आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तथाकथित सामाजिक प्राणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण खूप लहानपणापासून एक गोष्ट सातत्यानं वाचतो, ऐकतो, अनुभवतो ती म्हणजे, माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. म्हणजे एकेकाळी प्राण्यांपासून बचाव करायला म्हणून समूहात राहायला सुरुवात केलेल्या मनुष्यप्राण्याला हळूहळू त्याच्या कला, भावना, गरजा समजून घेण्यासाठी, शेअर करण्यासाठी माणसं लागत गेली. आजही कुठलाही आनंद, सण, संघर्ष, कसोटीच्या वेळी आपल्याला आपली माणसं लागतातच की! असं असतानासुद्धा, आज हे सामाजिक दिसणं, असण्यापेक्षा जास्त आहे असं जाणवायला लागतं मला आजूबाजूला पाहिलं की!

तंत्रज्ञान जसं विकसित आणि उपलब्ध होत गेलंय तसं माणसाचं व्यक्त होणंसुद्धा बदलत जातंय, नाही? व्हर्च्युअल एक्स्प्रेशन हा प्रकार किती वाढला आहे! म्हणजे आज जेव्हा फेसबुकवर कुठल्या तरी दूरच्या छोट्याशा खेड्यातले माझ्या ओळखीचे एखादे काका हाय म्हणतात, तेव्हा मला त्यात गंमत वाटते. पण त्याहीपेक्षा मला कधीकधी भीती वाटते, जेव्हा लोक अण्णा हजारेंच्या उपोषणाला फेसबुकवर लाइक करतात किंव्हा एखादी व्यक्ती गेल्यावर तिच्या प्रोफाइलवर आत्म्याला शांती मिळो असे लिहितात. मला भीती वाटते की घरात लॅपटॉप घेऊन तथाकथित जवळ आलेल्या जगात मुशाफिरी करून माणसाचं सामाजिक असणं निभावता येईल?

मी आणि माझ्या बहिणी काहीतरी असाच टाइमपास करत असतो घरी गेल्यावर आमच्या आमच्या लॅपटॉपवर. एकदा बाबा कधीतरी वैतागून म्हणाले, मग आपल्या सगळ्यांकडे फोन आहेत, आपण एक काम करूयात, फोनवरच बोलत जाऊयात न? नाहीतर मी नि आईसुद्धा चॅटवर येतो, आपण तशा व्हर्च्युअल गप्पा मारूयात.

गांधीजींच्या मागोमाग हजारोंच्या संख्येने विश्वासाने जाणारे लोक आणि अण्णा हजारेंच्या उपोषणाला सोशल नेटवर्किंग साइट्सवर मिळणारे हजारो लाइक्स यादरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय आणि कदाचित ह्या सामाजिक असण्यातला चार्मसुद्धा!

माझ्या लहानपणी दस-याला घरोघरी जाऊन सोनं दिल्याचं आहे माझ्या लक्षात, पण आता मात्र ब-याचदा आपण प्रत्यक्ष जाण्यापेक्षा एक एसएमएस पाठवून देतो. मला खूपदा आई म्हणते की आमच्याकडे पैसे नव्हते खूप, पण माणसं जोडली कायम बक्कळ. आमची संपदा ती आहे.

आता गंमत अशी आहे की, टिळकांनी विचारमंथन या हेतूने लोक एकत्र यावेत आणि समाजप्रबोधन व्हावं म्हणून सुरू केलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अजूनही लोक जमतात, पण त्यातून ब-याचदा होते ती गर्दी! त्या उद्देशातला आत्मा बाजूला ठेवून उरलेला चोथा शीला आणि मुन्नीला बदनाम होताना ऐकत राहतो आणि गणराय मखरात बसून सगळं काही पाहत राहतात.

हे चित्र बघून माणूस सामाजिक प्राणी आहे ही बाब चांगली की वाईट असा प्रश्न पडतो.
मला आठवतंय, मी शाळेत असताना भारत, इंग्रज, पारतंत्र्य वगैरे धडे वाचून एकदा आईला विचारलं होतं, सगळे मिळून असून असून असतील कितीसे इंग्रज? चारी दिशांनी सगळे भारतातले लोक गेले असते त्यांच्यावर चालून तर दीडशे वर्षं थोडीच लागली असती? आता मोठी झाल्यानंतर कधीतरी असंही वाटून गेलं की भारतातल्या सगळ्या श्रीमंत माणसांनी ठरवलं तर देशाचं दारिद्र्य दूर नाही व्हायचं पटकन?

दोन्ही विचार कदाचित बालिश आहेत. पण मुद्दा असा आहे की आपलं सामाजिक असणं याबद्दलचे विचार आणि त्याबद्दलचे सत्य याच्यात खूप अंतर पडतंय. प्रश्न आणि अडचणी सोडवण्यापेक्षा ते वाढतील अशा रीतीनं आपण समाजव्यवस्थेचा भाग होतो आहोत. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात एक प्रकरण आहे, ज्यात गावात अवर्षण असल्यामुळं देवळाचा गाभारा आपल्या घरच्या पाण्याने भरायचा ठरते आणि प्रत्येक जण आपल्या घरातून, आपापल्या ताकदीनुसार कळशी, तांब्या, भांडे घेऊन त्यातून पाणी घेऊन जातो. हे प्रत्येकानं सहभागी होऊन गोष्ट सोडवणं दुर्मिळ होतंय असं नाही वाटत तुम्हाला?
शेतक-याच्या मोळीची गोष्टसुद्धा आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली आहे. त्याचं आपण करतो काय हे जास्त महत्त्वाचं, नै का?