आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Successful Woman Who Is Stands On Self Feet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखदु:खाचा गुंफुनि धागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण फक्त चौथी. भांडवल नगण्य. पाठबळ, जागा या कशाचाही पत्ता नाही. पण किमया झाली. किमयागार होती एक स्त्री. ती समाजासाठी झटत होती. निराधार स्त्रियांची तिला पर्वा होती. इतकेच नव्हे तर येईल त्या संकटावर मात करून काटेरी वाटेवरूनही जोमाने धावत होती. मनाच्या निश्चयाला कुणीही अडवू शकत नाही, हेच तिने आपल्या ध्येयसिद्धीने आणि कार्यकर्तृत्वाने जगाला दाखवून दिले. ते होते ताराबाई पाध्ये नावाचे एक वादळ, जे आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन चालत होते.

‘क्रियासिद्धिर्भवति महताय् नोपकरणे’ अर्थात ‘साधनांचा अभाव, परिस्थितीची प्रतिकूलता जरी असली तरी काही लोक आपले कार्य पूर्णत्वास नेत असतात.’ तसेच काहीसे शारदा उद्योग मंदिराबाबत झाले. अमरावती शहराचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास शारदा उद्योग मंदिरच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. गरीब, गरजू, परावलंबी स्त्रियांना मदतीचा हात देऊन त्यांचे संसार उभे करणे, सुरळीत ठेवणे हाच हेतू डोळ्यापुढे ठेवून ताराबार्इंनी अनेक सुसंस्कृत आणि सुखवस्तू घरांतील महिलांना एकत्र आणले आणि शारदा उद्योग मंदिरचा पाया रोवला. भव्य वास्तू, उत्तम व्यवस्थापन, कडक शिस्त आणि मायेचा ओलावा यातून ही संस्था मोठी झाली. प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेल्या धैर्याने ती भरभराटीला आली. विशेष म्हणजे, सरकारी मदतीचा इथे लवलेशही नाही.

मंदिरात समाजाच्या सर्वच स्तरांतील लोकांचा वावर असतो. शारदा उद्योग मंदिरही असेच आहे, जिथे विचार होतो, तो प्रामुख्याने समाजातील दुर्बल, पीडित, असहाय लोकांच्या, श्रमिकांच्या हितसंवर्धनाचा.

शहराच्या मध्यभागी, जयस्तंभ चौकात असलेल्या शारदा उद्योग मंदिराला वरील उक्ती लागू पडते. गरीब, निराधार, परित्यक्ता अशा स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य सुरू झाले. संस्था जन्माला आली तेव्हा अवघे 357 रुपये भांडवल, पेपरमिंट बनवण्याचे यंत्र आणि एक शिवणयंत्र अशी अपुरी साधनसामग्री होती. मात्र, सहकार्य व परोपकारावर ठाम श्रद्धा असलेल्या भगिनी डगमगल्या नाहीत. परिणामी दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी, ध्येयासक्ती, आत्मविश्वास यावर उभी असलेली ही भव्य इमारत आज दुस-या पिढीच्या हातात आहे. या पिढीनेदेखील या संस्थेचे संवर्धन अत्यंत संयम आणि आपुलकीने केले आहे.


परिस्थितीने खचलेल्या आणि निराधार झालेल्या महिलांना आर्थिक आधाराची गरज असते. त्यांना मदत करण्याचे दोन मार्ग असतात. पहिला म्हणजे त्या व्यक्तीला मदत करणे आणि दुसरा म्हणजे तिला संकटावर मात करण्यास सक्षम बनविणे. शारदा उद्योग मंदिरच्या संस्थापिका ताराबाई पाध्ये यांनी दुसरा मार्ग निवडला. त्यांनी गरजू महिलांना शारदा उद्योग मंदिरामध्ये रोजगार दिला.

त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी मोठा हातभार लावला. तेव्हापासून केवळ शिकलेल्याच नाही, तर ज्या शारदांना शिक्षणाचा साधा गंध नाही, त्याही रोजगाराचे धडे येथे गिरवतात. त्यांना हळद, तिखट, मसाले, लोणची, साखरांबा, पापड, कुरवड्या, फेण्या, फराळाचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लग्नात ठेवण्यात येणा-या रुखवताच्या वस्तू, साखरेची भांडी, हलवा, हलव्याचे दागिने, मोत्याचे नारळ आदी खाद्यवस्तू व इतर वस्तू तयार करायला शिकवले जाते.
कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून त्या वस्तू तयार करवून घेतल्या जातात. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना मग संस्था बाजारपेठ उपलब्ध करून देते. शिवाय श्रमिक वर्गासाठी 10 रुपयांत दोन भाकरी आणि झुणका हा उपक्रम गेली अनेक वर्षे अविरतपणे सुरू आहे.

