आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sharukh Khan By Dharmendrapratap Singh, Divya Marathi

शाहरुखचा दिवाना क्रिश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1992 नंतर भारताची भाग्यरेषा बदलल्याचं मानलं जातं. 1992 हे वर्ष जसं उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं होतं, तसंच ते शाहरुख खानच्या बॉलीवूडमधल्या आगमनाचंही होतं. तेव्हापासून भारताची आणि शाहरुखची अशी यशोगाथा समांतरपणे फुलत गेल्याचंही निरीक्षण अनेक जण नोंदवतात. उदारीकरण पर्वाचं बोट धरून आलेला शाहरुख खान आज बॉलीवूडचा सुपरस्टार बनलाय. त्याच्या केवळ अस्तित्वाने मनोरंजनापासून क्रिकेटपर्यंतची क्षेत्रं उजळून निघताहेत. पण शाहरुख सुपरस्टार असेल तर हृतिक रोशन हा इंडस्ट्रीचा सुपरहिरो म्हणून उदयास आलेला आहे. ‘क्रिश’ ही त्याची ओळख बनली आहे. त्याच्या ‘क्रिश-3’ने शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला कमाईच्या बाबतीत बरेच मागे टाकले आहे. पण हृतिकने शाहरुखची शान बिघडवण्याची ही काही पहिली खेप नव्हती.


या आधी ‘कोई मिल गया’ या सिनेमाद्वारे त्याने आपल्या आगमनाचं सुतोवाच केलं होतं, तेव्हा अतिउत्साही मंडळींनी शाहरुखच्या तुलनेत त्याला ‘हिंदू हिरो’ (अगदी बाळासाहेब ठाकरेंनी एकेकाळी ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ अशी घोषणा केली होती, तश्शी) म्हणून घोषित केलं होतं. त्याला कारण हृतिकच्या पदार्पणाच्या सिनेमाने प्रस्थापित शाहरुखच्या ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ला बॉक्स ऑफीसवर पार झोपवलं होतं. योगायोग म्हणा वा अँटी क्लायमॅक्स; पुढे हृतिकने संजय खानच्या मुलीशी म्हणजेच, धर्माने मुस्लिम असलेल्या सुझानशी लग्न केलं होत. तेव्हासुद्धा धर्माच्या नावाने आग ओकायला सदा आसुसलेल्यांनी हृतिकने आमचं नाक कापलं म्हणून आकांडतांडव केलं होतं. अर्थात, कभी खुशी कभी गम या करन जोहरनिर्मित सिनेमात दोघे एकत्र दिसले होते. पण, दोघांतला तणाव मात्र निवळला नव्हता. उलट शाहरुखने त्यापूर्वी वश केलेल्या सुभाष घई, यश चोप्रा, संजय लीला भन्साली, आशुतोष गोवारीकर यांसारख्या सर्वच निर्माता-दिग्दर्शकांसोबत काम केल्याने हृतिकने त्याच्या पुढ्यात एकप्रकारे आव्हानच उभं केलं होतं.


आज दोघेही आपापल्या परीने संघर्ष करताहेत. शाहरुखने आपलं कार्यक्षेत्र विस्तारलंय. हृतिक खासगी आयुष्यात आलेली वादळं झेलून स्वत:ला पुन्हा सिद्ध करू पाहतोय. पण एक वेळ अशी होती, की शाहरुख आणि हृतिकमध्ये देव अणि भक्त असं अनोखं नातं होतं. तेव्हा शाहरुख हा वडलांच्या म्हणजे, राकेश रोशनच्या सिनेमांचा अविभाज्य घटक होता. किंग अंकल, करण-अर्जुन, कोयला या सिनेमांच्या सेटवर असिस्टंट डायरेक्टर म्हणून हृतिक रोशन चहा देण्यापासून खुर्ची पुढे सरकवण्यापर्यंत शाहरुखची खातरदारी करत होता. असंही म्हणतात, की करण-अर्जुनच्या सेटवर हृतिकने पहिल्यांदा सलमानला बघितलं आणि त्याचं फिजिक बघून इम्प्रेस झाला. पण अ‍ॅक्टिंगचं म्हणाल, तर नि:संशय त्याच्यावर शाहरुखचाच प्रारंभापासून प्रभाव राहिला. ‘कोयला’च्या दरम्यान तर दोघांत देव आणि भक्त हे नातं अधिक घट्ट झालं. त्यानंतर हा भक्त जमेल तिथे आपल्या देवाच्या दर्शनासाठी धाव घेऊ लागला.
त्या दरम्यान अशीच एक घटना घडली. जिथे, आपल्या देवाचं दर्शन घेण्याआधीच हृतिकला पळ काढावा लागला. त्याला अर्थातच हृतिकचा फ्रेन्झीनेस जबाबदार ठरला. झालं असं की, साधारण 15 वर्षांपूर्वी जुहूस्थित सेंटॉर हॉटेलमध्ये झी-सिने अवॉर्डचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘दिल तो पागल है’साठी शाहरुखला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार होता. प्रेक्षकांमधल्या पहिल्या रांगेत हृतिक आपल्या वडलांसोबत बसला होता. अर्थात, बसला होता म्हणण्यापेक्षा शाहरुखला बघण्याच्या आतुरतेनं अस्वस्थ होता. त्याला आपल्या देवाला अवॉर्ड घेताना बघायचं होतं. तेव्हाचा हृतिक आजच्यासारखा पिळदार शरीर आणि रेखीव चेह-याचा धनी नव्हता. तर त्यावेळच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचं कोवळेपण होतं, चेह-यावर निरागसता होती. म्हटलं तर आजच्यापेक्षाही तेव्हाचा हृतिक अधिक लोभसवाणा होता. इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी शाहरुख आला. तो आलाय बघितल्यावर चित्कार टाकत काही मुली पुढे सरसावल्या. प्रत्येकीला शाहरुखला स्पर्श करायचा होता. त्याच्या जवळ जायचं होतं. इतकं सगळं होत असताना हृतिकचाही धीर सुटत होता आणि त्याला आवरताना राकेश रोशनच्या नाकीनऊ येत होते. शेवटी, हृतिकचा त्या वेळचा अवतार पाहून न राहवून राकेश रोशनने शाहरुखला पुरस्कार मिळण्याआधीच तिथून काढता पाय घेतला होता...


dpsingh@dainikbhaskargroup.com