आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम फत्ते!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पराकाष्ठा करत ‘मैत्री’ स्टेशनचं काम पूर्णत्वास नेलं. ‘याच मोहिमेत फत्ते करणार’, असं जर्मन पथकाला दिलेलं आव्हान पूर्ण केलं. त्याचबरोबर इच्छाशक्ती असेल तर भारतीय कोणतीही आव्हानं सहज स्वीकारू शकतात, हा आत्मविश्वासही वाढला.
टार्क्टिक जीवसृष्टीसारखी आम्हाला निसर्गाने संरक्षण कवचं बहाल केली नव्हती. आम्ही तिथं परकेच होतो. मानव-निर्मित सुरक्षाकवचं आणि नियमावलींचा अंगीकार करत तगून होतो. बांधकाम आपल्या परीने प्रगतिपथावर होतं. तथापि, जहाजवाल्यांची घाई चालली होती. मार्च उजाडला होता. समुद्र गोठला तर? सर्वांनाच चिंता होती. सर्वात जिकिरीचं काम वॉटर हिटिंग सिस्टिम, ते पुरं झालं आणि सर्वांनाच हायसं वाटलं.

चांगली गोष्ट म्हणजे, मार्चच्या सुरुवातीपासूनच हवामानाची साथ लाभली. पराकाष्ठा करत ‘मैत्री’ स्टेशनचं काम पूर्णत्वास नेलं. ‘याच मोहिमेत फत्ते करणार’ असं जर्मन पथकाला दिलेलं आव्हान पूर्ण केलं. त्याचबरोबर इच्छाशक्ती असेल तर कोणतीही आव्हानं भारतीय सहज स्वीकारू शकतात, हा आत्मविश्वासही वाढला. भारताच्या शिरपेचात तो मानाचा तुरा होता. सॅटेलाइट यंत्रणा कार्यरत होती. तिच्याद्वारे भारताच्या शिरपेचातल्या आणिक एका ‘मानाच्या तुऱ्याची’ वार्ता कानावर आली. भारताच्या कर्नल जितेंद्रकुमार बजाज यांचं पाऊल १७ जानेवारी १९८९ रोजी दक्षिण ध्रुवावर पडलं.
लाकडी बनावटीचं हे स्टेशन लोखंडी अँगल्सवर उभं आहे. याचं कारण वादळं झालीच (ती होणारच) तर वारा अँगल्सच्या मोकळ्या भागातून आरपार जाईल. स्टेशनला त्याचा धोका कमी असेल. स्टेशनाची रचना इंग्रजी ‘U’ अक्षराच्या आकाराची आहे. डावा भाग प्रयोगशाळा तथा वैज्ञानिक उपकरणासाठी. मधला भाग, वैज्ञानिकांच्या रहिवासासाठी आणि उजवीकडचा भाग मेस, रिक्रिएशन आणि प्रसाधनांसाठी. वर एक मजला. तो मुख्यतः साठवणुकीसाठी.
आज हे बांधकाम पूर्ण होऊन, २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, अंटार्क्टिकाच्या खडतर हवामानाला तोंड देत, ते आजही कार्यरत आहे. विविध वैज्ञानिक संशोधनाला ते आधारभूत आहे. अर्थातच त्याचं श्रेय, केवळ आमच्या मोहिमेला जात नसून, त्याची यथायोग्य निगा ठेवणाऱ्या सर्वच मोहिमांना जातं. भारताचं तिसरं स्टेशन (२०१२) ‘भारती’ हेही अंटार्क्टिकावर आज दिमाखात उभं आहे. हे स्टेशन लार्समन हिल भागात "मैत्री’च्या बऱ्याच पूर्वेला म्हणजे, ७६ पूर्व रेखांशावर आहे. (मैत्री १२ पूर्व रेखांशावर आहे.) ‘मैत्री’चं बांधकाम १६०० चौ.मी.चं आहे, तर ‘भारती’चं २५०० चौ.मी. ‘भारती’ची उभारणी १३४ शिपिंग कंटेनर्स एकमेकांना जोडून करण्यात आली आहे. संपूर्ण स्टेशन उष्णतारोधक आवरणांनी आच्छादलेलं आहे. आजतागायत भारताच्या ३०च्या वर मोहिमा अंटार्क्टिकावर गेल्या असून अंटार्क्टिकावर एकापेक्षा अधिक स्टेशन्स असलेला भारत हा जगातला नववा देश आहे.
