आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Social Transition In Western World By Prashant Dixit

जिहाद आणि युरोप ( प्रशांत दीक्षित )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शार्ली हेब्दोने मुस्लिम धर्ममतांची खिल्ली उडविली, प्रेषित महंमदाला साप्ताहिकाचा गेस्ट एडिटर करण्यापर्यंत अगोचरपणा केला व त्याची प्रतिक्रिया म्हणून हल्ला झाला, हा अनेक घटनांच्या मालिकेमधील एक भाग आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दहा लाखांचा जनसमुदाय राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत जमा झाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उच्चार करण्यासाठी युरोपीय समाज एकत्र झाला, हे खरे असले तरी पूर्ण वस्तुस्थिती तशी नाही. खरे तर मुस्लिम संस्कृतीबद्दलच्या भयगंडाची अभिव्यक्ती या जनसमुदायातून झाली होती.

दहशतवादी व युरोपमधील संघर्षाचे आजपर्यंतचे स्वरूप हे राजकीय होते. हा संघर्ष कधी तेलाभोवती फिरत होता, तर कधी अन्य काही तात्कालिक कारणे त्यामागे असत. मात्र, इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना सक्रिय झाल्यापासून या संघर्षाचे स्वरूप बदलले. आता तो दोन जीवनशैलींमधील म्हणजेच माणसाने कसे जगावे, यासंबंधीचा संघर्ष झाला.
युरोपातील राष्ट्रांनी स्वस्त मनुष्यबळासाठी मुस्लिमांना कवाडे खुली करून दिल्याने मुस्लिमांची संख्या वाढली आहे.
फ्रान्समध्ये ती आठ टक्क्यांपर्यंत गेली. जर्मनी, स्वीडन, ब्रिटन, स्पेन या देशांमध्ये ती सहा टक्क्यांपर्यंत आहे. या मुस्लिमांपासून युरोपला आर्थिक धोका नाही. ते व्यवसाय ताब्यात घेत नाहीत वा मोठ्या कंपन्या उभारीत नाहीत. मात्र युरोपातील उदारमतवादी नीतिमूल्यांमुळे स्थलांतरितांनाही अनेक राजकीय व सामाजिक हक्क मिळाले. याचा फायदा घेत
इस्लामी मूल्ये समाजात बळकट करण्याची खटपट तेथे सुरू झाली व त्याला आखाती राजवटींकडून प्रोत्साहन मिळू लागले.

तीस वर्षे हे सुरू आहे. रशियाच्या अफगाणिस्तानातील घुसखोरीनंतर अराजकाला सुरुवात झाली होती. अमेरिकेने त्यामध्ये धर्मांधतेचे विष ओतले, आर्थिक हितसंबंधांमुळे अमेरिकेच्या मागोमाग युरोपही त्यामध्ये ओढला गेला. आधी पॅलेस्टाइन व नंतर हस्तक्षेपाच्या अनेक घटना यामुळे अमेरिकेच्या साथीदारांबद्दल कमालीचा द्वेष मुस्लिम राष्ट्रांमध्ये खदखदू लागला.
ज्यू व इस्रायलला या देशांतून मिळणारे समर्थन हे यामागचे मुख्य कारण होते. या द्वेषाला आखाती देशांतून व्यवस्थित खतपाणी घातले गेले. कारण खिलाफतसाठी ते आवश्यक होते. युरोप-अमेरिकेविरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी युरोपातच लहानाचे मोठे झालेले मुस्लिम तरुण पुढे येऊ लागले.

