आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sunil Gagopadhyay Novel By Shashikant Sawant, Rasik

वैश्विक कादंबरी पहिला जाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतेक धार्मिक ग्रंथांत मानवी संस्कृतीची सुरुवात पुरापासून होते. बायबलमध्ये सुरुवातीला पूर येतो आणि नोहा आपल्या प्रसिद्ध नौकेत पशू-पक्षी आणि प्राण्यांना आश्रय देते. वामनपुराणात मनूच्या माशाची गोष्ट आहे. पूर आल्यावर मासा मनूला वाचवतो आणि उंच शिखरावर घेऊन जातो. सर्व महाकाव्ये नद्यांच्या तीरांवर रुजतात आणि हजारो वर्षांत त्यातील काव्य पाहत राहतात, तेव्हा त्याला महाकाव्याचा दर्जा प्राप्त होतो. बहुतेक मोठ्या कादंब-या आपला आश्रय संपृक्त करण्यासाठी नदीचा आधार घेतात. ‘क्वाईट फ्लोज द डॉन’ किंवा मिसीसीपी काठी घडणारी आणि मिसीसीपीचा आश्रय घेऊन उभी राहिलेली ‘अॅडव्हेंचरस ऑफ अकलबरी फिल्म्स’सारखी कादंबरी असो.

सुनील गंगोपाध्याय यांच्या पहिली जाग या महाकादंबरीचा दुसरा भाग नदीकिनारी सुरू होतो. आणि जागोजागी असलेली नदी आणि समुद्र हे टागोरांना कवितेची स्फूर्ती देते. टागोरांप्रमाणेच बंकिमचंद्र, रामकृष्ण, विवेकानंद, भगिनी निवेदिता, जगदीशचंद्र बोस, योगी अरविंद इतकेच काय, महाराष्ट्रातील चाफेकर बंधू, गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा गांधी, नटी विनोदिनी, लॉर्ड कर्झन अशी अनेक मोठी व्यक्तिमत्त्वे कादंबरीत येतात.
इतकी मोठी कादंबरी लििहणे काय, वाचणेसुद्धा बौद्धिक कष्टाचाच भाग आहे. सिनेमाप्रमाणे यात विविध ट्रॅक्स येतात. रिपुराचे कविमनाचे राजे वीरचंद्र यांच्यापासून कादंबरीला सुरुवात होते. आपल्या प्रिय राणीच्या मृत्यूनंतर एका नवोदित कवीच्या कवितेमुळे त्यांना सांत्वन लाभते. ते कवी म्हणजे टागोर होय. त्यानंतर राजे स्वतःच टागोरांना येऊन भेटतात. यानंतर कादंबरीत टागोरांची कथा सुरू होते. टागोर यांची जमीनदारी, शांतिनिकेतनची स्थापना, नोतून बाऊठाण या आपल्या प्रिय वहिनींशी असलेले तरल नाते (ज्यावरून चारुलताची कथा नष्टनी त्यांना सुचली.), त्यांचे बंधू आणि इतर कुटुंबीय, विविध कविता स्फुरतानाची त्यांची मन:स्थिती, टागोर कुटुंबीयांचे त्या काळातील कलकत्त्यातील वेगळेपण असा टागोर घराण्याचा बराचसा इतिहास कादंबरीत येतो. नंतर गोष्ट येते ती कलकत्त्यातील थिएटरची. घोषाल बाबू, नटी विनोदिनी, नयन मनी अशा बंगाली रंगभूमी गाजवणा-या व्यक्तिमत्त्वांबरोबरच स्टार थिएटर आणि त्याच्याशी स्पर्धा करणारे थिएटर हा कादंबरीचा आणखी ट्रॅक.
