आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Student Parents Relations By Smita Kelkar

एज्यु कॉर्नर: पाल्यांचे पाठबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोर्डाची परीक्षा म्हटले की, विद्यार्थ्यांच्या काळजाचे ठोके वाढतातच. पण त्यापेक्षाही जास्त जर कोणाच्या हृदयाची धडधड वाढत असेल तर ती वाढते पालकांची. विद्यार्थ्यांपेक्षा पालकच आजकाल परीक्षेबद्दल जास्त चिंताग्रस्त आढळून येतात. का बरं नाही होणार? आजच युग हे स्पर्धामय युग आहे. ज्या क्षेत्रात जाल, तिथे स्पर्धा. अशा या स्पर्धामय युगात, जर आपल्याला टिकून राहायचे असेल, नाव कमवायचे असेल, तर इतर स्पर्धकांपेक्षा पुढे जाणे, किमान त्यांच्या बरोबरीने तरी राहणे काळाची गरज बनली आहे. याकरिता, परीक्षेत आपला पाल्य भरघोस यश कसे मिळवेल, याकडे पालकांनी आपले लक्ष्य एकवटलेले असते. परंतु पालकांची ही चिंता, काळजी जर मुलांच्या तणावाचाच कारण बनली तर मग? याकरिता पदोपदी पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक ठरते. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना पालकांकडून जास्तीत जास्त पाठबळ व सहकार्य अपेक्षित असते. पालक वेगवेगळ्या प्रकारे, पाल्याला सहकार्य करू शकतात. त्यांना अभ्यासात मदत करण्यापासून ते त्यांना शारीरिक व मानसिक तणावापासून दूर ठेवण्यापर्यंत अगदी सर्व (Just be for them 24 X 7) काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्या पालकांनी समजून घेऊन, त्यांचे पालन करणे फायदेशीर ठरते. प्रत्येक छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या अशा सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. आपला जास्तीत जास्त वेळ त्यांना देण्याचा प्रयत्न करा.

आठवा तो आपल्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस. त्याचे चिमुकले हात हातात घेऊन तुम्ही त्यांना शाळेत घेऊन गेलात. तो शाळेत रडू नये, शाळेतील वातावरणात समरस व्हावा, यासाठी तुम्ही काय काय नाही केले. सर्व छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले. तेच प्रेम, तीच आपुलकी, तीच खबरदारी आताही आपल्या मुलांना हवी आहे हे समजून घ्या. त्यांना हवी आहे, ‘तुमची साथ’, ‘तुमचे प्रेमळ सहकार्य’, ‘तुमची प्रेमळ थाप’.

घरात अभ्यासाकरिता अनुकूल वातावरण निर्माण करणे
अभ्यासाकरिता, अनुकूल वातावरण करावे याकडे पालकांनी आपले संपूर्ण लक्ष एकवटले पाहिजे. त्यामुळे अभ्यास जलद गतीने करणे मुलांना सहज शक्य होईल. खरे म्हणजे हा कालावधी म्हणजे एक संधी असते, आपल्या मुलांबरोबर एक घनिष्ठ मैत्री करण्याची एक संधी असते. त्यांचे मार्गदर्शक बनण्याची, त्यांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन करत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत त्यांचे मनोबल उंचावण्याची.

क्रियाशीलतेसाठी प्रयत्नशील असावे
पाल्यांना योग्य व पौष्टिक आहार द्या. दररोज नियमित वेळेवरच आहार केला गेला पाहिजे याची खबरदारी घ्या. परीक्षेच्या कालावधीत आहाराचे, अभ्यासातील महत्त्व त्यांना पटवून देणे गरजेचे ठरते. त्यांच्या आहारात दूध, फळे, पालेभाज्या, कडधान्य, सुका मेवा यांचा जास्तीत जास्त समावेश करा. ताण-तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्याचबरोबर एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शारीरिक व्यायाम, योग फायदेशीर ठरतो.

अभ्यासाचे नियोजन करण्यात मदत
मुलांना वेळापत्रक बनवण्यात, सरावाचे नियोजन करण्यात सहकार्य करा. दुर्लक्षित गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून द्या. जर तुम्ही यात कुशल नसाल तर शिक्षकांची मदत घ्या. मुलांना ६ ते ८ तास झोप मिळेलच याची खबरदारी घ्या. जर मुले झोपेला एवढा वेळ देत नसतील तर त्याचे शरीरावर व त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीत होणारे दुष्परिणाम त्यांना पटवून घ्या.

प्रथम स्वत: टी. व्ही. प्रकर्षाने टाळा
अगदी आपण दुस-या खोलीत बसून छोट्या आवाजात टी.व्ही. पाहिला तरीही. आपल्या मुलांनी एकाग्रतेने अभ्यास करावा अशी जर आपली इच्छा असेल तर स्वत: टी. व्ही. पाहण्याचे टाळा. त्यामुळे मुलांची एकाग्रता तर वाढेलच पण त्याचबरोबर तुमच्याविषयी एक वेगळीच आत्मीयता मुलांच्या मनात निर्माण होईल आणि एका वेगळ्या जिद्दीने, आत्मविश्वासाने मुले अभ्यास करतील. सतत परीक्षा, अभ्यास याबद्दल चर्चा करून घरात गंभीर वातावरण निर्माण करू नका. ज्यामुळे अनावश्यक भीती नैराश्य मुलांमध्ये निर्माण होईल. चांगला न गेलेल्या पेपरची चर्चा वारंवार करू नका. कारण त्याचा परिणाम पुढच्या पेपर्सवरही होण्याची शक्यता असते.