शारदा उद्योग मंदिरची उपलब्धी आणि कार्याचा व्याप पाहूनच वीर वामनराव जोशी यांनी अमरावती नगरपालिकेचे अध्यक्ष असताना जयस्तंभ चौकातील सराय बिल्डिंग एक रुपया वार्षिक भाड्याने दिली. आजही ही संस्था येथेच सुरू आहे. संस्थेच्या विकासात ताराबार्इंचे पती भय्यासाहेब पाध्ये यांचेही मोठे योगदान होते. संस्थेच्या विकासाच्या विविध योजना आखणे, पत्रव्यवहाराकरिता मार्गदर्शन करणे, हिशेब तपासणे अशा महत्त्वाच्या कामी त्यांची खूप मदत झाली.
जयस्तंभ चौकात डौलाने उभ्या असलेल्या शारदा उद्योग मंदिरच्या वास्तूमध्येच अन्नपूर्णा भोजनालय आहे. येथे सुग्रास जेवण माफक दरात उपलब्ध करून दिले जाते. इतकेच नव्हे तर कर्मचारी महिला आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहदेखील येथे आहे. बडनेरा रेल्वेस्थानकावर 1955पासून कँटीन चालविले जात आहे. रेल्वे कँटीन चालविणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. संस्थेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहेच, अमरावतीकरांसाठी गौरवाची बाब आहे.
ताराबार्इंनी स्वत:पुरता विचार न करता ‘योग कर्मसु कौशलम्’ या उक्तीचा अंगीकार करून दुर्बल, निराधार घटकाला आधार दिला, त्यांचे स्वप्न साकार केले.
माणसाला तरी सुख, शांती आणि आनंद याशिवाय दुसरे काय हवे असते? ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ तसेच ‘मन एवं मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो’ हाच प्रगतीचा मार्ग आहे, विकासाचा, उन्नतीचा मार्ग आहे, हेच शारदा उद्योग मंदिराच्या यशातून दिसून येते.

सहा दशकांपूर्वी रोवलेल्या या बीजाचा पाहता पाहता वृक्ष झाला. या वृक्षाच्या सावलीखाली आज अनेक कुटुंबे स्थिरावली आहेत. ‘सुखदु:खाचा गुंफुनि धागा, पट विणला आयुष्याचा’ या उक्तीचा प्रत्यय या वृक्षाखाली आल्याखेरीज येत नाही.

एकीकडे खासगीकरणाचे वारे वाहत असताना शारदा उद्योग मंदिरसारख्या संस्थांची आज देशाला खूप गरज आहे. काळानुरूप लोकांची आवडनिवड बदलत जाते, पिढी बदलते, स्पर्धा निर्माण होते, तरीही शारदा उद्योग मंदिर हे अनेकांचे आवडते आणि हक्काचे ठिकाण आहे. हीच संस्थेच्या प्रेमाची खरी पावती होय.
शासनाकडून एका दमडीचेही अनुदान न घेता स्वबळावर चालणारी ही संस्था बदलत्या युगात मागे पडू नये म्हणून भविष्यकाळाची योजना आखत आहे. त्यातही विचार आहे तो केवळ समाजातील शारदांचाच. सर्व गोष्टींचे ज्ञान असूनही व्यक्ती संगणकाशिवाय निरक्षर आहे, हे ओळखून संस्थेच्या अध्यक्ष कुंदाताई पाध्ये यांनी महिलांसाठी कॉम्प्युटर कोर्सेस सुरू करायचा विचार केला आहे.

शिवाय उत्पन्नाचे साधन म्हणून भविष्यात ड्रेस डिझायनिंगसारखे क्लासेस सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. बदलत्या काळानुरूप संस्था कात टाकत आहे. आतापर्यंत कागदोपत्री चालणारे काम आता संगणकीकृत होत आहे. संस्थेशी जुळणा-या महिलांची व्याप्ती मोठी आहे. स्त्रियांनी समाजोपयोगी कार्यासाठी पुढे यावे, एवढीच माफक अपेक्षा संस्थेची समाजाकडून आहे.