कादंबरीत अथपासून इतिपर्यत भेटते ते भरत हे सामान्य पात्र. अत्यंत गरीब आणि वखवखलेला, पण ज्ञानाची आस असलेला भरत हा त्रिपुराच्या राजांचा अनौरस पुत्र आहे. ज्याला राजाचा रोष झाल्यामुळे चक्क दूर जंगलात गळ्यापर्यत पुरण्यात येते, पण कसाबसा वाचतो आणि कलकत्त्याला येतो. त्याच्यावर लोभ करणारा शशिभूषण त्रिपुराच्या राजवाड्यात काम करीत असतो. तो भरतला सतत मदत करतो आणि शशिभूषणचा जीव जिच्यावर जडतो ती भूमीसुद्धा भरतकडे आकृष्ट झालेली असते. सुंदर गाता येणारी, नृत्य करता येणारी भूमीसुद्धा बंगाली रंगभूमीवर नयन मनी या नावाने वावरते. तिकडे भरत पदवीधर होऊन बँकेचा ऑफिसर बनतो. तो आयुष्यात स्थिरावला आहे, असे वाटत असताना पत्नी मरण पावते. आपल्या मुलाला सास-याकडे सोडून भरत परागंदा होतो आणि अक्षरशः भिका-यासारखे आयुष्य जगू लागतो; पण द्वारका नावाचा मित्र त्याला ओळखतो आणि पुन्हा माणसात आणण्याचा प्रयत्न करतो. तरीही भरतचा प्रवास चालूच राहतो. महाराष्ट्रात नागपूरपर्यत पोहोचतो आणि चाफेकर बंधूंतील एकाबरोबर त्याला अटक होते. हा सारा कथाभाग १७७४ पानांना जोडून ठेवतो आणि अश्वत्थाम्याशी साम्य सांगणारा भरत त्या काळच्या बंगालचे रुपक वाटायला लागतो. अंधश्रद्धा, सतीसारख्या प्रथा, कालीला बळी द्यायची प्रथा अशा विचित्र स्थितीत असलेला बंगाल हळूहळू ब्राह्मोसमाज, इंग्रजी शिक्षण, केशवसेन आणि टागोर प्रभृतींनी केलेले सामाजिक कार्य आणि लेखन यामुळे हळूहळू प्रबोधनाच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे दिसते. दरिद्री आणि अर्धपोटी भरतचा शिक्षण आणि मैत्रीप्रेम यातून झालेला विकास त्याला समांतर आहे. पण भरतवरची संकटे संपत नाहीत. तसेच त्या काळच्या बंगालचे दुष्काळ, भूकंप, इंग्रजांची लूटमार या सा-यांचे चित्र गंगोपाध्याय यांनी प्रचंड संशोधनाचा आधार घेऊन केलेले आहे.
नाटक मंडळीतील तेव्हाची सुंदोपसुंदी आणि पडद्यामागचे राजकारण हेदेखील बंगालचा सांस्कृतिक इतिहास सांगतो. प्रसंगी गंगोपाध्याय यांची लेखणी बंगाली व्यक्तिमत्त्वातील दोष खूप कठोरपणाने दाखविते.
चार-पाच ट्रॅक एकत्र करून सुनिल गंगोपाध्याय यांनी अनेक कादंब-या एकत्र करून महाकादंबरी बनविली आहे का? तसे असेल तर तो शॉर्टकट झाला, पण या सा-याला समृद्ध असे गद्य आणि काव्यात्मकतेची जोड देऊन गंगोपाध्याय यांनी कादंबरीच्या कॅन्व्हासवरील प्रतिमा आणि पार्श्वभूमी एकजीव केली आहे. यामुळे वेगळ्या कहाण्या सुट्या वाटत नाही आणि त्यामुळेच ही कादंबरी सुट्या पण लांबलचक कादंब-यांची गुंफण वाटत नाही. १८८० ते १९१० या तीस वर्षांत भारतभरात घडलेल्या घडामोडींचा उल्लेखही येतो. जे गांधीजी कलकत्त्यात येऊन निराश होऊन परत गेलेले तेच नेतृत्वाच्या दिशेने जाताना दिसतात. ज्या रँडच्या खुनाचा संपूर्ण भारतभरात झालेला परिणाम काय होता, हे आपल्याला इथे मोठ्या परिप्रेक्षातून कळतो.
साहित्य अकादमीनेही कादंबरी मराठीत केवळ सातशे रुपयांत उपलब्ध करून दिलेली आहे. बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद रंजना पाठक यांनी केलेला आहे. मुख्य म्हणजे, या कादंबरीची पहिली आवृत्ती संपली आहे.वाचनाची आवड कमी होते आहे. वाचनसंस्कृतीचे काय होणार, अशी काळजी करणा-यांना यातून उत्तर मिळू शकेल.
* पहिली जाग
* सुनील गंगोपाध्याय
* मराठी अनुवाद ः रंजना पाठक
* पृष्ठसंख्या : १७७४
* प्रकाशक : साहित्य अकादमी
shashibooks@gmail.com