आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवडयाच्‍या बनातली कृष्‍णधून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सापाला ध्वनिज्ञान नसते, हे आता सर्वज्ञात आहे. तथापि इतर पशुपक्ष्यांना आवाजाशी काही सोयरसुतक असते का? हे प्राणी सूर-संगीताचा आस्वाद घेऊ शकतात का?

कृष्णदेव बासरी वाजवायचे तेव्हा त्यांच्या भोवताली गायी जमा होत, तल्लीनतेने त्या सुरावटीचा आस्वाद घेत, हा आपला पौराणिक दाखला. वर्तमानातली गोष्ट; माझा पुतण्या बासरी वाजवतो तेव्हा खिडकीमध्ये कबुतरे जमा होतात. संगीताच्या सान्निध्यात गायी जास्त दूध देतात, असेही प्रयोगांती सिद्ध झाले आहे. संगीताचा असा हा महिमा. तथापि वन्यपशू आणि संगीत यांचे भावबंध असू शकतात का?

सागर-किनार पदभ्रमण अभ्यास दौ-यांचे दिवस. ओडिशातील छत्रपूरला होतो. आमच्या परमाणू विभागाच्या गेस्टहाउसवर मुक्काम होता. हे गेस्टहाउस शहरापासून दूर- जंगलातच होते, म्हणा ना! रात्रभर कोल्हेकुईने सतावले. गेस्टहाउसचा मॅनेजर बोलला, ‘या भागात कोल्ह्यांनी उच्छाद मांडलाय.’


दुस-या दिवशीचा ट्रेक गोपालपूरकडे होता. मॅनेजरने आम्हाला सावध केले, ‘हा भाग तर पक्का रानवट. जपून जा. या भागात कोल्ह्यांचा वावर फारच आहे.’


त्याचे आभार मानून आम्ही चालायला सुरुवात केली. सारी तांबड्या मातीची पायवाट. दोन्ही बाजूला केवड्याचे दाट रान. केवडादेखील एवढा-तेवढा नव्हे, चांगला 4-5 मीटर उंचीचा. वाटेवर चुकूनच भेटला तर एखादा माणूस भेटायचा. एक म्हातारी भेटली. तिच्या डोईवर केवड्याची मोळी. उत्तर प्रदेशातील कनौजचे व्यापारी हे केवडे विकत घेतात. कनौज म्हणजे भारतातील अत्तर निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. आमच्या या भ्रमंतीत एके ठिकाणी जरा मोठी वाट आढळली. या वाटेवरून बैलगाडी चालली होती. गाडी केवड्यांनीच भरलेली. गाडी चालताना तांबडी धूळ उडाली आणि कपड्यांवर धुळवड झाली. अवाढव्य केवडा जशी या परिसराची ओळख होती, तशीच राक्षसी वारुळेही. चांगली 3-4 मीटर उंचीची वारुळे, त्या तांबड्या वाटेवरच्या टेकड्या वाटायच्या.

पायवाट संपली आणि आम्ही टार रोडला लागलो, लक्ष्मीपुरम नावाच्या छोट्या गावाला नेणारा रस्ता. कोप-यावर चहाची टपरी पाहताच तरतरी आली. चहा पिता पिता आमच्या मराठीतून गप्पा चाललेल्या. त्या ऐकून चहावाल्याला भरते आले. तो आमच्याशी मराठीतून बोलू लागला. कधी काळी त्याने दहा वर्षे मुंबईत भायखळा भागात व्यतीत केली होती. ‘मराठी’ पाजळण्याची संधी ‘चालत चालत’ आली होती.

‘पुढे कुठे जाणार?’ वगैरे चौकशा झाल्या.

आमचे उत्तर, ‘गोपालपूर.’

‘हा रस्ता सरळ गोपालपूरलाच जातो.’

त्याने टार रोडने जाण्याचा सल्ला दिला. वर इशाराही दिला, ‘केवड्याच्या बनात कोह्यांचा सुळसुळाट आहे.’
टार रोडने जाणे आम्हाला सोसणारे नव्हते. आम्ही केवड्याच्या बनात शिरलो. दाट बन. दाट सावली. सावलीत थोडा विसावा घ्यायचे ठरले. आम्ही विसावलो. आमच्यातला विजय देसाई चांगला बासरीवादक. त्याला बासरी वाजवण्याची विनंती केली. विजयने बासरी काढली. पहाडी धून छेडली. विजय तल्लीन होऊन वाजवत होता. आम्ही तल्लीनतेने ऐकत होतो. सारे जण त्या सुरावटीतच धुंद होते. आमच्यापैकी एकाचे आजूबाजूला लक्ष गेले. हळुवारपणे त्याने आम्हा सर्वांना सावध केले. तेव्हा कुठे आमच्या ध्यानात आले, आम्ही सात-आठ कोह्यांनी घेरले गेलो होतो. एव्हाना विजयलाही परिस्थितीची जाणीव झाली. त्याचे बासरीवादन थांबले, मात्र कोल्हे केवड्याच्या बनात गुल झाले. ते कोल्हे श्रोते होते? हरिप्रसाद चौरसियांचा बासरीवादनाचा कार्यक्रम असावा; कार्यक्रम आटपावा; संगीताची धून मनात घोळवत रसिकांनी घरी परतावे, तसे काहीतरी त्या क्षणी घडले. काहीसे अकल्पित; बरेचसे नैसर्गिक.