आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Similaratiy Between Marathi And Sindhi Language

मराठी भाषाभगिनी सिंधी-मराठीतील साम्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाळणीनंतर सिंध प्रांतातून मोठा हिंदू समाज भारताततल्या विविध प्रांतांत स्थायिक झाला आणि कालांतराने त्या त्या प्रदेशाशी एकरूप झाला. सिंधी समाज प्रांतीय भाषा शिकून सर्व प्रकारचे व्यवहार करू लागला. 60-62 वर्षांनंतर ही गोष्ट ठळकपणे जाणवते की सिंधी माणसाने भारतातील प्रांतीय भाषांना महत्त्व देऊन त्या शिकण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तो यशस्वी झालेला आहे.

* मराठी-सिंधी व सिंधी-मराठी भाषांतरे मोठ्या प्रमाणात, मराठीत स्वतंत्र लेखनही :
मराठीपुरते बोलायचे झाल्यास आज अनेक सिंधी विद्वान व व्यावसायिक दिसतील की ज्यांनी मराठी भाषा पूर्णपणे आत्मसात करून प्रावीण्य मिळवले आहे. ही सिंधी माणसं नुसतं फाडफाड मराठी बोलतच नाहीत, तर मराठी-सिंधी व सिंधी-मराठी भाषांतरेही करतात किंवा मराठीत स्वतंत्र लेखनही करतात. काही मराठी माणसांना सिंधी भाषा उत्तम प्रकारे बोलता येते. राष्‍ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हे सुचिन्ह आहे.

* मराठीप्रमाणे सिंधीही संस्कृतोद्भव आणि देवनागरीही :
बहुतेक सर्व भारतीय भाषा संस्कृतमधून निघालेल्या आहेत. सिंधीदेखील संस्कृतोद्भव भाषा आहे. मराठीशी सिंधी भाषेचे फार जवळचे नाते आहे. मराठी-सिंधी भाषाभगिनी आहेत. मी नेहमी म्हणत असतो की सिंधी माझी मातृभाषा आहे आणि मराठी माझ्या मावशीची भाषा आहे. फाळणीनंतर महाराष्टÑात आल्यानंतर माझ्या मावशीची भाषा मला गवसली.

* सिंधी-मराठीत पाच हजार समान शब्द व आहे हे क्रियापदही समान :
सिंधी किंवा मराठी शिकताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, पाच हजारांपेक्षा जास्त शब्द दोन्ही भाषांत समान आहेत आणि अनेक शब्द हे फक्त सिंधी-मराठीतच सापडतात, दुस-या कुठल्याही भाषेत नाही. उदाहरणार्थ ‘आहे’ हे क्रियापद फक्त सिंधी व मराठीत समान रूपाने आढळते, दुस-या भाषेत नाही. उदाहरण म्हणून एक वाक्य पाहूया- ‘माझे नाव लक्ष्मण आहे.’ या मराठी वाक्याचे सिंधी वाक्य होईल- ‘मुहिंजो नांउ लक्ष्मण आहे.’ ‘हे मुंबई शहर आहे.’ = ‘हीउ मुंबई शहरू आहे.’ या ठिकाणी ‘आहे’ हे क्रियापद दोन्ही भाषांमध्ये सारखे आढळते.

* सिंधी देवनागरी लिपीत 53 वर्ण तर मराठीत 48 : सिंधी देवनागरी लिपीत 52 वर्ण किंवा अक्षरे आहेत. म्हणजे स्वर व व्यंजनं मिळून जास्त वर्ण असलेली सिंधी ही भारतातील कदाचित पहिली भाषा असावी. उदाहरणार्थ मराठीत 48 वर्ण आहेत.
* सिंधी वर्णमालेतील अ ते औ हे दहा स्वर व उच्चारही मराठीप्रमाणेच :