इस्लामी धर्मराज्य प्रस्थापित करण्यासाठी सर्वस्व झोकून देण्यात या तरुणांना जीवित हेतू सापडू लागला. हे तरुण तंत्रकुशल आहेत, युरोपीय रीतिभाती त्यांच्या अंगवळणी पडलेल्या आहेत. यापैकी काहींनी इराक, सिरियामध्येच बस्तान ठोकले, तर काही जण प्रशिक्षित होऊन पुन्हा युरोपमध्ये आले. अशांची संख्या काही हजारांत आहे. या तरुणांना दहशतवादापासून दूर करण्यासाठी चॅनेल हा प्रशिक्षण कार्यक्रम ब्रिटिश सरकारने हाती घेतला. त्यामध्ये १२८१ तरुणांनी नावे नोंदवली यावरून प्रशिक्षितांची संख्या लक्षात यावी. इस्लामी जनसंख्येचा वाढता वावर युरोपीय जनतेला समोर दिसत होताच. आता दहशतवादाचे प्रशिक्षण घेतलेल्या कुशल युवकांची संख्या लक्षणीयरीत्या जाणवू लागली. यातून युरोपामध्ये भयगंड विस्तारत गेला.
याच वेळी जिहादी संघटनांमध्ये महत्त्वाचे स्थित्यंतर झाले. इस्लामिक स्टेट व अल कायदा यांची सूत्रे अत्यंत जहाल अशा तरुणांकडे गेली. नव्या नेतृत्वाला कोणत्याच मर्यादा मान्य नाहीत.
निरपराध व प्रसंगी मुस्लिमांचेही शिरकाण करण्यास हरकत नाही, अल्लाच्या जवळ ते लवकर पोहोचतील, असे धार्मिक समर्थन नवे नेतृत्व करते. या संघर्षाचे बदललेले
स्वरूप इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता अबू अहमद अदानी याच्या सप्टेंबरमधील आदेशात लक्षात येते. इस्लामच्या शत्रूंशी मुस्लिम राष्ट्रांत न लढता हे युद्ध युरोपात न्या. इस्लामवर श्रद्धा न ठेवणा-यांची सर्रास कत्तल करा. त्यांना कशाही पद्धतीने मारा, असे फर्मान निघाले. हे मूळ फर्मान अंगावर काटा आणणारे व इस्लामिक स्टेटची हिंसक मानसिकता ठळकपणे
दाखविणारे आहे. अश्लील व्यवहार करणा-या फ्रेंचांना लक्ष्य करण्याचे विशेष आवाहन यामध्ये होते. फ्रेंचांनी अमेरिकेबरोबर केलेल्या आघाडीबरोबरच अनिर्बंध स्वातंत्र्याचा आग्रह धरणारी फ्रेंचांची जीवनशैली खिलाफत लादणा-यांच्या डोळ्यात खुपत होती.

इस्लामिक स्टेटकडून निघणारे फतवे, जाहीरपणे होणारे शिरच्छेद, इराक-सिरियाकडे तरुणांचा लागलेला ओघ, त्यांना मिळणारे प्रशिक्षण, त्यातील अनेकांचा मायदेशी वावर या सर्व घटनांची प्रतिक्रिया म्हणजे पॅरिसमधील दहा लाखांचा जनसमुदाय! मतांचे व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अर्थकारण जपणारे राजकीय नेतृत्व इस्लामच्या वाढत्या धोक्याविरुद्ध उघडपणे
बोलत नव्हते. बुद्धिमंत निधर्मीवादाची प्रवचने देत होते. जनतेच्या अस्वस्थतेला वाचा फुटत नव्हती. जर्मनीत ड्रेस्डेन शहरात डिसेंबरमध्ये ती फुटली. Pegida या बॅनरखाली काही जण एकत्र येऊ लागले. पॅट्रेओटिक युरोपिअन्स अगेन्स्ट द इस्लमायझेशन ऑफ द वेस्ट असा त्याचा अर्थ. या संघटनेचे लोक मीडियाला भेटत नाहीत वा पत्रके देत नाहीत. मीडियातील लोक अनेक घटनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून विपरीत प्रचार करीत राहतात, असे संघटनेचे
मत आहे. जाहिरात व्यवस्थापकाने ही चळवळ सुरू केली. त्याचे पूर्वजीवन गुन्हेगारी असले तरी त्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो आहे. दर सोमवारी हे लोक एकत्र येऊन काहीही घोषणाबाजी न करता फक्त शक्तिप्रदर्शन करून इस्लामच्या संभाव्य धोक्याकडे अंगुलिनिर्देश करतात. पहिल्या आठवड्यात काहीशे लोक उपस्थित होते. महिनाभरातच ही
संख्या २० हजारांच्या पुढे गेली. जर्मनीच्या चॅन्सेलर मार्केल यांच्यासह अनेक बुजुर्ग नेत्यांनी, संपादकांनी, कलाकारांनी, चर्चनेही या संघटनेवर झोड उठविली आहे. तिखट टीका वृत्तपत्रांतून होत आहे. नव-नाझी निर्माण होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, इतकी टीका होऊनही पेजिडाचा पाठिंबा वाढतो आहे. महिनाभरातच जर्मनीतील अन्य शहरांमध्येही
शाखा सुरू झाल्या आहेत.

