंपरिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी दृष्टीने पाहिले. याचे कारण असे, की फक्त मार्क्सवाद, फुलेवाद किंवा आंबेडकरवाद हे दृष्टिकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही ‘मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद’ ही अन्वेषण पद्धती अधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषण पद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात. संस्कृत, प्राच्यविद्या आणि तत्त्वज्ञान या तिन्ही शाखांचा व्यासंग आणि सर्वहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशोधकाची दृष्टी अधिक व्यापक, मूलगामी झाली आहे. त्यांच्या मते, ‘बुद्धाचा धम्म वर्ण व्यवस्था अंताच्या संदर्भांत क्रांतिकारक होता. पण आंबेडकरांनी त्याला सर्व विषमता अंताच्या संदर्भांत क्रांतिकारक मानला.’ शरद पाटलांचा हा सिद्धांत समकालीन दलित चळवळींच्या संदर्भांत तपासला असता, दलित चळवळ जातीअंताचा प्रश्न आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे हाताळण्यामध्ये का अपयशी ठरत आहे, याचे उत्तर मिळते. त्याचप्रमाणे धर्मांतराने जातीअंताचा प्रश्न सोडवण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न अपुरा का ठरला, या प्रश्नाचे आकलन होते. ‘जात’ हा घटक केंद्रस्थानी ठेवून आधुनिक भारताचे जे इतिहासलेखन शरद पाटील यांनी केले आहे, त्यातून अनेक नवीन तपशील व अन्वयार्थ पुढे येतात. शरद पाटील लिहितात की, ‘फुले या शूद्राने व आंबेडकर या अतिशूद्राने व्यक्तिस्वातंत्र्याचा निकराने पाठपुरावा केला, याचे कारण जात्यन्ताची चळवळ व्यक्तिस्वातंत्र्याशिवाय प्राप्त होऊ शकत नव्हती. फुले-आंबेडकरांनी म्हणून जात्यन्तानंतरच्या स्वातंत्र्याला राष्‍ट्रीय स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ मानले.’ अशा प्रकारे फुले आणि आंबेडकरांचा अग्रक्रम हा जात्यन्तक स्वातंत्र्याला होता, हे पाटील स्पष्टपणे नोंदवतात. आपण ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथाचे लेखन विधायक अब्राह्मणी अन्वेषण पद्धतीने केले आहे, असे सांगून पाटील म्हणतात की, अब्राह्मणी अन्वेषण पद्धतीचे जनक फुले असून तिचा विकास आंबेडकरांनी केला. माफुआ ही अन्वेषणपद्धती घेऊन शरद पाटील यांनी आधुनिक भारतातील इतिहासाच्या आकलनात महत्त्वाची भर घातली आहे. जात हा ‘स्वातंत्र्यलढा’ समजावून घेण्याचा महत्त्वाचा निकष आहे, असे मानून त्यांनी वासाहतिक काळाचे विश्लेषण केले आहे. शरद पाटील म्हणतात, ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा बाह्यसंघर्ष ब्रिटिश साम्राज्यशाही व हिंदी उच्चजातीय-वर्गीय राष्‍ट्रवादी, यांच्या नेतृत्वाखालील हिंदी जनता यांच्यातला असला, तरी आंतरिक संघर्ष उच्चजातीय, वर्गीय, राष्‍ट्रवादी व शुद्रातिशूद्र जातीय-वर्गीय, जात्यन्तवादी यांच्यातला होता.’ आज महाराष्‍ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीत विविध ठिकाणी कार्यरत असणारे असंख्य कार्यकर्ते तसेच लेखक-विचारवंतांचा फार मोठा समूह असा आहे, जो त्यांचे लेखन वाचून, त्यांच्या अभ्यासवर्गातून, त्यांच्या चळवळीतून किंवा त्यांची व्याख्याने ऐकून घडला आहे. त्यांच्यामध्ये भारतीय लोकशाही क्रांतीचे स्वप्न रुजविण्याचे श्रेय कॉम्रेड शरद पाटील यांचे आहे.


patildinesh04@yahoo.com