सिंधी वर्णमालेतील अ ते औ हे दहा स्वर मराठी, हिंदीप्रमाणेच आहेत. त्यांचा उच्चारही तसाच आहे. क़, ख़, ग़, ज़, फ़ ही व्यजनं अरबी-फारसी भाषेतून सिंधीमध्ये आलेली आहेत. त्यांचा उच्चारही उर्दू-अरबी-फारसीच्या या अक्षरांप्रमाणे होतो.
* सिंधी भाषेची ठळक वैशिष्ट्ये :
1. प्राकृतप्रमाणेच सिंधीचे सगळे शब्द स्वरांत असतात.
2. अकारांत शब्दांच्या शेवटच्या अक्षराचा उच्चार पूर्ण होतो. उदाहरणार्थ ‘खट’ म्हणजे ‘खाट’. यात ‘ट’चा पूर्ण उच्चार केला जातो. मराठीप्रमाणे ‘ट’चा उच्चार पाय मोडून अर्धा केला जाणार नाही. ‘अठ’ (आठ-8), ‘नथ’ (नथ), ‘जिभ’(जीभ), ‘अटक’(अटक), ‘आस’ (आशा), बाड़ (तलफ, हुक्की)
3. अकारांत नामे बहुधा स्त्रीलिंगी असतात. शेवटच्या अक्षराचा उच्चार पूर्ण होतो. उदा. बास (वास, स्वीकृती), पिन (टाचणी, पीन, भिक्षा, भीक), गीत (गटका, घोट, गिळणे), वाउख (उघडीप) वगैरे.
4. ओकारांत नामे बहुधा पुल्लिंगी असतात. उदाहरणार्थ घोडो (घोडा), कुतो (कुत्रा), काको (काका)
5. आकारांत आणि -हस्व-दीर्घ इकारांत नामे बहुधा स्त्रीलिंगी असतात. उदा. माया, काया, जोई (जाया, बायको) इत्यादी.
6. -हस्व-दीर्घ उकारांत नामे बहुधा पुल्लिंगी असतात. उदा. घरु (घर), ग्रंथु (ग्रंथ), गणेशु (गणेश).
7. सिंधीत हिंदीप्रमाणे दोनच लिंग आहेत - पुल्लिंग व स्त्रीलिंग.
8. वचनेही दोनच आहेत- एकवचन व बहुवचन/अनेकवचन.
9. मराठीप्रमाणे सिंधीतही क्रियापदे ‘णकारांत’ असतात. उदा. उथणु (उठणे), खाइणु (खाणे), गाइणु (गाणे).
10. अकर्तृक क्रियापदे सिंधीशिवाय बहुधा दुस-या कोणत्याही भारतीय व युरोपीय भाषेत नाहीत. उदा. 1. नदीअ में तरिजे थो = नदीत पोहलं जातं. 2. पींघे में लुडिबो आहे = झोपाळ्यात झोके खाल्ले जातात.
11. ‘आहे’ हे क्रियापद मराठी व सिंधीत समान आहे हे आपण वर पाहिलेच.
12. काही सर्वनामीय वाक्यांचे शेवट फक्त सिंधीत आणि काही प्रमाणात काश्मिरी भाषेत आहेत. काही वेळेला तर एकाच क्रियापदामध्ये दोन शेवट जोडून कर्ता किंवा कर्म यांचे अर्थ प्रकट केले जातात. असे शब्द जणू ‘शॉर्टहँड’ रायटिंगचं कार्य साधणारे असतात. हे सिंधीचे मोठे व वेगळे वैशिष्ट्य मानले पाहिजे. उदा. मारायाईम = (त्याने) मला (दुस-याकडून) मारविले, खाराईयम = (त्याने) मला खाऊ घातले.
13. इ, उ हे पदाच्या/शब्दाच्या शेवटी आल्यास त्यांचा उच्चार -हस्व होतो. हा -हस्व उच्चार मराठीतील -हस्व उच्चारापेक्षा आणखी कमी वेळेत केला जातो. यासाठी ‘निभृत उच्चार’ असा पारिभाषिक शब्द आहे.
* मराठी माणसाला सिंधी व सिंधी माणसाला मराठी शिकणे सोपे :
उदा. गणेशु या शब्दात शेवटी आलेल्या ‘शु’चा उच्चार मराठीतील -हस्व उच्चारापेक्षा आणखी कमी वेळेत केला जाईल. सिंधीत असे अनेक शब्द आहेत- वेदु, अंगु, खीरु, वीरु, नीरु वगैरे.
तर अशा रीतीने मराठीला जवळ असलेली सिंधी भाषा शिकणे फार सोपे आहे. समानतेच्या आधारे सिंधी माणसाला मराठी शिकणे किंवा मराठी माणसाला सिंधी शिकता येणे अजिबात अवघड नाही.