फ्रान्समध्ये असे प्रदर्शन झाले नव्हते. मात्र, शार्ली हेब्दोवर हल्ला झाला त्याच दिवशी ‘सबमिशन’ या वादग्रस्त कादंबरीचे प्रकाशन झाले. मायकेल हॉलेबाक यांच्या या कादंबरीने प्रकाशनापूर्वीच वादळ उठविले होते. २०२२मधील फ्रान्सचे चित्र ही कादंबरी रंगविते. सोर्बोन विद्यापीठातील साहित्याचा प्राध्यापक हा कादंबरीचा नायक आहे. राजकीय उलथापालथीत त्याला परागंदा व्हावे लागते. निवडणूक अत्यंत चुरशीची होते व मोहंमद बिन आबेस हा मुस्लिम, फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष होतो. काही काळानंतर नायक परततो] तेव्हा मुस्लिम राजशकटाखालचे पॅरिस त्याला ओळखता येत नाही. विद्यापीठात बुरखा अनिवार्य असतो, महिलांना नोकरी करण्यास बंदी असते, बहुपत्नी पद्धत कायदेशीर झालेली असते,
सौदी अरेबियाच्या पैशावर प्राध्यापकांना भरगच्च पगार दिला जातो, पण विद्यापीठाचे नाव इस्लामिक विद्यापीठ असे होते व संशोधनाच्या स्वातंत्र्यावर निर्बंध येतात. या परिस्थितीत कसे जगावे, असा प्रश्न स्वातंत्र्यप्रेमी फ्रँकला पडतो.

या कादंबरीवरही सडकून टीका होत आहे. असा इस्लामोफोबिया किळसवाणा आहे, असे डाव्या विचारांच्या पत्रकारांना
वाटते. मात्र, आमच्या मनातील भीती हॉलेबाक यांनी ओळखली, असे बहुसंख्य फ्रेंच मानतात. सध्याचा मान्यवर कादंबरीकार इमॅन्युअल कार यांनी ‘ल मॉन्द’मध्ये लेख लिहून कादंबरीची प्रशंसा केली व जॉर्ज ऑर्वेलच्या ‘१९८४’च्या पंक्तीमध्ये तिला बसविले. हॉलेबाक यांच्या मते, इन्लायंटमेंट काळाकडून भ्रमनिरास झाल्याने धर्मामध्ये अर्थ शोधू पाहणा-या अवनत समाजाचे चित्र ते रंगवतात. या परिस्थितीत युरोपमधील खळबळीचा, बदलत्या परिस्थितीचा अर्थ कसा लावायचा व त्यावर उपाय काय, यावर तेथे मंथन सुरू आहे. मात्र, ठोस उपाय सुचलेला नाही. स्पष्ट कारणमीमांसा करण्याचे धाडस ना नेत्यांकडे आहे ना बुद्धिमंतांकडे. राजकीय नेत्यांना देशाचे व स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपायचे आहेत. मुस्लिम मतांकडेही त्यांचे लक्ष आहे,
तर बुद्धिमंत आपल्या वैचारिक कोषात अडकून पडले आहेत. काही तरुणांनी वेडाचार केला म्हणून इस्लामला धोकादायक समजणे योग्य नाही, या तरुणांना समजून घेतले पाहिजे, असा युक्तिवाद भारताप्रमाणे तेथील बुद्धिमंतही करतात. आर्थिक मागासलेपणामुळे तरुण भरकटतात, या युक्तिवादात फारसे तथ्य नाही. कारण युरोपातील राहणीमान खूप चांगले आहे व गरिबीत राहणारे अन्य धर्मीय बंदुका हाती घेत नाहीत. शार्ली हेब्दोने आततायीपणा केला म्हणून अशी प्रतिक्रिया उमटली, असा बचाव बीबीसीवरही केला गेला. तेव्हा व्यंगचित्राला व्यंगचित्राने उत्तर देता आले असते; बंदुकीने का दिले? असा प्रतिप्रश्न केला गेला. त्याला उत्तर नव्हते.

