आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोष एकट्या श्‍वेताचा ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली आणि सध्या अभिनेत्री म्हणून स्थिरावण्यासाठी संघर्ष करणारी श्वेता बासू प्रसाद हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली. पण हा दोष एकट्या श्वेताचा आहे? निदान दीपिका पदुकोण, साक्षी तन्वर, विशाल भारद्वाज, शोभा डे आणि हंसल मेहता यांना तरी तसे वाटत नाही.

‘मकडी’ आणि ‘इक्बाल’ या दोन गाजलेल्या सिनेमांत बालकलाकार म्हणून चमकलेली, त्यातील ‘मकडी’च्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली श्वेता प्रसाद बासू हैदराबाद येथे सेक्स रॅकेटमध्ये सापडल्याची बातमी मीडियामध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाली. अनेक वृत्तपत्रांनी या बातमीला पहिल्या पानावर स्थान दिले. सिनेअभिनेत्री, त्यात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त; असे बातमीला उठाव देणारे घटक असल्यामुळे या घटनेला नको तितके महत्त्व प्राप्त झाले. सिनेमातल्या नट-नट्या चारित्र्यहीन असतात, या गैरसमजाला दुर्दैवाने बळकटीही मिळाली. श्वेताला परिस्थितीमुळे हा मार्ग पत्करावा लागणे हे दुर्दैवी.
किंबहुना, श्वेतानेही आपण नाइलाजाने यात फसल्याचे कबूल केले आहे. आता तिची रवानगी सुधारगृहात झाली आहे. पैशांसाठी शरीर विकायला लागण्याची अशी घटना आजवर असंख्य मुलींबाबत घडली आहे. यातल्या प्रत्येकीची कहाणी विदारक आहे. श्वेताचीही कहाणी याहून वेगळी नसणार. पण यात दोषी एकटी श्वेता आहे, अशा थाटात सनसनाटी बातम्यांच्या आहारी गेलेल्या आणि म्हणूनच असंवेदनशील बनलेल्या मीडियाने तिला नकारात्मक प्रसिद्धी दिली. लेखक-दिग्दर्शक हंसल मेहता आणि लेखिका शोभा डे यांनी मात्र एकट्या श्वेतालाच दोषी धरणा-यांना शिंगावर घेतले. ‘तुम्ही मकडीला पकडलेत, पण सापांचे काय?’ असा थेट सवाल शोभा डे यांनी विचारला. तर ‘तिला जाळ्यात अडकवणारा दलाल वा तिचा उपभोग घेणारे व्हाइट कॉलर बिझनेसमन यांचे काय‌‌?’ असा बोचणारा प्रश्न मेहता यांनी विचारला आहे. श्वेताला भविष्यात तोंड द्याव्या लागणा-या संकटांचा अंदाज घेऊन मेहता यांनी आगामी सिनेमात तिला भूमिका देण्याचे जाहीर केले आहे. अर्थात, एवढे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी श्वेतासारख्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्रीला योग्य काम न देऊ शकल्याबद्दल स्वत:ला पर्यायाने समाजालाही तितकेच दोषी ठरवले आहे.

डे आणि मेहतांनंतर श्वेताच्या आईची भूमिका केलेली साक्षी तन्वर आणि आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणही श्वेतासाठी पुढे सरसावल्या आहेत. साक्षीनेही एक खुले पत्र लिहून मीिडयाच्या पक्षपातीपणाला धारेवर धरत, श्वेताला नकारात्मक प्रसिद्धी देताना जे पुरुष बिझनेसमन यात गुंतले होते, त्यांची नावं का नाही छापली, असा खडा सवाल केला आहे. तर दीपिकाने श्वेताला भावनिक आधार देऊ केला आहे. हे खरे की, समाजाने आखून दिलेल्या मूल्यव्यवस्थेत श्वेताचे वर्तन अस्वीकारार्ह आहे, कायद्याचा भंग करणारेही आहे. अशा प्रकारच्या वर्तनासाठी निश्चित केलेली शिक्षा तिला भोगावी लागणार आहे. त्यातून तिची सुटका नाही. पण सुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर आयुष्याला पुन्हा सुरुवात करण्यासाठी आवश्यक जागा मीडिया आणि त्याला डोक्यावर घेणारा समाज नाकारत असताना दीपिका-साक्षी-डे आणि मेहता यांनी घेतलेली भूमिका खूप धाडसाची आहे. त्यांच्या या ‘चोमडेपणा’मुळे तमाम संस्कृतिरक्षकांचा संताप होत असला तरीही, ही कृती श्वेताचा एक माणूस म्हणून सन्मान करणारी, पर्यायाने नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी तिला मोठे बळ देणारीही आहे.