आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकव आस्थेचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराजवळ असलेल्या बागेच्या फाटकावर सिंहाचे चित्र असल्याने तिची मुलगी त्याला सिंहाची बाग म्हणत असे. फाटकाजवळ उभ्या असलेल्या मुलीला तिने विचारले, ‘या फाटकावर काय आहे? कशाचे बनविले आहे हे फाटक?’ समोरच्या रस्त्यावरील ड्रेनेज पाइपच्या खोदकामाकडे बोट दाखवत ती मुलगी म्हणाली ‘आम्ही हे छी घाण काम करतो. मला कसे माहीत?’ त्या मुलीच्या नजरेत बागेतल्या मुलांबद्दल असणारे एक आश्चर्य आणि आस ती टिपते. तोपर्यंत तिची मुलगी झोक्यावर खेळण्यासाठी पळत जातेसुद्धा. तेवढ्यात जवळच्या वस्तीतील छोट्या मुलांचा एक गट बागेत येतो. मुलगी झोका थांबवून घसरगुंडीकडे धावत जाते. हे पाहिल्यावर बागेतील वॉचमन जोरात शिट्टी वाजवून त्यांच्यावर ओरडतो. आल्याप्रमाणे ती मुलं घाबरून पळून जातात. जवळ येऊन तो म्हणतो, ‘‘ही झोपडपट्टीतील मुलं तोड-मोड करतात. स्वच्छ नसतात. ‘आपल्या’ मुलांना नीट खेळायला मिळत नाही.’’ ती विचार करत राहते. तिला त्या मुलांच्या डोळ्यात प्रेमाची याचना दिसत होती. घरी परतताना तिला शेजारीण भेटते. ‘बागेतील पेरू, पिकू देत नाहीत ही झोपडपट्टीतील मुलं. कधीही कुंपणावरून उड्या मारून आत येतात. यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्याला काही तरी करायला पाहिजे. म्हणजे रविवारी संस्कार वर्ग चालवायचे माझ्या मनात आहे. मला तुझी मदत हवी आहे.’ शेजारणीचा प्रस्ताव चांगला होता. पण........
तिच्या डोळ्यासमोर वस्तीतील अनेक मुला-मुलींचे चेहरे आले. तीदेखील नोकरीसाठी ‘मुंबई नगरी बडी बांका’ येथे आली होती. सुरुवातीला घर नसल्यामुळे भांबावलेली होती. तिची नोकरी चांगली असल्याने ती मध्यमवर्गीय वसाहतीत घर घेऊ शकली होती. नाही तर वस्तीत राहावे लागेल की काय, असे तिलाही वाटून गेले होते. कोणीही स्वेच्छेने अनेक गैरसोयी असलेल्या वस्तीत दाटीवाटीने असलेल्या घरांमधून राहत नसतील, याची तिला खात्री होती. अनेक वेळा झोपडपट्टी निर्मूलन म्हणून बुलडोझरने सरकारी निगराणीखाली झोपड्या तोडल्या जाताना तिने पाहिले होते. तिच्या घराजवळची वस्ती तर 1980 च्या दशकात तीन वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्या घरांकडे पाहिले की तिला वाटायचे, ‘हे लोक किती कल्पक आहेत. टाकून दिलेल्या सामग्रीतून ते घरं तयार करतात. आतून ती राहण्यालायक बनवतात. मुला-बाळांना शाळेत पाठवतात. कष्टाने जगतात. दूध देणे, पेपर टाकणे, गाड्या धुणे, नळ दुरुस्ती, घरकामात मदत अशा मध्यमवर्गीयांना लागणा-या सेवा देतात.’
तिने आनंद पटवर्धनचा ‘हमारा शहर’ माहितीपट पाहिला होता. त्यानंतर आपण किती परस्परावलंबी आहोत, हे तिला प्रकर्षाने जाणवले होते. याचीही माहिती झाली की, मुंबईत 60 टक्के माणसे 20 टक्के जमिनीवर राहतात. तेथे किमान पातळीवरील पायाभूत सेवा नसतात. उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, राजस्थान, महाराष्‍ट्रातील दुष्काळी जिल्हे अशा विविध ठिकाणांहून माणसे जगण्यासाठी मुंबईत दाखल होतात. अनेक प्रकारचे आरोग्याचे, सुरक्षेचे, अनधिकृत निवा-याचे धोके पत्करून जगायला शिकतात. अशा वस्त्यांतून राहणा-या माणसांबद्दल तिला नेहमीच आस्था वाटायची. तेथील मुलं-मुली ‘आपली’ वाटायची. ती आनंदी, विचारी आणि सर्जनशील होण्यासाठी काही करता येईल का, असा विचार तिच्या मनात मधूनमधून डोकावून जायचा. काहीच जमले नाही तर त्यांच्याशी शेजारी म्हणून मैत्री करता येईल का, असे तिला वाटायचे.
मैत्री करायची तर मनाची तयारी करायला हवी, याची तिला जाणीव होती. त्यासाठी गिजुभाई बधेकांच्या कवितेची तिला सोबत वाटली :
‘जर तुम्हाला मुलांसाठी
एकच गोष्ट करायची असेल
तर त्यांना मारणे सोडून द्या.
दोन करायच्या असतील
तर त्यांना रागावू नका आणि
त्यांचा अपमान करू नका ...’
या मुला-मुलींशी मैत्री करून तिच्याही मनात आनंद प्रकाशणार होता. अनेक प्रकारच्या अडचणी झेलत ती जगतात कशी, याची खिडकी ते तिच्यासाठी उघडणार होते. तिच्या मध्यमवर्गीय अनुभवविश्वाला संपन्न करणारा संदर्भ देणार होते. ती शेजारणीला म्हणाली, ‘तुमचा विचार छानच आहे. संस्कारवर्ग वगैरे नको म्हणायला. आपण दर रविवारी वस्तीतील मुला-मुलींशी मोकळ्या गप्पा मारायला जाऊया. त्यात गोष्टी, खेळ, कविता, वाचन असे सर्व काही करता येईल. त्यांच्याशी मैत्री करूया. मी घेईन जबाबदारी.’ आस्थेचे पूल बांधत दर रविवारच्या मोकळ्या गप्पांमधून शिकण्या-शिकवण्यातला आनंद 1993 ते 2005 या दरम्यान त्यांच्यासाठी कसा विस्तारत गेला हे अनुभवणे मोठे रंजक आहे. या काळात वस्तीतील मुला-मुलींबरोबर झालेल्या तिच्या प्रवासातील अनेक वळणांवर आपण थांबणार आहोत. त्यांच्यामध्ये तयार झालेल्या मनोज्ञ नात्याचा अनुभव घेणार आहोत. वस्तीमधील मुला-मुलींच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय वास्तवाबद्दल तिला पडलेले प्रश्न समजावून घेणार आहोत. त्यासाठी आपण महिन्यातून दोनदा ‘आनंद शिकण्या-शिकविण्याचा’ या सदरातून संवाद साधणार आहोत. आपले मत, सूचना, अनुभव आणि प्रोत्साहन यांतून संवाद नक्की प्रगल्भ होईल.
aruna.burte@gmail.com
(क्रमश:)