भारतात परतल्यावर अंटार्क्टिक या विषयावर अनेक स्लाइड शो झाले. शोनंतर बहुतेकांचे प्रश्न, खासगी बाबतीतलेच असायचे. परंतु हळवेपणाला अशा मोहिमांत थारा नसतो. अंटार्क्टिक मोहीम निवडप्रक्रियेत सभासदाच्या शारीरिक आणि मानसिक चाचण्या घेतल्या जातात. ‘होमसिकनेस’ असलेल्या उमेदवारांची निवड केली जात नाही.
तथापि, एका ज्येष्ठ नागरिकाने विचारलेल्या एका प्रश्नाने मला विचार करण्यास भाग पाडले. त्यांचा प्रश्न होता, “तुमचं काम, विज्ञान संशोधन हे सारं प्रकाशात आलं आहे. मला हवंय, अंटार्क्टिक मोहिमेतून तुम्हाला या व्यतिरिक्त काही शिकायला मिळालं का? काही विशेष बोध झाला का?”
या प्रश्नाचं उत्तर मला तत्काळ देता आलं नाही. या प्रश्नात केवळ एकच जण इंटरेस्टेड होता. त्यांचा फोन नंबर मी घेतला. थोडा विचार करावाच लागला आणि उत्तरं मिळालीच. घरी परतताच त्यांना फोन लावला.

या निर्जन भूमीवरही मला एका मानवी नियमाचं प्रत्यंतर आलं. मानवी समाजात उपयुक्त गुणांमुळे एखाद्याचे शोषण होत असते. अनेक वनस्पती-प्राणी प्रजातींचं उपयुक्ततेनुसार शोषण होतं. सह्यपट्ट्यात आढळणारी अत्यंत उग्र दर्पाची वनस्पती, नावच मुळी नरक्या. तिच्या वाटेला कुणी जायचं नाही. परंतु कॅन्सर उपचारात तिची उपयुक्तता सिद्ध झाली आणि तिचं नामाभिधान झालं, ‘अमृता’. उपयुक्तता सिद्ध झाल्यावर अमृताची वारेमाप तोड झाली. ती आज नष्टांशाच्या गर्तेत आहे. अंटार्क्टिकातील सील्स आणि व्हेल्स हे तर अतिउपयुक्त जलचर. त्यांचीही गत अशीच झाली.
परतीच्या प्रवासात एक विचार सतावत होता. इतके दिवस पृथ्वीवरील प्रदूषणविरहित प्रदेशात राहिलो, आता आपला प्रवास प्रदूषित जगाकडं चाललाय. गोव्यात उतरल्यावर लष्करी बँडच्या ताफ्यात आमचं स्वागत झालं. स्वजनांना भेटताही आलं. परंतु मनसोक्त गप्पा मारता आल्या नाहीत. आमच्यात आडवं आलं, कस्टम खातं. त्यांनी बराच वेळ खाल्ला. बायकोने विचारलं,
“अंटार्क्टिकात कोण कसली तस्करी करू शकतो?”
मला तो प्रश्न निरर्थक वाटला. माझ्यासोबत ‘अंटार्क्टिकावरील ६५ किलो दगड होते, १२५ लिटर पाणी होतं, लायकेन आणि अल्गीचे नमुने होते, हवेच्या नमुन्यांचे शेकडो फिल्टर्स होते. हे सर्व आमच्या अभ्यासाचे विषय होते, हे पटवून दिल्यानंतर सँपल्स व माझी सुटका झाली. ‘कस्टम चेकिंग’ ही भारतात आल्याची पावती होती.
(समाप्त)