व्यंगचित्राला व्यंगचित्राने उत्तर देण्याइतकी प्रगल्भता एखाद्या संस्कृतीत विकसित झाली नसेल तर त्या संस्कृतीशी कसे वागायचे, हा प्रश्न युरोपला पडला आहे. प्रबोधन, आर्थिक विकास, काव्य-शास्त्र-विनोद तसेच विज्ञानात आनंद घेणारी जीवनशैली संपविण्याचा विडा कोणी उचलला असेल तर तिचा मुकाबला कसा करायचा? या आततायी गटांपासून इस्लाम
धर्माला दूर ठेवा, असे म्हणणे तात्त्विकदृष्ट्या ठीक असले तरी वस्तुस्थिती तशी आहे का? रिचर्ड डॉकिन्ससारख्या अज्ञेयवादी वैज्ञानिकांचे इस्लामबद्दलचे ट्विट विचार करायला लावणारे आहे. रुपर्ट मरडॉक तसेच म्हणत आहेत. सोमालियाची मान्यवर लेखिका अयान हिरसी अली हिने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील लेखात इस्लाम व हिंसा यांच्यातील परस्परसंबंधांवर काही धारदार प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना पुरोगामी व विवेकवादी विचारांची कास धरणा-या ‘न्यूयॉर्कर’सारख्या साप्ताहिकाचीही गडबड उडाली.

इस्लामच्या सीमा रक्तरंजित असल्यामुळे क्लॅश ऑफ सिव्हिलायजेझन- संस्कृतीमधील संघर्ष- होणे अनिवार्य आहे, असे भाकीत अमेरिकी इतिहासकार सॅम्युअल हटिंग्टन यांनी १९९३मध्ये केले होते. त्या आधी सप्टेंबर ९०मध्ये बर्नाड लेविस यांनी ‘द रूट ऑफ मुस्लिम रेज’ या ‘अॅटलांटिक’ मासिकातील दीर्घ लेखात याचा उच्चार केला होता. या दृष्टिकोनावर डाव्या विचारवंतांकडून प्रखर टीका झाली. ‘फॉरिन अफेअर्स’ या प्रतिष्ठित मासिकाने वादविवाद घडवून आणला. या दृष्टिकोनाचे सोदाहरण विवेचन करणारा ग्रंथ १९९६मध्ये हटिंग्टन यांनी लिहिला. या सिद्धांतात त्रुटी असल्या तरी तो खरा असावा, अशी युरोपची धारणा होऊ लागली आहे.

पश्चिमी जीवनमूल्यांशी इस्लामी मूल्ये सुसंगत नाहीत, असे ६० टक्क्यांहून अधिक पाश्चिमात्य नागरिकांना वाटते. प्यु रिसर्चने युरोप, ब्रिटन व अमेरिकेत नुकत्याच केलेले सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष आहेत. जीवनशैली, जीवनाचे साफल्य वा प्रयोजन यामध्ये विसंगती असेल तर सामंजस्याने एकत्र राहायचे कसे, याचे उत्तर युरोप-अमेरिकेतील समाजशास्त्रींना
अद्याप मिळालेले नाही. आयुधजीवी समाज व बुद्धिजीवी समाज यांचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्न हिंदुस्थानातही प्राचीन काळात पडला होता. त्यावर त्या काळात शोधलेली उत्तरे आणि त्याच्या ब-या-वाईट परिणामांचे विवेचन इतिहासाचार्य वि.
का. राजवाडे यांनी ‘हिंदी समाजात हिंद्वितरांचा समावेश’ या निबंधात केले होते. पाश्चात्त्यांची समावेशन नीती, मुस्लिमांची समावेशन नीती व हिंदूंमधील समावेशन याचा तुलनात्मक अभ्यास त्यामध्ये आहे. आयुधजीवी समाज हा मुस्लिम आक्रमकांसाठी इतिहासाचार्यांनी वापरलेला खास शब्द. या निबंधातून शिकण्यासारखे बरेच काही आहे; पण मग हिंदूंना
समाजशास्त्र समजत होते, हे मान्य केल्यासारखे होईल व त्याला अनेकांची तयारी नसेल.

prashant.dixit@dbcorp.in